Oct 24, 2021
कथामालिका

एक आगळेवेगळे लग्न भाग ४६

Read Later
एक आगळेवेगळे लग्न भाग ४६

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

मागील भागाचा सारांश: मैथिली हॉस्पिटल मधून संध्याकाळी राधिका ताईच्या घरी जाते. शेखर आल्यावर मैथिली घरी बोलावल्याचे कारण त्याला विचारते, यावर शेखर तिला सांगतो की राधिकाने सौरभला आतापर्यंत पन्नास हजार रुपये दिले आहेत आणि याबद्दल मला काहीच कल्पना नाही. मैथिली शेखरला सांगते की येत्या दोन तीन दिवसांत मी तुमचे पैसे परत करते. मैथिली काही न खाता पिता राधिकाच्या घरातून बाहेर पडते शिवाय ती माही ला भेटण्यासाठी थांबत नाही म्हणून शेखरला वाटते की आपल्या बोलण्याचा मैथिलीला राग तर नाही आला ना?

आता बघूया पुढे...

राधिकाच्या घरुन निघाल्यावर गाडी चालवताना मैथिलीच्या डोक्यात अनेक विचार चालू होते, आज शेखर जिजूंच्या बोलण्याचा रोख वेगळाच होता. नात्यात पैसे येऊ देऊ नये जे म्हणतात ते काही खोटे नाही. राधिका ताईने जिजूंना न विचारता सौरभला पैसे दिले हे ताईचे चुकलेच पण यावरुन जिजूंनी एवढी बडबड करायची काय गरज होती? या सौरभला ताईकडून पैसे घ्यायची काय गरज होती? सौरभने पैसे घेतले नसते तर मला जिजूंच हे बोलणं ऐकावं तरी लागलं नसतं. आता सौरभला काही बोलायला जावं तर साहेब डिप्रेशन मध्ये जाईल याची भीती असेल, या विषयावर मी आई बाबांशी तर बोलूच शकत नाही. केतन सध्या अमेरिकेत असल्याने मी त्याच्या सोबत या विषयावर बोलू शकत नाही. मला या विषयावर कोणाशी तरी बोलावे लागेल नाहीतर विचार करुन करुन माझे डोकं फुटेल.

मैथिली या विचारातच घरी पोहोचली. फ्रेश होऊन ती जेवण करायला बसली. आईने तिला विचारले, "राधिकाकडे काही खाल्लं नाहीस का? आल्या आल्या जेवायला बसलीस म्हणून विचारलं. गाडी बघून माही काय म्हणाली?"

जेवण करता करता मैथिली म्हणाली," ताई जेवून जा म्हणून आग्रह करत होती पण आज मला तिच्याकडे काही खायची इच्छाच होत नव्हती. माही झोपलेली असल्याने माझी तिच्या सोबत भेट होऊ शकली नाही. अजून थांबले असते तर घरी यायला उशीर होऊन गेला असता."

आई म्हणाली," राधिकाकडे सर्व काही ठीक आहे ना? शेखर राव काही बोलले का?"

मैथिली म्हणाली," आई तुला जेवढं सिरिअस वाटतंय तेवढं काही नाहीये, नवरा बायकोचं किरकोळ भांडण झालं होतं, आता सर्व नॉर्मल आहे. आपली ताई कधी कधी माघार घेत नाही म्हणून त्यांच्यात भांडणं होतात. आपण त्यांच्या दोघांमध्ये तर काही बोलू शकत नाही."

आई म्हणाली," हम्मम राधिका पहिल्या पासून बोलताना विचारच करत नाही.बरं ते जाऊदेत तुझे बाबा घरात नाहीये म्हणून जरा तुझ्या सोबत मला बोलायचे होते."

मैथिली आश्चर्याने म्हणाली," काय ग आई?"

आई म्हणाली," अग आज सकाळी सौरभचा फोन आला होता, त्याला त्याच्या प्रोजेक्ट साठी तीस हजार रुपये पाहिजे होते, तो म्हणाला की बाबांना याबद्दल सांगू नकोस. आता माझ्याकडे तर एवढे पैसे नाहीयेत, निलिमा ताई इकडे असत्या तर त्यांच्या कडून मी ऍडव्हान्स घेतला असता, तुझ्याकडे पैसे असतील तर सौरभला देते का?"

मैथिली म्हणाली," आई एका प्रोजेक्ट साठी एवढे पैसे लागतात का? आणि असे अचानक कुठून पैसे आणायचे, सौरभला काही कळत की नाही?"

आई म्हणाली," सौरभच्या अभ्यासाचा प्रश्न आहे ना, तुझ्याकडे नसतील तर केतन कडून तु पैसे घेऊ शकतेस का?"

मैथिली म्हणाली," आई केतनकडे पैसे मागायला कस वाटेल? बरं तु जास्त काही टेन्शन घेऊ नकोस, मी उद्या सौरभला फोन करुन कधी पर्यंत पैसे लागणार आहेत याबद्दल विचारते, हवंतर हॉस्पिटल मधून ऍडव्हान्स भेटतो का ते बघते."

आई म्हणाली," कर काहीतरी त्याची शेवटची परीक्षा आहे."

मैथिली मनातल्या मनात म्हणाली, "हा सौरभ आपल्या डोळ्यांसमोर आईला गुंडाळत आहे आणि हे आपल्याला माहीत असून सुद्धा आपण काहीच करु शकत नाही."

जेवण झाल्यावर सौरभला फोन लावण्यासाठी मैथिलीने फोन हातात घेतला तर केतनचा मॅसेज आलेला होता, " हाय डिअर, गाडी व्यवस्थित चालवता आली ना? राधिका ताईकडे गेली होतीस का? शेखर जिजू काय म्हणाले? काही टेन्शन असेल तर सांग. मी सुलभा मावशीकडे पोहोचल्यावर तिच्या फोनवरुन फोन करेल, नवीन सिम घेऊन नंबर तुला कळवतो, बाय टेक केअर."

मैथिलीने लगेच रिप्लाय दिला," हाय डिअर, गाडी एकदम मस्त आहे, मी राधिका ताईकडे गेले होते, राधिका ताईने सौरभला दिलेल्या पैश्यांबद्दल जिजूंना माझ्या सोबत बोलायचे होते. टेन्शन घेण्यासारखं अस विशेष काही नाही, असेल तर ते तुला सांगेलच. बाय"

तेवढ्यात पुजा मॅडमचा मॅसेज आला, "मैथिली मॅडम नवीन गाडी घेतल्याची पार्टी कधी देताय?"

पुजा मॅडमचा मॅसेज बघितल्यावर मैथिलीला आठवलं की आपल्याला कोणासोबत तरी बोलायचं होत ना? पुजा मॅडम परफेक्ट आहेत, उद्या मी त्यांना भेटायला जाते, निमित्त पार्टीचे असेल पण डोक्यातील विचार तरी जातील. मैथिलीने पुजा मॅडमला लगेच रिप्लाय दिला, "मॅडम आपण उद्या भेटू शकतो का? पार्टी पण देते आणि आपल्यात बऱ्याच दिवसापासून गप्पा व्हायच्या बाकी आहेत"

पुजा मॅडम ऑनलाइन असल्याने त्यांनी लगेच मॅसेज केला," डॉ केतन इथे नाहीये म्हटल्यावर माझी आठवण झाली असेल बरोबर ना? मलाही तुला भेटायचं आहे, उद्या संध्याकाळी भेटुयात, मी वेळ तुला फोन करुन कळवते."

दुसऱ्या दिवशी ठरल्या प्रमाणे संध्याकाळी मैथिली डॉ पुजाला भेटायला गेली. दोघीजणी एका कॅफेत भेटणार होत्या. मैथिली वेळेआधी कॅफेत पोहोचली होती. काही वेळातच डॉ पुजा कॅफेत पोहोचली. कॉफी व स्नॅक्सची ऑर्डर देऊन झाल्यावर डॉ पुजा म्हणाली, "मग मॅडम सर्व कस काय चाललंय? Post engagement period काय म्हणतोय? तुमच्या रिलेशनशिप मध्ये काही प्रोग्रेस? केतन बद्दल असणाऱ्या फिलिंग्ज मध्ये काही बदल?"

मैथिली हसून म्हणाली," मॅडम किती सारे प्रश्न विचारत आहात? सुरवातीला मी केतनकडे एक मित्र म्हणून बघत होते, पण engagement नंतर त्याच्याकडे मी एक लाईफ पार्टनर म्हणून बघायला लागले आहे सो फिलिंग्ज मध्ये बदल होणारच ना, केतन मला माणूस म्हणून अगदी सुरवातीपासूनच आवडायचा. केतन खरंच खूप चांगला आहे, मी स्वतःला खूप नशीबवान समजते की मला असा लाईफ पार्टनर मिळाला आहे. सगळं छान सुरु आहे. केतन तीन महिन्यांसाठी अमेरिकेला गेला आहे, तिकडून आल्यावर तो स्वतःच हॉस्पिटल सुरु करेल, हॉस्पिटलचं काम सुरु झालं आहे, तो येईपर्यंत सर्व काम पूर्ण होईल. केतनला आईंना सरप्राईज द्यायचं आहे."

डॉ पुजा म्हणाली," हम्मम डॉ केतनने मला हॉस्पिटल बद्दल कल्पना दिली होती, ते मला म्हणत होते की किती दिवस दुसरीकडे नोकरी करणार? माझ्या हॉस्पिटलमध्ये एक केबिन रिकामी आहे तर हवंतर तुम्ही मला जॉईन करू शकता."

मैथिली म्हणाली," अरे मस्तच आयडिया आहे, मग तुम्ही काय ठरवलं आहे?"

डॉ पुजा म्हणाली," मी यांना विचारलं तर तेही म्हणाले की संधी चांगली आहे शिवाय डॉ केतनला माझ्या घरातील सर्वच ओळखतात सो विचार करायला काही हरकत नाही, तसही मी खरंच दुसऱ्यांच्या हॉस्पिटलमध्ये नोकरी करुन कंटाळले आहे, कितीही कंटाळा आला तरी दररोजच्या वेळेत हजर व्हावेच लागते. आता इकडे चालू करायचं म्हटल्यावर स्वतःला इन्व्हेस्टमेंट करावी लागेल त्याची जुळवाजुळव करुन मगच योग्य तो निर्णय घ्यावा लागेल. शक्यतो निर्णय होकारार्थीच असेल, बघू."

मैथिली म्हणाली, "किती छान होईल ना, पुन्हा आपल्याला एकत्र काम करायला मिळेल. आपल्याला गप्पा मारण्यासाठी असा स्पेशल वेळ काढावा लागणार नाही."

डॉ पुजा म्हणाली," हो ना, बाकी घरी सर्व ठीक आहे ना? माही काय म्हणतेय?"

मैथिली म्हणाली," बाहेरुन बघायला गेलं तर सर्व ठीक आहे पण खूपच प्रॉब्लेम्स पुढे उभे आहेत, मला तुमच्या सोबत ह्याच विषयावर बोलायचं होतं म्हणून मी तुम्हाला आज भेटायला बोलावलं आहे ( मैथिली आतापर्यंत सर्व घडलेली हकीकत सांगते) , आता तुम्हीच सांगा एवढं सगळं आजूबाजूला घडतं असताना मी शांत कस बसायचं? काहीच सुचत नाहीये, एका सौरभमुळे एवढे सगळे प्रश्न निर्माण झाले आहे, तोंड दाबून मुक्क्यांचा मार चालू आहे."

डॉ पुजा म्हणाली," आता सध्या तुझी परिस्थिती काय आहे? हे मी समजू शकते. मी सौरभला किंवा तुझ्या फॅमिलीतील कुठल्याच मेम्बरला जवळून ओळखत नाही. पण माझ्या अनुभवावरुन मी तुला एकच सांगेल की सौरभ बद्दल जे तुला कळलं आहे ते तु आई बाबांना सांगून द्यावं कारण उद्या काय घडेल हे आपल्याला माहीत नाही. सौरभने जर सर्व व्यसनं सोडलीच तर चांगलच आहे पण देव न करो जर त्याने व्यसनं सोडलीच नाही तर याचे काय परिणाम होतील हे मी तुला सांगायला नकोय आणि हे सगळं जेव्हा आई बाबांना कळेल तेव्हा तुम्ही त्यांच्या पासून हे सर्व लपवल्याचं दुःख सर्वात जास्त होईल. शेखर जिजूंचे पैसे लवकरात लवकर परत कर म्हणजे त्यांचे व तुमचे रिलेशन खराब होणार नाही"

मैथिली म्हणाली," मॅडम मी जर आत्ता आई बाबांना सर्व खरं सांगायला गेले तर ते खचतील सो ते योग्य होणार नाही. उद्याचा दिवस वाईट उगवेल म्हणून मला आजचा दिवस वाईट होऊ द्यायचा नाहीये.आता राहिला प्रश्न शेखर जिजूंच्या पैश्यांचा तर ते पैसे मी लगेच देणारच होती पण कालच आईने मला सौरभला तीस हजार रुपये द्यायला सांगितले आहे.आता दोघांचंही पुरं होईल एवढे पैसे माझ्याकडे नाहीयेत, काल मला सौरभचा आधीच राग आलेला असल्याने मी त्याला फोन करुन पैसे कशाला हवे आहे हे विचारले नाही, आता आज फोन करेल मग कोणाला आधी पैसे द्यायचे हा विचार करेल."

मैथिली बोलत असतानाच डॉ पुजाला फोन येतो, फोनवर बोलून झाल्यावर डॉ पुजा म्हणाली," मैथिली सॉरी यार घरी पाहुणे आले आहेत मला लगेच जावे लागेल, मी संध्याकाळी तुला फोन करते मग राहिलेल्या टॉपिकवर आपण बोलू."

डॉ पुजा घाईने कॅफेतून बाहेर पडते, तिच्या पाठोपाठ मैथिलीही कॅफेतून घरी जायला निघते.

©®Dr Supriya Dighe

 

 

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now