एक आगळेवेगळे लग्न भाग २

Phase of ketan's life, how he grows, what he became.

मागील भागाचा सारांश: केतनचे बाबा युद्धात गोळी लागून जखमी होतात. केतनच्या बाबांचे ऑपरेशन करून गोळ्या काढल्या जातात. केतनचे बाबा बेशुद्ध अवस्थेत असतात. आता बघूया पुढे.

घड्याळ पुढे सरकत असते, एक एक तास पुढे चाललेला असतो. केतन व त्याची आई ऑपरेशन थिएटर बाहेर बसून बाबा शुद्दीत कधी येतील याची वाट बघत असतात. पाच ते सहा तास उलटून गेल्यावर सुभेदार केतनला म्हणतात की, " केतन बाळा आईला इथे बसूदेत, तु माझ्यासोबत घरी चल, सकाळपासून तु काहीच खाल्लेले नाहीये"

केतन म्हणाला, " नाही काका मी आईला सोडून कुठेच जाणार नाहीये, युद्धावर जाताना बाबा सांगून गेलेत की आईला कधीच एकटे सोडू नकोस"

हे ऐकून सुभेदार काकांच्या डोळ्यात पाणी येते ते केतनच्या आईला म्हणतात, " ताई तुम्हीच केतनला सांगा, मी त्याला माझ्या घरी घेऊन जातो"

केतनची आई केतनकडे बघून बोलते, " बाळा मी इथे एकटी नाहीये, तुझे बाबा माझ्या सोबत आहेत, तु सुभेदार काकांसोबत जा आणि काहीतरी खाऊन घे"

केतन आईचे म्हणणे लगेच ऐकतो व सुभेदार काकांसोबत जायला तयार होतो. बारा तास उलटून जातात तरी केतनचे बाबा अजून शुद्धीत आलेले नसतात. केतनची आई देवाचा धावा करत होती. दुसऱ्या दिवशी केतन लवकर उठून सुभेदार काकांसोबत हॉस्पिटलमध्ये येतो. अजून बाबा शुद्दीत न आल्याने तो हिरमुसून बसतो. केतनची आई केतनला धीर देते आणि सांगते की, " केतन आपले बाबा नक्की शुद्दीत येतील, आपण कुणाचे काही वाईट केलेले नाही मग देव तरी आपले वाईट कसे होऊ देईल." 

ऑपरेशन होऊन बावीस तास उलटून जातात पण केतनचे बाबा शुद्दीत आलेले नसतात. घड्याळ तर पुढे सरकत होते पण केतनच्या बाबांच्या तब्येतीत काहीच सुधारणा होत नाही. अखेर ज्याची भीती होती तेच झाले ऑपरेशनला चोवीस तास होतात पण केतनचे बाबा शुद्दीत येत नाहीत, डॉक्टरांनी केतनचे बाबा कोमात गेल्याचे घोषित केले. आता पुढे काय होणार या कल्पनेने केतन व त्याची आई हादरून जातात. पुढील कित्येक दिवस केतन व आई हॉस्पिटलमध्ये येऊन बाबांजवळ बसायचे, डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे बाबांसोबत गप्पा मारायचे पण सगळे प्रयत्न व्यर्थच होते. 

केतनच्या आईने खंबीरपणे एक निर्णय घेतला व तो केतनकडे बोलून दाखवला, " केतन बाळा आपले बाबा कोमातून कधी बाहेर येतील हे आपण सांगू शकत नाही, महिन्यांमागून महिने उलटून चालले आहेत. दोन महिने झाले आहेत तसा तु शाळेत गेला नाहीस. इथून पुढे तु फक्त रविवारी हॉस्पिटलमध्ये जायचं, इतर दिवस शाळेत जायचे आणि मन लावून अभ्यास करायचा. बाबा शुद्दीत आल्यावर त्यांना जर कळाले की तु इतके दिवस शाळेत गेला नाहीस तर ते मला ओरडतील. मी रोज हॉस्पिटलमध्ये जाऊन बाबांची काळजी घेत जाईल"

" ठीक आहे, तुला जर वाटत असेल की मी शाळेत जाऊन अभ्यास करावा तर मी तुझे म्हणणे मोडणार नाही, मी मन लावून अभ्यास करेल, तु माझी काळजी करू नकोस, तु तुझी आणि बाबांची काळजी घे" केतन आज्ञाधारक मुलाप्रमाणे बोलला.

त्या दिवसापासून केतनचा व त्याच्या आईचा दिनक्रम ठरलेला होता, केतनने सकाळी उठून शाळेत जायचे आणि आईने हॉस्पिटलमध्ये जायचे. रविवारी केतनने हॉस्पिटलमध्ये जायचे आणि आईने घरी राहून आराम करायचा. हळूहळू दिवस पुढे चालले होते. केतनच्या बाबांच्या तब्येतीत काही सुधारणा होत नव्हतीच उलट त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती. साधारणतः दीड वर्षांनी केतनचे बाबा हे जग सोडून देवाघरी गेले. केतनचे बाबा शहीद झाले होते.बाबा गेल्यावर केतनने स्वतःला आणि आईलाही सावरले. बाबा गेल्यावर त्यांना आर्मीचे क्वार्टर सोडावे लागणार होते. केतनच्या आईने त्यांच्या गावापासून जवळच नाशिकला स्थायिक व्हायचे ठरवले. केतनला त्याची आर्मी स्कुल सोडण्याची इच्छा होत नसल्याने त्याने होस्टेलला रहाण्याचा निर्णय घेतला. 

केतनच्या आईसोबत नाशिकला केतनची आजी म्हणजे त्याच्या आईची आई येऊन राहू लागली. दोघी मायलेकी सोबत राहत असल्यामुळे केतनला आईची काळजी वाटणे कमी झाले होते. केतन मन लावून अभ्यास करत असे. केतनच्या आईने हातावर हात धरून न बसता शिवणकाम शिकली आणि स्वतः घरच्या घरी शिवणकाम सुरू केले. केतनच्या आईच्या हातात कला व जिभेवर साखर असल्याने तिच्याकडे भरपूर काम येऊ लागले, काही दिवसांनी कामाचा व्याप वाढल्याने केतनच्या आईने काही गरजू बायकांना आपल्याकडे कामाला ठेवले, हळूहळू कामही वाढू लागले आणि त्या सोबत कामगारही. काही वर्षांनी केतनच्या आईने छोटेसे बुटीक चालू केले. केतनची आई फक्त गरजू स्त्रियांनाच कामावर ठेवत असे. 

केतनचे दहावीपर्यंत शिक्षण आर्मी स्कुल मध्येच झाले, पुढील शिक्षणासाठी तो नाशिकला आईकडे येऊन राहिला. बारावीनंतर केतनला एअर फोर्स जॉईन करण्याची इच्छा केतनने आईकडे बोलून दाखवली त्यावेळी आई त्याला म्हणाली, " केतन मला माहित आहे की एअर फोर्स जॉईन करण्याचे स्वप्न तु लहानपणापासून बघत आला आहे, तुझे बाबा गेल्यानंतर मी फक्त तुझ्याकडे बघत आयुष्य जगत आहे आणि तुही एअर फोर्समध्ये निघून गेलास तर मी कोणाकडे पाहून जगायचे"

केतन बोलला, " आई ठीक आहे मी एअर फोर्समध्ये जाणार नाही, मी दुसरी फिल्ड निवडतो"

केतनने आईच्या इच्छेखातर आपल्या स्वप्नांना तिलांजली दिली. केतनने बारावीनंतर MBBS ला ऍडमिशन घेतले. शिक्षण चालू असतानाच सुट्टीत घरी आल्यावर केतन आसपासच्या खेड्यावर जाऊन शरीर निरोगी कसे राहावे त्यासाठी काय केले पाहिजे यावर LECTURES देऊ लागला, ज्यांना गरज आहे त्यांच्यावर उपचार करू लागला. केतनला समाजसेवा करण्याची आवड होती. MBBS नंतर केतनने पुढे MD MEDICINE केले. केतनने शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो नाशिकमध्ये एका नामांकित व मोठ्या हॉस्पिटलमध्ये रुजू झाला सोबतच त्याने त्याच्या गावी एक हॉस्पिटल चालू केले जिथे तो दर शनिवारी रविवार जाऊन गरिबांवर उपचार करू लागला.

केतनला त्याचे मित्र विचारायचे की " केतन तु गरिबांवर मोफत उपचार का करतोस?"

यावर केतनचे उत्तर ठरलेले असायचे, " माझ्या बाबांनी सांगितलं आहे की आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून मी माझ्या परीने काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे"

केतनच्या आयुष्यात पुढे काय होईल ते बघूया पुढील भागात.

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all