एक आगळेवेगळे लग्न भाग ४४

Ketan gifts a bike to maithili

मागील भागाचा सारांश: मैथिली केतन व त्याच्या आई सोबत गप्पा मारत मारत जेवण करते, त्यानंतर केतन मैथिलीला सोडायला घरी जातो, वाटेत आईस्क्रीम खाण्यासाठी म्हणून केतन व मैथिली थांबले असताना मैथिलीला शेखर जिजूंचा मॅसेज येतो की उद्या संध्याकाळी घरी ये, मला तुझ्या सोबत एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचे आहे. मैथिली याबद्दल केतन सोबत चर्चा केली. दुसऱ्या दिवशी सकाळी केतन व त्याची आई अमेरिकेला जाणार असल्याने त्यांना भेटण्यासाठी मैथिली व तिची आई जातात.

आता बघूया पुढे... 

केतन व त्याची आई रवाना झाल्यावर मैथिली व तिची आई घरी जातात. मैथिलीला हॉस्पिटलमध्ये व तिच्या आईला बुटीकमध्ये जायचे असल्याने दोघीही तयारी करत असतात, मैथिलीचे बाबा हॉलमध्ये पेपर वाचत बसलेले असतात. मैथिली विचार करत असते की शेखर जिजूंनी संध्याकाळी घरी बोलावलं आहे, हे आई बाबांना डायरेक्ट सांगू शकत नाही, माही ला भेटायला जायचं अस सांगितल्यावर दिवसभरात आई किंवा बाबा राधिका ताईला फोन करुन सांगतील, राधिका ताई व जिजूंचे काही वाद विवाद झालेले असतील तर ती मला नको येऊ म्हणून सांगेल, त्यापेक्षा मी संध्याकाळी हॉस्पिटल मधून निघाल्यावर आईला फोन करुन राधिका ताईकडे जाणार असल्याचे सांगेल. 

मैथिली आपल्या विचारात दंग असतानाच मैथिलीचे बाबा किचनमध्ये येऊन म्हणाले, "मैथिली बाळा आज तुझ्या आईची बरीच धावपळ चालू आहे, तु जरा एक कप चहा करुन देशील का?"

मैथिलीची आई म्हणाली," निलिमा ताई जोपर्यंत परत येत नाही, तोपर्यंत माझी सकाळी अशीच धावपळ सुरु असेल,मला बुटीकमध्ये लवकर जावे लागेल आणि मैथिली तु यांना चहा देऊ नकोस, हल्ली चहा पिण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे"

मैथिली म्हणाली," बाबा आई बरोबर बोलत आहे, जास्त चहा पिणं चांगलं नाही."

बाबा काही बोलणार इतक्यात दरवाजावरची बेल वाजली. मैथिलीच्या बाबांनी दरवाजा उघडला, समोरचा माणूस म्हणाला," डॉ मैथिली इथेच राहतात ना?"

मैथिलीचे बाबा म्हणाले," हो माझी मुलगी आहे, तुमचं तिच्याकडे काय काम आहे?"

तो माणूस म्हणाला," साहेब मी होंडा शोरूम मधून गाडी देण्यासाठी आलो आहे."

मैथिलीचे बाबा म्हणाले," गाडी? आणि कोणती? कोणी मागवली होती? तुम्ही कदाचित चुकीच्या पत्त्यावर आला असाल."

तो माणूस म्हणाला," नाही साहेब,मी एकदम बरोबर पत्त्यावर आलेलो आहे. डॉ केतन सरांनी मैथिली मॅडम साठी activa घेतली आहे, तीच घेऊन मी आलो आहे. सरांना कालच गाडी हवी होती पण त्यांना आवडलेले मॉडेल काल रात्री उशिरा आले म्हणून आज मला गाडी पोहोचवायला यायला लागले."

बाबा एवढया वेळ कोणाशी बोलत आहेत हे बघायला मैथिली किचन मधून बाहेर येऊन म्हणाली, "बाबा तुम्ही कोणाशी बोलत आहात? कोण आलं आहे?"

मैथिलीचे बाबा खुश होऊन म्हणाले," अरे बेटा केतन रावांनी तुझ्या साठी activa घेतली आहे, तीच गाडी पोहोचवण्यासाठी हे आले आहेत."

मैथिलीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते, मात्र तिचे आई व बाबा दोघेही प्रचंड खुश होते. मैथिलीने घराबाहेर येऊन गाडी बघितली, गाडी घेऊन आलेल्या माणसाने तिच्या हातात एक चिठ्ठी टेकवली व तो म्हणाला," मॅडम केतन सरांनी गाडी सोबत हे पत्रही तुम्हाला द्यायला सांगितले आहे." 

मैथिलीने त्याच्या हातातली चिठ्ठी घेतली, त्या माणसाने गाडीच्या सर्व पार्ट्सची ओळख मैथिलीला करुन दिली व तो निघून गेला. तो माणूस निघून गेल्यावर मैथिलीच्या आईने तिच्या चेहऱ्यावरुन हात फिरवला व ती म्हणाली," पोरी नशीब काढलंस, केतन सारखा न मागताही सर्व काही देणारा जोडीदार भेटला आहे, अजून काय हवं आहे."

मैथिली स्माईल देऊन तेथून निघून गेली, तिला चिठ्ठीत काय लिहिलेले होते ते वाचायचे होते, मैथिली बाजूला जाऊन चिठ्ठी वाचू लागली, "नवीन गाडी साठी हार्दिक अभिनंदन मॅडम, गाडी बघून तु शॉक झाली असशील ना? मला तुझा हा चेहरा बघायचा होता ग, पण काय करु तुला हवा असलेला गाडीचा कलर त्यांच्याकडे नव्हता मग काय शेवटी एक चिठ्ठी लिहावी लागली. आता तु विचार करत असशील की ही गाडी मी तुला का दिली असेल? बरोबर ना तर यापुढे मी नसताना तुला बरीच कामे करायची आहेत, स्वतःची ड्युटी सांभाळून हॉस्पिटलच्या कामाकडे लक्ष द्यायचे आहे. रिक्षा व बसची वाट बघण्यात बराच वेळ निघून जातो आणि तुला त्रासही होईल, ते मला नकोय. तु स्वतःहून तर कधीच काही मागत नाहीस म्हणून मीच स्वतःहून तुला गाडी द्यायची ठरवली आहे. मी गाडी दिली म्हणून तु जास्त टेन्शन घेऊ नकोस, आता एक स्माईल दे आणि गाडी घेऊन हॉस्पिटलमध्ये जा.हेल्मेट विना गाडी चालवायची नाही हे लक्षात ठेव, ही माझी ऑर्डर समज. I really miss you dear. गाडीसोबत फोटो काढून मला पाठव."

चिठ्ठी वाचताना मैथिलीच्या डोळयात पाणी आले, ती मनातल्या मनात म्हणाली," मी मागच्या जन्मात नक्कीच खूप पुण्य केले असेल ते या जन्मात इतकं प्रेम करणारा केतन माझ्या आयुष्यात आला आहे, हे देवा माझ्या या सुखाला कोणाची नजर लागू देऊ नको." 

मैथिलीने केतनला लगेच मॅसेज केला, "Thank you so much dear for activa, I miss you too अँड I love you so much"

तेवढ्यात मैथिलीची आई तिथे येते, ती म्हणते, "मैथिली पटकन आवर, तुला हॉस्पिटलला जायला उशीर होईल ना?"

मैथिली म्हणाली," हो आई, मी निघतच आहे, आई ऐक ना संध्याकाळी हॉस्पिटल मधून मी ताईच्या घरी जाऊ का? राधिका ताईला व माही ला गाडी दाखवून सरप्राईज देऊ का?"

आई म्हणाली," ठीक आहे, मीच तुला म्हणणार होते की राधिकाकडे एक चक्कर टाकून ये म्हणून ,काल फोनवर तिचा आवाज थोडा भरलेला वाटला."

मैथिली म्हणाली," आई पण तु तिला फोन करुन मी येणार असल्याचे कळवू नकोस आणि ताई ठीक असेल, तुला आपली ताई तर माहीत आहे ना, थोडा कामाचा ताण पडला की मॅडमचा आवाज भरुन येतो."

आई म्हणाली," काल मी शेखर रावांना राधिकाची चौकशी करायला फोन केला होता तेव्हा ते माझ्या सोबत नीट बोलले नाही म्हणजे त्यांच्या बोलण्यात मला कोरडेपणा वाटला, एरवी ते आपुलकीने बोलायचे."

मैथिली आईला समजावण्या साठी म्हणाली, "आई जिजूंना काही कामाचं टेन्शन असेल, तु यावर अतिविचार करु नकोस. सगळं काही ठीक असेल, तुझ्यात व बाबांमध्ये या वयात वाद होतात तर ताई व जिजूंमध्ये जरी काही झालं असेल तर ते नॉर्मल असेल. तुझ्यासाठी मी ताई व जिजूंना याबद्दल विचारुन येईल म्हणजे तुझ्या मनात शंका येणार नाही."

आई निघून गेल्यावर मैथिली मनातल्या मनात म्हणाली," आपण आई पासून काहीच लपवू शकत नाही हेच खरे आहे, आईला राधिका ताईच्या एका आवाजावरून काहीतरी गडबड असल्याचा अंदाज आला, आई तु खूप महान आहेस, मी तर म्हणेल की जगातील सर्वच आया महान आहेत."

आईने गाडीची पूजा केली, मैथिलीने गाडीच्या पूजेचे फोटो काढले व ते केतनला लगेच पाठवले. गाडी हॉस्पिटलला घेऊन जाण्याआधी बाबांनी मैथिलीला ट्रॅफिक व रोडबद्दल सूचना दिल्या. केतनने सांगितल्या प्रमाणे मैथिलीने पहिले हेल्मेट घातले आणि मगच ती गाडीवर बसली. स्वतःची गाडी चालवण्याचा काय आनंद असतो हे मैथिलीला पहिल्यांदाच अनुभवायला मिळाले होते. मैथिली गाडी घेऊन हॉस्पिटलला गेली.

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all