एक आगळेवेगळे लग्न भाग २६

Maithili is taking decision of leaving hospital

मागील भागाचा सारांश: मैथिलीने हॉस्पिटलमध्ये घडलेला इतंभूत प्रकार राधिका ताईला सांगितला. केतनने आईला अमेरिकेत जाण्याचा प्लॅन सांगितला, तसेच आईने केतनच्या मनात मैथिलीबद्दल काय भावना आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याला सांगितले की मैथिली सून म्हणून मला पसंत आहे यावर केतनने विचार करून उत्तर देतो असे कळवले.

आता बघूया पुढे...

राधिका ताईने मैथिलीला सांगितले होते की आई बाबांच्या नजरेत एक डॉक्टर मुलगा आहे ह्या विचाराने मैथिलीला झोप काही लागत नव्हती, तिच्या डोक्यात असंख्य विचारांनी एकाच वेळी गर्दी केली होती. मैथिली विचार करू लागली की बाबा तर माझ्यासाठी योग्यच मुलगा शोधतील पण तो कसा असेल? माझी स्वप्ने तो समजून घेईल का? मला प्रत्येक कामात पाठिंबा देईल का? आज जे झालं तस जर काही भविष्यात घडलं तर तो माझी साथ देईल का? केतन सर जस मला समजावून सांगतात, मी काय करायला हवे हे माझ्याच लक्षात जस सरांनी आणून दिलं तस तो ही करेल का? अरे पण मी त्याची तुलना केतन सरांसोबत का करत आहे? आता ह्या सर्वाशी केतन सरांचा तर काहीच संबंध नाही मग मी त्यांचा विचार का करत आहे? पण ते काही असो केतन सरांची बायको खूप नशीबवान असेल, सर खरंच स्त्रियांना किती आदर देतात. केतन सरांसारखा माणूस एकमेव असू शकतो, सगळे सरांसारखे थोडीच असतील. जाऊदेत आता सगळं या सगळ्याचा विचार उद्या सकाळी उठल्यावर करू. उद्या हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, पंकज सरांना जर काढलं नसेल तर दुसऱ्या नोकरीच काहीतरी बघावं लागेल, मैथिली झोप आता.

दुसऱ्या दिवशी सकाळी केतन झोपेतून उठून फ्रेश होऊन हॉल मध्ये येतो, आई त्याची वाट बघतच बसलेली असते, केतन आल्या आल्या त्याच्या हातात चहाचा कप देते व विचारते, "केतन मैथिली बद्दल काय विचार केलास?"

केतन चहाचा एक घोट घेऊन म्हणाला, "आई तुला किती घाई लागली आहे, अग लग्न करायचं आहे, आयुष्यभराचा प्रश्न आहे."

आई म्हणाली," अरे पण तुच बोलला होतास की सकाळी सांगतो म्हणून."

केतन म्हणाला," आई मी बोललो होतो ते खरे आहे, तु सांगितल्याप्रमाणे मी डॉ मैथिली बद्दल विचार केलाही पण आई कस आहे ना की आपण डॉ मैथिलीला गेल्या काहीच दिवसांपासून ओळखत आहे, त्या चांगल्या आहेत याबद्दल मला काही शंकाच नाही पण आपल्याला त्यांच्या मनात काय चालू आहे हेही जाणून घ्यायला लागेल ना? डॉ मैथिलीचा पुढच्या आयुष्याचा काय प्लॅन आहे? त्यांना पुढे काय करायचे आहे? हे मला तरी काहीच माहीत नाही. डॉ मैथिलीकडे मी कधी त्या नजरेतून बघितलेले नाही. आमच्यामध्ये एक कम्फर्ट झोन आहे यात काही वादच नाही पण लग्न या विषयावर त्यांच्यासोबत चर्चा केल्यावरच मी योग्य तो निर्णय घेऊ शकेल."

आई म्हणाली," केतन मला तुझं म्हणणं पटतंय पण त्यासाठी आपल्याला तिच्या आई बाबांशी बोलायला लागेल, पण त्याआधी तुझा निर्णय पक्का व्हायला हवा."

केतन म्हणाला," आई तु लगेच जाऊन त्यांच्या आई बाबांशी बोलू नकोस. मी डॉ मैथिली सोबत गप्पा मारता मारता मला ज्या काही शंका आहेत त्या सगळ्या दूर करून घेण्याचा प्रयत्न करतो मग आपण फायनल निर्णयावर पोहोचूयात"

"ठीक आहे जशी तुझी इच्छा, मला फक्त एकच वाटतं की मैथिली सारखी चांगली मुलगी आपल्या हातून जायला नको." आई उत्तरली.

केतन म्हणाला," आई तु काळजी करू नकोस, मी जो निर्णय घेईल तो व्यवस्थित विचार करून घेईल,आज हॉस्पिटलमध्ये माझी व डॉ मैथिलीची भेट होईलच मग बघू."

मैथिली सकाळी लवकर उठून हॉस्पिटलला जाण्यासाठी तयारी करत होती, ती तिच्या कामात दंग होती, तिचे बाबा तिला म्हणाले, "मैथिली बाळा तुझ्याकडे थोडा वेळ आहे का? थोडं महत्त्वाचे बोलायचे होते."

मैथिलीने हातातील काम बाजूला ठेवले व ती बाबांकडे बघून म्हणाली," बाबा बोला ना, काय बोलायचं आहे?"

बाबा म्हणाले," मी आणि तुझी आई तुझ्या लग्नाचा विचार करत होतो, माझ्या एका मित्राचा मुलगा डॉक्टर आहे, मुलगा निर्व्यसनी आहे, त्याची फॅमिली सुसंस्कृत आहे शिवाय आपल्या सारखीच मध्यमवर्गीय आहे,तो पुण्यात MD करत आहे, शिक्षण पूर्ण झाल्यावर तो नाशिकमध्येच सेटल होणार आहे यावर तुझं काय म्हणणं आहे?"

मैथिली थोडा विचार करून म्हणाली," बाबा तुम्हाला जे योग्य वाटत असेल ते करा, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला जो मुलगा पसंत असेल त्याच्याशी मी लग्न करायला तयार आहे, माझी काहीही हरकत नाही."

 बाबा म्हणाले," मला तुझं उत्तर माहीत होतं पण एकदा तुझं मत जाणून घ्यावे म्हणून विचारले. मी आजच माझ्या मित्राशी याबद्दल बोलतो."

बाबांशी बोलून झाल्यावर मैथिली हॉस्पिटलमध्ये निघून गेली. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर मैथिली तडक डीन सरांच्या केबिनमध्ये गेली, मैथिलीला बघून सर म्हणाले, "डॉ मैथिली या ना, मी तुम्हाला थोड्यावेळात बोलावणार होतोच."

"सर पंकज सरांबद्दल काय निर्णय घेतला आहे? तो मला जाणून घ्यायचा आहे?" मैथिलीने विचारले.

डीन सर म्हणाले," डॉ मैथिली झालेल्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. डॉ पंकज चुकीचे वागले हे खरे आहे पण त्यांना मी हॉस्पिटलमधून काढून टाकू शकत नाही. मी तुम्हाला शब्द देतो की डॉ पंकजपासून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही."

मैथिली पुढे म्हणाली," ठीक आहे सर, हा तुमचा फायनल निर्णय असेल तर माझाही निर्णय ठरला आहे, मी आजच राजीनामा देते. ज्या हॉस्पिटलमध्ये डॉ पंकज सारखी व्यक्ती काम करत असेल त्या हॉस्पिटलमध्ये मी सुरक्षित असू शकेल असा मला वाटतं नाही."

डीन सर म्हणाले," डॉ मैथिली तुमचा निर्णय जर झालाच असेल तर मी तरी काय बोलणार, तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. माझी काही मदत लागली तर मला नक्कीच सांगू शकता."

एवढे बोलून मैथिली डीन सरांच्या केबिन मधून बाहेर पडली. मैथिलीने राजीनामा लिहून सरांकडे सोपविला. थोडयाच वेळात तिची केतनसोबत भेट झाली.

केतन म्हणाला," डॉ मैथिली तुम्ही डिपार्टमेंट सोडून इकडे तिकडे का फिरत आहात?"

मैथिली म्हणाली," सर तुम्ही म्हणाले तसंच झालं, डॉ पंकजला हॉस्पिटलमधून काढले नाही, मी माझा राजीनामा सरांकडे दिला आहे."

केतन म्हणाला," बरं केलंस, माझा हा आठवडा ह्या हॉस्पिटल मधील शेवटचा आठवडा आहे. मी तस डीन सरांसोबत बोललो आहे."

"सर तुम्ही माझ्या नोकरीबद्दल तुमच्या मित्राला विचारले का?" मैथिलीने विचारले.

केतनने उत्तर दिले," हो मी माझ्या मित्रासोबत बोललो आहे. साधारणतः एक तासाने मी फ्री होईल, तुमच्याकडे वेळ असेल तर आपण माझ्या मित्राच्या हॉस्पिटलला जाऊन येऊयात म्हणजे तुमची आणि त्याची भेट होईल."

मैथिली म्हणाली," चालेल पण इतक्या वेळ मी हॉस्पिटलमध्ये काय करू?"

केतन म्हणाला," डॉ पुजासोबत तुम्ही सहज एक तास घालवू शकतात ना?"

मैथिली डोक्याला मारत म्हणाली," अरे हो पुजा मॅडमला तर मी विसरलेच होते."

केतन आपल्या कामाला निघून जातो. मैथिली डॉ पुजाच्या केबिनमध्ये जाते. डॉ पुजा मैथिलीला बघून म्हणते, " अरे मैथिली मी तुलाच फोन करणार होते, कॉफी शॉपमध्ये काय झालं? तेही तु मला सांगितलं नाहीस,ते राहूदेत पण तु ह्या वेळी डिपार्टमेंट सोडून माझ्याकडे काय करतेय?"

मैथिली म्हणाली," कॉफी शॉपमध्ये काय झालं ते मी तुम्हाला निवांत सांगेल पण आता सध्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी हे हॉस्पिटल सोडत आहे?"

"काय? पण का?" डॉ पुजा आश्चर्याने म्हणाली

मैथिली म्हणाली," मॅडम पंकज सर ह्याच हॉस्पिटलमध्ये काम करणार आहे, त्यांना काहीच शिक्षा झाली नाहीये, ते ह्या हॉस्पिटलमध्ये असताना मी इथे कशी काम करू?"

डॉ पुजा म्हणाली," ते ठीक आहे पण... तु हे हॉस्पिटल सोडायला नको होते, म्हणजे मी तुला खूप मिस करेल."

मैथिली म्हणाली," हम्मम मॅडम मीही तुम्हाला खूप मिस करेल पण आता काय करणार? दुसरा पर्यायही नाहीये. आपण बाहेर भेटत जाऊयात ना."

डॉ पुजा पुढे म्हणाली," दुसरीकडे कुठे नोकरीच बघितलं आहे की मी काही करू?"

मैथिलीने उत्तर दिले," हो म्हणजे केतन सरांच्या मित्राच्या हॉस्पिटलमध्ये vacancy आहे तिथे काम होईल."

डॉ पुजा म्हणाली," ओके, घरी आई बाबांना हॉस्पिटल सोडण्याची कल्पना दिली आहेस का?"

"नाही, राधिका ताईला माहीत आहे पण आई बाबांना यातील काहीच माहीत नाही. बाबांनी माझ्यासाठी एक स्थळ बघितलं आहे, घरी सध्या तोच विषय सुरू आहे." मैथिली उत्तरली

डॉ पुजा म्हणाली," बरं म्हणजे यंदा कर्तव्य आहे म्हणायचं, मला लग्नाला बोलवायला विसरू नकोस.

मैथिली म्हणाली," मॅडम तुम्ही पण ना... तुम्हाला नाही बोलावणार तर कुणाला बोलवेल. चला मी आता निघते, बाकीचं राहिलेलं आपण फोनवर बोलूयात, बाय."

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all