Oct 24, 2021
कथामालिका

एक आगळेवेगळे लग्न भाग ४१

Read Later
एक आगळेवेगळे लग्न भाग ४१

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

मागील भागाचा सारांश: सौरभ येण्याआधी केतन मैथिलीला सांगून ठेवतो की सौरभ आल्यावर मला त्याच्या सोबत महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे, तेव्हा मी बोलत असताना प्रश्न विचारू नकोस. सौरभ आल्यावर तो केतन व मैथिलीला फेमस मिसळ खाण्यासाठी घेऊन जातो. मिसळ खात असताना केतन सौरभला व मैथिलीला त्याच्या एका मित्राची हेमंतची कथा सांगतो. हेमंत चुकीच्या संगतीमुळे व व्यसनामुळे कश्या पद्धतीने वाया गेला हे तो सांगतो. सौरभ यावर म्हणतो की तुम्ही हे सर्व आत्ता का सांगत आहात?

आता बघूया पुढे....

केतन म्हणाला," सौरभ तु एक प्रसिद्ध म्हण ऐकलीच असेल ना 'चोराच्या मनात चांदणं' तुझं अगदीच तसं झालंय, मी फक्त माझ्या एका मित्राची स्टोरी सांगत होतो त्यात मी तुझे कुठेही नाव घेतले नाही आणि तु स्वतःवर का आळ घेत आहेस?"

सौरभ चिडून म्हणाला," जिजू पण तुम्ही सुरवातीला हेच म्हणालात ना की तुम्हाला मला बघून त्याची आठवण झाली म्हणून, या सगळयात तुमची काही चूक नाहीच ये, तुम्हाला माझ्या विरोधात दिदीनेच भडकवले असेल म्हणून तुम्ही माझ्या बद्दल असा विचार करत असाल. कावीळ झालेल्या माणसाला जस जग पिवळं दिसत तसंच अगदी दीदीच झालंय, तिला माझ्या प्रत्येक कृतीत मी चुकीचाच दिसत आहे, आधी तिने राधिका ताईला भडकवलं आणि आता तुम्हाला भडकवायचे काम करत आहे."

मैथिली काही बोलणार तेच केतनने तिला थांबवलं," मैथिली तु आत्ता काहीच बोलू नकोस,मुद्दा बाजूलाच राहील आणि तुमचं भांडण मला बघायला लागेल. सौरभ एकतर मैथिलीने मला काहीच सांगितलेलं नाहीये, दुसरी गोष्ट 'कर नाही त्याला डर कशाला' तु काही केलेलंच नाहीये ना मग तुला चिडायची गरजच नाहीये."

सौरभ म्हणाला," तसं नाही जिजू पण मी जर काही बोललो नाही तर त्याचा चुकीचाही अर्थ तुम्ही काढला असता."

केतन म्हणाला," सौरभ आपल्यात जो ओव्हर कॉन्फिडन्स असतो ना तोच आपल्याला सर्वांत जास्त नडतो, मी यापुढे तुला काही बोलणारच नव्हतो विशेष म्हणजे मैथिली समोर पण तु स्वतःहून विषय काढला म्हणून सांगतोय, आमच्या साखरपुड्याचे फोटो मी माझ्या स्टेटस ला ठेवले होते, त्यात एका फॅमिली फोटोत तुही होतास,त्या फोटोला बघून मला माझ्या एका मित्राने विचारले की तु माझा कोण आहेस? तर मी सांगितलं की तु मैथिलीचा भाऊ आहेस यावर त्याने फक्त एवढंच लिहिलं की त्याला हेमंत होण्यापासून वाचव. म्हणून मी त्याला फोन करुन विचारलं तेव्हा तो म्हणाला की तु ड्रग्स घेतोस शिवाय तुला जुगार खेळण्याचीही सवय आहे, तु एकही रात्र होस्टेलला नसतोस, तु सिगारेट ओढतोस आणि दारुही पितोस. मला त्या मित्राचं बोलणं खरं वाटलं नाही म्हणून मी दुसऱ्या मित्राला फोन करुन तुझा तपास काढायला लावला, माझ्या मित्राच्या काकांची तुझ्या होस्टेलला मेस आहे, त्यांनी सांगितलं की तुम्हाला कळलेली सर्व माहिती खरी आहे. आता मला तुझ्या तोंडून सर्व खरं ऐकायचं आहे. आता बोल."

हे सर्व ऐकून मैथिलीच्या डोळ्यातच पाणी आले, सौरभने मन खाली घातली.

मैथिली रडक्या आवाजात म्हणाली," सौरभ तुला माही ची शप्पथ आहे, केतन जे काही म्हणाला ते खरं आहे का? प्लिज सौरभ काहीतरी बोल."

सौरभ म्हणाला," दीदी तु माही ची शप्पथ का दिलीस? आता तर मला खोटंही बोलता येणार नाही आणि खरं बोलून मी तुला सामोरं जाऊ शकत नाही."

मैथिली चिडून म्हणाली," सौरभ तुला काहीच कसं कळत नाहीये, अरे आपले आई बाबा तुझ्या कडे उज्जवल भविष्य म्हणून बघत आहेत आणि तु हे काय करतो आहेस. केतन ह्याच काय करु मी, माझी तर परिस्थिती अशी झालीय की मी घरी जाऊन आई बाबांना खरंही सांगू शकत नाही आणि त्यांच्या तोंडून मी याचं कौतुक सुद्धा ऐकू शकत नाही. केतन मुली जेवढ्या आई वडिलांचा विचार करतात तेवढा विचार मुलं का करत नाहीत?"

केतन म्हणाला," सौरभ बघ तुझ्या सारख्या मुलांमुळे सर्व मुलांच्या जातीचं नाव खराब होत आहे. मैथिली तु उगाच इमोशनल बोलून त्याला त्रास देऊ नकोस. तुला शांत बसवत नसेल तर तु गाडीत जाऊन बस. असे इमोशनल डायलॉगचा परिणाम मुलांवर होत नसतो, त्यांना त्यांच्याच भाषेत सांगावं लागतं. सौरभ मला एक सांग, तु ही सर्व व्यसनं का करतोस?"

सौरभ म्हणाला,"जिजू मागील वर्षी आमच्या कॉलेजमध्ये स्पोर्ट्स कॉम्पिटीशन साठी दुसऱ्या कॉलेजचे स्टुडंट आले होते. मी टेबल टेनिस खेळतो आणि बऱ्यापैकी चांगलं खेळतो,तेव्हा माझी ओळख विकी सोबत झाली, तो टेबल टेनिस खेळण्यात माहीर आहे, मला त्याच्या कडून टेबल टेनिस शिकायचं असल्याने मी त्याच्या सोबत ओळख करुन घेतली, तो दर रविवारी मला टेबल टेनिस शिकवण्यासाठी कॉलेजला यायचा मग हळूहळू आमच्यात मैत्री झाली, तो आधीपासूनच सिगारेट प्यायचा, सिगारेट प्यायची मी त्याच्या कडूनच शिकलो, विकी सर्व व्यसनं करतो आहे तर आपण केली तर कुठे काय बिघडेल म्हणून मीही सर्व ट्राय करुन बघायला लागलो. ड्रग्स घेण्याची सवय विकी व त्याच्या ग्रुप मुळेच लागली."

केतन म्हणाला," बरं विकीचे वडील काय करतात?"

सौरभ म्हणाला," त्यांचा शेअर ट्रेडिंगचा बिजनेस आहे, ते खूप श्रीमंत आहेत."

केतन म्हणाला," तुझे बाबा जेवढे पैसे कमवत असतील तेवढे पैसे विकी व्यसनात उडवत असेल बरोबर ना? विकीला काही झालं तरी त्याच्या वडिलांकडे बक्कळ पैसा आहे, आपल्याकडची काय परिस्थिती आहे हे मी तुला सांगायची गरज नाहीये. सौरभ अजूनही वेळ गेलेली नाहीये. व्यसन हे खूप वाईट असतं. उद्या तुला काही झाल तर विकी तुझ्या मदतीला येणार नाही, तु ज्या बहिणींच्या नावाने शंख फुकत आहेस ना त्याच तुझ्या मदतीला येतील. मी हेमंत व त्याच्या घरच्यांची अवस्था जवळून बघितली आहे म्हणून सांगतोय भाऊ हे सगळं सोडून दे. तुला व्यसनमुक्ती केंद्रात जायच असेल तर मला सांग मी तुझी मदत करतो पण प्लिज हे सगळं सोडून दे, स्वतःच्या हाताने स्वतःचा नाश करु नकोस."

सौरभ म्हणाला," जिजू माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे, मी विकीच्या नादाला लागून व्यसन करायला नको होतं, मी माझी पायरी ओळखून वागायला पाहिजे होतं. प्लिज यातील तुम्ही आई बाबांना काहीच कळू देऊ नका. मी तुम्हाला वचन देतो की मी सर्व व्यसन सोडेल,विकी सारख्या मुलांपासून दूर राहील."

केतन म्हणाला,"तुला तुझी चूक कळाली ना यातच सर्व काही आलं. आता ही चूक सुधार, शेवटचं सेमिस्टर राहील आहे ना तर आता अभ्यासाला लाग, कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन तर झाले नसेलच ना? काहीच हरकत नाही. माझे एक दोन मित्र इंजिनिअर आहेत, तुझ्या नोकरीच काम ते करतील. तु फक्त अभ्यास कर."

सौरभ हसून म्हणाला," हो जिजू, दीदी मी तुला सर्वांत जास्त दुखावलं आहे, इथून पुढे मी अस काहीच वागणार नाही ज्यामुळे तुला किंवा आई बाबांना त्रास होईल."

मैथिली म्हणाली," सौरभ मी तुझी दुष्मन नाहीये, फक्त एवढीच अपेक्षा आहे की तु कुठल्याही वाममार्गाला जाऊ नये आणि तुझं नुकसान होऊ नये. अजूनही आपल्या हातातून काहीच निसटल नाहीये. चांगला अभ्यास कर."

सौरभला होस्टेलवर सोडून केतन व मैथिली नाशिकच्या दिशेने निघतात. मैथिली केतनला म्हणाली," केतन तुला सौरभ बद्दल समजल्यानेच तु माझ्यावर काल इतका चिडला होतास ना? ही लॉंग ड्राइव्ह हे सगळं खोटं होत ना?"

केतन म्हणाला," चला तुला माझ्या मनातील सर्व काही समजत अस म्हणायला काही हरकत नाही. मला तुला कुठेतरी फिरायला घेऊन जायचंच होतं त्यात काल मला सौरभची व्यसन कथा कळाल्यावर मला हेमंतची आठवण झाली आणि मग माझी चिडचिड सुरु झाली आणि त्यात मी तुला फोन केला तेव्हा तुझं आपलं वेगळंच काहीतरी सुरु झालं, मग मी चिडणार नाहीतर काय होणार. तुला आधीच सर्व काही सांगितलं असतं तर तु हायपर झाली असतीस आणि सौरभ समोर आल्यावर तुझी बडबड चालू झाली असते."

मैथिली म्हणाली," पण तु सौरभला फोटोची स्टोरी भारी सांगितली,मी तुला त्याच्या बद्दल काही सांगितले आहे याची भणक सुद्धा तु त्याला लागू दिली नाहीस."

केतन म्हणाला," मी जर तसं सांगितलं नसतं तर त्याला तुझा खूप राग आला असता आणि मला हे नको होतं."

मैथिली म्हणाली," तुझं इतकं बिजी शेड्युल असताना तु माझ्या भावासाठी एवढा वेळ काढला त्यासाठी मी तुझी खूप आभारी आहे, Thank you so much केतन."

केतन म्हणाला," मैथिली तुझा भाऊ माझा कोणीच लागत नाही का? माझे आभार मानून मला परकं करणार आहेस का?"

मैथिली म्हणाली," मला तस नव्हतं म्हणायचं. केतन तु सौरभला एवढं समजावून सांगितलं आहेस आणि सौरभ जस बोलला तसा खरंच तो वागेल का?"

केतन म्हणाला," माझ्या मनात सुद्धा हीच भीती आहे. हे बघ मैथिली आपलं काम होतं त्याला समोर खड्डा आहे म्हणून सांगणं जर त्याला त्या खड्ड्यातच पडायचं असेल तर आपण काहीच करु शकत नाही. सौरभला जर आपलं बोलणं खरंच पटलं असेल तर तो त्या प्रमाणे त्याच्या आयुष्यात बदल करेल आणि नसेलच पटलं तर शेवटी जे होईल ते आपल्याला बघत रहावं लागेल. ज्याचा हात मोडतो त्याच्याच गळयात पडतो."

मैथिली म्हणाली," सौरभचा हात मोडणं हे आपल्या सर्वांसाठीच दुःखदायक असेल खासकरून आई बाबांसाठी. देव करो आणि सौरभला चांगली बुद्धी येवो. म्हणजे पुढच्या संकटाचा सामना आपल्याला करावा लागणार नाही."

©®Dr Supriya Dighe

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now