Oct 24, 2021
कथामालिका

एक आगळेवेगळे लग्न भाग ३८

Read Later
एक आगळेवेगळे लग्न भाग ३८

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

मागील भागाचा सारांश:केतनने मैथिलीला नवीन हॉस्पिटल टाकण्याची कल्पना दिली तसेच आईला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी सरप्राईज देण्याबद्दल सांगितले. मैथिलीने केतनला सौरभ बद्दल टेन्शन असल्याचे सांगितले.

आता बघूया पुढे...

केतनचे दोन तीन मित्र सौरभच्या कॉलेजच्या आसपासच्या एरियात रहायला होते. केतनने त्यांना सौरभ बद्दल माहिती गोळा करायला सांगितले. केतनने मैथिली समोर दाखवले नसेल तर त्यालाही सौरभचे टेन्शन आलेच होते.

दुसऱ्या दिवशी केतनचा व त्याच्या आईचा व्हिसा साठी इंटरव्ह्यू होता, इंटरव्ह्यू झाला आणि त्यांना व्हिसा मिळाला होता. मैथिली हॉस्पिटलची शिफ्ट संपल्यावर स्वतःच्या घरी न जाता केतनच्या घरी गेली. मैथिलीला असं अचानक आपल्या घरी बघून केतनची आई म्हणाली," अग मैथिली तु कशी काय इकडे आलीस? केतनला भेटण्यासाठी आली असशील तर तो सध्या घरी नाहीये"

मैथिलीने केतनच्या आईला सर्वप्रथम पाया पडून नमस्कार केला व ती म्हणाली," काकू आपल्याच घरी येण्याआधी मला कुणाची परवानगी घ्यावी लागणार आहे का?"

केतनची आई म्हणाली,"काकू म्हणशील तर तुला परवानगी घ्यावी लागेल पण आई म्हणशील तर हक्काने घरी यायचं"

मैथिली जीभ चावत म्हणाली," अरे हो ते आई म्हणायचं माझ्या लक्षातच राहत नाही, केतननेही एक दोनदा यासाठीच टोकल,पण तोंडात काकूच येतं, इथून पुढे लक्षात ठेवेल."

केतनची आई म्हणाली," होईल हळूहळू सवय, नवीन नोकरी काय म्हणतेय?"

मैथिली म्हणाली," चांगली चालू आहे,माझं राहूदेत अमेरिकेत जाण्यासाठी लागणाऱ्या सामानाची तयारी केलीत का काही?"

केतनची आई म्हणाली," तयारी काय करण्याची त्यात? साखरपुड्याच्या वेळेस नवीन चार पाच साड्या घेतल्या आहेत त्याच घेऊन जाईल, बाकी अजून मला सामान तरी काय लागणार आहे?"

मैथिली आश्चर्याने केतनच्या आईकडे बघत म्हणाली," आई म्हणजे तुम्ही अमेरिकेत जाऊन साड्या घालणार आहात? काहीतरीच काय? ते काही नाही उद्या संध्याकाळी तयार रहा, आपण कपड्यांच्या खरेदीसाठी मार्केटमध्ये जाणार आहोत."

केतनची आई म्हणाली," अग पण अस कोणी लिहलंय का की अमेरिकेत जाऊन साड्या घालायच्या नाहीत म्हणून."

मैथिली म्हणाली," आई अस नाहीये, पण म्हणतात ना जसा देश तसा वेश, इकडे तुम्ही कधी ड्रेस किंवा जीन्स टॉप तर घालणार नाहीत मग तिकडे चाललाच आहात तर तीही हौस करून बघा. आई माणसाने आयुष्यात सर्व हौसमौस करावी, अशी कोणती गोष्ट ठेवायचीच नाही की जी आपण केलीच नाही. लाईफ एन्जॉय करायला हवी."

केतनची आई म्हणाली," अग ड्रेस घेण्यासाठी मार्केटमध्ये जायला कशाला हवं, आपल्या बुटीक मधील बाया बनवून देतील की,त्या चांगल्या डिझाईन्स बनवतात."

मैथिली म्हणाली," आई आपल्या बुटीकमध्ये छानच ड्रेस बनवतात पण यावेळी आपल्याकडे वेळ कमी आहे, कमी वेळात चांगले कपडे बनणं अशक्य आहे, मला ते काही माहीत नाही आपण आत्ता तुम्हाला लागणाऱ्या सर्व सामानाची यादी करतोय आणि उद्यापासून रोज संध्याकाळी थोड्या थोड्या सामानाची खरेदी करणार आहोत."

केतनची आई म्हणाली," ठीक आहे बेटा, जशी तुझी इच्छा, मी कितीही बोलले तरी तु ऐकणार थोडीच आहे. मला बऱ्याच बायका विचारायच्या की तुम्हाला मुलीची कमी भासत नाही का? तर यावर माझे उत्तर असायचे की नाही. पण यासाठीच सर्वजण एकतरी मुलगी हवी असे म्हणतात वाटतं. आता केतनचच बघ ना सकाळपासून फोनवर काहीतरी चालू असतं, नेमकं त्याच काय चालू आहे काही कळत नाही. मी सकाळी त्याला म्हटलं की आपल्याला थोडी फार खरेदी करावी लागेल तर तो म्हणतोय की खरेदी करण्याची काय गरज आहे? माझ्याकडे भरपूर कपडे आहेत, तुझ्याकडेही कपडे असतीलच आणि समजा तिकडे गेल्यावर काही कमी पडलंच सुलभा मावशी आहेच की तिच्याकडून घेता येईल किंवा तिच्या मदतीने मार्केटमध्ये जाऊन विकत घेता येईल."

मैथिली म्हणाली," केतनच्या कपड्यांची खरेदीही आपल्यालाच करावी लागेल अस वाटतं आहे,तो त्याच्या महत्त्वाच्या कामात बिजी असेल. आई तुम्ही अमेरिकेत जाण्याबद्दल सुलभा मावशींना सांगितलं का? त्या खूप खुश झाल्या असतील ना?"

केतनची आई म्हणाली," नाही ग, मी हेच सांगायला तिला फोन लावला होता तर फोन तिच्या मुलाने उचलला तर तो म्हणाला की तुम्ही इकडे या, आपण आईला सरप्राईज देऊयात. मला त्याची कल्पना आवडली. सुलभा आणि मी बालपणापासूनच्या मैत्रिणी, लग्नानंतर फक्त दोनदा आमची भेट झाली, त्यानंतर ती तिकडे आणि मी इकडे. मला बघून ती खूप आनंदीत होईल यात शंकाच नाही. केतनचे बाबा गेल्यावर ती मला रोज फोन करायची, मी बुटीक टाकून स्वतःच्या पायावर उभे रहावे ही तिचीच इच्छा होती."

मैथिली म्हणाली," आई तिकडे गेल्यावर दोघीजणी फुल्ल मस्ती, धमाल करा. आयुष्य जगून घ्या."

मैथिलीने अमेरिकेत जाण्यासाठी लागणाऱ्या सामानाची यादी केली. केतनला काय लागू शकते? त्याच्या आईला काय लागू शकते? याची वेगवेगळी यादी केली,तसेच सुलभाला कुठले भारतीय पदार्थ आवडतात याचीही माहिती तिने केतनच्या आईकडून घेतली, काही वेळाने ती तिच्या घरी निघून गेली. घरी आल्यावर मैथिलीने आईला केतनच्या आईसोबत मारलेल्या गप्पा सांगायला सुरुवात केली," आई आज मी केतनच्या घरी गेले होते तेव्हा आईंमध्ये व माझ्यात बऱ्याच गप्पा झाल्या, त्यांनी त्यांच्या अमेरिकेत राहणाऱ्या मैत्रिणीबद्दल म्हणजे सुलभा मावशींबद्दल मला सांगितले, तर आई व सुलभा मावशी या घनिष्ठ मैत्रिणी आहेत. सुलभा मावशींना रव्याचे लाडू व शंकर पाळे खूप आवडतात तर आपण ते करून देऊ शकतो का? कारण आई तर सामानाची व घराची आवराआवर करण्यात बिजी असतील तर."

मैथिलीची आई म्हणाली," हो करूयात की, रव्याचे लाडू व शंकरपाळे बनवायला जास्त वेळ नाही लागत, इतक्यात तयार होतील, त्यांना अजून आपली काही मदत लागत असेल तर तेही विचारून घेशील.

मैथिली म्हणाली," हो विचारते, उद्यापासून संध्याकाळी हॉस्पिटलची शिफ्ट संपल्यावर मी त्यांच्याकडे जात जाईल तेवढीच माझी त्यांना मदत होईल तर मला घरी यायला उशीर होईल."

मैथिलीच्या आईने मान हलवून संमती दर्शवली. स

दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलची शिफ्ट संपल्यावर मैथिली केतनच्या आईसोबत मार्केटमध्ये खरेदी करायला गेली, केलेल्या यादीप्रमाणे एकेक वस्तू विकत घेतली, केतन सोबत नसताना त्याच्याही सामानाची खरेदी केली. मैथिली सारखी सून मिळाल्याने केतनची आई मनापासून आनंदी झाली होती. केतन नवीन हॉस्पिटल तयार करण्याच्या तयारीत होता. मैथिलीला याची कल्पना असल्याने त्याची घरातील बरीचशी कामे ती स्वतः करून घेत होती.

केतनची फ्लाईट मंगळवारी रात्रीची होती. फ्लाईट मुंबईहुन असणार होती.जवळजवळ सर्व तयारी पूर्ण झाली होती. हॉस्पिटलच्या कामाचीही जुळवाजुळव झाली होती. केतनने मैथिलीला हॉस्पिटलच्या कामाबद्दल सर्व सूचना देऊन ठेवल्या होत्या.

शनिवारी रात्री आठच्या सुमारास मैथिलीला केतनचा फोन आला," हॅलो केतन काय झाले? तुला माझ्याशिवाय करमत नाहीये वाटतं, आत्ता आपण सात वाजेपर्यंत सोबतच होतो, फक्त एकच तास झालाय आणि लगेच तुला माझी आठवण आली. अमेरिकेत तीन महिने माझ्याविना कसा काढशील?"

मैथिलीचे बोलणे तोडत केतन चिडून म्हणाला," मैथिली समोरचा माणूस कुठल्या परिस्थितीत तुला फोन करतोय,का करतोय? हे न ऐकता आपली वायफळ बडबड चालू करायची, ही कुठली पद्धत आहे?"

केतन मैथिलीसोबत ह्या भाषेत पहिल्यांदाच बोलल्याने ती जरा दचकलीच, ती म्हणाली, "केतन काय झालंय? इतका चिडला का आहेस?"

केतन म्हणाला," मी तुझ्या बाबांसोबत बोललो आहे म्हणजे त्यांची परवानगी घेतली, उद्या सकाळी सात वाजता आपण पुण्याला चाललो आहोत, रात्रीपर्यंत आपल्याला परत यायचे आहे, आपण कशाला चाललो आहोत? का चाललो आहोत? याबद्दल आपण उद्या गाडीत बोलू. सकाळी ठीक सात वाजता तयार रहा, मी तुला घ्यायला येईल."

एवढं बोलून केतनने फोन कट केला. मैथिलीच्या मनात विचारांनी गर्दी केली, 'केतन आज एवढा चिडून का बोलला? त्याला तर माझ असं बोलणं नेहमीच आवडायचं ना? मग आज असं काय झालं असेल? उद्या असं अचानक पुण्याला का जायचं असेल?

©®Dr Supriya Dighe

 

 

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now