एक आगळेवेगळे लग्न भाग ३५

Radhika is talking with saurabh about his behavior

मागील भागाचा सारांश: मैथिली व केतनचा साखरपुडा धुमधडाक्यात पार पडतो. गौरी व डॉ पुजा दोघींनी मिळून साखरपुड्याच्या दिवशी केक आणून मैथिलीला चांगलंच सरप्राईज दिले. राधिका सौरभला सिगारेट पिताना रंगेहाथ पकडते.

आता बघूया पुढे.... 

साखरपुड्याचे सर्व विधी उरकले, सर्व पाहुण्यांची जेवणे आटोपली. साखरपुडा झाल्यावर सर्व पाहुणे मंडळी आपापल्या घरी परतली. केतन व त्याच्या घरचेही निघून गेले. मैथिली व तिच्या घरचेही घरी जायला निघाले. मैथिलीच्या आई बाबांच्या चेहऱ्यावर समाधान बघायला मिळत होते.घरी आता मैथिली, राधिका,सौरभ, शेखर, माही आणि आई बाबा एवढीच घरची मंडळी होती. मैथिलीचे बाबा म्हणाले, "चला आज एक मोठे डोक्यावरचे ओझे कमी झाल्यासारखे वाटतेय, शेखरराव या आधीच तुमच्या सारखा जावई मिळाल्याने भाग्य उजळले होते आणि आता डॉ केतन सारखा जावई मिळाल्याने मैथिलीचेही टेन्शन कमी झाले. मला जेव्हापासून दोन मुली झाल्या तेव्हापासून मी एकच गोष्ट कटाक्षाने ठरवली होती की आपण जावई शोधताना भले ते गरीब असले तरी चालतील पण निर्व्यसनी आणि सुसंस्कारी असायला हवे. आता काय राहीला सौरभचा प्रश्न, ह्या वर्षी सौरभ इंजिनिअर होईल आणि नोकरीला लागेल, म्हणजे मला रिटायर व्हायला मोकळं, खूप वर्षांपासून नोकरी करत आहे, आता काम करण्याची इच्छा राहिली नाहीये. सौरभ सारख्या मुलाला तर कोणीही सहज मुलगी देईल."

सौरभ बद्दल बाबा अभिमानाने बोलत आहे हे ऐकल्यावर राधिका व मैथिलीने एकमेकींकडे बघितले, दोघींनाही जे बोलायचे होते ते त्या एका नजरेतून त्यांनी एकमेकींना सांगितलं. राधिकाने व मैथिलीने सौरभकडे बघितले तर तो मान खाली घालून बाबांचे बोलणे गुपचूप ऐकत होता. बाबांचे बोलून झाल्यावर शेखर म्हणाला," सौरभ ऐकतोयेस ना बाबा काय म्हणत आहेत? त्यांच्या तुझ्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. राधिका म्हणत होती की हल्ली तु खूप बिजी असतोस म्हणे."

यावर सौरभ म्हणाला,"हो जिजू, सध्या सबमिशनची घाई गडबड चालू आहे, शिवाय प्रोजेक्टचेही काम चालू आहे. मोकळा वेळ खूप कमी भेटतो. राधिका ताईचा फोन आला की ती बाकीच्याच गोष्टी जास्त सांगत बसते. आता मी काय लहान आहे का की प्रत्येक गोष्ट समजून सांगायला म्हणून शक्यतो मी राधिका ताई सोबत व मैथिली दीदी सोबत बोलणं टाळतोच."

शेखर हसून म्हणाला," सौरभ अरे बहिणी यासाठीच असतात, त्यांचे कामच आहे ते. आपला भाऊ कुठल्या संकटात सापडू नये असच वाटत असेल त्यांना, आपली काळजी तोच व्यक्ती करतो ज्याचे आपल्यावर सर्वांत जास्त प्रेम असेल. तु ज्या वयात आहेस त्या वयात नकळतपणे चुकीचे पाऊल टाकले जाते म्हणून राधिका व मैथिली तुझी कसून चौकशी करत असतात."

शेखरच्या या बोलण्यावर सौरभने फक्त स्माईल दिली. सौरभ बाबांकडे बघून म्हणाला, "बाबा मी उद्या सकाळी निघणार आहे. बराचसा अभ्यास करायचा बाकी आहे."

बाबांनी मान हलवून होकार दर्शवला. रात्री सर्वांची जेवणं आटोपल्यावर मैथिली राधिकाला हळूच म्हणाली, "ताई सौरभ जायचं म्हणतोय, त्याच्या सोबत आजच काय ते बोलून क्लिअर करावे लागेल."

"हो मी पण तोच विचार करतेय, सगळ्यांसमोर बोलणं योग्य नाही, आपण बाहेर जाऊन त्याच्यासोबत बोलूया." राधिकाने उत्तर दिले.

राधिकाने इकडे तिकडे घरात बघितले पण सौरभ दिसला नाही म्हणून तिने आईला विचारले," आई सौरभ कुठे आहे ग? घरात दिसत नाहीये."

आई म्हणाली," टेरेसवर मोकळ्या हवेत फिरायला गेला आहे."

राधिका म्हणाली," हो का, आई माही कडे जरा वेळ लक्ष दे,मी व मैथिली टेरेसवर जाऊन त्याच्या सोबत जरा गप्पा मारुन येतो, खूप दिवस झालेत आमच्या तिघांमध्ये निवांत गप्पाच नाही झाल्या."

आई म्हणाली," तुम्ही गप्पा मारा पण भांडू नका, हल्ली मी बघतेय तुम्ही दोघी त्याच्या डोक्याला खूप ताण देत आहात."

आई सोबत बोलून झाल्यावर राधिका मैथिलीला म्हणाली," सौरभ टेरेसवर आहे, चल आपण तिथेच जाऊन बोलूयात पण तुला एक सांगते मी बोलत असताना तु काहीच बोलू नको,तु काही बोललीस की लगेच त्याच्या डोक्यात तिडीक जाते, आम्ही काय बोलतो हे फक्त तु ऐक."

मैथिलीने फक्त मान हलवली. मैथिली व राधिका टेरेसवर गेल्या त्यावेळी सौरभ कोणाशी तरी फोनवर बोलत होता. दोघींना टेरेसवर आल्याचे बघताच सौरभने फोन ठेवला व तो म्हणाला," काय झालं ताई? तुम्ही दोघी अश्या टेरेसवर का आलात?"

राधिका म्हणाली," मोकळ्या हवेची गरज काय फक्त तुलाच असते का? आमच्या वहिनी सोबत फोन चालू होता का? आम्ही डिस्टर्ब तर नाही ना केलं?"

सौरभ म्हणाला," अरे ताई काहीपण काय बोलतेस? वहिनी वगैरे काय, हल्ली तुमच्या डोक्यात माझ्या बद्दल शंकांचे काहूर माजले आहेत. मी माझ्या मित्रासोबत फोनवर बोलत होतो"

राधिका म्हणाली," सौरभ तु शंका येण्यासारखं वागत आहेस म्हणून आम्हाला शंका येणं स्वाभाविकच आहे ना?"

सौरभ रागाने म्हणाला," मैथिली दिदीने तुझ्या डोक्यात माझ्याबद्दल शंकांचे गुऱ्हाळ घातले असेल ना?"

राधिका थोड्या मोठ्या आवाजात म्हणाली, "सौरभ ती तुझ्याबद्दल मला काहीतरी सांगायला आणि मी ते ऐकायला लहान बाळ नाहीये. तुझं वागणं तिला खटकण्याआधी मला खटकलं होतं. मैथिली बद्दल तुझ्या डोक्यात असणारा राग काढ. मी तिला याचसाठी शांत बसायला सांगितले होते. सौरभ व्यसन ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे, तुला असलेलं व्यसन तुझ्या नाशाला कारणीभूत ठरू शकते हे लक्षात ठेव. तु आमचा भाऊ आहेस, म्हणून आम्ही कळकळीने तुला विनंती करत आहे.तुला जर काही झालं तर आमच्याच डोळ्यात पाणी येईल दुसऱ्याच्या नाही. बाबा मघाशी काय बोलले ऐकलंय ना. त्यांना जर कळाले की त्यांचा मुलगा सिगारेट पितो तर हे त्यांना कधीच सहन होणार नाही."

सौरभ सारवासारव करत म्हणाला," अग ताई तुझा काहीतरी गैरसमज होतो आहे. मित्र म्हणाला की एकदा सिगारेट पिऊन बघ म्हणून मी तुला काल सिगारेट पिताना बघितलं, मला व्यसन वगैरे अस काहीच नाही."

राधिका म्हणाली," हे बघ सौरभ मित्र म्हणाला जीव देऊन बघ तर तु तेही करशील का? स्वतःची काही अक्कल आहे की नाही. तुला काय व्यसन आहे की नाही हे मला माहीत नाही पण जे काही करत असशील ते ताबडतोब बंद कर, सिगारेट पिऊन स्वतःच्या शरीराची वाट लावून घेऊ नकोस."

सौरभ म्हणाला," ताई मी मान्य करतो की सिगारेट पिऊन मी चूक केली आहे, आत्ता या क्षणापासून मी सिगारेटला हातही लावणार नाही पण प्लिज माझ्याबद्दल मनात काही अढी ठेऊ नकोस कारण सिगारेट पिण्या व्यतिरिक्त मला दुसरे व्यसन नाहीये."

राधिका म्हणाली, "बरं मला एक सांग, तु घरी जास्त दिवस राहत का नाही? आमच्या सोबत साधं सरळ बोलत का नाहीस? आम्हाला सतत टाळत असतोस, अस का? सर्वांसोबत घरात का थांबत नाहीस? सतत टेरेसवर का येतोस?"

सौरभ म्हणाला,"ताई अभ्यासच आणि सबमिशनचं टेन्शन असल्याने माझं घरी मन रमतच नाही म्हणून मी घरी जास्त राहत नाही. आता कॉलेजचे थोडेच दिवस बाकी आहेत, ते झाले की मग सुट्टीसाठी घरीच येणार आहे. मी तुम्हाला टाळत नाहीये, तुमच्या मनात माझ्याबद्दल शंका असल्याने तुम्हाला तसं वाटतं आहे. माझ्यावर विश्वास ठेवा मी चुकीचं काहीच करत नाहीये आणि करणारही नाहीये."

राधिका म्हणाली," सौरभ मी तुझ्यावर विश्वास ठेवते पण माझा विश्वासघात करू नकोस. एकवेळेस माझा विश्वास तोडलास तरी चालेल पण आई बाबांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नकोस, त्यांनी आजचा दिवस आपल्याला दाखवण्यासाठी खूप कष्ट केले आहेत, त्यांच्या कष्टाची जाणीव ठेव म्हणजे झालं."

सौरभ म्हणाला," हो ताई नक्कीच, दीदी तु काहीच बोलणार नाहीयेस का?"

मैथिली हसून म्हणाली, " आत्ता तरी मला काहीच बोलायचे नाहीये पण पुन्हा या विषयावर बोलायची वेळ येऊ देऊ नको म्हणजे झालं."

सौरभने स्माईल देऊन होकार दर्शवला. राधिका व मैथिली खाली यायला निघाल्या तेव्हा वाटेत राधिका मैथिलीला म्हणाली, "सौरभच बोलण ऐकून तुला काय वाटतंय? तो अजूनही आपल्यापासून काही लपवत असेल का? मला तरी वाटतंय की आपण उगाच त्याच टेन्शन घेत आहोत."

मैथिली मिश्कील हसून म्हणाली," ताई तुझा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला असेल, मला तर वाटलं की तो सरळसरळ तुला घुंडाळत होता.सौरभ इतका साधा सरळ नाहीये, काल तु त्याला सिगारेट पिताना बघितलं म्हणून त्याने ते मान्य केलं नाहीतर तो कधीच खरं बोलला नसता. Hope so अजून काही व्यसन करत नसेल. पुढे काय घडेल हे बघूयात, त्याशिवाय आपल्या हातात आहे तरी काय?"

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all