Oct 24, 2021
कथामालिका

एक आगळेवेगळे लग्न भाग ३०

Read Later
एक आगळेवेगळे लग्न भाग ३०

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

मागील भागाचा सारांश: केतनने आईकडे मैथिलीसाठी होकार दिला. केतनच्या आईला मैथिलीच्या आईकडून मैथिलीला बघायला पाहुणे येणार असल्याचे समजते. मैथिलीला बघायला मुलगा येणार असल्याने तिच्या मनात बऱ्याच शंका असतात, त्या शंकांचे निराकरण करण्यासाठी ती राधिका ताईकडे जाते.

आता बघूया पुढे....

राधिका ताईच्या घरुन संध्याकाळी मैथिली तिच्या घरी परतते, घरी आल्यावर आईच्या सांगण्यावरून मैथिली दुसऱ्या दिवशी घालण्यासाठी लागणारी साडी ब्लॉउज, दागिने याची तयारी करून ठेवते. मैथिलीला बघण्यासाठी पहिल्यांदाच पाहुणे येणार असल्याने आई बाबा खुशीत होते तसेच ते कार्यक्रमाची तयारी करण्यात व्यस्त होते. मैथिलीच्या मनात राहून राहून विचार येत होते की उद्या येणारा मुलगा कसा असेल? तो काय प्रश्न विचारेल? अशा अनेक प्रश्नांनी तिच्या मनात गोंधळ माजवला होता. या विचारांनी तिला रात्रभर झोपही लागत नव्हती, या विचारांच्या सोबतच तिच्या मनात केतनचाही विचार चालू होता. मैथिलीला कळतच नव्हते की आपल्या मनात केतनचा विचार का येत आहे? आपण उद्या येणाऱ्या मुलाची व केतनची तुलना का करत आहोत? पहाटे कधीतरी मैथिलीला झोप लागली. आईच्या आवाजाने मैथिलीला जाग आली.

"मैथिली बाळा उठ पाहुणे येईपर्यंत तुझं सर्व आवरून झाले पाहिजे" आई म्हणाली

यावर मैथिलीने उत्तर दिले,"आई मला रात्रभर झोप लागली नाही, थोड्यावेळ झोपू दे ना प्लिज."

आई मैथिलीजवळ आली, आईने मैथिलीच्या केसातून हात फिरवला व ती म्हणाली,"काय झालं बाळा, तुला झोप का नाही लागली?"

मैथिली म्हणाली," माहीत नाही का पण आजच्या कांदेपोहे कार्यक्रमाचे खूप टेन्शन आले आहे."

आई हसून म्हणाली," अग प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हा क्षण येताच, तुझी पहिली वेळ आहे म्हणून तुला अस वाटतं असेल. मैथिली तु टेन्शन अजिबात घेऊ नकोस. तुला जर मुलगा आवडला तरच आपण होकार देऊयात, तुझ्या मनाविरुद्ध आम्ही काहीच करणार नाही. तुझ्याशी बोलत बसले तर माझीही कामे राहून जातील, तु उठ बर लवकर." एवढे बोलून आई मैथिलीच्या रुम मधून किचन मध्ये निघून गेली.

मैथिलीच्या कांदेपोहे कार्यक्रमासाठी सौरभ सकाळीच होस्टेलवरून आला होता तसेच राधिका ताई व तिचा नवराही आले होते. बऱ्याच दिवसांनी घरी सर्वजण एकत्र जमले होते. घरातील गोंधळ बघता जणूकाही ते लग्नघरच वाटतं होते. मैथिलीने उठून तिचे आवरले, तिला राधिका ताईने साडी घालून दिली तसेच तिचा हलकासा मेकअप करून दिला होता. मैथिलीला साडीत बघून राधिका ताईला गहिवरून आले होते, ती म्हणाली, "मैथिली कधी एवढी मोठी झालीस हे कळालं पण नाही ग, साडीत तर किती छान दिसतेस, कुठलाही मुलगा तुला नाही म्हणू शकत नाही."

काही वेळातच मुलाकडची मंडळी मैथिलीच्या घरी पोहोचली.मैथिलीच्या आई बाबांनी पाहुण्यांचे स्वागत केले.मैथिली तिच्या रुममध्ये होती. मैथिलीला साडीत थोडं वेगळंच वाटतं होते. राधिका ताई तिला बोलावण्यासाठी रुममध्ये येऊन ती म्हणाली," चला मॅडम आपल्याला बाहेर बोलावत आहेत."

मैथिली म्हणाली," ताई मला खूप धडधडत आहे."

राधिका ताई म्हणाली," मला तर मुलगा आवडलाय, तुलाही तो नक्कीच आवडेल असच वाटतंय, आता टेन्शन घेणं सोड, बाहेर जाऊयात."

राधिका ताई मैथिलीला हॉल मध्ये घेऊन आली, मैथिली मान खाली घालून आली होती, तिची मान वर करुन बघण्याची हिम्मत होत नव्हती, तिला भीती वाटत होती. मैथिलीचे बाबा म्हणाले, "अरे बाळा ये इकडे खुर्चीत बस, घाबरू नकोस सगळी आपलीच माणसे आहेत."

बाबांच्या या वाक्यावर मैथिलीने खुर्चीच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी मान वर केली असता तिचे मुलाकडे गेले व ती जोरात ओरडली, "तुम्ही?"

कोणी काहीच बोललं नाही. मैथिली उपस्थित असलेल्या सर्वांकडे आश्चर्याने बघत होती, कोणी काहीच बोलत नाही हे बघून ती म्हणाली, " आई तु तर बोलली होती की बाबांच्या मित्राचा मुलगा बघायला येणार आहे आणि मग हा I mean हे इथे कसे काय?"

यावर बाबा तिला म्हणाले, " मैथिली तु इथे खुर्चीत बस मग तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील."

मैथिली खुर्चीत जाऊन बसली मग बाबा म्हणाले, " मैथिली तु म्हणते ते अगदी बरोबर आहे, माझ्या मित्राचा मुलगाच तुला बघायला येणार होता पण ते झाले असे की परवा माझ्या मित्रासोबत माझे बोलणे झाले असता त्याने त्याच्या मुलाला फोन करून तुझ्याबद्दल माझ्यासमोरच कल्पना दिली त्यावेळी त्याचा मुलगा आज तुला बघायला यायला तयार होता , पण त्याच दिवशी संध्याकाळी त्या मुलाने घरी आई वडीलांना सांगितले की त्याचे दुसऱ्याच कुठल्या तरी एका मुलीवर प्रेम आहे व त्याने तिच्यासोबत काही महिन्यांपूर्वी रजिस्टर लग्न केले आहे, या सर्वाची माझ्या मित्राला पुसटशीही कल्पना नव्हती. मी काल कंपनीत गेलो होतो तेव्हा माझ्या मित्राने मला भेटून या सर्वाची कल्पना दिली. मी जर हे सर्व तुझ्या आईला फोनवर सांगितले असते तर ती जास्त नाराज झाली असती म्हणून मी तिला बुटीकमध्ये जाऊन हे सांगितलं, यावर तुझी आई मला म्हणाली की निलिमा ताईंच्या नजरेत तुझ्या योग्य कोणीतरी मुलगा आहे म्हणून मी व तुझ्या आईने त्यांची बुटीकमध्ये भेट घेऊन याबद्दल विचारणा केली असता त्या म्हणाल्या की कोणी दुसरा तिसरा मुलगा नसून केतनसाठीच तु योग्य आहेस असे त्यांना वाटते तसेच त्यांनी हेही सांगितले की केतनलाही तु पसंत आहेस. निलिमा ताईंनी याबद्दल आम्हाला विचारले असता आमच्याकडे केतनला नकार देण्यासाठी एकही कारण नव्हते. मला व तुझ्या आईला केतन पसंत आहे. आता राहिला प्रश्न तुला आम्ही या सर्वाची कल्पना आधीच का नाही दिली तर आम्हाला वाटले की तु उगाच डिस्टर्ब होशील म्हणून जेव्हा समोर केतनला बघशील तेव्हाच तुला सर्व सांगावे म्हणजे यावर तु जास्त विचार करणार नाहीस. तुला केतन जर पसंत असेल तर आपण पुढे जाऊ नाहीतर बघ म्हणजे तुझा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल."

एका दमात बाबा सर्व काही सांगून मोकळे झाले. चेहऱ्यावरून तरी मैथिली नॉर्मल वाटत होती पण तिच्या मनात पुन्हा एकदा सर्वच गोंधळ निर्माण झाला होता. निलिमा ताई म्हणाल्या, "हे बघ मैथिली आजचा कार्यक्रम म्हणजे आमच्यासाठी निमित्तमात्र आहे, मला तु सून म्हणून पसंत आहेस, केतनलाही तु पसंत आहेस पण ही आमची बाजू आहे, तु कसलंही दडपण घेऊ नकोस, तुझ्या मनात जे काही प्रश्न असतील ते तु केतनला विचारू शकतेस, तु होकारच दिला पाहिजे असं आमचं मत नाही, तु नाही म्हणालीस तरी आम्ही काहीच म्हणणार नाही. तुला वेळ हवा असेल तर तो घे, निवांत विचार करून निर्णय घे. शेवटी हा तुझ्याही आयुष्याचा प्रश्न आहे."

यावर मैथिली म्हणाली," काकू मी तुम्हाला किंवा केतनला अगदी जवळून ओळखते, तुमच्याबद्दल माझ्या मनात काहीच शंका नाहीत पण मला केतनसोबत थोडे बोलायचे आहे आणि मगच मी निर्णय घेऊ शकेल. आई बाबा, काकू तुम्हाला जर काही प्रॉब्लेम नसेल तर मी केतनसोबत एकांतात बोलू शकते का?"

निलिमा ताई म्हणाल्या," हो नक्कीच माझी काहीच हरकत नाहीये."

निलिमा ताईंच्या बोलण्यावर मैथिलीच्या आई व बाबांनी मान हलवून संमती दर्शविली.

मैथिली केतनसोबत काय बोलेल? व तिचा निर्णय काय असेल? हे बघूया पुढील भागात...

©®Dr Supriya dighe

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now