Oct 18, 2021
कथामालिका

एक आगळेवेगळे लग्न भाग ५०

Read Later
एक आगळेवेगळे लग्न भाग ५०
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

मागील भागाचा सारांश: मैथिलीचं केतनच्या आई व सुलभा सोबत फोनवर बोलणं होतं. सुलभा मैथिलीला सांगते की निलिमाची काळजी घे, तिने तिच्या आयुष्यात खूप दुःख भोगलं आहे. परीक्षा संपल्यामुळे सौरभ घरी परत येतो. मैथिली सौरभ सोबत फारसं काही बोलत नाही, ती त्याच्या सोबत नोकरी संदर्भात बोलायला गेली पण सौरभने छोटी मोठी नोकरी करायला नकार दिला.

आता बघूया पुढे....

मैथिली हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर असताना तिला अचानक केतनचा फोन येतो, "हॅलो मैथिली बिजी आहेस का?"

मैथिली म्हणाली,"बोल ना केतन काय झालं?"

केतन म्हणाला," अग हॉस्पिटलच्या साईटवर फर्निचरचे काम सुरू आहे तर तेथील कामगाराला काही सामानाची कमतरता पडली आहे, एक तर माझा मित्रही बाहेरगावी गेलेला आहे आणि लवकरात लवकर जर सामान पोहोचले नाही तर हॉस्पिटलचे काम वेळेत होणार नाही. तु आत्ता जाऊ शकतेस का? हवंतर मी अजय सोबत बोलतो."

मैथिली म्हणाली,"अजय सर एक तासापूर्वी बाहेर गेले आहेत, ते येईपर्यंत मला हॉस्पिटल मधून निघता येणार नाही, अजय सर आल्यावर गेले तर चालणार नाही का?"

केतन म्हणाला," अरे यार, सगळे प्रॉब्लेम्स एकाच वेळी निर्माण होतात, आता तर हॉस्पिटलच्या साईटवर जाणे गरजेचे आहे, बरं जाऊदे मी बघतो काही तरी."

मैथिलीला अचानक काहीतरी आठवल्या सारखे झाले व ती म्हणाली," केतन एक मिनिट, मी सौरभला तिथे पाठवते, तसाही तो घरी बसूनच असतो, कालच मला म्हणत होता की हॉस्पिटलचं काही काम असेल तर मला सांग, मी त्याला फोन करुन सामान घेऊन जायला सांगते. मला सामानाची लिस्ट पाठवून दे.

केतन म्हणाला," ठीक आहे, मी लिस्ट तुला पाठवतो, तु सौरभला काम व्यवस्थित समजावून सांग. काही अडचण आली तर मला फोन करायला सांग."

मैथिलीने केतनचा फोन कट केला आणि सौरभला फोन करुन कामाबद्दल सविस्तर माहिती दिली तसेच सामानासाठी पैसे त्याच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर केले. हॉस्पिटलची शिफ्ट संपल्यावर मैथिली हॉस्पिटल मधून निघत होती तोच तिला केतनचा फोन आला, "हॅलो मैथिली हॉस्पिटलमधून निघालीस का?"

मैथिली म्हणाली," हो मी निघतच होते"

केतन म्हणाला," आपला सौरभ तर फारच हुशार निघाला. तु त्याला हॉस्पिटल साठी लागणारे सामान घेण्यासाठी दुकानात पाठवलेस, त्याने त्याच सामानाची किंमत दोन दुकानात विचारुन कमी दरात जिथे भेटलं तेथून खरेदी केली, कामगारांना दुकानदारा कडून कमिशन भेटत असल्याने त्या कामगाराने आपल्याला त्याच दुकानाचा पत्ता दिला होता पण सौरभने त्याच डोकं वापरुन आपला फायदा करुन दिला, एवढेच नाही तर कामगारा समोर बसून त्याने फर्निचरचे राहिलेले काम करुन घेतले व न लागणारे अधिकचे सामान दुकानदाराकडे नेऊन दिले व त्याचे पैसे परत घेतले. सौरभ तर भारी डोकेबाज निघाला, आज त्याने आपल्या बऱ्याच पैश्यांची बचत केली. सर्व काम संपल्यावर मला मॅसेज करुन डिटेल मध्ये सांगितलं मग मी त्याला फोन केला होता, तो म्हणाला की उद्या पासून तो स्वतः साईटवर जाऊन हॉस्पिटलचे राहिलेले सर्व काम जातीने लक्ष देऊन करुन घेणार आहे."

मैथिली म्हणाली," चला आमचे भाऊराया काहीतरी कामाचे निघाले."

केतन म्हणाला," हो ना त्याच्या करामती डोक्याचा आपल्याला बराच फायदा होऊ शकतो, प्रत्येक क्षेत्रात लॉबी असते. आपण जगाकडे आपल्या नजरेतून बघतो आणि फसतो."

मैथिली म्हणाली," हम्मम तु म्हणतो ते बरोबर आहे. उद्यापासून सौरभ साईटवर जाईल तर माझी जास्त धावपळ होणार नाही, चल आता मी फोन ठेवते, आपण रात्री बोलू."

मैथिली घरी जायला निघते, वाटेत गाडी थांबवून सौरभची आवडती मिठाई घेते. केतनने सौरभचे कौतुक केल्याने मैथिली मनातून सुखावलेली असते. घरी गेल्यावर आई मैथिलीला विचारते, " मैथिली आज सौरभची आवडती मिठाई का आणलीस?त्याचा निकाल तर लागला नाही ना?"

मैथिली म्हणाली," आई ते सगळं सांगते पण सौरभ कुठे आहे? तो घरात नाहीये का?"

आई म्हणाली,"अग तो राधिका कडे गेलाय, जेवण करुन येणार असल्याने त्याला यायला उशीर होईल. नाशिकला आल्यापासून तो राधिकाकडे गेलाच नव्हता ना, शिवाय कित्येक दिवसापासून माहीची व त्याची भेट झालेली नव्हती म्हणून तो आज संध्याकाळीच राधिकाकडे गेला."

मैथिली म्हणाली," आई आज सूर्य नक्की पूर्वेकडूनच उगवला आहे ना?"

आई म्हणाली," का ग? अस काय झालं?"

मैथिलीने आईला दिवसभरात घडलेली सर्व हकीकत सांगितली व ती म्हणाली," आज सौरभ आश्चर्य वाटेल अशीच कामे करत आहे"

आई म्हणाली," हम्मम बरं झालं आता तो हॉस्पिटलचे काम सांभाळेल तर तुझी जास्त धावपळ होणार नाही."

मैथिली म्हणाली," हो, सौरभच्या कामगिरीवर खुश होऊन मी त्याच्या आवडीची मिठाई घेऊन आले."

आई म्हणाली," आलं माझ्या लक्षात, रात्री लवकर आला तर ठीक नाहीतर उद्या सकाळी सौरभला मिठाई देईल. तुझ्यात आणि निलिमा ताईंमध्ये काही बोलणं झालं का?"

मैथिली म्हणाली," नाही ग, का? काही काम होतं का?"

आई म्हणाली," अग हो दोन दिवसांपासून ताईंच्या फोनची मी वाट पाहत आहे, बुटीक मध्ये काम करणारी रंजना म्हणून एक आहे, आत्ता काही महिन्यांपूर्वीच तिने बुटीकमध्ये काम सुरु केले आहे, तिला पगार ऍडव्हान्स मध्ये पाहिजे आहे. आता जुनी एखादी बाई असते तर मी तिला ऍडव्हान्स दिला असता पण आता ह्या नवख्या बाईला ऍडव्हान्स द्यायचा म्हणजे जरा जोखमीचे काम आहे, ताईंना विचारल्या शिवाय मी कसा काय निर्णय घेऊ शकेल."

मैथिली म्हणाली," आई मी केतनला तसा मॅसेज करुन ठेवते म्हणजे तो आईपर्यंत तुझा निरोप बरोबर पोहोचवेल."

आई म्हणाली," बरं, तुला राग येणार नसेल तर एक सांगू?"

मैथिली म्हणाली,"हो आई सांग ना, मला तुझ्या बोलण्याचा राग का म्हणून येईल?"

आई म्हणाली," तु माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नकोस, कदाचित तुला माझे म्हणणे आई झाल्यावर कळेल. निलिमा ताई तुझ्या सासूबाई आहेत, त्यांना तु आई म्हणतेस यात काही गैर नाही पण जेव्हाही कधी तु माझ्या समोर त्यांना आई म्हणतेस तेव्हा मला खरंच खूप वाईट वाटतं. मी माझ्या सासूबाईंना आत्त्या म्हणायचे म्हणून मला जरा वेगळं वाटतं असेल. तु निलिमा ताईंना आई म्हणत जा पण मला माझं मन मोकळं करावं वाटलं म्हणून मी हे बोलले."

मैथिली आईजवळ गेली, आईचा हात आपल्या हातात घेऊन ती म्हणाली," आई मी तुझ्या बोलण्याचा अजिबात चुकीचा अर्थ घेणार नाही. जेव्हा त्यांनी निलिमा काकूच्या बदल्यात त्यांना आई म्हणण्यास सांगितले तेव्हा मला त्यांना आई म्हणायला खूप वेगळे वाटले होते. मी जरी त्यांना आई म्हणत असले तरी जी शांत झोप तुझ्या कुशीत येईल ती शांत झोप त्यांच्या कुशीत येईल का? मी निलिमा काकूंना आई म्हणते म्हणजे त्या माझ्या आई झाल्या अस नाही ना? आई जेव्हाही कधी मी त्यांना आई म्हणते त्या त्यावेळी मला तुझी आठवण येते."

आईने मैथिलीच्या चेहऱ्यावरून हात फिरवला व ती म्हणाली," शहाणी ग बाई माझी. माझ्या पुढे जेवढी शहाण्या सारखी वागतेस ना? तेवढीच शहाण्या सारखी सासरी जाऊन पण वाग. माझ्या संस्कारांना कोणी नाव ठेवेल अस वागू नकोस." 

मैथिली म्हणाली," आई कुठला विषय कुठे घेऊन चालली आहेस, सासरी जायला मला अजून भरपूर वेळ आहे. सासरी जायचं नाव घेतलं की मला भरुन येतं."

आई समोर डोळ्यात पाणी यायला नको म्हणून मैथिली तेथून निघून गेली.

©®Dr Supriya Dighe

 

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now