Oct 24, 2021
कथामालिका

एक आगळेवेगळे लग्न भाग ३९

Read Later
एक आगळेवेगळे लग्न भाग ३९

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

मागील भागाचा सारांश: केतनचा व त्याच्या आईचा व्हिसा साठी इंटरव्ह्यू झाला व त्यांना व्हिसा मिळाला होता, त्यानंतर मैथिलीने केतनच्या आईला खरेदी करण्यात मदत केली. केतन हॉस्पिटलच्या कामात बिजी असल्याने त्याच्या सामानाची खरेदीही मैथिलीनेच केली होती.केतनला व त्याच्या आईला मंगळवारी अमेरिकेत जायची फ्लाईट होती. शनिवारी रात्री केतनने मैथिलीला फोन करुन सांगितले की उद्या सकाळी ७ वाजता आपल्याला पुण्याला जायचं आहे, कशासाठी जायचे आहे ते उद्या गाडीत सांगेल.

आता बघूया पुढे...

रविवारी सकाळी ७ वाजता केतन घ्यायला येणार असल्याने मैथिली लवकर उठून तयार झाली. बरोबर ७ वाजता केतन मैथिलीला घ्यायला आला. मैथिली त्याच्या सोबत फारसं काही न बोलता गुपचूप गाडीत बसली. जरावेळ दोघेही एकमेकांशी काहीच बोलले नाही. काही वेळ असाच गेल्यानंतर केतन म्हणाला," मैथिली घरातून निघताना काही खाल्ले होतेस का?"

मैथिली म्हणाली," हो मी घरातून निघताना नेहमी काही ना काही खाऊनच निघते, उपाशीपोटी निघायची सवय नाहीये मला."

मैथिली जरा तोऱ्यातच बोलल्याने केतनला समजून गेले की हिला आपल्या कालच्या बोलण्याचा राग आलेला दिसतोय.

केतन तिला म्हणाला," मैथिली मला माहित आहे की तुला माझ्या बोलण्याचा राग आला असेल पण मी एवढा चिडून का बोललो असेल? या मागील कारण समजल्यावर तुझा राग कुठल्या कुठे पळून जाईल. मी तुझ्याशी चिडून बोलायला नको होते पण त्या वेळची माझी मनस्थिती ठीक नव्हती."

मैथिली म्हणाली," काय झालं हे सांगणार आहेस का? तुला परवा अमेरिकेला जायचे आहे, हॉस्पिटलच्या कामाची लाईन लावायची बाकी आहे, ते काम करायचं सोडून आपण असे अचानक घाईघाईने पुण्याला का चाललो आहोत? मला माहीत आहे की आपण जाण्यामागील कारण तितकंच अर्जंट असेल, पण तु मला सांगितलंच नाहीतर मला कळणार कसं?"

केतन म्हणाला," आपण पुण्याला का जात आहोत हे मी तुला आत्ता सांगणार नाहीये, ते कारण आत्ताच सांगून मला आपल्या पुढच्या प्रवासाची मजा घालवायची नाहीये."

मैथिली म्हणाली," ठीक आहे, जोपर्यंत तु मला काही सांगणार नाही तोपर्यंत मी तुझ्यासोबत काहीच बोलणार नाही."

केतन म्हणाला,"जशी तुझी मर्जी."

जवळजवळ पूर्ण प्रवासात मैथिली व केतन एकमेकांशी काहीच बोलले नाही. पुणे थोड्या अंतरावर राहिलेले असताना केतनने गाडी एका हॉटेल समोर थांबवली व तो म्हणाला, "मला खूप भूक लागली आहे, इथे सर्व प्रकारचे जेवण भेटते, साऊथ इंडीयन, पंजाबी, फास्ट फूड, महाराष्ट्रीयन. मी पुण्याला जेव्हा जेव्हा येतो तेव्हा जेवणासाठी इथेच थांबतो."

मैथिली नाक मुरडत गाडीच्या खाली उतरली, बघायला गेले तर मैथिलीला मनातून आनंद झालेला होता पण तिने तो चेहऱ्यावर दाखवला नाही. केतन पुढे चालू लागला व त्याच्या मागून मैथिली हॉटेल मध्ये गेली. केतनने रिसेप्शन जवळ जाऊन काहीतरी विचारले, मैथिली थोड्या मागेच उभी होती. रिसेप्शनिस्टने एका टेबलकडे बोट दाखवत तिकडे केतनला जाण्यास सांगितले, केतन टेबलच्या दिशेने निघाला व त्याने मैथिलीला खुणावले की माझ्या मागे चल.

केतन टेबल जवळ जाऊन बसला, त्याच्या पाठोपाठ मैथिलीही टेबल जवळ पोहोचली, तिने टेबलवर बघितले तर तिथे लिहिलेले होते की 'वेलकम डॉ केतन and डॉ मैथिली'

मैथिलीच्या चेहऱ्यावर आपसूकच हसू आले. मैथिली खुर्चीत बसल्यावर लगेच एक वेटर कॉफी घेऊन आला, सोबत एक चिठ्ठीही मैथिलीला देऊन गेला. मैथिलीने चिठ्ठी उघडून वाचायला सुरुवात केली, 'Thank you so much dear for coming in my life. तु माझ्या आयुष्यात आल्यापासून माझे आयुष्य परिपूर्ण झाल्यासारखे वाटत आहे. तु मला प्रत्येक गोष्टीत support करत आहेस, तु माझ्यावर इतका विश्वास दाखवते त्याबद्दल खरंच मी तुझा खूप आभारी आहे. माझ्या आईसोबत तु ज्या प्रेमाने वागत आहेस, तिची काळजी घेत आहेस त्याबद्दल खरंच थँक्स. साखरपुडा झाल्यापासून मी तुला लांब कुठंतरी फिरायला घेऊन जाऊ शकलो नाही त्याबद्दल सॉरी. पुढील तीन महिने मी तुझ्यापासून लांब असणार आहे, मी तुला नक्कीच मिस करेल, इथे असताना प्रत्येक गोष्ट तुझ्यासोबत शेअर करायची सवय लागली आहे. मला रोमँटिक काही करता येत नाही, पण जेवढ शक्य आहे तेवढं करतो आहे.I love you dear' चिठ्ठी सोबत एक गुलाबाचे फुलं ही होते.

चिठ्ठी वाचता वाचता मैथिलीच्या डोळ्यात पाणी आले, ती केतनकडे बघून म्हणाली, "केतन हे सॉरी आणि थँक्स काय लावले आहे, तु वेडा आहेस का? तु जे काही माझ्यासाठी करतो आहेस ते पुरेसे आहे, आणि तुझी आई माझी कोणीच नाहीये का? माझंही त्यांच्याप्रती काहीतरी कर्तव्य आहे की नाही. तु मला हे सर्व आधी सांगितलं असतं तर सरप्राईज राहिलंच नसतं ना? मीच वेडेपणा केला आणि पूर्ण प्रवासात तुझ्याशी काही बोलले नाही."

केतन म्हणाला," साखरपुड्यानंतर हे दिवस खूपच धावपळीचे गेले, माझ्या मनात तुझ्याबद्दल काय भावना आहेत? हेही नीट सांगायला वेळ भेटला नाही."

मैथिली म्हणाली," मी तरी कुठे तुला I love you म्हणाले, बऱ्याच वेळा वाटलं की छान काहीतरी करु आणि मग आपल्या मनातील भावना व्यक्त करु."

केतन म्हणाला," बघ तु आत्ता बोलता बोलता बोलून गेलीस."

मैथिली जीभ चावून म्हणाली," अरे हो की"

केतन म्हणाला,"मला खूप भूक लागली आहे, आपण काहीतरी ऑर्डर करूयात, फक्त प्रेमाने पोट भरणार नाहीये."

केतनच्या ह्या वाक्यावर मैथिलीने फक्त स्माईल दिली. केतनने त्याला व मैथिलीला आवडेल असे पदार्थ मागवले. केतन व मैथिलीने जेवण करता करता भरपूर गप्पा मारल्या. जेवण झाल्यावर केतन व मैथिली हॉटेलच्या बाहेर पडले. बाहेर पडता पडता मैथिली केतनला म्हणाली," केतन आपण फक्त ह्या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी इतक्या लांब आलो आहोत."

केतन म्हणाला," आपण कुठे लॉंग ड्राईव्हला पण गेलो नाही ना? म्हणून म्हटलं चला. आपलं असंच आहे, एकदा ठरवलं ना तर ते करायचंच. बरं मैथिली मी काय म्हणतोय? आपण आता इथपर्यंत आलोच आहोत तर पुण्यात जाऊन सौरभलाही भेटुयात, काय म्हणतेस?"

मैथिली म्हणाली," चालेल की, चांगली कल्पना आहे. मी लगेच सौरभला फोन करू का?"

केतन म्हणाला," नाही नको,आपण त्याच्या होस्टेल जवळ जाऊन त्याला सरप्राईज देऊयात."

मैथिली म्हणाली," चालेल."

केतन व मैथिली सौरभच्या होस्टेलवर जातात व खाली वॉचमन जवळ जाऊन केतनने सौरभला बोलवायला सांगितले यावर तो वॉचमन म्हणाला की सौरभ कुठेतरी बाहेर गेला आहे,तो रुममध्ये नाहीये. केतन व मैथिली सौरभला सरप्राईज द्यायला गेले होते आणि तो रूमवर नसल्याने हे स्वतःच सरप्राईज झाले होते. केतन मैथिलीला म्हणाला" मैथिली सौरभला फोन करून बघ ना म्हणजे तो कुठे आहे हे आपल्याला कळेल तरी."

मैथिलीने सौरभला फोन केला पण सौरभने फोन काही उचलला नाही. मैथिलीने दोन तीन वेळेस ट्राय केला तरी फोन उचलला गेला नाही. शेवटी केतनने त्याच्या फोनवरुन सौरभला फोन लावला आणि आश्चर्य म्हणजे सौरभने केतनचा फोन एका रिंगमध्ये उचलला.

"हॅलो कोण बोलतंय?" सौरभने विचारले

केतन म्हणाला," हॅलो मी डॉ केतन बोलतोय ओळखले का?"

सौरभ म्हणाला," बोला ना जिजू, तुमचा नंबर सेव्ह नव्हता म्हणून समजले नाही."

केतन म्हणाला," अरे तु कुठे आहेस?"

"मी इकडेच होस्टेलच्या रुमवर आहे" सौरभने सांगितले

केतन म्हणाला," मी तुझ्या होस्टेलच्या खालीच उभा आहे, तु रुममध्ये नाहीये हे मला माहीत आहे, मी इकडे थोड्या कामासाठी आलो होतो तर म्हटलं तुझी भेट घेऊन जावं."

सौरभ चाचरत म्हणाला,"जिजू मी एक पुढच्या पंधरा मिनिटांत पोहोचतो."

एवढं बोलून सौरभने फोन कट केला. मैथिली केतनला म्हणाली," तुम्ही त्याला सांगितलं का नाहीत की आपण सोबत आहोत म्हणून."

केतन म्हणाला,"मी जर हे सांगितलं असतं तर तो इथे आलाच नसता. आल्यावर त्याला मोठे सरप्राईज भेटणार आहे, त्याने तुझा फोन उचलला नाही पण माझा नंबर सेव्ह नसल्याने लगेच फोन उचलला."

यावर मैथिली काहीच बोलली नाही.

©®Dr Supriya Dighe

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now