Oct 24, 2021
कथामालिका

एक आगळेवेगळे लग्न भाग ४७

Read Later
एक आगळेवेगळे लग्न भाग ४७

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

मागील भागाचा सारांश: मैथिली डॉ पुजाला भेटण्यासाठी कॅफेत जाते, मैथिली डॉ पुजाला सौरभ बद्दल व राधिका ताईकडे काय घडलंय याची इतंभूत कथा सांगते. सर्व ऐकल्यावर डॉ पुजा मैथिलीला सांगते की तु सौरभ बद्दल तुझ्या आई बाबांना कल्पना द्यायला हवी, जर पुढे जाऊन काही घडलं तर तुम्ही त्यांच्या पासून एवढी मोठी गोष्ट लपवल्याचे आई बाबांना वाईट वाटेल.

आता बघूया पुढे.....

घरी पाहुणे आल्यामुळे डॉ पुजा कॅफेतून लवकर घरी गेली. डॉ पुजाच्या पाठोपाठ मैथिली सुद्धा कॅफेबाहेर पडली, तिच्या अचानक लक्षात आले की आपण सौरभला फोन करुन त्याला पैसे कशासाठी हवे आहे याची चौकशी करु, घरी गेल्यावर त्याच्या सोबत डिटेल मध्ये बोलता येणार नाही म्हणून मैथिलीने सौरभला फोन लावला. दोन तीन रिंग गेल्यानंतर सौरभने फोन उचलला, "हॅलो दीदी काय म्हणतेस? तु कशी आहेस? केतन जिजू अमेरिकेत पोहोचले का?"

मैथिली म्हणाली," मी बरी आहे, केतन अमेरिकेत सुखरूप पोहोचला आहे. मला एक सांग, तुझा अभ्यास कसा चालू आहे?"

" दीदी तुम्ही येऊन गेल्यापासून मी अभ्यासाला लागलो आहे, मला असणाऱ्या सर्व वाईट सवयी सोडून दिल्या आहेत." सौरभने उत्तर दिले

" सौरभ तु आईकडे तीस हजार रुपये कशासाठी मागितले, मला खरं उत्तर पाहिजे." मैथिलीने विचारले

सौरभ चाचरत म्हणाला," मी ड्रग्स घेण्यासाठी विकी कडून तीस हजार रुपये घेतले होते, त्याला ते परत करायचे आहेत."

मैथिली चिडून म्हणाली," सौरभ तुला थोडी तरी लाज वाटते का? राधिका ताईकडून थोडे थोडे करुन पन्नास हजार रुपये घेतलेस, त्यावरुन शेखर जिजू व राधिका ताईमध्ये वादविवाद झालेत, आता तुला तीस हजार रुपये पाहिजेत. मी कुठून आणायचे एवढे पैसे? जिजूंचे पन्नास हजार रुपये परत करायचे आहेत, तुला तीस हजार रुपये द्यायचे आहेत. एवढे पैसे ड्रग्स वर उडवताना तुझी अक्कल कुठे गेली होती."

सौरभ म्हणाला," दीदी मी माझी चूक मान्य केली आहे ना? मला माहीत आहे की माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे. मी नोकरीला लागलो की तुझे सर्व पैसे परत करेन पण प्लिज माझ्यावर रागावू नकोस."

मैथिली म्हणाली," सौरभ तु पैसे दे किंवा नको देऊस पण प्लिज इथून पुढे ड्रग्सच्या आहारी जाऊ नकोस, मी आई बाबांना यातील काही सांगितलं नाहीये याचा गैरफायदा घेऊन नकोस."

सौरभ म्हणाला," दीदी एवढ्या वेळेस माझ्यावर विश्वास ठेव, मी ड्रग्स काय सिगारेटला सुद्धा हात लावणार नाहीये."

एवढं बोलून मैथिलीने फोन कट केला, मग तिने बँकेत किती पैसे आहेत ते चेक केले, सौरभ व शेखर जिजू या दोघांना मिळून ऐंशी हजार रुपये द्यायचे होते, पण अकाउंट मध्ये कमी पैसे होते. केतनकडे पैसे मागावे की नाही हा विचार मैथिली करत होती.तेवढ्यात मैथिलीला आईचा फोन येतो म्हणून ती घरी जायला निघते. घरी जाऊन जेवण झाल्यावर केतनचा फोन येणार असल्याने मैथिली टेरेसवर जाते.

पुढील पाच ते दहा मिनिटांत केतनचा फोन येतो, "हॅलो मैथिली कशी आहेस? जेवण झालं का?"

मैथिली म्हणाली," हो आत्ताच, मी मजेत आहे."

केतन म्हणाला," मैथिली मी तुझ्या आवाजाला खरंच खूप मिस करत होतो ,आता तुझा आवाज ऐकल्यावर बरं वाटत आहे."

मैथिली लाजून म्हणाली," केतन तु पण ना, आईंना प्रवासात काही त्रास तर झाला नाही ना?"

केतन म्हणाला," नाही ग, आईला अजिबात त्रास झाला नाही. सुलभा मावशी आम्हाला एअरपोर्ट वर घ्यायला आली होती, तिला इतक्या वर्षांनी समोर बघून आईचा प्रवासाचा सर्व थकवा दूर झाला. आई व सुलभा मावशी इतक्या गप्पा मारत आहेत की त्यांच्या गप्पा संपायला तयारच नाहीयेत. आईला मी एवढं खुश पहिल्यांदा बघितलं आहे."

मैथिली म्हणाली," जुन्या मैत्रिणी भेटल्या की असंच असतं, आई खुश आहेत हे ऐकून मला खूप छान वाटलं आहे. तुम्ही तर सुलभा मावशीला सरप्राईज देणार होते ना?"

केतन म्हणाला," सुलभा मावशीच्या मुलाने म्हणजे आदित्यने फक्त मीच येणार असल्याचे सांगितले होते, सुलभा मावशी आईला बघून सरप्राईजच झाली होती. मी त्या दोघींचे एअरपोर्ट वरील फोटो काढले आहेत, ते मी तुला पाठवतो म्हणजे त्या दोघी एकमेकींना बघून किती खुश आहेत हे तुला कळेलच."

मैथिली म्हणाली," हो ठीक आहे, तुला तिकडे करमत का?"

केतन म्हणाला," उद्या पासून दिवसभराचा वेळ कोर्समध्येच जाईल सो मोकळा जास्त वेळ भेटणार नाही पण आज जरा बोअरच झालं, नवीन जागा, नवीन देश थोडं वेगळंच वाटतं ना? तरी एक बरं आहे की सुलभा मावशीचं इथे घर आहे म्हणून खाण्या पिण्याचे हाल तरी होणार नाही. गप्पा मारण्यासाठी आदित्य आहे पण आमचं ट्युनिंग काही जुळणार नाही असं दिसतंय. असो तुला शेखर जिजूंनी घरी का बोलावलं होतं?"

मैथिली म्हणाली," सौरभने आत्तापर्यंत राधिका ताईकडून पन्नास हजार रूपये घेतले आहेत आणि त्यांना त्या पैश्यांची आता सध्या गरज आहे म्हणून त्यांनी मला घरी बोलावलं होतं."

केतन म्हणाला," ठीक आहे, मग तुझ्याकडे पैसे आहेत का की मी देऊ, शेखर जिजूंचे पैसे लवकरात लवकर परत करायला हवे, उगाच पैश्यांमुळे नात्यात प्रॉब्लेम यायला नकोय."

मैथिली म्हणाली," जिजूंना पैसे देण्याइतके माझ्याकडे पैसे आहेत पण सौरभने आईकडे तीस हजार रुपयांची मागणी केली आहे, आईला त्याने प्रोजेक्टचं खोटं कारण सांगितलं पण मी त्याला विचारलं तेव्हा त्याने सांगितले की विकी कडून सौरभने ड्रग्स साठी पैसे उधार घेतले होते."

 केतन म्हणाला," अरे देवा ह्या भाऊने आतापर्यंत ड्रग्स पाई किती पैसे घातले असतील हे त्यालाच माहीत. मी तुला उद्या पन्नास हजार रुपये ट्रान्सफर करतो."

मैथिली म्हणाली," मी माझा पगार झाला की तुझे पैसे परत करेल."

केतन म्हणाला," आपल्यात हे माझं तुझं कधीपासून आलंय, मी सौरभ कडून पैसे वसूल करेल, तु त्याची काळजी करु नकोस."

मैथिली म्हणाली," केतन मी आज सौरभ बद्दल पुजा मॅडम सोबत बोलले तर त्या म्हणाल्या की आई बाबांना सर्व सांगून टाक, त्यांच्या पासून काही लपवून ठेऊ नकोस. तुला काय वाटतंय?"

केतन म्हणाला," डॉ पुजा जे म्हणत आहे ते खोटं नाहीये पण त्या तुझ्या आई बाबांना ओळखत नाही, त्यांना तुझ्या आई बाबांची काय प्रतिक्रिया असेल हे ठाऊक नाही. काही वेळेस अज्ञानात सुख असते हे म्हणतात ते काही खोटं नाही. सौरभ ज्यावेळी पुण्यावरुन परत येईल तेव्हा आई बाबांना त्याच्या बद्दल सर्व काही खरं सांगावं अस मला वाटतंय. आपल्याला आई बाबांपासून काही लपवायचं नाहीये फक्त थोडे दिवस त्यांना खरं काय ते सांगायचं नाही."

मैथिली म्हणाली," हम्मम तुझी म्हणणं खरं आहे, सौरभ परीक्षा देऊन घरी आल्यावर मी आई बाबांना खर काय ते सांगेल म्हणजे माझ्या मनावरील एक मोठं ओझे उतरेल."

केतन म्हणाला," तु यावर जास्त विचार करु नकोस. चल मी फोन ठेवतो, तुझ्या सोबत बोलायला लागलं की वेळ कसा निघून जातो हे कळतंच नाही पण हा इंटर नॅशनल कॉल आहे हे विसरुन चालणार नाही.बाय काळजी घे."

मैथिली मनातल्या मनात म्हणाली की केतन सोबत बोलल्यावर सर्व समस्यांचा गुंता सुटत जातो. आई म्हणतेय ते आज पटलं आहे, प्रश्न ही देवच तयार करतो आणि त्याचं उत्तरही तोच देतो. केतनने पैसे पाठवल्यावर लगेच शेखर जिजूंना व सौरभला पैसे पाठवून देते म्हणजे एकेक कामं मार्गी लागतील.

©®Dr Supriya Dighe

 

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now