Oct 18, 2021
कथामालिका

एक आगळेवेगळे लग्न भाग ३४

Read Later
एक आगळेवेगळे लग्न भाग ३४
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

मागील भागाचा सारांश: केतन काही दिवसांसाठी अमेरिकेला जाणार असतो, तो जाण्याआधी साखरपुडा उरकून घ्यायचा असे ठरते.साखरपुड्यासाठी कमी कालावधी राहिला असल्याने केतन व मैथिली सोबत जाऊन कपड्यांची व अंगठीची खरेदी करतात. मैथिलीला सौरभच्या बदललेल्या वर्तनाचा संशय येतो, ती याबद्दल राधिका ताईकडे बोलते तर राधिका ताईलाही सौरभच्या वर्तनाचा संशय आलेला असतो, ती मैथिलीला सांगते की तुझा साखरपुडा झाला की मग आपण सौरभसोबत याबद्दल चर्चा करूयात.

आता बघूया पुढे....

बघता बघता दोन तीन दिवस असेच निघून गेले. केतन व मैथिलीमध्ये कॉल्स, मॅसेजेसचे प्रमाण वाढले होते. कोणतीही गोष्ट घडली की ती मैथिलीला पहिले केतनला सांगावीशी वाटायची. मैथिलीच्या मनात केतनबद्दल प्रेमाचे अंकुर फुटत होते.नात्यांची मजा उलगडण्यात असते अस म्हणतात ना अगदी तसंच मैथिली व केतनचे नाते हळूहळू उलगडत होते.

दुसऱ्या दिवशी साखरपुडा असल्याने त्या दिवशी भरपूर कामे होती. गौरीने अचानक येऊन मैथिलीला सरप्राईज दिले होते. मैथिली व गौरीची भेट बऱ्याच महिन्यांनी झाल्याने त्यांच्यात चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. घरात पाहुणे मंडळी जमली होती.लहान मुले घरात इकडे तिकडे उड्या मारत होती. मैथिलीच्या हातावर मेहंदी सजली होती.मैथिली खूप खुश होती. आदल्या दिवशी येणारी सर्व पाहुणे मंडळी आली होती, संध्याकाळ झाली तरी सौरभ काही घरी आलेला नव्हता.

मैथिली राधिका ताईला खुणेनेच सौरभ अजून पोहोचला कसा नाही हे विचारते तर यावर राधिका ताई तिला सांगते की सौरभचा मॅसेज आलाय की तो काही वेळातच पोहोचेल. काही वेळातच सौरभ घरी येतो त्यावेळी त्याच्या डोक्याला बँडेज बांधलेले असते. बँडेज बघून आई बाबा, मैथिली, राधिका आणि जमलेले सर्वच जण टेन्शन मध्ये येतात. 

"सौरभ डोक्याला मार कसा काय लागला? कोणाशी मारामारी तर केली नाही ना?" बाबांनी विचारले

सौरभ म्हणाला, "बाबा मी कोणाशी मारामारी नाही केली, डोक्याला थोडासाच मार लागला आहे,बाथरूममध्ये पाय घसरून पडलो तेव्हा डोकं भिंतीवर आपटलं गेलं. फार काही झालं नाहीये, तुम्ही काही काळजी करू नका."

सौरभने दिलेले कारण मैथिली व राधिकाला पटले नव्हते. सौरभ धडधडीत खोटं बोलत होता हे मैथिलीच्या व राधिकाच्या एव्हाना लक्षात आले होते. घरात पाहुणे जमले असल्याने त्यांना शांत बसणे भाग होते. राधिका ताई व मैथिली जास्त प्रश्न विचारतील म्हणून सौरभ त्यांना टाळत होता. सौरभ फ्रेश होऊन जरा मोकळ्या हवेत बसता यावे म्हणून तो टेरेसवर गेला होता.बराच वेळ झाला तो खाली आला नाही म्हणून आईने जेवण करायला म्हणून राधिकाला त्याला बोलवायला पाठवले.

राधिका टेरेसवर गेल्यावर तिला सौरभ सिगारेट पिताना दिसला, राधिका जवळ येताना दिसल्याने सौरभने सिगारेट लगेच विझवली आणि काहीच केले नसल्यासारखे तो म्हणाला, "अग राधिका ताई मी खाली येतच होतो, जरा मोकळ्या हवेत बसावे म्हणून इथे आलो,खाली घरात खूपच गोंधळ आहे, सगळीकडे नुसती चिवचिव चालू आहे, शांतता अशी अजिबात भेटत नव्हती."

राधिकाने रागाने एक कटाक्ष टाकला व ती म्हणाली,"सौरभ सारवासारव करण्याची गरज नाहीये, मी तुला सिगारेट पिताना बघितलंय, शांततेच म्हणत असशील तर तुझ्या माहितीसाठी सांगतेय, उद्या तुझ्या बहिणीचा साखरपुडा आहे आणि त्याचसाठी घरात पाहुणे जमले आहेत.आईने तुला जेवायला बोलावलं आहे, मी फक्त हेच सांगायला आले होते."

एवढं बोलून राधिका खाली निघून गेली. सौरभही राधिकाच्या पाठोपाठ खाली गेला. सौरभने राधिका सोबत बोलण्याचा प्रयत्न केला पण राधिका त्याला टाळत होती कारण तिला माहीत होते की आता जर आपण ह्याच्या सोबत बोललो तर दडवून ठेवलेला सर्व राग बाहेर पडेल आणि आता अस होणं आपल्याला परवडणार नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजणच लवकर उठले होते. घरातील सर्व आटोपून मुलाकडची मंडळी येण्याआधी हॉलवर पोहोचायचे होते. सर्वांची धावपळ सुरू होती. एवढा सगळा गोंधळ सुरु असतानाही मैथिलीने राधिका ताईला बाजूला घेऊन विचारले," ताई सौरभ ठीक आहे ना? कालपासून बघतेय तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावरील रंग उडाले आहे, काही सिरियस आहे का?"

"नाही ग काही सिरीयस नाहीये, सौरभच्या चेहऱ्यावरचा रंग का उडाला आहे?हे मला माहीत नाही पण जर माझं म्हणत असशील तर घरातील कामे करून कंटाळा आला आहे बाकी काही नाही. मैथिली तुला पुन्हा एकच सांगते,प्लिज तु साखरपुडा एन्जॉय कर, बाकीच्यांच काही होउदे तु आजच्या दिवस स्वतःवर पूर्ण लक्ष केंद्रित कर." राधिका ताईने मैथिलीला समजावून सांगितले.

काही वेळातच मैथिलीच्या घरातील सर्व हॉल वर पोहोचले.हॉल खूप छान सजवलेला होता. हॉल सजवताना केतन व मैथिलीच्या आवडते रंग विचारात घेऊनच करण्यात आला होता. मैथिली तर हॉलच्या सजावटीकडे कितीतरी वेळ बघतच राहिली होती. हॉलच्या सजावटीचे काम शेखर कडे होते.मैथिली मनातल्या मनात म्हणाली,"थँक्स शेखर जिजू, you're just amazing. माझी आवड निवड जपून तुम्ही हॉल सजवून घेतला आहे. माझ्या आयुष्यातील हा खास दिवस अजून खास बनवला आहे."

काही वेळातच केतन व त्याच्या घरचे हॉलवर पोहोचले आणि साखरपुड्याच्या विधींना सुरुवात झाली. केतन मैथिलीला साडीत बघून तिच्याकडे बघतच राहिला होता. केतन व मैथिलीकडे बघितले की कोणीही त्यांच्याकडे बघतच राहत होते.दोघेही एकमेकांना साजेसे दिसत होते, ते म्हणतात ना made for each other.

साखरपुड्याचे इतर विधी उरकून झाल्यावर अंगठी घालण्याचा विधी बाकी राहिला होता. केतन व मैथिलीने एकमेकांच्या बोटात अंगठी घातली, सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट झाला. केतन व मैथिली आपल्या चेहऱ्यावरील आनंद लपवू शकत नव्हते. सर्वांना वाटलं की अंगठी घालून झाली म्हणजे साखरपुडा संपला. उपस्थित लोकं आपल्या जागेवरून उठायला लागली तोच गौरीने येऊन सर्वांना जागीच थांबवून अजून एक विधी बाकी आहे असं सांगितलं. पाच मिनिटं गौरीचं काय चालू आहे? हे कोणालाच काय even मैथिलीलाही समजले नाही. गौरी व डॉ पुजाने दोघींनी मिळून केतन व मैथिलीचा साखरपुडा celebrate करण्यासाठी केक आणला होता, दोघींनी मिळून मैथिलीला चांगलेच सरप्राईज दिले होते. गौरी व पुजाने आणलेल्या केककडे बघून मैथिलीच्या डोळ्यात चटकन पाणीच आले. मैथिलीच्या डोळ्यातील पाणी बघून गौरी म्हणाली,"मैथिली अजून रडलीस तर ते अश्रू केकवर पडतील व आम्हाला खारट केक खावा लागेल, त्याआधी पटकन केक कापून घ्या." 

गौरीचे बोलणं ऐकून मैथिलीच्या चेहऱ्यावर हसू उमटले. केतन व मैथिलीने केक कापला, केकचा पहिला घास मैथिलीने केतनला खाऊ घातला तर दुसरा घास गौरी व पुजाला खाऊ घातला, दोघींना मैथिलीने घट्ट मिठी मारली, जणू तिला त्यांचे आभार मानायचे होते. फोटो सेशन झाले, आलेल्या पाहुण्यांचे जेवण झाले. अशा रीतीने साखरपुडा मस्त पार पडला.

©®Dr Supriya Dighe

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now