Oct 24, 2021
कथामालिका

एक आगळेवेगळे लग्न भाग ४२

Read Later
एक आगळेवेगळे लग्न भाग ४२

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

मागील भागाचा सारांश: केतनने सौरभला सांगितले की तुला ड्रग्सचे व्यसन लागल्याचे त्याला त्याच्या एका मित्राकडून समजले असून केतनने याची पूर्ण शहानिशा करून घेतली आहे,सौरभने सुरवातीला खरे सांगितले नसल्याने मैथिलीने त्याला माही ची शप्पथ घातली तेव्हा सौरभने त्याला असलेल्या व्यसनं मान्य केली तसेच व्यसनं सोडण्याचा प्रयत्न करेल अशी ग्वाही सौरभने मैथिली व केतनला दिली. हे सर्व ऐकल्यावर मैथिलीला समजते की केतनला सौरभ बद्दल सर्व कळाल्यानेच तो आपल्याला पुण्याला घेऊन आला आहे, मैथिलीने यासाठी केतनचे आभार मानले.

आता बघूया पुढे...

केतन व मैथिली जरा उशिराच नाशिकला पोहोचले. केतन मैथिलीला तिच्या घरी सोडून आपल्या घरी निघून गेला. प्रवासाने थकून गेल्यामुळे मैथिलीला लगेच झोप लागली. पहाटे पहाटे सौरभ बद्दल काहीतरी वाईट स्वप्न पडल्याने मैथिलीला खडबडून जाग आली. मैथिली विचार करु लागली की मला केतनसारखा जोडीदार भेटला म्हणजे मी खरंच खूप भाग्यवान आहे. केतन प्रत्येक नातं किती छान हाताळतो. केतनने सौरभला अश्या रीतीने समजावलं की त्याला रागही नाही आला आणि केतनला काय सांगायचे होते हेही सौरभ पर्यंत व्यवस्थित पोहोचले. फक्त आता सौरभने व्यवस्थित रहायला पाहिजे. राधिका ताईला याबद्दल सर्व काही सांगावे लागेल नाहीतर देव न करो पुढे काही घडलं तर ताई माझ्या नावाने शंख फुकायला मोकळी. आई बाबांना याबद्दल काहीच कळायला नको नाहीतर त्यांना खूप मोठा धक्का पोहोचेल. बाबा तर हा धक्का पचवू शकतील की नाही यात मला शंकाच आहे. राधिका ताईला बाहेर कुठेतरी भेटूनच सौरभची कथा सांगावी लागेल,घरी गेले तर शेखर जिजूंनाही सर्व सांगावे लागेल, चला आत्ताच ताईला मॅसेज करुन ठेवते म्हणजे ती सकाळीच काहीतरी प्लॅन करुन ठेवेल. संध्याकाळी हॉस्पिटल मधून निघाल्यावर आधी राधिका ताईची भेट घेईल मग केतनच्या घरी जावे लागेल, आईंचं पूर्ण पॅकिंग झालं की नाही हे बघावं लागेल. चला मैथिली मॅडम अस बसून चालणार नाही, भरपूर काम पडली आहेत.

मैथिलीने राधिका ताईला मॅसेज केला, राधिका ताईचे लगेच उत्तर आले, 'संध्याकाळी नको, मी बिजी आहे, सकाळी हॉस्पिटलला जायच्या आधी भेटू, मी माही ला शाळेत सोडते आणि मग तुला भेटायला येते.'

राधिका ताईचा असा मॅसेज आल्यावर मैथिलीने पटपट आवरले व घरातून लवकर हॉस्पिटलला जाण्यासाठी म्हणून निघाली. ठरल्या प्रमाणे राधिका ताई मैथिलीला भेटायला आली. मैथिलीने तिला पुण्याला घडलेली सर्व हकीकत सांगितली, सर्व ऐकून राधिका ताईला मोठा धक्का बसला, ती म्हणाली, "मैथिली किती भयंकर आहे हे सगळं, मला वाटलं होतं की सौरभला व्यसन असून असून फक्त सिगारेट फार तर दारुच असेल पण तो ड्रग्स घेतो, हा आपलाच सौरभ आहे का?"

मैथिली म्हणाली," ताई तुला ऐकून इतका धक्का बसतोय पण तु जर त्याचा अवतार बघितला असतास तर तुझा तुझ्या डोळयांवर विश्वास बसला नसता. ताई मला एक कळत नाहीये की जे संस्कार आपल्या आई बाबांनी आपल्या दोघींवर केलेत तेच संस्कार सौरभवर सुद्धा केलेत बरोबर ना? मग आपण कुठलाही निर्णय घेताना आधी आई बाबांचा विचार करतो मग सौरभ का करत नसेल?"

राधिका ताई म्हणाली," काय माहीत? मलाही हाच प्रश्न पडलाय. डॉ केतनने सौरभला समजावून सांगितलेच आहे तर बघू आपल्या भाऊरायांच्या डोक्यात काही घुसलं असेल की नाही. मी याबद्दल लगेच काही त्याच्याशी बोलत नाही उगाच त्याचा तुमच्या दोघांबद्दल गैरसमज होईल."

मैथिली म्हणाली," हो मी तुला हेच सांगणार होते."

राधिका ताई म्हणाली," आता काही दिवस सौरभचा विषय डोक्यातून काढून टाक, केतन व निलिमा काकू उद्या अमेरिकेला जाणार आहेत ना? तु त्यांच्याकडे लक्ष दे, तुला खूप नशिबाने अशी माणसं भेटली आहेत, ते तुला समजून घेतात म्हणून त्यांच्या स्वभावाचा फायदा घेऊ नकोस. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट शेखर समोर सौरभचा विषय घेऊ नकोस."

मैथिली म्हणाली," का ग ताई? काही झालंय का?"

राधिका ताई म्हणाली," शेखरला सौरभच्या वागण्यावर संशय आला होता, त्यांनी मला सौरभ व त्याच्या प्रकरणा पासून दूर रहायला सांगितलं आहे, गेल्या काही दिवसांत मी सौरभला शेखरच्या विराहित पैसे देत होते आणि ते शेखरला समजले, त्यामुळे त्यांच्या समोर सौरभचे नाव न घेतलेलेच बरे, चल मी निघते, तुलाही हॉस्पिटलला जायला उशीर होईल."

राधिका ताई निघून गेल्यावर मैथिली तिच्या बोलण्याचा विचार करु लागली, राधिका ताई असं का बोलून गेली, आतापर्यंत तिने कधीच शेखर जिजूंचे गाऱ्हाणे केले नाही की त्यांना ती वाईट म्हणाली नाही पण अस अचानक काय घडलं असेल? सौरभला पैसे दिले म्हणून की अजून काही दुसरं कारण असेल? हा सौरभ पण ना, याच्या मुळे राधिका ताईच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स निर्माण झाले आहेत आणि हे भाऊ व्यसनं करण्यात दंग आहेत.

हॉस्पिटलच्या शिफ्टची वेळ झाल्याने मैथिली हॉस्पिटलमध्ये गेली. संध्याकाळी मैथिली हॉस्पिटल मधून थेट केतनच्या घरी गेली. हॉल मध्ये केतनची आई बॅग भरत होती. मैथिली म्हणाली," आई झालं का आवरून?"

केतनची आई म्हणाली," मैथिली बरं झालं तु आलीस, माझं सर्व सामान भरुन झालं आहे, केतन आत्ता पंधरा मिनिटांपूर्वी आला आहे, त्याच्या सामानाच्या बॅग अजून भरायच्या बाकी आहे, उद्या सकाळीच मुंबईला जाण्यासाठी निघायचे आहे आणि केतनची अजून तयारी नाहीये. मला जरा बुटीकमध्ये जायचं आहे, मी जाऊन येते तोपर्यंत तु केतनला मदत करशील का?"

मैथिली हसून म्हणाली, " आई मी तुम्हाला मदत करण्यासाठीच आली आहे. तुम्ही बुटीकमध्ये जाऊन या तोपर्यंत मी केतनला त्याच्या बॅग भरण्यात मदत करते. आई स्वयंपाक करुन ठेऊ का?"

केतनची आई हसून म्हणाली," सूनबाई लग्न झाल्या शिवाय तु स्वयंपाक घरात जायचे नाही."

मैथिली म्हणाली," आई अस का?"

केतनची आई म्हणाली,"अग मी गम्मत केली ग? तुही दिवसभर थकून आली असशील ना? मी मसालेभात करुन ठेवलाय, हवंतर अजून काहीतरी बाहेरुन मागून घेऊ. तु काही करु नकोस."

एवढं बोलून केतनची आई बुटीकमध्ये निघून गेली. मैथिली केतनच्या रुम मध्ये गेली तर केतन बॅगमध्ये कपडे भरण्यात व्यस्त होता. मैथिली म्हणाली," डॉक्टर साहेब आत येऊ का?"

केतन मैथिलीकडे बघून म्हणाला," मॅडम लग्नानंतर ही आपली सुद्धा रुम असणार आहे, आपल्याला या रुममध्ये यायला कधीपासून परमिशन लागायला लागली आहे."

मैथिली रुमच्या आत जाऊन म्हणाली," मी बॅग भरायला मदत करु का?"

केतन म्हणाला," नाही नको, थोडीच बॅग भरणे बाकी आहे, तु आईला जाऊन मदत कर, ती तर असं सामान भरत आहे जसं कायमच अमेरिकेला रहायला जायच आहे. बरं तरी सामान न्यायला लिमिट आहे नाहीतर आईने किती सामान घेतलं असतं याला काही मापच उरलं नसतं."

मैथिली म्हणाली," केतन अरे आम्हा बायकांचं असंच असतं, त्या काही फक्त त्यांचंच सामान घेत नसतील, त्या तुला लागणाऱ्या वस्तू देखील घेत असतील. आई बुटीकमध्ये गेल्या आहेत त्यांनी मला तुझी मदत कर असं सांगून गेल्या आहेत."

केतन म्हणाला," बरं ते जाऊदेत, सौरभचा काही फोन आला होता का?"

" नाही तसाही तो मला फोन करत नाही" मैथिलीने उत्तर दिले.

केतन म्हणाला," मैथिली सौरभ जरी तुला फोन करत नसेल पण तु त्याला सतत फोन करुन त्याची अपडेट घेत जा. तु त्याच्या पेक्षा मोठी आहेस."

मैथिली म्हणाली," केतन सौरभचा विषय सध्या बाजूला राहूदेत, हॉस्पिटलचे काम मार्गी लागले का?"

केतन म्हणाला," हो मी तुझ्याकडे एक फाईल देऊन जातो त्यात हॉस्पिटलची सर्व कागदपत्रे आहेत, तुला सर्व कामांकडे जातीने लक्ष द्यावे लागेल. मी तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवत आहे आणि तु ती निभावशील याची खात्री मला आहे. आठवड्यातून एक दिवस गावाकडे जाऊन पेशंट तपासून येशील. मी ड्रायव्हर काकांना सांगून ठेवलं आहे, तु गाडी घेऊन जात जा. तीन महिने एवढं ऍडजस्ट करुन घे, त्यानंतर मी आल्यावर तुला काही जास्त काम करावं लागणार नाही."

मैथिली म्हणाली," तु काही काळजी करु नकोस, मी सर्व काम करेल. केतन तीन महिने म्हणजे नव्वद दिवस खूप होतात रे, मला तुझी खूप आठवण येईल. तु सतत अवतीभवती असायची सवय झाली आहे. आपल्याला फोनवर पण जास्त वेळ बोलता येणार नाही."

मैथिली चेहरा पाडून बसली होती, केतनने हातातील सामान बाजूला ठेवले व तो मैथिली जवळ येऊन बसला, केतनने मैथिलीचा हात हातात घेतला व तो म्हणाला," मैथिली माझीही स्थिती तुझ्या प्रमाणेच झालीय, मलाही तुझ्या पासून दूर रहायला जमणार नाही, जसा वेळ भेटेल तसा मी तुला फोन करत जाईल. हे तीन महिने आपल्या साठी कठीण असणार आहेत पण ते म्हणतात ना की दुराव्यामुळे प्रेम वाढते. आपणही याचा अनुभव घेऊन बघूया."

मैथिली म्हणाली," हम्मम केतन तु माझ्या पासून दूर जात आहेस त्यासाठी तुला काहीतरी पेनल्टी द्यावी लागेल."

केतन म्हणाला," काय?"

मैथिली म्हणाली," तुला माझ्यासाठी गिफ्ट आणावे लागेल आणि ते गिफ्ट unique असले पाहिजे."

केतन म्हणाला," हो मॅडम जशी आपली आज्ञा. तुला जेव्हाही माझ्याशी बोलावं वाटेल तेव्हा मॅसेज पाठवत जा, मी जेव्हा बघेल तेव्हा लगेच रिप्लाय देत जाईल, कुठलीही अडचण आली की मला सांगत जा. मनात ठेवून एकटीनेच त्रास सहन करु नकोस. अगदी सौरभ बद्दल असेल तरी सांग."

केतन बोलत असतानाच दरवाजाची बेल वाजली. मैथिली म्हणाली," आई आल्या वाटतं, चल मी जाऊन दरवाजा उघडते."

मैथिली दरवाजा उघडण्यासाठी बेडवरुन उठण्याच्या तयारीत असते तोच केतन तिचा हात धरुन स्वतःकडे खेचतो, मैथिलीच्या चेहऱ्यावर तिचे केस येतात, केतन आपल्या हाताने केस बाजूला करतो, मैथिली लाजून म्हणते, "केतन आई दरवाजा बाहेर उभ्या आहेत मला जाऊदेत."

केतन म्हणाला," आईला थोडी वाट बघूदेत, काही होत नाही. आपण पुढचे तीन महिने भेटणार नाही."

केतन बोलता बोलता मैथिलीच्या अजून जवळ येतो तोच पुन्हा बेल वाजते, मैथिली केतनच्या हातातून आपला हात सोडवून दरवाजा उघडण्यासाठी जाते.

©®Dr Supriya Dighe

 

 

 

 

 

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now