Oct 18, 2021
कथामालिका

एक आगळेवेगळे लग्न भाग ५२

Read Later
एक आगळेवेगळे लग्न भाग ५२
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

मागील भागाचा सारांश: सौरभने हॉस्पिटलच्या कामाचा सर्व भार सांभाळल्याने मैथिलीला खूप छान वाटत होते. केतन सौरभच्या कामाचे कौतुकही करत असे. केतनला अमेरिकेतून परत यायला पंधरा दिवस राहिले असता मैथिली हॉस्पिटल बघण्यासाठी जाते. हॉस्पिटलचं इंटेरिअर बघून ती खूप आनंदी होते. हॉस्पिटल फिरता फिरता तिची नजर एका केबिनवर पडते, त्या केबिनच्या दरवाजावर डॉ मैथिली पाटील ही पाटी असते, आपल्या नावाची पाटी बघून मैथिली शॉक होते, हॉस्पिटलमध्ये स्वतःची केबिन असण्याचे तिचे स्वप्न केतनने पूर्ण केलेले असते.

आता बघूया पुढे......

केतनने सांगितल्या प्रमाणे मैथिलीने नाशिक मधील मोजक्या डॉक्टरांना व मेडिकल क्षेत्राशी संबंधित लोकांना हॉस्पिटलच्या उदघाटनासाठी आमंत्रित केले. केतन यायच्या आदल्या दिवशी मैथिली त्याच्या घरी गेली आणि तिने घराची आवरासावर करुन ठेवली. तीन महिने घर बंद असल्याने घरात बरीच धूळ साचली होती, सर्व घर मैथिलीने स्वच्छ केले होते.

केतन व त्याची आई दुसऱ्या दिवशी अमेरिकेतून आपल्या घरी परतले. घराचा दरवाजा उघडून आत गेल्यावर केतनची आई म्हणाली," केतन मैथिलीने घर तर एकदम लखलखीत करुन ठेवले आहे, घराला बघून कोणीही म्हणणार नाही की हे घर तीन महिने बंद असेल."

केतनची आई बोलत असतानाच मैथिली तिथे येऊन म्हणते," आई तुम्हाला खुश ठेवण्याचा सुलभा मावशींनी मला दम भरलेला आहे, त्यांचा आदेश टाळण्याची माझ्यात तरी हिम्मत नाही."

मैथिलीच्या या बोलण्यावर तिघेही खळखळून हसतात. केतन काही बोलणार इतक्यात मैथिली म्हणाली," मी तुमच्या दोघांसाठी गरमागरम जेवण घेऊन आले आहे, तुम्ही दोघे पटकन फ्रेश होऊन या तोपर्यंत मी जेवणाची ताट घेते."

केतन व त्याची आई फ्रेश होण्यासाठी आपापल्या रुममध्ये निघून जातात, मैथिली तोपर्यंत डायनिंग टेबलवर जेवणाची ताट मांडून ठेवते. काही वेळाने केतनची आई येऊन मैथिलीला म्हणते," मैथिली अग तु जेवण का घेऊन आलीस? आजच्या दिवस आम्ही काही बाहेरून मागवलं असतं."

मैथिली म्हणाली," आई आपल्या लोकांसाठी काही करण्यात कसला आला त्रास? तुमची अमेरिकेची वारी कशी झाली?"

केतनची आई म्हणाली," एकदम मस्त, तिकडे सुलभा नसती तर बोअर झालं असतं, सुलभा सोबत तीन महिने कसे निघून गेले हे कळले सुद्धा नाही. आता थोडं थकल्यासारखं वाटत आहे, जेवण करुन जरावेळ झोपते. मी व सुलभाने केलेली मजा तुला निवांत सांगेल."

यावर मैथिली म्हणाली," आई तुम्ही जेवायला सुरुवात करा, मी केतनला बोलावून आणते, बरं झालं केतन मुलगी नाहीये नाहीतर याला आवरायला किती वेळ लागला असता."

केतनची आई हसून म्हणाली," केतनला बोलवायला तु जा, तु गेल्याशिवाय तो काही बाहेर येणार नाही, तुझीच वाट बघत बसला असेल आणि हो मी आपली जेवण सुरु करते, तुम्ही थोड्या उशिरा आलात तरी चालेल."

मैथिली केतनच्या आईच्या बोलण्याचा इशारा कळल्याने ती लाजून केतनला बोलावण्यासाठी त्याच्या रुममध्ये गेली. केतन आरामशीर बेडवर बसून मोबाईल हाताळत होता. मैथिली चिडून त्याला म्हणाली," केतन अरे मी व आई तुझी जेवणासाठी बाहेर वाट बघतोय आणि तु इथे मोबाईल मध्ये बोट घालत बसला आहेस."

केतनने आपले काम सुरुच ठेवले, मैथिलीकडे वर मान करुन न बघता केतन म्हणाला," मी जर बाहेर आलो असतो तर तु रुममध्ये आलीच नसती आणि मला तुला एकट्यात भेटताच आले नसते."

केतन बोलता बोलताच मैथिलीजवळ जातो आणि तिला मिठीत घेतो, मैथिलीही त्याला घट्ट मिठी मारते. केतन मैथिलीला म्हणतो, "मैथिली गेले तीन महिने मी तुला किती मिस केले हे शब्दतही सांगू शकत नाही. हे बघ आता हॉस्पिटलच काम तर उद्या पासून मार्गी लागेल, मी आईला सांगून लग्नाची जवळची तारीख काढायला सांगतो."

मैथिली केतनच्या मिठीतून सुटत म्हणाली, "केतन लग्नाची फारच घाई झालेली दिसतेय."

केतन म्हणाला," मग जर आपली होणारी बायको इतकी सुंदर असेल तर लग्नाची घाई होईलच ना?"

मैथिली म्हणाली," केतन तुझी नौटंकी बंद कर, आई जेवणासाठी आपली वाट बघत आहेत, आपल्याला जायला उशीर झाला तर त्या आपल्या बद्दल काय विचार करत बसतील?"

मैथिली रुममधून बाहेर पडणार इतक्यात केतनने मैथिलीचा हात पकडला, यावर मैथिली म्हणाली," केतन माझा हात सोड."

केतनने मैथिलीचा हात सोडल्यावर मैथिलीचे लक्ष आपल्या हातावर गेले, केतनने तिच्या हातात एक सुंदर, नाजूक सोन्याचे ब्रेसलेट घातले होते, त्या ब्रेसलेट वर K loves M असे शॉर्टकट मध्ये लिहिलेले असते. मैथिली ब्रेसलेट बघून म्हणाली," केतन किती सुंदर ब्रेसलेट आहे हे, हे माझ्यासाठी आहे का?"

केतन डोक्याला हात मारुन म्हणाला," मैथिली मी हे ब्रेसलेट तुझ्या हातात घातले म्हणजे तुझ्याच साठी असेल ना? तुला आवडले ना?"

मैथिली म्हणाली," हो खूप जास्त, अरे किती नाजूक व सुंदर डिजाईन आहे."

केतन हळूच तिच्या कानात म्हणाला," अगदी तुझ्या सारखेच सुंदर व नाजूक"

एवढे बोलून केतन रुमच्या बाहेर पडला, मैथिली गालातल्या गालात हसली व केतनच्या पाठोपाठ तीही रुममधून बाहेर पडली. केतनची आई दोघांना म्हणाली," खूपच लवकर आलात, मला वाटलं होतं की माझी झोप झाल्यावरच तुम्ही बाहेर याल."

केतन म्हणाला," आई मला खूप भूक लागली आहे, मैथिलीचं माझ्याशी गप्पा मारत बसली म्हणून मला यायला उशीर झाला."

मैथिलीने केतनकडे रागाने बघितले. केतनच्या आईचे लक्ष मैथिलीच्या हातातील ब्रेसलेट कडे गेले, ती म्हणाली," मैथिली ब्रेसलेट आवडले का? माझ्या मुलाची चॉईस तशी छानच आहे पण तुला ब्रेसलेट आवडले का?"

मैथिली म्हणाली," हो आई ब्रेसलेट खूप छान आहे."

केतन जेवायला वाढून घेत असताना मैथिलीला म्हणाला," मैथिली तुला जेवायचे नाही का?"

मैथिली म्हणाली," नाही मी घरुन येताना जेवून आले होते."

केतनची आई म्हणाली," केतन तुला व ब्रेसलेटला बघून मैथिलीचे पोट भरले असेल"

केतन आईकडे आश्चर्याने बघत म्हणाला," आई तुझ्यावर सुलभा मावशीच्या संगतीचा बराच परिणाम झालेला दिसतोय."

केतनची आई म्हणाली," हो असं म्हणायला हरकत नाही. माझं जेवण झालंय, मी जरावेळ रूममध्ये जाऊन पडते, तु जेवण कर आणि थोडा वेळ आराम कर."

केतन म्हणाला," आई उद्या माझ्या एका मित्राच्या हॉस्पिटलचं उदघाटन आहे, त्याने तुला व मैथिलीलाही बोलावले आहे तर उद्या तु बुटीकमध्ये जायचे नाही."

आई म्हणाली," तु आणि मैथिली जा, माझं तिथे काय काम? मला बुटीकमध्ये जायचे आहे."

केतन म्हणाला," अग आई त्याने खूप आग्रह केला आहे, उदघाटनाचा कार्यक्रम झाल्यावर मी तुला बुटीकला सोडवेन मग तर झालं."

मैथिली म्हणाली," आई तीन महिने तुम्ही तुमच्या त्या मैत्रिणी सोबत घालवलेस ना? आता उद्याचा दिवस माझ्यासाठी द्यायचा. तुमच्या लक्षात आहे की नाही ते माहीत नाही पण मला मिळालेल्या माहितीप्रमाणे उद्या तुमचा वाढदिवस आहे तर उद्या सकाळी घरातून निघताना मी एक साडी तुमच्या रूममध्ये ठेवलेली आहे ती साडी घालून या, ती साडी माझ्या कडून तुमच्यासाठी गिफ्ट आहे. उद्या हॉस्पिटलचं उदघाटन झाल्यावर आपण तिघे देवीच्या मंदिरात जाणार आहोत.मला तुमचा वाढदिवस तुमच्या कायम लक्षात राहील असा साजरा करायचा आहे."

केतनची आई म्हणाली," अग मैथिली साडी कशाला आणायचीस? आणि वाढदिवस साजरा करायला मी काय लहान मुलगी आहे का?"

केतन म्हणाला," आई मैथिलीला तुझा वाढदिवस साजरा करायचा असेल तर करुदेत, आता यावर जास्त चर्चा नको, तु रुममध्ये जाऊन आराम कर."

आई रुममध्ये गेल्यावर केतन म्हणाला, "मैथिली तुला नवीन साडी घेण्याचं कस काय सुचलं? माझ्या तर अजिबात लक्षात आलं नाही."

मैथिली हसून म्हणाली," त्यासाठी तुला स्त्रीचा जन्म घ्यावा लागेल. बरं ऐक तुझ्या रूममध्ये एका बॅगमध्ये तुझ्यासाठी ब्लेझर, शर्ट व पॅन्ट ठेवलेली आहे. आपल्या तिघांचे कपडे मॅचिंग असणार आहेत."

केतन टाळी वाजवत म्हणाला," मैथिली तुला तर भारीच आयडिया सुचली आहे, तुझं खर आहे हे सगळं तुम्हा स्त्रियांनाच सुचू शकते. हॅट्स ऑफ यु डिअर"

©®Dr Supriya Dighe

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now