Oct 18, 2021
कथामालिका

एक आगळेवेगळे लग्न भाग ३१

Read Later
एक आगळेवेगळे लग्न भाग ३१
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

मागील भागाचा सारांश: मैथिलीला बघायला मुलगा येणार असल्याने ती थोडी नर्व्हस असते, मुलासमोर गेल्यावर तिला समजते की हा दुसरा तिसरा कोणी नसून केतनच आहे, पण हा इथे कसा? हा प्रश्न तिला पडतो. मैथिलीचे बाबा तिला याबद्दल पूर्ण स्पष्टीकरण देतात. मैथिलीच्या आई बाबांना केतन जावई म्हणून पसंत असतो तसेच केतनला व त्याच्या आईलाही मैथिली पसंत असते, आता राहिला प्रश्न फक्त मैथिलीच्या निर्णयाचा, तिला केतन आवडत असेल का?

आता बघूया पुढे....

आई बाबांची परवानगी घेऊन मैथिली केतनला आपल्या रुममध्ये घेऊन जाते. रुममध्ये गेल्यावर लगेच केतन म्हणतो, "गेल्यावेळी या रुममध्ये आलो होतो तेव्हा तुला समजावून सांगायचे होते आणि यावेळी लग्नासाठी मागणी घालायला आलोय. कधी वाटलही नव्हतं की सगळं इतक्या पटकन बदलेल."

केतनचं बोलणं पूर्ण झाल्यावर मैथिली म्हणाली, "केतन हे सर्व तुझ्या डोक्यात कधीपासून सुरू आहे?"

केतन म्हणाला,"मला तु एक व्यक्ती म्हणून किंवा मैत्रीण म्हणून आवडायचीस, तुझ्याशी बोलायलाही आवडायचं पण लग्न वगैरे असा विचार मी कधी केलाच नव्हता. काही दिवसांपूर्वी आईने तुझ्यासोबत लग्न करायला आवडेल का? म्हणून विचारले, त्यावेळी माझ्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं, आईला तु सून म्हणून पसंत होतीस, मी आईकडे वेळ मागून घेतला.रेस्टॉरंटमध्ये तुझ्यासोबत चर्चा केल्यावर मी माझा होकार आईकडे कळवला."

मैथिली म्हणाली," म्हणजे रेस्टॉरंटमध्ये तु मुद्दाम माझ्याकडून माझ्या मनातील सर्व काही काढून घेतलंस ना?"

"हो कारण तुझ्या लाईफ पार्टनर कडून असणाऱ्या ईच्छा मला पूर्ण करता येईल का? हा माझ्यापुढे प्रश्न उभा होता.मी तुला पूर्ण ओळखत नव्हतो, तुला जाणून घेण्यासाठी मला हे करावं लागलं."केतन उत्तरला

यावर मैथिली म्हणाली," केतन आतापर्यंत प्रत्येक वेळी तु माझी मदत केली आहेस, मला तु एक मित्र म्हणून आवडतोस, मला नेहमी हेच वाटायचे की तुझी बायको खूप नशीबवान असेल पण मी तुझी बायको होऊ शकेल का? हा प्रश्न माझ्या डोक्यात कधीच उपस्थित झाला नाही."

केतन म्हणाला," हे बघ मैथिली मी तुझी मदत केली किंवा मला तुझ्याशी लग्न करायचंय म्हणून तु होकार देऊ नकोस. जर तुला मनापासून मी आवडत असेल तरच होकार दे. Afterall its your life's one of most important decision."

मैथिली म्हणाली," केतन माझ्या मनात सध्या प्रचंड गोंधळ सुरू आहे, काय निर्णय घ्यावा हेच कळत नाहीये."

केतन म्हणाला," मैथिली घाई काहीच नाहीये, तुला हवा तितका वेळ घे, निवांत विचार कर. तुला एकच सांगतो की आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आला तरी मी नेहमी तुझ्यासोबत कायम असेल, तुझ्या ईच्छा माझ्या परीने पूर्ण करण्याचा मनापासून प्रयत्न करेल. आणि एक महत्त्वाचं जरी समजा तु मला नकार दिलास तरी आपल्यातील मैत्री कायम असेल याची ग्वाही मी देतो.आणि अजून एक आल्यापासून तुला सांगायचंय पण कस सांगू हेच कळत नाहीये, तु ह्या साडीत खूप सुंदर दिसत आहेस."

एवढे बोलून केतन मैथिलीच्या रुम मधून बाहेर पडतो, बाहेर आल्यावर निलीमा ताई म्हणतात," केतन मैथिली काय म्हणतेय? काही बोलली का ती?"

केतन म्हणाला," आई आमच्यात सर्व सविस्तर बोलणं झालंय, मैथिलीला विचार करायला थोडा वेळ हवा आहे आणि मला असं वाटतंय की आपण तिला तिचा वेळ देऊयात. काका काकू मैथिलीला लग्नासाठी बळजबरीने तयार करू नका, ती सध्या गोंधळलेल्या मनस्थितीत आहे. राधिका ताई ती तुमच्यासोबत नक्कीच बोलेल पण तिच्यावर तुमचा निर्णय थोपवू नका."

यावर राधिका म्हणाली," मैथिलीचे उत्तर काय असेल? याची मलाही कल्पना नाहीये, कालपासूनच ती गोंधळलेल्या मनस्थितीत आहे, पण मी हे अगदी ठामपणे सांगू शकते की जर तिने तुम्हाला होकार दिला तर ती खूप नशीबवान असेल, लग्न होण्याआधीच तुम्ही तिच्या मनाचा किती विचार करताय, अगदी थोड्याच कालावधीत तुम्ही तिला खूप समजून घेतलंय."

केतन व नीलिमा ताई मैथिलीच्या कुटुंबाचा निरोप घेतात, ते घराबाहेर पडल्यावर मैथिलीचे बाबा म्हणतात," मैथिलीने जर केतनसोबत लग्न करायला होकार दिला तर आपली चिंताच मिटेल, निलिमा ताईंच्या स्वभावाबद्दल कल्पना होतीच पण केतन एक डॉक्टर असून सुद्धा तो किती साधा सरळ आहे. आपल्या मैथिलीसाठी हाच मुलगा योग्य आहे. राधिका एकदा तुच मैथिलीसोबत बोलून बघ, निदान तिच्या मनात काय चालू आहे? ह्याचा तरी आपल्याला अंदाज येईल.

राधिका म्हणाली," हो बाबा मी मैथिली सोबत बोलते. केतन down to earth आहे."

राधिका मैथिलीच्या रुममध्ये जाते तर एव्हाना मैथिलीने साडी काढून ठेवली होती, तिची आवरसावरच चालू होती. राधिका ताईला बघून मैथिली म्हणाली," ताई ते लोक गेलेत का?"

"हो आत्ताच" राधिका उत्तरली.

मैथिली म्हणाली," बघ तु म्हणत होतीस ना की तुला केतनला भेटायचय म्हणून, बघ कशी अचानक तुझी त्याच्यासोबत भेट झाली. तुला केतन कसा वाटला?"

राधिका म्हणाली," हा प्रश्न मी तुला विचारायला हवा होता, माझे उत्तर ऐकायचे असेल तर सांगते, केतन मला अगदी तुझ्या योग्य वाटला, त्याला त्याच्या शिक्षणाचा, पोस्टचा, पैश्यांचा अजिबात गर्व नाहीये. खूप साधा सरळ आहे."

मैथिली म्हणाली," राधिका ताई आई बाबांचे काय म्हणणे आहे?"

राधिका म्हणाली," मैथिली आई बाबांचे काय म्हणणे आहे किंवा मला काय वाटते आहे? यापेक्षा तुझी काय ईच्छा आहे?हे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे."

मैथिली म्हणाली," हो ताई पण माझ्या मनात खूप गोंधळ उडाला आहे. काय निर्णय घेऊ? हेच कळत नाहीये."

राधिका म्हणाली," तुझ्या मनातील गोंधळ मी समजूच शकते पण मैथिली काहीतरी निर्णय तर घ्यावाच लागेल ना आणि जेवढा जास्त वेळ तु विचारात घालवशील तेवढंच तुला निर्णय घेणे कठीण होऊन बसेल. तुझी मोठी बहीण म्हणून मी एवढंच सांगेल की मीही लग्न करताना एकच बघितलं होत ते म्हणजे मुलाचा स्वभाव, त्याने आपल्या आई बाबांना आदराने वागवले पाहिजे तसेच आपल्या मताचा आदर केला पाहिजे. केतन व्यक्ती म्हणून कसा आहे? हे काही मी नव्याने तुला सांगायला नको. राहिला प्रश्न आई बाबांचा तर त्यांना केतन जावई म्हणून पसंत आहे. निलिमा काकू स्वभावाने खूप भारी आहेत, त्या घरात तु गेलीस तर तुझे कल्याणच होईल. बघ विचार कर आणि योग्य तो निर्णय घे."

एवढं बोलून राधिका मैथिलीच्या रुमच्या बाहेर पडते. साधारणतः अर्ध्यातासाने मैथिली हॉल मध्ये जाते, तिथे बाबा, सौरभ व जिजाजी बसलेले असतात, राधिका ताई माहीला जेऊ घालत असते तर आई स्वयंपाक घरात काम करण्यात मग्न असते. मैथिली आवाज देऊन आईला हॉल मध्ये बोलावून घेते, आई आल्यावर मैथिली बोलायला सुरुवात करते, "आई बाबा राधिका ताईकडून मला कळलं की तुम्हा सर्वांना केतन पसंत आहे. जेव्हापासून आपल्याला लग्न करायचे आहे हे मला समजले तेव्हापासून मी एकच ठरवले होते ते असे की जो मुलगा माझ्या बाबांना पसंत असेल त्याच मुलाशी मी लग्न करेल कारण मला माहित होतं की माझे बाबा माझ्यासाठी परफेक्ट मुलगा शोधतील. बाबा तुम्ही सर्वांनीच माझ्यापेक्षा चार उन्हाळे पावसाळे जास्त पाहिले आहेत, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे. तुम्हाला जर केतन माझ्यायोग्य वाटत असेल माझाही ह्या लग्नाला होकार आहे,मी मनापासून केतनसोबत लग्न करायला तयार आहे. तुम्ही माझा होकार निलिमा काकूंना फोन करून कळवू शकता."

मैथिलीचा निर्णय ऐकताच उपस्थित असलेल्या सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू झळकते, सर्वांना खूप आनंद होतो. आई म्हणते, " थांबा मी पहिले देवासमोर साखर ठेऊन आले."

मैथिलीच्या बाबांनी क्षणाचाही विलंब न करता मैथिलीचा होकार निलिमा ताईंना फोन करून कळवला. मैथिलीला आपल्या निर्णयाचा घरच्यांना किती आनंद झालाय हे तिला त्यांच्या चेहऱ्यावरून कळतच होते. आईच्या सांगण्यावरून तिने देवासमोर जाऊन हात जोडले व ती मनातल्या मनात म्हणाली," हे देवा माझ्या घरच्यांच्या चेहऱ्यावर आज जो काही आनंद दिसत आहे, तो कायम असाच दिसुदेत, माझ्या घरच्यांना कोणाची नजर नको लागू देऊ."

या सगळ्या गोंधळात मैथिलीचे आपल्या मोबाईलकडे लक्षच नव्हते. थोडा मोकळा वेळ भेटल्यावर तिने मोबाईल बघितला तेव्हा केतनचा मॅसेज आल्याचे समजले. केतनचा मॅसेज असा होता की," Hi my would be wife, thank you so much for such quick and expected decision."

©®Dr Supriya Dighe

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now