Oct 24, 2021
कथामालिका

एक आगळेवेगळे लग्न भाग ३३

Read Later
एक आगळेवेगळे लग्न भाग ३३

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

मागील भागाचा सारांश: मैथिलीने आपले लग्न केतनसोबत जमल्याची बातमी गौरीला फोनवरून तर डॉ पुजाला प्रत्यक्ष भेटून दिली.

आता बघूया पुढे....

पुजा मॅडमला भेटून मैथिली घरी परतते त्यावेळी आई बाबा तिची वाट बघत बसलेले असतात, मैथिलीचे घरात पाऊल पडताच आई म्हणाली, "मैथिली अग किती उशीर? आम्ही केव्हापासून तुझी वाट बघतोय."

मैथिली म्हणाली,"अग आई बऱ्याच दिवसांनी पुजा मॅडमसोबत गप्पा मारायला निवांत वेळ भेटला मग वेळेचे भानच उरले नाही.तुम्ही माझी वाट का बघत होते?"

यावर बाबा म्हणाले,"अरे बाळा काही वेळापूर्वी निलिमा ताईंचा फोन आला होता, त्या म्हणत होत्या की येत्या रविवारी साखरपुडा उरकून घेऊया. केतनरावांना कुठला तरी कोर्स करण्यासाठी अमेरिकेत जायचे आहे, निलिमा ताईंचे म्हणणे आहे की अमेरिकेला जाण्याआधी आपण साखरपुडा करून घेऊयात. तुझी काय इच्छा आहे?"

मैथिली म्हणाली," बाबा थोडी घाई होईल,पण ठीक आहे, रविवारी साखरपुडा करण्यास माझी काहीच हरकत नाहीये.उद्याच्या उद्या साखरपुड्यासाठी लागणाऱ्या कपड्यांची खरेदी करावी लागणार आहे."

आई म्हणाली," हो ना आपल्याकडे खूप कमी वेळ आहे, मी राधिकाला उद्या सकाळीच इकडे बोलावून घेते म्हणजे माझ्या मदतीला कोणी तरी असेल. हॉलची व इतर कामे बाबा आणि शेखरराव(राधिकाचा नवरा) बघून घेतील. अंगठी खरेदी करायला जाण्यासाठी निलिमा ताईंनी तुला बोलावले आहे.उद्या संध्याकाळी तु त्यांच्यासोबत जाऊन अंगठी घेऊन ये."

आईचं बोलणं मधेच थांबवत मैथिली म्हणाली, "आई बोलताना जरा श्वास तरी घे, अग सगळं होईल, तु काही जास्त काळजी करत बसू नकोस. बाबांच्या मदतीला सौरभही असेलच ना."

बाबा म्हणाले," मी सौरभला फोन केला होता तर तो म्हणतोय की तो शनिवारी संध्याकाळी येईल, परीक्षा तोंडावर आल्याने त्याच्याकडे अजिबात वेळ नाहीये, सबमिशन चालू आहे असं म्हणत होता."

मैथिली म्हणाली," बाबा पण एक दोन दिवस सुट्टी घेतल्याने काही फरक पडणार आहे का? तसही परीक्षेला अजून भरपूर वेळ आहे, तुमची किती धावपळ होईल हे त्याला कसे कळत नाही, थांबा मीच त्याला फोन लावून बोलते."

आई म्हणाली," मैथिली त्याला तुझ्या बोलण्याचा राग येईल, अभ्यासासाठीच म्हणतोय ना तर राहूदेत, अग खरंच त्याला खूप अभ्यास असेल."

मैथिलीला आईचे बोलणे पटले नव्हते पण तिला जास्त काही न बोलता ती आपल्या रुममध्ये निघून गेली. मैथिलीला का कोण जाणे सौरभची वागणे,बोलणे खटकत होते. सौरभ आपल्यापासून काहीतरी लपवत आहे असे सारखे राहून राहून मैथिलीला वाटत होते. मैथिलीला न राहवल्याने शेवटी तिने सौरभला फोन लावला. फोनची रिंग बराच वेळ वाजत होती, सौरभ फोन उचलत नसल्याने मैथिली काळजीत पडली होती,तिनेही ठरवले होते की जोपर्यंत तो फोन उचलणार नाही ती फोन करतच राहिली. साधारणतः दहा मिनिटानंतर सौरभने फोन उचलला, "काय झालंय दीदी, एवढे फोन करायचे असतात का?" सौरभ चिडून म्हणाला.

सौरभचा चिडलेला आवाज ऐकून मैथिलीलाही राग अनावर झाला होता पण स्वतःच्या रागावर ताबा ठेवत ती म्हणाली," अरे सौरभ तु फोन उचलत नसल्याने काळजी वाटत होती म्हणून सतत फोन करत होते. एवढा कुठे बिजी होतास?"

सौरभ म्हणाला,"लायब्ररीत अभ्यास करत होतो, आमच्या लायब्ररीत फोन अलाऊड नाहीये म्हणून माझा फोन कायम सायलेंट मोडमध्ये असतो, सुरवातीला तुझा फोन वाजला हे मला कळालेच नाही, जेव्हा कळाले तेव्हा लायब्ररी बाहेर पडलो तोपर्यंत थोडा वेळ लागणारच होता ना? ते राहूदेत फोन कश्यासाठी केला होतास?"

"काही काम असेल तरच मी फोन करावा असे काही आहे का? दोन दिवसांपूर्वी घरी येऊन गेलास तेव्हाही तु माझ्याशी फार काही बोलला नाहीस शिवाय जातानाही मला न सांगताच गेलास आणि बाबा म्हणत होते की तु साखरपुड्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी येणार आहेस म्हणून. भाऊ आपण एवढे कशात बिजी आहात?" मैथिली बोलली.

यावर सौरभ म्हणाला," दीदी सध्या अभ्यासाचा ताण खूप वाढला आहे, मोकळा वेळ असा भेटतच नाहीये, सबमिशनची धावपळ सुरू आहे." 

मैथिली पुढे काही बोलणार इतक्यात सौरभला कोणीतरी आवाज देऊन काहीतरी विचारत होता, मैथिलीला त्यांचे बोलणे जरा विचित्र वाटले म्हणून ती म्हणाली," सौरभ आता तुझ्याशी कोण काय बोलत होता? कसली पुडी पाहिजे असं विचारत होता?"

सारवासारव करण्यासाठी सौरभ म्हणाला, "दीदी अग काही नाही, माझा मित्र असाच काहीतरी सहज बोलत होता, मी तुला नंतर फोन करू का?"

मैथिली म्हणाली," मला माहिती आहे की तु खूप बिजी आहेस पण एकच सांगते आपल्या आई पप्पांनी खूप कष्ट करून आपल्याला शिक्षण दिले आहे,त्यांचा तुझ्यावर खूप विश्वास आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नको."

यावर सौरभने काही न बोलता फोन कट केला. इतर वेळी जेव्हा मैथिली सौरभला समजदारीच्या दोन गोष्टी सांगत असेल त्यावेळी सौरभ पूर्णपणे ऐकून घेत असे किंवा त्यावर argue करत असे पण यावेळी मात्र सौरभने फोन कट केला. मैथिलीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली,ती मनातल्या मनात म्हणाली,"साखरपुडा जर जवळ आला नसता तर मी स्वतः कॉलेजवर जाऊन सौरभच काय चालू आहे ते बघितलं असतं."

मैथिली सौरभच्या विचारात असतानाच केतनचा फोन येतो,केतनसोबत गप्पा मारत असताना ती सौरभबद्दल सर्व विसरुन जाते, साखरपुड्यासाठी कोणते कपडे घ्यायचे, कुठल्या रंगाचे घ्यायचे यावर दोघांमध्ये चर्चा रंगते.

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच राधिका व माही चे आगमन मैथिलीच्या घरी होते. माहीला आईकडे ठेऊन मैथिली व राधिका शॉपिंग करायला घराबाहेर पडतात, केतन व निलिमा ताईही त्यांना जॉईन करतात. चौघेजण मिळून बराच वेळ साखरपुड्यासाठी लागणाऱ्या कपड्यांची तसेच इतर सामानाची खरेदी करतात. अंगठ्याची खरेदी केतन व मैथिलीच्या पसंतीने होते. सर्व खरेदी करून झाल्यावर केतनने मैथिली व राधिकाला आपल्या गाडीतून घरी सोडले.

घरी आल्यावर मैथिली व राधिकाने सर्व कपडे आई व बाबांना दाखवले, मैथिलीने माही साठी एक ड्रेस घेतला होता, तो ड्रेस घालून माही घरभर उड्या मारत होती.घरात उत्साहाचे, आनंदाचे वातावरण होते. तेवढ्यात राधिकाला सौरभचा फोन येतो.राधिका बाजूला जाऊन फोनवर बोलते.मैथिलीच्या मनात पुन्हा शंकेची पाल चुकचुकते.आपल्या शंकेचे निरसन करण्यासाठी मैथिली राधिका ताईला रुममध्ये घेऊन जाऊन विचारते, "राधिका ताई सौरभच काय चालू आहे? तु फोन घेऊन बाजूला का निघून गेलीस?"

राधिका म्हणाली," सौरभला पैश्यांची गरज असल्याने त्याचा फोन आला होता, आई बाबांना कळू नये म्हणून मी बाजूला जाऊन बोलले."

मैथिली चिडून म्हणाली," ताई तु सौरभला जरा अतिप्रमाणात पाठीशी घालत आहेस, मला त्याचे चालचलन काही ठीक वाटत नाहीये. सौरभ किती पैसे उधळत आहे याला काही माप आहे की नाही. तु त्याला पैसे देत जाऊ नकोस."

राधिका म्हणाली," मैथिली तु लगेच चिडतेस, सौरभचे बदललेले वर्तन बघून मलाही शंका आलीच आहे पण आपण इथे आणि तो तिथे, खरं काय नी खोटं काय हे आपल्याला कसे कळेल. तुझा साखरपुडा होऊन जाऊदे मग बघू काय करायचं ते.तु आत्ता या सगळ्याचा विचार करू नकोस. मला तुझी काळजी समजतेय पण आता ही योग्य वेळ नाही. मी स्वतः सौरभसोबत बोलणार आहे. तु तुझा साखरपुडा एन्जॉय कर."

©®Dr Supriya Dighe

 

 

पुढील भागाच्या अपडेट साठी फॉलो करा खालील पेज

http://facebook.com/irablogs

 

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now