एक आगळेवेगळे लग्न भाग ३७

Maithili discuss with ketan about saurbh's behavior

मागील भागाचा सारांश: मैथिली नवीन हॉस्पिटल जॉईन करते. मैथिलीची शिफ्ट संपल्यावर केतन तिला न्यायला हॉस्पिटलमध्ये येतो. मैथिलीला भूक लागली असल्याने ते पहिले रेस्टॉरंट मध्ये जाऊन स्नॅक्स ऑर्डर करतात. मैथिलीला खूप भूक लागली असल्याने ती केतनकडे जास्त लक्ष केंद्रित न करता खाण्याकडे लक्ष देते.

आता बघूया पुढे...

मैथिलीचे खाऊन झाल्यावर तिने केतनकडे वर मान करून बघितले त्यावेळी केतन तिच्याकडे टक लावून बघत होता. मैथिली म्हणाली, "केतन माझ्याकडे तु असा का बघत आहेस?"

केतन म्हणाला," तुला अश्या रीतीने खाताना पहिल्यांदाच बघत आहे ना, तु किती मन लावून खात आहेस, आपल्या समोर कोणी बसलं आहे की नाही याची दखल सुद्धा तु घेतली नाहीस."

"कारण समोर तुच होतास, दुसरं कोणी असतं तर मी अशी वागलेच नसते.आपल्याला दोघांना आयुष्य एकत्र घालवायचे आहे. मी जे नाही ते बनण्याचा प्रयत्न का करु?मला तुझ्या समोर शो ऑफ करायचा नाहीये. ते राहूदेत तुला माझ्या सोबत काहीतरी बोलायचे होते ना?" मैथिली बोलली

केतन म्हणाला," That's good, तु जी आहेस तशीच माझ्यासमोर रहा.मला तुला अस सांगायचं होत की आता आपला साखरपुडा झाला आहे, काही महिन्यांनी आपले लग्नही होईल तर मला अस वाटतंय की आपण एकमेकांशी सर्वच शेअर करायला हवं. जसा मी तुझ्या सुखात सहभागी असेल तसा दुखातही असेल.माझ्या बाबतीत तुला सर्व काही माहिती असावं असं मला वाटतंय. माझ्याशी बोलताना तु विचार करुन बोलण्याची गरज नाहीये, तुझ्या बोलण्याने मी काय विचार करेल किंवा त्यावर माझी प्रतिक्रिया काय असेल? याचा विचार करू नकोस. आपलं लग्न व्हायला जरी अवकाश असेल तरी मी तुझ्या प्रत्येक सुख दुःखात भागीदार असेल."

मैथिली म्हणाली," केतन मला तुझ्या बोलण्याचा हेतू कळतोय पण मी तुझ्या पासून काही लपवतेय असं तुला वाटतंय का?"

केतन म्हणाला," हो, काल रात्री मी जेव्हा तुला फोन केला होता, तेव्हा तुझी मनस्थिती चांगली नव्हती हे तुझ्या आवाजावरून स्पष्ट जाणवत होते तरीही तुला काय झालेय हे तु मला सांगितलेच नाही.तु मला अजूनही परका समजतेस का?"

मैथिली म्हणाली," नाही केतन मी तुला परका समजत नाही, पण कसं आहे ना की समजा आईंची एखादी गोष्ट तुला पटली नसेल तर त्या क्षणाला तु रिऍक्ट होशील आणि आईंबद्दल काहीतरी चुकीचं बोलशील पण काहीवेळाने तु नॉर्मल होऊन जाशील कारण तुला माहीत आहे की आई कधी अश्याही वागतात आणि कधी तश्याही. पण त्यावेळी जर तु मला आई कश्या चुकीच्या वागल्यात हे सांगशील त्यावेळी माझ्या मनात आईंची एक चुकीची प्रतिमा तयार होईल आणि असं म्हणतात ना की First impression is last impression. अगदी त्याचप्रमाणे पुढे जाऊन आई कितीही चांगल्या वागल्या तरी माझ्या मनात आईंची तीच प्रतिमा राहील. आता जर हे समजा काही दिवसांनी घडलं तर चित्र उलट असेल कारण मला आई खऱ्या कशा आहेत हे कळलं असेल तर त्यावेळी माझी प्रतिक्रिया थोडी वेगळी असेल."

केतन म्हणाला," मैथिली मला तुझ्या भावना कळाल्या आहेत, तुला काय बोलायचं आहे ते समजलं आहे, तरीही तुला एक सांगतो की तुला जर माझ्याशी बोलावसं वाटलं तर बिनधास्त बोलू शकतेस."

मैथिली म्हणाली," हो नक्की. अमेरिकेतून परतल्यावर कुठले हॉस्पिटल जॉईन करणार आहेस? म्हणजे काही प्लॅन केला आहेस की नाही?"

केतन म्हणाला," मी पण ना जे सांगण्यासाठी भेटलो तो विषय बाजूलाच ठेवला आणि भलत्याच विषयावर बोलत बसलो. मी कुठलेही हॉस्पिटल जॉईन करणार नाहीये तर स्वतःचेच हॉस्पिटल टाकायचा विचार करतोय."

मैथिली म्हणाली, "काय? पण तु याबद्दल काहीच बोलला नाहीस."

केतन म्हणाला," अग हो मी आत्ताच यावर विचार केला आहे, मला माझे हॉस्पिटल टाकण्याचा प्लॅन कधीपासून होता पण काहीना काही कारणाने ते लांबत होते. माझ्या मित्राने कालच मला सुचवले की एका जुन्या हॉस्पिटलची बिल्डिंग विकायला आहे, जागा अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. थोडंफार renovation केलं की बिल्डिंग एकदम चकाचक होईल."

मैथिली म्हणाली," मस्तच प्लॅन आहे, आईंना सांगितलंस का?"

केतन म्हणाला," नाही आईला मी सरप्राईज देणार आहे. अमेरिकेतून परत आल्यावर एका आठवड्यात आईचा वाढदिवस आहे आणि मला त्याच दिवशी आईच्या हातून हॉस्पिटलचे उदघाटन करायचे आहे."

मैथिली म्हणाली,"भारीच ना"

केतन म्हणाला," पैश्यांची व्यवस्था होऊन जाईल, हॉस्पिटलच्या रजिस्ट्रेशन व इतर कागदपत्रांची कामे माझा एक मित्र करून घेईल, तु फक्त इंटेरिअरचे काम करून घेशील."

मैथिली म्हणाली," हो चालेल, मी हॉस्पिटलच्या कामाकडे लक्ष देईल, मला आधीच सांगितले असते तर हे हॉस्पिटल मी जॉईनच केले नसते."

केतन म्हणाला," तुला पूर्ण वेळ देण्याची गरज नाहीये फक्त अधून मधून लक्ष देत जा. तु आत्ता जॉब केलास तर तेवढाच तुझ्या बाबांना थोडाफार हातभार लागेल, लग्नानंतर ते तुझ्या पैश्यांना हातही लावणार नाही याची कल्पना मला आहे."

मैथिली म्हणाली," तु माझ्या बाबांना परफेक्ट ओळखलं आहेस. आई किती नशीबवान आहेत की त्यांना तुझ्या सारखा मुलगा लाभला आहे, तु त्यांचा सतत किती विचार करत असतोस नाहीतर हल्लीची मुले आपल्याच जगात दंग असतात, आई वडिलांबद्दल विचार सुद्धा करत नाहीत."

केतन म्हणाला," हल्लीच्या मुलांनी तुला काय त्रास दिलाय?त्यांच्याबद्दल एवढी चिडून का बोलत आहेस?"

मैथिली म्हणाली," काही वेळापूर्वी तु विचारत होतास ना की तुला काल काय झाले होते म्हणून? काल माझा मूड बिघडण्यामागे सौरभ कारणीभूत होता. तु फक्त त्याच्या बद्दल काही चुकीचा समज करून घेऊ नकोस कारण मी रागाच्या भरात काही तरी बोलून जाईल आणि तु चुकीचा अर्थ काढशील. काही दिवसांपासून सौरभचे वर्तन मला संशयास्पद वाटत होते, याचं नक्कीच काहीतरी वेगळं प्रकरण चालू आहे असं मला वाटतं होतं, मी याबद्दल डायरेक्ट त्याच्याकडे विचारणाही केली होती पण त्याने सर्व काही अलबेल असल्याचे सांगितले. मी काही चांगलं सांगायला गेले तरी सौरभला माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढायची सवय आहे म्हणून मी त्याच्यासोबत जास्त काही बोलले नाही. राधिका ताईलाही त्याचे वागणे खटकायला लागले होते, ताई त्याच्या सोबत बोलणार होतीच तेच तिने त्याला परवा सिगारेट पिताना पाहिले. काल राधिका ताईने त्याला बराच वेळ समजावून सांगितले त्यावर तो म्हणाला की मी सिगारेट पिणे सोडून देईल व तो हेही म्हणाला की त्याला इतर कुठलेही व्यसन नाहीये."

केतन म्हणाला," मग झालं तर ना, सगळा प्रॉब्लेमच solve झाला म्हणायचा."

मैथिली म्हणाली," का कुणास ठाऊक पण मला सौरभचे बोलणं पटलं नाही, तो इतक्या सहजासहजी सिगारेट पिणे सोडेल अस मला वाटतं नाही." 

केतन म्हणाला," मैथिली मी ह्या विषयावर बोलणं चुकीचे होईल पण एकच सांगतो की तु तुझ्या मनातील संशय काढून टाक. राधिका ताईने व तु तुमचे काम केले आहे. आता सौरभची ड्युटी आहे ,तुमचे ऐकायचे की नाही. सौरभ जर चुकीच्या मार्गावर गेला असेल तर त्याला परत सरळ मार्गावर आणणे हे आपले काम आहे. आपण त्याला मार्ग दाखवू शकतो पण हात धरून आपल्या सोबत चाल असं तर म्हणू शकत नाही ना. मी सौरभला फारसं काही ओळखत नाही तेव्हा त्याच्या बद्दल लगेच मी माझं मत देऊ शकत नाही किंवा या विषयावर मी त्याच्याशी बोलणंही उचित ठरणार नाही. तो तुझा भाऊ आहे, त्याच्यात तुझे गुण नक्कीच असणार, शिवाय तुमचे संस्कार बघता मला तरी असं वाटत नाही की तो काही चुकीच्या मार्गावर जाईल."

मैथिली म्हणाली," केतन मला तुझं म्हणणं पटतंय पण माझं मन सांगतंय की सौरभ चुकीच्या मार्गावर गेला आहे, आता याबद्दल मी आई बाबांसोबतही बोलू शकत नाही, त्यांना जर कळलं तर ते मानसिक रित्या खालावतील. काय करावे काहीच कळत नाहीये."

केतन म्हणाला," सौरभच्या मित्रांसोबत तुझा काही कॉन्टॅक्ट आहे का?"

मैथिली म्हणाली," नाही, मी त्याच्या कोणत्याच मित्रांना ओळखत नाही."

केतन म्हणाला," ठीक आहे, त्याच्या कॉलेजमध्ये माझं कोणी ओळखीच आहे का ते बघतो, मग आपण चौकशी करू, बाहेरून चौकशी केली म्हणजे त्याला कळणार नाही. तु काळजी नको करुस,मी आहे."

मैथिली म्हणाली," थँक्स"

सौरभ चुकीच्या मार्गावर गेला असेल का? बघूया पुढील भागात...

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all