Oct 18, 2021
कथामालिका

एक आगळेवेगळे लग्न भाग ४०

Read Later
एक आगळेवेगळे लग्न भाग ४०
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

मागील भागाचा सारांश: मैथिली केतन सोबत पुण्याला जाण्यासाठी निघते, केतन मैथिलीला पुण्याला आपण का जात आहोत? याचे कारण सांगत नाही. पुण्याच्या थोडं अलीकडे केतन एका हॉटेल समोर गाडी उभी करतो आणि मैथिलीला त्या हॉटेलमध्ये नेऊन केतन तिला सरप्राईज देतो. केतन तिला लॉंग ड्राइव्ह साठी व तिच्या सोबत वेळ घालवण्यासाठी तिला पुण्याला घेऊन आला आहे असं सांगतो. त्यानंतर केतन व मैथिली सौरभला भेटण्यासाठी त्याच्या होस्टेलवर जातात पण सौरभ तिथे नसतो. मैथिली त्याला फोन लावण्याचा प्रयत्न करते पण तो तिचा फोन उचलत नाही. केतनचा फोन नंबर त्याच्याकडे सेव्ह नसल्याने केतनने फोन केला असता सौरभ लगेच फोन उचलून तो होस्टेललाच असल्याचे सांगतो यावर केतन त्याला सांगतो की मी तुझ्या होस्टेलच्या खालीच आहे तु ताबडतोब जिथे असशील तिथून निघून ये.

आता बघूया पुढे....

सौरभ सोबत फोन झाल्यावर केतन मैथिलीला म्हणाला," हे बघ मैथिली सौरभ आल्यावर त्याला जास्त प्रश्न विचारत बसू नको आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मी त्याच्या सोबत बोलत असताना मला काहीच प्रश्न विचारायचे नाही. मला सौरभ सोबत शांततेत एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचे आहे."

मैथिली म्हणाली," केतन तुझं काल पासून काय चालू आहे? मला तर काहीच कळत नाहीये, या सर्वामागचा तुझा हेतू काय आहे हेही कळत नाहीये. बरं ठीक आहे,तुला सौरभ सोबत जे बोलायचं असेल ते बोल फक्त एक काळजी घे की तो कसाही असला तरी माझा भाऊ आहे आणि माझी अजिबात अशी इच्छा नाहीये की माझ्या भावाचं आणि माझ्या नवऱ्याचं नातं खराब होऊ नये कारण मला तुम्ही दोघे हवे आहात, मी तुमच्या दोघांमध्ये एकाची निवड करु शकत नाही."

केतन हसून म्हणाला," तु कशी आहेस ना मैथिली, एरवी सौरभच्या नावाने कायम शंख फुकत असते पण तुझ्या मनात सौरभ बद्दल किती प्रेम आहे याची कल्पना सौरभला सुद्धा नसेल. तु काळजी करु नकोस मी सौरभ सोबत व्यवस्थित बोलेल."

थोड्या वेळातच सौरभ एका मित्राच्या बाईकवर बसून केतनच्या गाडीजवळ आला. सौरभला सोडून त्याचा मित्र निघून गेला, मैथिली गाडीत बसलेली असल्याने सौरभला ती आल्याचे कळालेच नाही. सौरभचा अवतार एका टपोरी मुला सारखा होता, केस विस्कटलेले, दाढी वाढलेली, शर्टची वरची दोन बटणं उघडीच होती. मैथिलीने सौरभला अश्या अवतारात कधीच बघितले नव्हते. सौरभ केतन जवळ येऊन म्हणाला, "जिजू तुम्ही एकटेच आलात का? आधी फोन केला असता तर मी होस्टेललाच थांबलो असतो, उगाच तुम्हाला माझी वाट पहावी लागली."

केतन हसून म्हणाला," मी एकटा नाही तुझी बहीण पण माझ्या सोबत आलेली आहे, हॉस्पिटलचे काम असल्याने आम्ही पुण्याला आलो होतो, मैथिली म्हणाली की इथे अचानक येऊन तुला सरप्राईज देऊया पण आम्हाला काय माहीत की इथे येऊन आम्हीच सरप्राईज होणार आहोत आणि आम्ही जर फोन केला असता तर तु होस्टेलवर असतोस की इकडे तिकडे उनाडक्या करत फिरतो आहे हे आम्हाला कळलेच नसते ना."

सौरभ म्हणाला," नाही जिजू मी फक्त मित्रांसोबत थोडं फिरायला गेलो होतो. बाकी काही नाही."

केतन म्हणाला," सौरभ कॉलेज लाईफ मीपण एन्जॉय केली आहे, मलाही मित्र होते. तु माझं बोलणं एवढं मनावर नको घेऊस, मी फक्त गंमत केली रे. बरं मैथिली गाडीत बसली आहे, तिच्याशी जाऊन बोल नाहीतर मॅडम रागावतील हं."

सौरभ गाडीजवळ जाऊन म्हणाला," दीदी कशी आहेस? इकडे एक मिसळ सेंटर आहे, तिथे खूप छान मिसळ भेटते, आपण तिकडे जाऊयात का? म्हणजे आपल्याला बसून गप्पाही मारता येईल"

मैथिलीने मान हलवून होकार दिला. सौरभ गाडीत बसला.केतनने गाडी सुरु केली, सौरभ सांगेल तसा केतन गाडी चालवत होता. मैथिली सौरभ सोबत एकही शब्द बोलली नाही. सौरभ मैथिलीला बोलतं करण्या साठी म्हणाला, "जिजू दीदीच तापमान वाढलंय वाटतं की तिला भूक लागलीय म्हणून ती बोलत नाही. तुम्हाला एक टीप देतो, दिदीला जर खूप भूक लागली असेल ना मग ती कोणाचाही राग कोणावर काढू शकते, छोट्या छोट्या गोष्टींनी चिडत बसते."

केतन हसून म्हणाला," मला तिच्या भुकेबद्दल कल्पना आहे. तुझ्या दीदीच तापमान वाढण्यामागे तुच जबाबदार आहेस, तु तिचा फोन उचलला नाहीस ना म्हणून तिला तुझा राग आलेला आहे."

सौरभ म्हणाला," दीदी माझा फोन सायलेंट मोडवर होता ग, नेमका जिजूंचा फोन यायची वेळ आणि मी फोनकडे बघायची वेळ एकच झाल्याने मी जिजूंचा फोन उचलला."

मैथिली म्हणाली," सौरभ माझं तापमान वाढलेलं नाहीये. मी हल्ली थोडी शांत झाले आहे. तु माझा फोन जरी उचलला नाही तरी त्याने मला काही फरक पडत नाही."

केतन म्हणाला," तुम्ही दोघे बहीण भाऊ थोड्या वेळ एकमेकांशी बोलू नका नाहीतर मला टॉम अँड जेरी बघितल्या सारख वाटेल."

गाडी मिसळ सेंटर समोर नेऊन केतनने उभी केली, सौरभ दोघांना आतमध्ये घेऊन गेला. शेवटच्या कोपऱ्यातील रिकामा टेबल बघून तिघे जाऊन बसले.

सौरभने मिसळची ऑर्डर दिली. सौरभ म्हणाला," जिजू इथली मिसळ खूप फेमस आहे, आम्ही मित्र मिळून इथे नेहमी येत असतो."

केतन म्हणाला," तुझ्या कॉलेजला, होस्टेलला बघून मला माझ्या कॉलेजची आठवण येत आहे, एकदा कॉलेज संपलं की सर्व मित्र आपापल्या मार्गाने जातात आणि मग कितीही ठरवलं तरी पुन्हा एकत्र येऊ शकत नाही. तुला बघून ना मला माझ्या एका मित्राची आठवण झाली आहे म्हणजे माहीत नाही तुम्ही वेगळे ही असाल पण एकंदरीत त्याचा आणि तुझा अवतार सारखाच आहे. मी त्याला नेहमी म्हणायचो की भाऊ आपल्या शर्टला वरती जे दोन बटणं दिलेली असतात ना ती फक्त शोसाठी दिलेली नसतात पण त्याने माझं कधीच ऐकलं नाही. ( केतन अस बोलल्यावर सौरभने घाई घाईने शर्टची बटण लावली, यावर मैथिली व केतन दोघेही हसले) माझ्या मित्राचं नाव हेमंत आहे. हेमंत एका साधारण घरातला मुलगा, तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ, लाडकोडात वाढलेला, परिस्थितीची जाण असलेला, त्याचे वडील शाळेत शिपाई होते तर आई मेस चालवायची. हेमंत नेहमी म्हणायचा की मला माझ्या आई वडीलांना सुखात ठेवायचे आहे, त्यांच आयुष्य आमच्यासाठी झुरत गेलं आहे, मी कमवायला लागलो की मी त्यांना जगभर फिरायला पाठवणार आहे. हेमंत दहावी बारावीत मेरीट मध्ये आलेला होता, खूप हुशार, मेहनती मुलगा होता. 

( केतनचे बोलणं चालू असतानाच मिसळ येते आणि हे खायला सुरुवात करतात, केतन खाता खाता पुन्हा आपलं बोलणं सुरू करतो) पहिले दोन वर्ष हेमंत एकदम सरळ लाईन मध्ये चालणारा मुलगा होता म्हणजे कॉलेज, अभ्यास एवढंच त्याच विश्व होतं. तिसऱ्या वर्षात असताना तो कॉलेज बुडवून कुठे जायचा माहीत नाही, रात्री उशिरा होस्टेलला यायचा, आमच्या पैकी बऱ्याच जणांनी त्याला विचारण्याचा प्रयत्न केला पण तो धातूरमातूर कारण द्यायचा, मी पण भरपूर वेळेस त्याचं नेमकं काय चालू आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला पण सगळं व्यर्थ होतं. कालांतराने आमच्या लक्षात आलं की आमच्या कॉलेजमधील एक टपोरी मुलगा होता ज्याला सिगारेट, दारुचे व्यसन होते तो त्याचा मित्र झाला होता. हेमंत कॉलेज बुडवण्या बरोबरच सिगारेट पिऊ लागला होता, नंतर तर होस्टेलला येताना दारु पिऊन यायचा. हेमंतचे मित्रच वेगळे झाले होते. हेमंतला दारुचे व सिगारेटचे अति व्यसन लागले होते, तो दररोज दारू पिऊ लागला होता, दारुच्या नशेत त्याला ना अभ्यासाचे भान राहिले होते ना परीक्षेचे. आमच्या सरांनीही वाया गेलेला मुलगा म्हणून त्याला सोडून दिले होते. मी हेमंतला समजावण्याचा खूप प्रयत्न केला होता पण तो समजून घेण्या पलीकडे निघून गेला होता. आम्ही चौथ्या वर्षात असताना हेमंत ड्रग्ज च्या आहारी गेला होता, ड्रग्ज साठी पैसे कमी पडू लागल्याने तो जुगार खेळू लागला. पुढे जाऊन हेमंत ड्रग्जच्या इतक्या आहारी गेला होता की त्याची प्रचंड बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. कॉलेजच्या प्रिन्सिपल सरांनी हेमंतच्या वडिलांना बोलावून घेतले आणि हेमंतला सोबत घेऊन जायला सांगितले, त्यांनी हेमंतला एका rehabilitation सेंटर मध्ये दाखल केले, यात आम्ही सर्वांनी त्याची मदत केली होती, सौरभ तिथे जवळजवळ एक वर्ष होता, त्याची तिथे काय परिस्थिती होती ती मी स्वतः डोळ्याने बघितली आहे. व्यसनापायी आणि चुकीच्या संगतीमुळे एक हुशार, संस्कारी मुलगा वाया गेला, त्याच्या घरच्यांना किती मानसिक त्रास झाला असेल हे त्यांनाच माहीत. भयंकर होत ते सगळं."

केतनचे बोलणे पूर्ण होईपर्यंत मिसळही संपली होती. मैथिलीला केतनच्या बोलण्याचा हेतू कळाला होता, सौरभला केतनच्या बोलण्याचा राग येऊ नये म्हणून मैथिली म्हणाली, " सौरभ मिसळ खरंच खूप चविष्ट होती."

सौरभ म्हणाला," जिजू मला एक सांगा, तुम्ही तुमच्या मित्राची स्टोरी आत्ता माझ्या समोर का सांगितली? तुमच्या बोलण्याचा हेतू काय होता? तुम्हाला असं तर वाटतं नाही ना की मी ड्रग्जच्या आहारी गेलो आहे म्हणून?"

केतन सौरभला काय उत्तर देईल हे बघूया पुढील भागात.....

©®Dr Supriya Dighe

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now