Oct 24, 2021
कथामालिका

एक आगळेवेगळे लग्न भाग ४५

Read Later
एक आगळेवेगळे लग्न भाग ४५

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

मागील भागाचा सारांश: केतनने मैथिलीसाठी घेतलेली गाडी शोरुम मधील माणूस मैथिलीच्या घरी आणून देतो. मैथिली व तिचे आई बाबा गाडी बघून शॉक होतात. गाडी सोबत केतनने मैथिलीसाठी एक चिठ्ठी दिलेली असते, चिठ्ठी वाचून मैथिली थोडी भावनिक होते. मैथिली गाडी घेऊन हॉस्पिटलला जाते.

आता बघूया पुढे...

हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर मैथिली गौरीला व पुजा मॅडमला केतनने गाडी गिफ्ट दिल्याचे मॅसेज करुन सांगते. संध्याकाळी मैथिली हॉस्पिटल मधून नेहमीच्या वेळेच्या थोडी आधीच राधिका ताईच्या घरी जाण्यासाठी निघाली. वाटेत थांबून मैथिलीने माही साठी चॉकलेट घेतले. राधिका ताईच्या घरी जाऊन मैथिलीने दारावरची बेल वाजवली, राधिका ताईने दरवाजा उघडला. राधिका ताई मैथिलीला अचानक बघून शॉक झाली, ती म्हणाली," मैथिली तु आणि यावेळी? आज अशी अचानक का आलीस?"

मैथिली म्हणाली," ताई तुझ्या घरी यायला मला कुणाची परवानगी घ्यावी लागणार आहे का? चला म्हटलं तुला व माही ला सरप्राईज देऊया म्हणून हॉस्पिटल मधून जरा लवकरच निघाले."

राधिका ताई म्हणाली," आपण दोन दिवसांपूर्वीच भेटलो होतो ना म्हणून म्हटलं आज कशी काय आलीस?"

मैथिली म्हणाली," बरं ताई आत येऊ की दरवाजातूनच मागे जाऊ?"

राधिका चेहऱ्यावर बळजबरी हसू आणून म्हणाली," अग ये ना आत, केतन व निलिमा काकू सकाळीच गेल्या असतील ना?"

मैथिली घरात जात म्हणाली," हो सकाळीच गेले, मी आणि आई गेलो होतो. माही कुठे दिसत नाहीये आणि जिजू आले का?"

राधिका म्हणाली," माही एवढ्यातच झोपली आहे, शेखर अजून आले नाहीयेत."

मैथिली म्हणाली," केतनने माझ्यासाठी activa घेतली आहे, आज सकाळी केतन निघून गेल्यावर शोरुम मधील माणसाने गाडी घरी आणून दिली, केतनने खूप मस्त सरप्राईज दिले, म्हटलं चला ताईला गाडी दाखवणंही होईल आणि माहीला भेटणंही होईल."

राधिका म्हणाली," अरे वा केतन तर भारीच आहे. आई बाबाही खुश झाले असतील ना?"

मैथिली म्हणाली," हो खूप, ताई तुला बरं नाहीये का? आई म्हणत होती की तुझा आवाज भरलेला येत होता."

राधिका म्हणाली," मी बरी आहे ग, आईचा फोन आला तेव्हा मी थकलेली होते म्हणून तस तिला वाटलं असेल. ते राहूदेत तु चहा घेशील की कॉफी, नाहीतर मी खायलाच काहीतरी करते."

मैथिली म्हणाली," ताई विषय बदलू नकोस, तु एक बोलत आहेस आणि तुझा चेहरा वेगळंच काहीतरी सांगत आहे. निदान तु माझ्या पासून तरी काही लपवू नकोस."

राधिकाने डोळ्यातील पाणी पुसले व ती म्हणाली," मैथिली हल्ली शेखर खूप विचित्र वागत आहे, गेल्या आठ दिवसापासून आमच्या सरळ बोलणंच झालं नाहीये, सतत टोमणे मारत बोलत असतात, नेमकं त्यांचं काय दुखतंय हेच कळत नाहीये, विचारायला गेलं तर आमच्यात भांडण होतं म्हणून मी काही बोलतच नाहीये."

मैथिली म्हणाली," ताई मी जिजूंशी बोलू का?"

राधिका ताई म्हणाली," त्याचा त्यांना अजून राग येईल, मी तुझ्याकडे गाऱ्हाणे केले म्हणून."

मैथिली म्हणाली," ताई मी तुझ्याशी खोटं बोलले, मला जिजूंनीच आज बोलावून घेतले आहे."

राधिका म्हणाली," काय? कशाला?"

राधिका हे बोलत असतानाच शेखर येतो. शेखर घरात मैथिलीला आलेलं बघून म्हणतो, "मैथिली तु आलीस पण, मला वाटलं होतं की तुला यायला उशीर होईल."

मैथिली म्हणाली," तुम्ही बोलावलं आहे म्हटल्यावर मला लवकर यावेच लागेल ना?"

शेखर म्हणाला," मी फ्रेश होऊन येतो मग आपण बोलू. राधिका माझ्यासाठी चहा करशील का?"

शेखर फ्रेश होण्यासाठी रुममध्ये गेला, राधिका चहा करण्यासाठी किचनमध्ये गेली, राधिकाला प्रश्न पडला की शेखर इतका नम्र होऊन कसा काय बोलला? शेखर फ्रेश होऊन आल्यावर राधिकाने त्याच्या हातात चहाचा कप टेकवला.

शेखर म्हणाला," मैथिली तुला काय वाटतं? मी तुला इथे का बोलावलं असेल?"

मैथिली म्हणाली," जिजू मला कस माहीत असेल आणि प्लिज जास्त सस्पेन्स न ठेवता जे काही बोलायचं असेल ते सरळ बोला."

शेखर म्हणाला," बरं ठीक आहे, मैथिली तुझ्या ताईने सौरभला आत्ता पर्यंत तुझ्या आई बाबांच्या विराहित पन्नास हजार रुपये दिले आहेत, राधिका सौरभला पैसे देते याची कल्पना मला होती पण ती इतके पैसे देत असेल हे मला माहित नव्हते. राधिकाने सौरभला पैसे दिले यात मला काही गैर वाटत नाहीये पण एवढे? तो ते पैसे कुठे वापरतो याची तरी खातरजमा मैथिलीने करावी की नाही?"

मैथिली राधिका ताईकडे बघून म्हणाली,"ताई तु सौरभला एवढे पैसे दिलेत?"

राधिका म्हणाली," हो अग त्याने काही एकदम नव्हते मागितले, हळूहळू देता देता पन्नास हजार कसे झाले हे मलाही नाही समजले."

मैथिली म्हणाली," ताई तु कोणालाही कल्पना न देता सौरभला एवढे पैसे दिलेस ही तुझी खूप मोठी चूक झाली आहे, तु जिजूंना तरी हे सांगायला हवे होते."

शेखर म्हणाला," मैथिली माझंही हेच म्हणणं होतं, उद्या जर आपल्याला समजलं की सौरभ चुकीच्या मार्गाला गेला आहे तर ते पन्नास हजार कोणत्या भावात पडणार आहेत?"

मैथिली म्हणाली," जिजू तुम्ही बोलत आहात ते खरे आहे पण मला एक सांगा एवढ्यात हा विषय का निघाला? आणि त्यावरून तुमच्यात वाद का होत आहेत?"

शेखर म्हणाला," फ्लॅट घेण्याच्या वेळी मी माझ्या बहिणी कडून काही पैसे घेतले होते, ते मी तिला वेळेत परत केले देखील,मागच्या आठवड्यात तिचा फोन आला होता आणि तिने माझ्याकडे पन्नास हजारांची मागणी केली, मला वाटलं की राधिकाकडे पैसे असतील म्हणून मी तिला हो म्हणालो. घरी आल्यावर राधिकाला विचारलं तर ती म्हणाली की तिने ते पैसे सौरभला दिले आहे, मग मी चिडणार की नाही? मी चिडलो तर त्यावर राधिका म्हणाली, माझ्या भावाला पैसे दिल्यामुळे तुम्ही तुमच्या बहिणीला मदत करु शकत नाही आहात आणि त्यामुळे तुम्ही चिडचिड करत आहात आणि यात एवढं चिडण्यासारखं काहीच नाहीये, सौरभ नोकरीला लागल्यावर आपले पैसे परत करणार आहे. आता मला एक सांग मैथिली आमच लग्न झाल्यापासून मी कधीच तुझा भाऊ, तुझी बहीण अस कधी केलं आहे का? मी तुम्हा दोघांना माझ्या बहीण भावाप्रमाणे मानत असतो, तुमच्या आई बाबांना माझे आई बाबा समजतो मग राधिकाला माझं तुझं करण्याची काय गरज आहे? आधीच मी चिडलेला होतो आणि त्यात ती असं बोलल्याने मला खूप राग आला आणि जे नको बोलायला ते माझ्या तोंडून बाहेर पडले. रागाच्या भरात मी चुकीचा बोललो असेल तेही मला मान्य आहे पण राधिका तेच शब्द डोक्यात घेऊन बसली आहे."

मैथिली म्हणाली," जिजू मला एक सांगा, तुम्ही तुमच्या बहिणीला पैसे दिले की नाही?"

शेखर म्हणाला," माझ्या एका मित्राकडून घेऊन दिले, आता मी तिला शब्द देऊन बसलो होतो मग मला ते पूर्ण करावेच लागेल ना?"

मैथिली म्हणाली," जिजू मी दोन तीन दिवसांत तुमचे पैसे परत करते, तुम्ही तुमच्या मित्राला ते देऊन टाका आणि ताई इथून पुढे सौरभला एक रुपया सुद्धा द्यायचा नाही, बाबा त्याला पुरेसे पैसे पाठवत असतात आणि जरी त्याने तुझ्याकडे पैसे मागितले तर मला सांग, मी त्याला पैसे देईल. तुमचा दोघांचा सुखाचा संसार चालू आहे त्यात आमच्या कोणामुळे विघ्न आणू नका."

शेखर म्हणाला," तु पैसे द्यावेत म्हणून मी हे सर्व बोललो नाही तर तुला या सर्वाची माहिती असावी म्हणून"

मैथिली म्हणाली," जिजू या विषयावर मला जास्त काही बोलायचं नाहीये, तुम्ही का बोललात? तुमचा हेतू काय होता? यापैकी मला काहीच जाणून घ्यायचं नाहीये, फक्त एवढंच सांगेल की तुमच्या दोघांमध्ये कितीही वाद विवाद झाले तरी त्याचा राग तुम्ही आई बाबांवर काढू नका. आईने तुम्हाला फोन केला होता तेव्हा तुम्ही तिच्या सोबत नीट बोलला नाहीत तर इथून पुढे असं करु नका."

शेखर म्हणाला," हम्मम माझं त्या दिवशी जरा चुकलंच, मी आईंसोबत व्यवस्थित बोलायला पाहिजे होतं."

मैथिली म्हणाली," ताई इतक्या छोट छोट्या गोष्टींवरून भांडत जाऊ नकोस, थोडं समजूतीने घ्यायला शिक. तुम्ही दोघेही माझ्यापेक्षा मोठे आहात तेव्हा मला तुम्हाला काही सांगायची गरज नाहीये पण प्लिज आई बाबांना तुमच्यातील मतभेदांचा त्रास होईल असं वागू नका. मी निघते."

शेखर म्हणाला," मैथिली जेवण करुन जा ना, अजून माही पण उठली नाहीये, हवं तर मी तुला घरी सोडतो."

मैथिली म्हणाली," मला केतनने activa घेऊन दिली आहे, मी जाईल, माही उठल्यावर मला लवकर जाऊ देणार नाही. नंतर केव्हातरी तिला भेटायला येईल, चल ताई मी येते."

एवढं बोलून मैथिली राधिकाच्या घरातून निघाली, मैथिली निघून गेल्यावर शेखर राधिकाला म्हणाला," राधिका मैथिलीला राग आलाय का? आज ती जरा वेगळंच बोलत होती."

राधिका म्हणाली," बहुतेक तरी तिला राग आलेलाच दिसतोय, नाहीतर ती एरवी असं बोलतही नाही आणि माही ला भेटल्या शिवाय ती जात नाही. आज तिने साधा चहा सुद्धा घेतला नाही. थोडे दिवस जाऊदेत मग मी तिच्याशी बोलेल."

©®Dr Supriya Dighe

 

 

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now