Oct 24, 2021
कथामालिका

एक आगळेवेगळे लग्न भाग ४३

Read Later
एक आगळेवेगळे लग्न भाग ४३

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

मागील भागाचा सारांश: मैथिलीने राधिका ताईला पुण्याला जाऊन सौरभची भेट घेतल्याचे सांगितले तसेच सौरभ ड्रग्स घेतो हेही सांगितले. केतनने सौरभला कश्या पध्दतीने समजावले हेही मैथिलीने राधिका ताईला सांगितले. राधिका ताईच्या बोलण्यावरुन मैथिलीला अंदाज आला की नक्कीच शेखर जिजू व राधिका ताईमध्ये काहीतरी चालू आहे याचं कारण सौरभला पैसे दिले हे आहे की अजून काही दुसरे आहे. केतन व त्याच्या आईची मदत करण्यासाठी मैथिली त्यांच्या घरी जाते. केतनची आई बुटीकमध्ये गेल्यावर केतन व मैथिली दोघे एकटेच घरात असतात. 

आता बघूया पुढे.....

मैथिली दरवाजा उघडते. केतनची आई म्हणते, "मैथिली अग तुम्ही दोघे काय करत होतात? मी केव्हाची बेल वाजवतेय, ऐकू आली नाही का?"

यावर मैथिली काहीच बोलली नाही ती खाली मान घालून लाजत होती. केतनच्या आईच्या हे लक्षात आल्यावर ती म्हणाली," अरे देवा मी चुकीच्या वेळी बेल वाजवली वाटतं, मला आधीच लक्षात यायला हवे होते."

मैथिली विषय बदलण्यासाठी म्हणाली, "आई सुलभा मावशीं करता आईने लाडू आणि शंकरपाळे बनवले आहेत, ते मी उद्या सकाळी घेऊन येईल."

केतनची आई मैथिलीकडे बघून हसून म्हणाली," तु विषय बदलण्यात माहीर आहेस ग, उद्या सकाळी येताना भारतीला सोबत घेऊन येशील, तिला थोडे बुटीकचे कामं समजून सांगायची आहेत, मी इथे नसल्यावर काही अडचण यायला नको."

मैथिली म्हणाली," आई बुटीकमध्ये काही अडचण असेल तर मीही लक्ष देईल, तुम्ही इथली काहीच काळजी करु नका. मी सर्व सांभाळून घेईल, तुम्ही तिकडे जाऊन एन्जॉय करा, इकडची चिंता सोडून द्या."

केतनची आई म्हणाली," हो ग बाई, बुटीक मधील सगळया बाया सुद्धा हेच म्हणाल्या पण बुटीक टाकल्यापासून मी एकही दिवस कुठे गेलेले नाही म्हणून जरा काळजी वाटतेय."

मैथिली व आईचे बोलणे चालू असतानाच केतन येऊन म्हणतो," आई अग किती काळजी करशील? तुझी हक्काची सून आहे इथे ती सर्व सांभाळून घेईल म्हणतेय ना मग तर झालं, आपण टेन्शन घ्यायचं नाही. तसही तिकडे गेल्यावर सुलभा मावशी तुला इकडचा विचार करु देणार नाही याची मला खात्री आहे."

मैथिली म्हणाली," आई मला रोजच्या रोज फोटो पाठवत जा, म्हणजे तुम्ही तिकडे काय करताय हे मलाही समजेल. तुम्ही अमेरिकेत जाताय पण मीच जास्त एक्साईटेड झाले आहे."

केतनची आई म्हणाली," माझ्या एकटीचेच फोटो पाठवू की अजून कुणाचे फोटो पहायचे आहेत."

मैथिली म्हणाली," आई सुलभा मावशींसोबत तुम्ही फिरायला जाणार मग त्यांच्या सोबत सुद्धा फोटो काढा आणि ते मला पाठवा. माझ्या हातात असतं तर मीपण तुमच्या सोबत आले असते."

केतनची आई म्हणाली," लग्न झाल्यावर तुम्ही दोघे हनिमूनला अमेरिकेलाच जा, माझ्या कडून गिफ्ट समजा."

केतन म्हणाला," आई तुझं काय चाललंय? आता आपण तर जाऊन येऊ मग पुढचं पुढे बघू."

केतनची आई म्हणाली," ओके सॉरी तुमचा काही वेगळा प्लॅन ठरला असेल ना?"

मैथिली म्हणाली," आई तुम्ही आम्हाला चिडवण्याचा मूडमध्ये दिसत आहात, मी आता निघते आई घरी वाट बघत असेल."

केतनची आई म्हणाली," मी भारतीला फोन करुन सांगते की तुला यायला उशीर होईल म्हणून, तु आमच्या सोबत जेवण कर, केतन तुला घरी सोडेल."

मैथिलीने मान हलवून होकार दिला. मैथिली, केतन व त्याच्या आईने एकत्र बसून गप्पा मारता मारता जेवण केले. जेवण झाल्यानंतर केतन मैथिलीला सोडण्यासाठी तिच्या घराच्या दिशेने निघाला. मैथिली गाडीत बसल्यावर केतन म्हणाला," मैथिली आईस्क्रीम खायला जाऊयात का?"

मैथिली म्हणाली," मलाही आवडलं असत रे, पण घरी पोहोचायला जास्त उशीर होईल."

केतन म्हणाला," अग थोडा उशीर होईल जास्त नाही, आई काही बोलली तर सांग तुझा जावयाला आईस्क्रीम खायचं होतं."

मैथिली हसून म्हणाली," केतन तुझं तर ना काहीपण असतं, ठीक आहे बाबा, आपण आईस्क्रीम खायला जाऊया."

केतनने गाडी आईस्क्रीम पार्लरच्या इथे थांबवली. मैथिली गाडीतच थांबली, केतन आईस्क्रीम आणण्यासाठी गेला होता तोपर्यंत मैथिली मोबाईल वर मॅसेज चेक करत होती त्यात शेखर जिजूंचा मॅसेज होता, 'मैथिली उद्या संध्याकाळी हॉस्पिटल मधून घरी ये, थोड्या महत्त्वाच्या विषयावर बोलायचे आहे'

शेखर जिजूंचा असा मॅसेज बघून मैथिली विचारात पडली की जिजूंना अस माझ्याशी काय महत्त्वाचं बोलायचं असेल? मैथिली तिच्या विचारात दंग असताना केतन आईस्क्रीम घेऊन आला व तो म्हणाला, "मैथिली एवढा कसला विचार करत आहेस?"

"अरे काही नाही असंच, तु आईस्क्रीम घेऊन आला सुद्धा." मैथिलीने बोलता बोलता केतनच्या हातातून आईस्क्रीम घेतले.

आईस्क्रीम खातानाही मैथिली शेखर जिजूंच्या मॅसेजचा विचार करत होती, तिचे केतनच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते. केतनला हे लक्षात आल्यावर तो म्हणाला," मैथिली काय झालंय? सौरभचा काही मॅसेज आलाय का? "

मैथिली म्हणाली," शेखर जिजूंनी मला उद्या संध्याकाळी घरी बोलावलं आहे, त्यांना काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे."

केतन म्हणाला,"अग मग त्यात एवढं विचार करण्यासारखं काय आहे? शेखर जिजूंना सौरभ बद्दल बोलायचं असेल किंवा दुसराही विषय असू शकेल."

मैथिली म्हणाली," मी सकाळी राधिका ताईला भेटले होते तिच्या बोलण्यावरुन असे वाटत होते की तिच्यात व जिजूंमध्ये नक्कीच काहीतरी झाले आहे आणि शिवाय जिजू मला डायरेक्ट फोनच करतात, ते मला कधीच मॅसेज करत नाहीत, आज चक्क त्यांनी मला मॅसेज केला आहे."

केतन म्हणाला," नवरा बायकोमध्ये भांडण होणं हे नॉर्मल आहे, तुला नेमकी शंका कसली आहे?"

मैथिली म्हणाली," राधिका ताईने आमच्या भाऊरायांना जिजूंच्या विराहित काही पैसे दिले होते आणि ते जिजूंना समजले आहे."

केतन म्हणाला," अग मग त्यात काय बिघडलं? सौरभ राधिका ताईंचा लहान भाऊ आहे, त्याला जर मदतीची गरज होती तर ती ताईंनी केली तर काय हरकत आहे? आता हे त्यांनी शेखर जिजूंना सांगितले नाही ही राधिका ताईंची चूक आहे. समजा शेखर जिजूंच्या भाऊ किंवा बहिणीला त्यांनी मदत केली असते तर यावर राधिका ताई आक्षेप घेऊ शकल्या नसत्या मग हेच जर राधिका ताईंनी केलं तर त्यात काय बिघडलं?

मैथिली म्हणाली," केतन तु आणि तुझे विचार खूप महान आहेत, सगळेच जर तुझ्या सारखा विचार करायला लागले तर मग काहीच प्रॉब्लेम होणार नाही. शेखर जिजू इतकेही वाईट नाहीयेत, तु साखरपुड्याच्या वेळेला बघितलंच असेल की त्यांनी किती धावपळ केली होती पण नेमकं ह्यावेळी त्यांना काय झालं, कुणास ठाऊक? उद्या त्यांच्याकडे गेल्यावरच सगळं खरं काय आहे ते कळेल."

केतन म्हणाला," हम्मम, मी तुला घरी सोडतो, जास्त विचार करु नकोस."

केतन मैथिलीला घरी सोडतो. दुसऱ्या दिवशी सकाळी केतन व त्याच्या आईला लवकर निघायचे असल्याने मैथिली लवकर झोपते, दुसऱ्या दिवशी लवकर उठून तयारी करते व आईला सोबत घेऊन ती केतनच्या घरी पोहोचते. हॉलमध्ये केतनने सर्व बॅग्स काढून ठेवलेल्या असतात. मैथिली सोबत आणलेले सामान एका बॅगमध्ये भरुन देते. केतन आईच्या विराहित मैथिलीकडे हॉस्पिटलच्या फाईल देतो. सर्व सामान व्यवस्थित चेक करुन केतन ते गाडीत ठेवतो. मुंबईला पोहोचायला उशीर होऊ नये म्हणून केतन व त्याची आई जायला निघतात. मैथिली केतनच्या आईच्या पाया पडून नमस्कार करते. केतनही मैथिलीच्या आईच्या पाया पडतो. दोघांच्या आया समोर असताना मनात असताना सुद्धा केतन व मैथिलीला एकमेकांना मिठी मारता येत नाही. केतनची गाडी निघताना मैथिलीच्या डोळ्याच्या कडा ओलावलेल्या असतात. 

©®Dr Supriya Dighe

 

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now