एक आगळेवेगळे लग्न भाग २५

Discussion between ketan and Ketan's mother about maithili.

मागील भागाचा सारांश: मैथिली व केतन दोघे एका कॉफी शॉपमध्ये भेटतात, त्यावेळी मैथिलीला केतनचे हॉस्पिटल सोडण्यामागील खरे कारण कळते. मैथिली केतनला सांगते की जर डॉ पंकज त्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत राहणार असेल तर मी तिथे काम करणार नाही यावर केतन तिला सांगतो की माझ्या एका मित्राच्या हॉस्पिटलमध्ये vacancy आहे तिथे तुम्ही काम करू शकता.

आता बघूया पुढे...

कॉफी शॉपमधून बाहेर पडून मैथिली व केतन आपापल्या घरी जातात. केतन मैथिलीला तिच्या घरापर्यंत सोडतो, वाटेत मैथिली केतनला सांगते की हॉस्पिटलमध्ये जे झाले आहे त्याबद्दल प्लिज माझ्या घरी कळू देऊ नका, आई बाबांना खरे काय कळल्यावर ते मला नोकरी करू देणार नाही. मैथिली घरी पोहोचल्यावर बघते तर काय? राधिका ताई व माही आलेल्या असतात. मैथिली दारात गेल्या गेल्या माही तिच्या दिशेने धावत येऊन तिला बिलगते, मैथिली तिला उचलून घेऊन तिची पप्पी घेते. माहीला बघून मैथिलीच्या मनावरील दिवसभर झालेल्या घटनांचा ताण, थकवा कुठल्या कुठे दूर पळाला.

मैथिली राधिका ताईला विचारते," ताई तु आज कशी काय अचानक इकडे आलीस?"

राधिका म्हणाली," माझं माहेर आहे, मी हवी तेव्हा येऊ शकते, मला कोणाची परवानगी घेण्याची गरज नाही."

ताईच्या बोलण्यातून तिला मैथिली बद्दल असलेला राग स्पष्ट जाणवत होता. मैथिलीला ताईशी बोलायचं होतं पण आई बाबा समोर असल्यामुळे ती शांत बसली. रात्री जेवण झाल्यावर मैथिलीने ताईला वॉकला येण्याबद्दल विचारले. राधिका ताईला कल्पना होतीच की मैथिलीला काहीतरी बोलायचे असेल म्हणून ती वॉकला जाण्याबद्दल विचारत असेल. माहीला आई बाबांकडे ठेऊन दोघीही वॉकला जाण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडल्या.

घरापासून पुढे काही अंतर दोघी फक्त चालतच होत्या, एकमेकींशी बोलायला तयार होत नव्हत्या. मैथिलीला वाटत होते की राधिका ताई पहिले काहीतरी बोलेल मग आपण तिला त्याचे स्पष्टीकरण देऊ, शेवटी न राहवून मैथिली म्हणाली," ताई मला माहीत आहे की तु माझ्यावर खूप रागावली आहेस पण मला माझी बाजू मांडण्याची एक संधी तर दे."

एवढा वेळ मनात दाबून ठेवलेल्या भावना राधिकाने रागात बोलायला सुरुवात केली, "मैथिली तु वेडी आहेस का? या वयात आई बाबांना एवढे टेन्शन द्यायचे असते का? हॉस्पिटल मधील कामचा ताण तणाव घरच्यांवर काढायचा असतो का? तुला कल्पना नसेल पण आईला तुझ्या अश्या शांत राहण्याचा खूप त्रास झाला आहे, ती रोज फोन करून माझ्याजवळ रडायची, तिला तुझी प्रचंड काळजी वाटत होती. तु माझ्याशी तर सर्वच शेअर करायचीस ना मग ह्या वेळेस तुला राधिका ताई का आठवली नाही? तुझ्याशी फोनवर बोलावं तर तुझा फोन बंद. अग तु आता मोठी झाली आहेस."

मैथिली नम्रपणे हळू आवाजात म्हणाली,"ताई I am really sorry. अग गोष्टी अश्या घडल्या की त्यावर प्रतिक्रिया काय द्यायची हेच मला कळले नाही. तुझ्याशी बोलावं हेही त्या वेळी सुचले नाही."

राधिका ताई रागाने तिच्याकडे बघत म्हणाली, "प्रस्तावना देत बसण्यापेक्षा नक्की घडले काय ते सांगशील का?"

मैथिली म्हणाली," हो ताई मी तुला सर्व सांगते, आपण तिकडे झाडाखालच्या बेंचवर बसून बोलूयात."

मैथिली व राधिका ताई बेंचवर जाऊन बसल्या, मग मैथिलीने आजपर्यंत घडलेली पूर्ण हकीकत सांगितली, राधिका ताईने शांतपणे मैथिलीचं सर्व बोलणं ऐकून घेतले. मैथिलीचे पूर्ण बोलून झाल्यावर राधिका ताईने तिला घट्ट मिठी मारली व ती म्हणाली, " मैथिली बाळा इतक्या वाईट मनस्थितीत तु होतीस, तुला एकदाही माझ्याशी बोलावं वाटलं नाही. आई बाबांना यातील काही कळू दिलं नाही हे फार चांगलं केलंस. पण आता पुढे काय करायचे ठरवले आहे? डॉ पंकज सारखा माणूस जर त्या हॉस्पिटलमध्ये असेल तर तु तिथे काम कशी करू शकशील?"

मैथिली म्हणाली," ताई तेच तर ना, केतन सर म्हणाले की त्यांच्या एका मित्राच्या हॉस्पिटलमध्ये vacancy आहे, तिथे काम झाले तर मग हे हॉस्पिटल सोडून देईल, ताई डॉ पंकजचा खरा चेहरा सर्वांसमोर आणून मी काही चुकीचे तर केले नाही ना?"

राधिका ताई म्हणाली," नाही ग तु तर खूप धीराने आलेल्या समस्येला तोंड दिले आहे, तु चुकीच्या गोष्टींना खतपाणी घातले नाही हे खूप चांगले केलेस आणि डॉ पंकजला त्यांच्या कृत्याची शिक्षा दिलीस हे अगदी योग्य केलंस."

मैथिली पुढे म्हणाली," उद्या हॉस्पिटलमध्ये जाऊन बघेल, पंकज सरांना जर हॉस्पिटल मधून काढले नसेल तर मी लगेच राजीनामा देईन."

राधिका ताई म्हणाली," हो तसंच कर, डॉ केतन खूपच चांगले आहेत वाटतं, आईही त्यांचं कौतुक करत होती. तुमच्यात बऱ्यापैकी चांगली मैत्री झालेली दिसतेय."

मैथिली म्हणाली," हो ताई केतन सर खूप खूप म्हणजे खूप चांगले आहेत, तु त्यांना एकदा भेटून तर बघ म्हणजे तुलाही कळेल. आमच्यातील मैत्री म्हणशील तर अगदी विशेष अशी काही नाही पण त्यांच्या सोबत कुठल्याही विषयावर अगदी बिनधास्तपणे चर्चा करता येते."

राधिका ताई म्हणाली," तुमच्यात मैत्री पलीकडे काही नाही ना?"

मैथिली म्हणाली," नाही ग पण तु अस का विचारलंस?"

राधिका ताई म्हणाली," अग आई बाबा म्हणत होते की तुझं लग्नाचं बघावं लागेल, कोणीतरी एक डॉक्टर मुलगा त्यांच्या नजरेत आहे म्हणे, म्हणून मी विचार केला की तुझं काय आहे ते क्लीअर करून घेऊ."

मैथिली म्हणाली," ताई तुला तर माझं माहीतच आहे की बाबा म्हणतील त्या मुलाशी लग्न करायला मी तयार असेल."

राधिका ताई म्हणाली," ठीक आहे मग मी आईला तस सांगेल, चल आता आपण घरी जाऊयात, माही वाट बघत असेल."

आतापर्यंत आपण बघितलं की मैथिलीच्या घरी काय चालू आहे... आता बघूया केतनकडे काय चालू आहे......

केतन मैथिलीला तिच्या घरी सोडून स्वतःच्या घरी जातो, घरी गेल्यावर फ्रेश होऊन आईसोबत जेवायला बसतो.जेवताना आईसोबत इकडच्या तिकडच्या गप्पा मारतो. जेवण करून झाल्यावर केतन आईला म्हणतो, "आई मला तुझ्यासोबत थोडं बोलायचं आहे?"

आई म्हणाली," अरे आपण गेले किती वेळ बोलतच आहोत ना?"

केतन म्हणाला,"आई अग थोडा विचार करायला लावणाऱ्या विषयावर बोलायचं आहे."

"अरे बोल की मग"आई उत्तरली

केतनने बोलायला सुरुवात केली," आई बऱ्याच दिवसापासून माझ्या डोक्यात हे विचारचक्र चालू आहे. मला तीन महिन्यांचा एक कोर्स करण्यासाठी अमेरिकेत जायचे आहे आणि सध्या मी ज्या हॉस्पिटलमध्ये नोकरी करत आहे ते हॉस्पिटल सोडण्याचा विचार केला आहे. तीन महिन्यांसाठी मी अमेरिकेला जाणारच आहे तर तुही माझ्यासोबत चल, तसही शोभना मावशी कधीची तुला तिकडे बोलावत आहे, तिच्याकडे जाणंही होईल आणि अमेरिका फिरणंही होईल. आपण दोघे सोबत कुठे ट्रीपलाही गेलो नाहीये. कशी वाटली माझी आयडिया?"

थोड्यावेळ विचार करून आईने उत्तर दिले, "तुझं म्हणणं मला पटतंय पण गावाकडच्या तुझ्या पेशन्ट्सच काय करशील?"

केतन म्हणाला," आई मी त्याचा बंदोबस्त करून ठेवलाय, डॉ मैथिली तिकडचे पेशंट बघायला व त्यांच्यावर उपचार करायला तयार आहेत. मी आपल्या ड्रायव्हर काकांवर त्यांना गावाला ने-आण करण्याची जबाबदारी सोपवणार आहे."

"बरं म्हणजे डॉ मैथिली तुझ्या गैरहजेरीत तुझी जबाबदारी पार पाडणार आहे तर" आई थोड्या वेगळ्या सुरात बोलली.

"आई तु अशी का बोलत आहेस?" केतनने विचारले.

आई पुढे म्हणाली," हे बघ केतन मला आडून आडून काही बोलता येत नाही, मी जरा स्पष्टच बोलते. शोभनाकडे आपण नक्कीच जाऊया पण त्याआधी मला एक काम करायचे आहे. मला एक खरं खरं सांग की तुला मैथिली कशी वाटते?"

"कशी वाटते म्हणजे मला समजलं नाही, तुला काय म्हणायचं आहे?" केतनने प्रश्नार्थक चेहऱ्याने विचारले.

" हे बघ केतन मैथिली एक चांगल्या संस्कारी घरातील मुलगी आहे, शिवाय तिचा स्वभावही चांगला आहे, तिने आई वडिलांच्या घरची गरिबी अनुभवली असल्याने तिला सर्व गोष्टींची जाण आहे, तिला कसलाही गर्व नाही आणि तुझं व तीच बऱ्यापैकी जमतं, मला मैथिली सून म्हणून पसंत आहे. तुझं यावर मत काय आहे? तुझ्या मनात जर दुसरी कुठली मुलगी असेल तर तसं मला सांगू शकतोस." आई उत्तरली.

केतन गोधळलेल्या आवाजात म्हणाला," आई तु तर एकदम गुगलीच टाकलीस. पहिले एक स्पष्ट करतो की माझ्या मनात दुसरी कोणी मुलगी नाही. राहिला प्रश्न डॉ मैथिलीचा तर याबद्दल मी कधीच विचार केलेला नाही. डॉ मैथिली बद्दल मी पूर्णपणे रात्रभर विचार करतो आणि उद्या सकाळी तुला माझे उत्तर कळवतो."

एवढे बोलून केतन आपल्या रुममध्ये निघून जातो. केतनचे उत्तर काय असेल? हे बघूया पुढील भागात....

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all