एक आगळेवेगळे लग्न भाग २९

After talking with maithili, ketan is ready to marry her.

मागील भागाचा सारांश: केतनला त्याच्या होणाऱ्या बायकोकडून काय अपेक्षा आहेत हे तो मैथिलीला सांगतो. घरी गेल्यावर मैथिलीने आईला पहिल्या हॉस्पिटल मधील नोकरी सोडण्याबद्दल तसेच नवीन हॉस्पिटल जॉईन करण्याबद्दल कल्पना दिली.

आता बघूया पुढे....

केतन घरी गेल्याबरोबर आईने त्याला विचारले, "केतन मैथिलीसोबत काही बोलणे झाले का?"

"आई किती घाई झालीय तुला, माझे मैथिलीसोबत सविस्तर बोलणे झाले आहे." केतन उत्तरला.

आई म्हणाली," अरे घाई तर होणारच ना कारण आजच भारती म्हणत होती की मैथिली साठी त्यांनी कोणीतरी मुलगा बघितला आहे. बरं ते जाऊदेत मैथिली सोबत चर्चा झाल्यावर तुझे काय मत आहे? तुला मैथिली सोबत लग्न करायचे आहे की नाही?"

केतन म्हणाला," आई मैथिली माझ्यासाठी परफेक्ट आहे"

निलिमा ताईंच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता, त्या म्हणाल्या," मला तुझे उत्तर माहीत होते, उगाच तु एवढा वेळ घेतलास.लवकरात लवकर मैथिलीच्या आई बाबांशी बोलावं लागेल नाहीतर तो कोण मुलगा बघितला आहे त्याच्यासोबत ते लग्न ठरवून मोकळे होतील."

केतन म्हणाला," आई अग अजून तो मुलगा बघायला येणे बाकी आहे, अजून त्यांच्यात काहीच बोलणे झाले नाहीये, मला मैथिलीने याबद्दल सर्व काही सांगितले आहे. तु बोल तिच्या आई बाबांशी पण त्यांच्यावर जबरदस्ती करू नकोस."

निलिमा ताई म्हणाल्या," अरे नाही रे, मी हळूच त्यांचा अंदाज घेईल मग बोलेल. मला माहिती आहे की भारती मला नाही म्हणू शकणार नाही.आपल्याला कोणावरही आपलं मत लादण्याचा अधिकार नाही. मैथिली ही त्यांची मुलगी आहे तिचे लग्न कोणासोबत करायचे हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. मी फोन करून भारतीला याबद्दल थोडीफार विचारणा करते मग बघू पुढे काय होईल ते."

निलिमा ताईंनी मैथिलीच्या आईला फोन लावला, दोन तीन रिंगनंतर फोन उचलला गेला, " हॅलो निलिमा ताई बोला काय म्हणताय?" मैथिलीची आई म्हणाली

निलिमा ताई म्हणाल्या," काही नाही ग अगदी सहजच फोन केला होता.तु सकाळी मैथिली साठी मुलगा बघितलाय असं काहीतरी म्हणत होती ना, त्याच बद्दल विचारायचे होते."

मैथिलीची आई म्हणाली," हो ताई, आत्ता मी त्याच विषयावर मैथिलीच्या बाबांशी बोलत होते, त्यांच्या मित्राचा मुलगा आहे, आजच मुलाच्या वडिलांसोबत हे मैथिलीबद्दल बोलले असता ते म्हणाले की परवा मुलगा नाशिकला येणार आहे, बघण्याचा कार्यक्रम परवाचाच ठरला आहे."

निलिमा ताई म्हणाल्या," चांगलंच झालं मग, माझ्याही नजरेत एक मुलगा आहे, तो मैथिली साठी मला एकदम परफेक्ट वाटतोय म्हणून म्हटलं चला तुझ्या कानावर टाकून ठेवूयात."

मैथिलीची आई म्हणाली," हो का, ताई परवाचा कार्यक्रम होऊन जाऊद्यात, मग बघू जर हे फिक्स नाही झालं तर तुम्ही जो मुलगा म्हणत आहात तो बघू."

निलिमा ताई म्हणाल्या," म्हणजे तुमचं फिक्स काही झालं नाहीये का?"

मैथिलीची आई म्हणाली," ताई अजून मुलाने मुलीला व मुलीने मुलाला बघितले नाहीये, हे फक्त त्याच्या वडीलांना ओळखतात, आमच्या पैकी कोणीही मुलाला भेटलेलं नाहीये,आता प्रत्यक्ष भेट झाल्यावरच तो कसा आहे ते कळेल. ताई मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे, घाई गडबड करून कशी चालेल?"

निलिमा ताई म्हणाल्या," बरोबर आहे तुझं, विचारपूर्वक निर्णय घ्या. आपली मैथिली लाखात एक आहे."

मैथिलीची आई म्हणाली," हो ताई, परवाचा कार्यक्रम झाल्यावर मी काय झालं ते तुम्हाला कळवेल, ताई मला दोन दिवस बुटीकमध्ये यायला जमणार नाही."

निलिमा ताई म्हणाल्या," काहीच हरकत नाही, तु दोन काय तीन दिवस सुट्टी घेतली तरी चालेल."

एवढं बोलून दोघीजणी फोन बंद करतात. निलिमा ताई मैथिलीच्या आईसोबत झालेले बोलणे केतनला सांगतात. यावर केतन म्हणतो, " आई जर मैथिली माझ्या नशिबात असेल तर माझे तिच्यासोबत लग्न होईलच पण जर तस नसेल तर जे घडेल ते आपल्याला स्वीकारावेच लागेल. तु वाईट वाटून घेऊ नकोस."

केतनने हे बोलून आईला जरी समजावले असेल तरी त्यालाही मनात कुठे ना कुठे वाईट वाटतच होते कारण त्याला मैथिली मनापासून आवडली होती. मैथिलीचे जर दुसऱ्या कोणासोबत लग्न झाले तर हा विचार सारखा त्याच्या मनात येत होता.

मैथिलीला तिच्या बाबांनी मुलगा बघायला येणार असल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी मैथिली राधिका ताईच्या घरी गेली. हॉस्पिटलमुळे तसही तिला राधिका ताईच्या घरी जाता येत नसायचे. आता सुट्टीही होती आणि शिवाय ताईसोबत तिला मुलगा बघायला येणार असल्याने त्या विषयावर बोलायचेही होते. राधिका ताईच्या घरी गेल्यावर पहिले काही वेळ मैथिली माहीसोबत खेळली तोपर्यंत राधिका ताईने घरातील कामे उरकली. दुपारी माही झोपल्यानंतर दोघींना गप्पा मारायला वेळ भेटला.

राधिका म्हणाली," मैथिली आज कितीतरी दिवसांनी तु अशी निवांत माझ्या घरी आली आहेस, माहीलाही किती छान वाटले बघ"

मैथिली म्हणाली, "ताई तुला बाबांनी सांगितलं असेलच, उद्या मुलाकडचे बघायला येणार आहेत, मला खूप भीती वाटत आहे."

राधिका हसून म्हणाली," त्यात भीती वाटण्यासारखे काय आहे?"

मैथिली म्हणाली," ताई हसू नकोस, मी नर्व्हस झाले आहे, असं एका पाच ते दहा मिनिटांच्या भेटीत समोरचा व्यक्ती आपल्या योग्य आहे की नाही हे कसं ओळखायचे, आपण एखादा ड्रेस घेताना सुद्धा किती पारखून घेतो."

राधिका म्हणाली," मैथिली आपल्याकडे हेच चालत आले आहे, माझेही असेच झाले आहे सो त्यात एवढा विचार करण्याची गरज नाहीये."

मैथिली म्हणाली," ताई तु जिजूंना पहिल्यांदा पाहिलं त्यावेळी तुला जिजू तुझ्यासाठी परफेक्ट आहेत हे कसं कळाले? माझी मनस्थिती तुला समजत असेलच ना?"

राधिका पुढे म्हणाली," तुझी मनस्थिती मला कळते आहे, काही वर्षांपूर्वी मीही ह्याच स्थितीतून गेले आहे. पण ह्या सगळ्याचा एवढा विचार खरंच करू नकोस. तुझे जिजू ज्यावेळी मला बघायला आले तेव्हा त्यांच्या घरचे कसे आहेत याबद्दल बाबांनी चौकशी आधीच केली होती, आम्हाला दोघांना एकांतात गप्पा मारायला वेळ दिला होता त्यावेळी माझ्या मनात यांच्याबद्दल असणारे सर्व प्रश्न मी विचारले त्याची उत्तरे मनासारखी भेटली आणि माझ्या ज्या काही बेसिक अपेक्षा होत्या त्यात ते बसले मग लगेच मी माझा होकार दिला. तुझी शंका बरोबर आहे की फक्त पाच मिनिटांच्या भेटीत समोरच व्यक्ती कसा आहे हे ओळखायचे कसे? पण एक सांगू का की समोरच व्यक्ती आपल्या योग्य आहे की नाही दोन वाक्यांवरूनही कळतो आणि म्हणतात ना आपल्यात जो sixth sense असतो त्यामुळे हा व्यक्ती आपल्यासाठी योग्य आहे की नाही ते कळते. आता एक काम कर, तुझ्या लाईफ पार्टनर कडून काय अपेक्षा आहेत याची मनातल्या मनात यादी कर, जर तुझ्या दहा अपेक्षा असतील तर त्यातल्या आठ अपेक्षेप्रमाणे जरी तो असेल तरी त्याला तु होकार द्यावास अशी माझी इच्छा आहे. शेवटी कोणीच परफेक्ट नसतो पण आपल्यालाही जास्त compromise करायचे नाहीये."

मैथिली म्हणाली," ताई तु ना खूप भारी आहेस, कुठलीही अवघड गोष्ट तु अगदी सोपी करून सांगतेस."

"मग शेवटी बहीण कोणाची आहे?" राधिका ताई हसून म्हणाली.

राधिका ताईच्या या वाक्यावर दोघीही खळखळून हसल्या.

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all