एक आगळेवेगळे लग्न भाग ४९

Maithili talks with sulabha mavashi

मागील भागाचा सारांश: मैथिली केतनच्या गावी पहिल्यांदाच जाते, तिथे केतनचे क्लिनिक असते. केतन गावातील रुग्णांवर मोफत उपचार करत असे. मैथिली तिथे पोहोचली तेव्हा क्लिनिकच्या बाहेर पेशंटची लांब रांग लागली होती. एवढे पेशन्ट्स बघून सुरवातीला मैथिलीला दडपण आले होते पण नंतर काही वाटले नाही. इतरवेळी हॉस्पिटलमध्ये एवढे पेशंट तपासल्यावर मैथिली थकून जायची पण यावेळी मात्र मैथिलीला अजिबात थकवा जाणवला नाही, तिला गावाकडे येऊन फ्रेश वाटले होते.

आता बघूया पुढे...

मैथिली गावावरुन घरी जाण्यासाठी निघाली, तिला वाटेत केतनचा फोन आला, "हॅलो मैथिली जास्त पेशन्ट्स तपासून थकली तर नाहीस ना?"

मैथिली म्हणाली," अजिबात नाही,उलट मला खूप फ्रेश वाटत आहे."

केतन म्हणाला," रिचार्ज झाल्यासारखं वाटत असेल ना? मलाही अशीच फिलींग यायची म्हणून तर मी आठवड्यातील एक दिवस गावी जातो. बरं ऐक ना आईला तुझ्याशी बोलायचं आहे. मी आईकडे फोन देतो."

केतनने आईकडे फोन दिला, केतनची आई म्हणाली," हॅलो मैथिली बेटा कशी आहेस? तुला फक्त केतनचीच आठवण येते वाटतंय. मला तर साधा एखादा मॅसेज सुद्धा नाही केलास."

मैथिली म्हणाली," आई तस नाहीये, मी केतनकडे तुमची चौकशी रोज करते, हवं तर तुम्ही केतनला विचारा. केतनने मला तुमचे व सुलभा मावशींचे एअरपोर्ट वरील फोटो पाठवले होते. तुम्हाला एवढं आनंदी बघून खरंच खूप छान वाटलं."

केतनची आई म्हणाली," मला एअरपोर्टवर बघून सुलभा खूप आनंदी झाली होती. आम्ही बऱ्याच वर्षांनी भेटलो ना, आमच्या गप्पा काही केल्या संपत नाहीत.मी इकडे यायला नको म्हणत होते पण खरंच ह्या ब्रेकची मला गरज होती. रोजचं तेच रुटीन नकोस होतं ग, थोडा ब्रेक गरजेचा आहे. भारतीला कुठेतरी पाठवा, तेवढंच तिला बरं वाटेल. तुमच्या कडून ती ऐकणार नाही. मी आल्यावर तिला बाहेर फिरायला घेऊन जाईल."

मैथिली म्हणाली," हो आई नक्कीच, तुम्हीच आईला घेऊन जा. आम्ही तिला नेहमी म्हणतो की आई दोन दिवसांसाठी का होईना कुठेतरी जाऊन ये पण ती ऐकतच नाही, प्रत्येक वेळी वेगवेगळे कारणे सांगते. सुलभा मावशी कश्या आहेत?"

केतनची आई म्हणाली," ती एकदम बिनधास्त, मजेत आहे, ती दर महिन्याला मैत्रिणींसोबत फिरायला जाते. सुलभाला तुझ्या सोबत बोलायचं आहे."

केतनच्या आईने फोन सुलभाकडे दिला, "हॅलो मैथिली सुलभा बोलतेय, निलिमा कडून सतत तुझं कौतुक ऐकायला भेटत आहे, अजून लग्नही झालं नाहीये तरी इतकं कौतुक करत आहे. लग्न झाल्यावर सुद्धा तिने असच कौतुक केलं पाहिजे अशी वाग नाहीतर माझ्याकडे तुझे गाऱ्हाणे करत बसेल."

मैथिली म्हणाली," मावशी मी आत्ता जशी आहे तशीच लग्नानंतर सुद्धा राहील. जुन्या मैत्रिणीला भेटून कसं वाटतंय?'

सुलभा म्हणाली," जुन्या सर्व आठवणींना उजाळा मिळाला आहे. निलिमाला एवढ्या वर्षांनी भेटून एक कळालं की जरी वरवर वाटतं असलं की समोरची व्यक्ती खूप बदलली आहे पण तसं नसतं माणूस आतून तसाच असतो. निलिमा आणि मी एवढ्या वर्षांनी भेटलोय तरी आमच्यातील इक्वेशन बदललं नाहीये. निलिमा पहिले जशी होती अगदी तशीच आत्ताही आहे. बरं ते जाऊदेत तुझ्या आईने केलेले रव्याचे लाडू अप्रतिम आहेत. माझ्याकडून आईला थँक्स सांग. तु मला भेटायला अमेरिकेत केव्हा येत आहेस? ते सांग."

मैथिली म्हणाली," मावशी तुम्हीच आमच्या लग्नासाठी इकडे या म्हणजे आपली भेट होईल आणि आईंनाही छान वाटेल."

सुलभा म्हणाली," हम्मम येईल ना. बरं ऐक आपलं पुन्हा बोलणं होईल नाही होईल,म्हणून आत्ताच सांगून ठेवते, तुझ्या सासूबाईने तिच्या आयुष्यात बरीच दुःख झेलली आहेत. केतन तिची किती काळजी घेतो हे तुला ठाऊकच असेल पण इथून पुढे निलिमाची काळजी घेणे तुझी जबाबदारी आहे. निलिमा तुला काही सासुरवास करणार नाही याची मी खात्री देते. तु तिच्या घराची जबाबदारी घेऊन तिला मोकळं कर."

मैथिली म्हणाली," मावशी मी तुम्हाला प्रॉमिस करते की मी आईंना काहीच त्रास होऊ देणार नाही."

एवढं बोलून फोन कट झाला. लगेच मैथिलीला केतनने मॅसेज केला," मैथिली सुलभा मावशीच्या बोलण्याचे वाईट मानून घेऊ नकोस, ती अशीच आहे. मनात येईल ते तोंडावर बोलून मोकळं होते. सुलभा मावशीला आईची खूप काळजी वाटते म्हणून ती असं बोलली असेल."

मैथिलीने लगेच रिप्लाय केला," मला वाईट वाटलंच नाहीये, आपल्या आई खूप नशीबवान आहेत की त्यांचा विचार करणारी मैत्रीण त्यांना लाभली आहे."

दुसऱ्या दिवसापासून मैथिलीचं रुटीन सुरु झालं, सकाळी हॉस्पिटलची ड्युटी, संध्याकाळी केतनच्या हॉस्पिटलचं जिथे काम चालू होते तिथे जाऊन चक्कर मारणे, दिवसभर केलेल्या कामाची अपडेट घेणे. रात्री घरी आल्यावर जेवण करुन केतनला फोन करुन हॉस्पिटलच्या कामाची माहिती देणे. सगळं मॅनेज करता करता मैथिलीची दमछाक उडत असे, त्यात भर म्हणून आईने फर्मान सोडले होते की एक वेळेचा स्वयंपाक मैथिलीने करायचा कारण लग्न झाल्यावर तिला स्वयंपाक करावा लागणार असेल तर आधीच सवय असली की पुढे जाऊन जड जाणार नाही. सोमवार ते शनिवार ही सर्व कामे करायची आणि रविवारी गावाकडे जाऊन तेथील पेशंट चेक करायचे. मैथिलीचं शेड्युल एकदम व्यस्त झालं होतं. गौरी व डॉ पुजा सोबत बोलायला तिला वेळही भेटत नव्हता. अश्यातच एक महिना कसा उलटून गेला हेही तिला समजले नाही. राधिका ताई व माहीला भेटणेही तिला जमत नव्हते

सौरभची परीक्षा संपल्याने तो घरी परतला होता. सौरभ दिवसभर घरीच असायचा. मैथिली सौरभ सोबत फारसं बोलत नसे. एके दिवशी आईने मैथिलीला विचारले, "मैथिली तु एरवी सौरभ सोबत गप्पा मारत बसायचीस, तुमच्यात सतत छोटी मोठी भांडणं चालायची. आता अस काय झालंय की तु त्याच्या सोबत कामाव्यतिरिक्त बोलत नाहीस. तुमच्यात काही बिनसलं आहे का?"

मैथिली म्हणाली," आई आता आम्ही दोघेही मोठे झालो आहोत. तु तर बघत आहेस की माझी सध्या किती धावपळ सुरु आहे. सौरभ सतत आपल्या मोबाईल मध्ये गुंग असतो, तेव्हा त्याच्या सोबत कधी बोलणार आणि तसंही मी त्याला दोन शब्द सांगायला गेले तर त्याला ते पटणार नाही आणि मग उगाच आमच्यात वाद विवाद होतील."

आई म्हणाली," सौरभ सतत मोबाईल मध्ये असलेला मलाही आवडत नाहीये, त्याने एखादी छोटी मोठी नोकरी शोधायला पाहिजे असं मला वाटतं म्हणजे तेवढाच घरखर्चाला हातभार लागेल. पण तुझ्या बाबांसमोर काही बोलायला गेलं तर ते तेवढंच घेऊन बसतील, त्याचा निकाल लागेपर्यंत मी तरी नोकरी बद्दल त्याच्या सोबत काही बोलायचं नाही असंच ठरवलं आहे."

मैथिली म्हणाली," आई नोकरी बद्दल बोलायचं असेल तर मी वेळ बघून त्याच्या सोबत बोलेल."

दोन तीन दिवसांनंतर संध्याकाळच्या वेळी घरी येताना मैथिलीची गाडी पंक्चर होते म्हणून ती सौरभला मदतीसाठी बोलावून घेते. पंक्चरच्या दुकानापर्यंत गाडी लोटत न्यायला सौरभ मैथिलीला मदत करतो. मैथिली सौरभला म्हणाली," सौरभ पंक्चर काढेपर्यंत आपण समोर जाऊन वडापाव खाऊयात का? मला खूप भूक लागली आहे."

सौरभ मानेनेच होकार देतो. वडापाव खाता खाता सौरभ म्हणाला," दीदी तुझी हल्ली खूपच धावपळ होत आहे ना?"

मैथिली म्हणाली," अरे हो केतन परत येईपर्यंत हॉस्पिटलचे काम पूर्ण झाले पाहिजे ना? हॉस्पिटलचे काम पूर्ण होईपर्यंत माझी अशीच धावपळ होईल."

सौरभ म्हणाला,"माझी काही मदत हवी असेल तर सांग. तसाही मी दिवसभर घरी बसूनच असतो."

मैथिली म्हणाली," हो नक्कीच सांगेल. सौरभ रिझल्ट लागेपर्यंत इथेच नाशिकमध्ये एखादी नोकरी का शोधत नाहीस? तेवढाच तुझा विरंगुळाही होईल आणि बाबांना थोडा आर्थिक दृष्ट्या आधार मिळेल."

सौरभ म्हणाला," दीदी मी पुण्यात एक दोन ठिकाणी इंटरव्ह्यू दिले आहेत, त्यांनी रिझल्ट लागल्यावर जॉईन व्हायला सांगितले आहे. पॅकेज चांगले आहे. मला अशी छोटी मोठी नोकरी करायला आवडणार नाही."

मैथिली म्हणाली," ठीक आहे, जशी तुझी इच्छा."

मैथिलीला पुढे काही बोलावं अस वाटलंच नाही. तिला माहीत होतं की सौरभला कितीही काहीही सांगितलं तरी तो त्याला जे वाटेल तेच करेल उगाच आपण आपल्या तोंडाची वाफ वाया का घालवायची? सौरभच्या मनात परत आपल्या बद्दल काही गैरसमज निर्माण होईल.

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all