एक आगळेवेगळे लग्न भाग ४८

Maithili visits ketan's village and clinic for the first time

मागील भागाचा सारांश: मैथिली सौरभला फोन लावून विचारते की त्याने आईकडे तीस हजार रुपये कशासाठी मागितले आहे? यावर सौरभ सांगतो की त्याने विकीकडून ते पैसे ड्रग्ज साठी उधार घेतले होते व आता त्याला ते पैसे परत करायचे असतात. मैथिली कडे शेखर जिजू व सौरभला देण्यासाठी पैसे नसतात. मैथिली केतन सोबत फोनवर बोलत असताना सौरभ व शेखर जिजूंचे पैसे देण्याबद्दल बोलली असता केतन तिला सांगतो की मी तुला पैसे देतो तु ते पैसे दोघांनाही देऊन टाक. मैथिलीच्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये केतन मदतीचा हात पुढे करत असे.

आता बघूया पुढे....

केतनने मैथिलीला सांगितल्या प्रमाणे दुसऱ्या दिवशी पैसे मैथिलीच्या अकाऊंट मध्ये ट्रान्सफर केले. मैथिलीने शेखर जिजूंना व सौरभला लगेच पैसे ट्रान्सफर केले. हॉस्पिटलमध्ये जास्त पेशन्ट्स असल्याने मैथिलीला जरा जास्त वेळ हॉस्पिटलमध्ये थांबावे लागले. मैथिली घरी जाण्यासाठी निघणार इतक्यात डॉ अजय सुर्यवंशीने मैथिलीला आवाज दिला म्हणून ती थांबली. 

डॉ अजय म्हणाला," मैथिली तुझी उद्या सुट्टी असते पण तु तर बघितलेस की आज खूप पेशन्ट्स होते तर तुला उद्या हॉस्पिटलला यायला जमेल का?"

मैथिली म्हणाली," सर मी नक्कीच उद्या हॉस्पिटलला आले असते पण केतन इथे नसल्याने गावाकडे जाऊन त्याचे पेशन्ट्स चेक करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. उद्या सुट्टी असल्याने मी तिकडे जाणार आहे."

डॉ अजय म्हणाला," अरे हो की, मला केतन याबद्दल बोलला होता. बरं ठीक आहे तु गावाकडे जा, उद्याच मी ऍडजस्ट करुन घेईल."

मैथिली घरी गेली, गावाकडे जायची तयारी केली, लवकर जेवण करुन झोपण्याचा प्लॅन होता पण केतनचा फोन आल्याने तिचा पुढील काही वेळ असाच निघून गेला. केतनने मैथिलीला गावाकडे गेल्यावर काय काय करायचे याबद्दल कल्पना दिली तसेच गावाकडचे लोकं कसे असतात हेही सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळीच केतनची गाडी घेऊन ड्रायव्हर दारात उभा होता. मैथिली पहिल्यांदाच गावी जाणार असल्याने मैथिली थोडी नर्व्हस होती. केतनचे गाव नाशिक पासून दोन तासांवर होते. ड्रायव्हरने बरोबर अकरा वाजेपर्यंत मैथिलीला गावात पोहोचवले. मैथिली गाडीतून खाली उतरली तेव्हा तिला गावाचे व केतनच्या क्लिनिकचे पहिले दर्शन घडले. क्लिनिकच्या बाहेर पेशन्ट्सची रांग लागली होती. एवढे पेशन्ट्स बघून मैथिलीला दडपण आले होते.

मैथिलीला बघून एक मुलगी पुढे येऊन मैथिलीच्या हातातील बॅग घेऊ लागली. मैथिली तिला म्हणाली," अग राहूदेत मी घेते."

ती मुलगी म्हणाली," मॅडम तुम्ही मला ओळखलं नसेल, माझं नाव शितल आहे, मी तुमच्या क्लिनिक मध्ये कंपाऊंडरचे काम करते."

मैथिली तिच्या हातात बॅग देत म्हणाली," हो का? मला माहीतच नव्हतं. मी पहिल्यांदाच इथे आले आहे ना"

शितल म्हणाली," मॅडम तुम्ही कसलीही काळजी करु नका, तुम्ही केबिनमध्ये जाऊन बसा, मी मस्तपैकी एक चहा आणते, तो प्यायल्यावर पेशन्ट्स तपासणे चालू करा. एवढे पेशंट तपासायचे म्हटल्यावर एनर्जी पण यायला हवी ना."

मैथिली शितलच्या पाठोपाठ केबिनमध्ये जाऊन बसली, शितल बॅग तिथे ठेऊन चहा घेण्यासाठी गेली, तोपर्यंत मैथिली केबिनला न्याहाळत होती. इतक्या वेळ पेशंट चेक करण्याचे जेवढे टेन्शन मैथिलीला आले होते ते केबिनमध्ये गेल्यावर कुठल्या कुठे पळून गेले होते. केतनने केबिनची अरेंजमेंट तशी केली होती, केबिनमध्ये गेल्यावर एक अनोख्या प्रकारची पॉजिटीव्ह एनर्जी मिळत होती. तेवढ्यात शितल चहा घेऊन आली, चहा पिता पिता शितलने मैथिलीला पेशन्ट्सची माहिती दिली.

एकेक पेशंट तपासता तपासता दुपार कशी उलटून गेली हे मैथिलीला स्वतःलाही समजले नाही. सगळे पेशंट तपासून झाल्यावर शितल केबिनमध्ये येऊन म्हणाली," मॅडम जेवायची वेळ केव्हाच टळून गेलीय, तसेही आता पेशंट संपले आहेत. तुम्ही जेवण करुन घ्या."

मैथिली म्हणाली," हो ना, पेशंट चेक करता करता वेळ कसा निघून गेला हे माझे मलाच समजले नाही, तुझं जेवण झालं का?"

शितल म्हणाली," नाही मॅडम, मी बाहेर बसून जेवते तोपर्यंत तुम्ही आत बसून जेवण करुन घ्या."

मैथिली म्हणाली," अग तु बाहेर का जेवायला बसतेस, आपण दोघी मिळून जेवण करुयात."

शितल तिचा डबा घेऊन आत आली, दोघींनी डबे उघडले तेवढ्यात एक आजीबाई आल्या व म्हणाल्या," पोरी डॉक्टर आहेत की निघून गेले, मला यायला जरा आज उशिरच झाला."

आजीबाई केबिनमध्ये येत आहे हे बघून शितल म्हणाली," आजी तुम्ही बाहेर बसा, मॅडमचं जेवण चालू आहे, मी बोलावते तुम्हाला."

मैथिली डबा बंद करत म्हणाली," शितल आपण थोड्या वेळात जेवण करु,तु आजींना आत बोलावं, मी त्यांना चेक करते."

शितल म्हणाली," मॅडम पण तुम्ही जेवण करुन घ्या, आजी बाहेर थांबतील "

मैथिली म्हणाली," अग मला अस पेशंटला बाहेर बसवून माझ्या घश्याच्या खाली घास उतरणार नाही."

शितल हसून म्हणाली," ठीक आहे मॅडम, तुमची आणि केतन सरांची जोडी अशीच नाही जमली."

आजी केबिनमध्ये आल्यावर मैथिलीने त्यांची नम्रपणे विचारपूस केली व तपासणी केली. आजींच्या सर्व शंकांचे अतिशय शांतपणे निरसन केले. आजीबाई म्हणाल्या," पोरी इथं पहिले दुसरे डॉक्टर यायचे ना? तु कधीपासून यायला लागली?"

तेवढयात शितल आतमध्ये येऊन म्हणाली, "आजी जे डॉक्टर यायचे ना त्यांचं ह्या मॅडम सोबत लग्न होणार आहे, ते डॉक्टर परदेशात गेले आहे म्हणून मॅडम आल्या आहेत."

आजी म्हणाल्या," असं व्हय, राम सीतेचा जोडा शोभतोय. दोघांना समाजसेवा करण्याची आवड दिसतेय. दोघांचे छत्तीस गुण जुळत असणार, माझ्यामुळे जेवण करता करता उठावे लागले तरी किती शांतपणे ही माझ्याशी बोलली. पोरी तुझं लई भलं व्हईल."

एवढं बोलून आजी निघून गेल्या. शितलने तिचा व मैथिलीचा डबा उघडला आणि मैथिलीला बळजबरी जेवायला लावलं. मैथिली म्हणाली," आजींच बोलणं ऐकून पोटचं भरल्यासारखं वाटलं. तुला माहितीये शितल जेव्हापासून मी प्रॅक्टिस करायला लागले तेव्हापासूनचा माझा अनुभव तुला सांगते. महिन्याला आपल्या खात्यात किती पैसे जमा होतात त्यापेक्षा जेव्हा ह्या आजींसारखे पेशंट माझं, माझ्या कामाचं कौतुक करतात, आशिर्वाद देतात तेव्हा सर्वांत जास्त आनंद होतो, एक प्रकारचे वेगळे समाधान मिळते. इतके पेशंट केलेत तरी थकल्यासारखे वाटत नाहीये."

शितल म्हणाली," मॅडम तुम्ही सेम केतन सरांसारख्या बोलतात. गावात प्रत्येकाच्या तोंडात त्यांचं नाव असतं. तुम्ही त्यांना या कामात साथ देत आहात हे खूप चांगले आहे."

मैथिली म्हणाली," तुझं शिक्षण कुठं पर्यंत झालं आहे? तु वयाने लहानच दिसतेस."

शितल म्हणाली," मी कॉलेजच्या पहिल्या वर्षाला आहे, मला डॉक्टर व्हायची खूप इच्छा होती पण परिस्थिती मुळे होता आलं नाही. केतन सरांना जेव्हा हे कळालं तेव्हा त्यांनी मला क्लिनिक मध्ये येऊन काम करायला सांगितले त्या बदल्यात मला पगारही भेटतो आणि सर इथे नसताना पेशंटची सेवाही करता येते. मॅडम केतन सरांसारखा डॉक्टर मी अजून दुसरा कोणी बघितला नाहीये. निस्वार्थ पणे रुग्णांची सेवा करत असतात. माझ्या वडिलांचे दारुचे व्यसन सुटले ते केतन सरांमुळेच."

मैथिली म्हणाली," हम्मम केतनचं म्हणणं आहे की आपण ज्या समाजात राहतो त्याच काहीतरी देणं लागतो. मलाही त्याच म्हणणं पटतं"

जेवण झाल्यावर काही वेळातच मैथिली गावातून नाशिकला येण्यासाठी निघाली. मैथिली गावात येऊन मनापासून प्रसन्न झाली होती. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून आपल्याला जसा ब्रेक हवा असतो अगदीच त्याप्रमाणे मैथिलीला गावाला आल्यावर प्रसन्न वाटत होते. आपल्या शिक्षणाचा वापर आपण एका चांगल्या कामासाठी करत आहोत याचे समाधान तिला वाटत होते.

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all