एक आगळेवेगळे लग्न भाग २१

Discussion between ketan, maithili, gauri and dr pooja

मागील भागाचा सारांश: केतन मैथिलीला बोलतं करण्याचा प्रयत्न करत असतो, सुरुवातीला मैथिली खरं काय आहे ते सांगायला तयार नसते पण केतनने बोलून बोलून मैथिलीला खरं काय घडलं आहे ते सांगायला भाग पाडलं. केतन मैथिलीला डॉ पंकजला धडा शिकव असं सांगतो, मैथिलीलाही डॉ पंकजला त्याच्या कृत्याची शिक्षा द्यायची असते पण तिची हिम्मत होत नाही,ती पूर्णपणे गोंधळून गेलेली असते.

आता बघूया पुढे....

केतनने काहीतरी प्लॅन केला आहे हे ऐकून मैथिलीला जरा बरे वाटले, ती केतनला म्हणाली," सर तुमचा काय प्लॅन आहे? तुम्ही जर माझ्यासोबत असाल ना तर मला काहीच काळजी नाहीये, तुम्ही सोबत असाल तर सर्व ठीक होईल."

केतन म्हणाला," एक मिनिटं मैथिली तुझा काहीतरी गैरसमज होतो आहे, जे काही करायचं आहे ते तुला एकटीला करायचं आहे, हा लढा तुझ्या एकटीचा आहे.मी तुला हवी ती मदत करायला तयार असेल पण ही लढाई तुझी आहे."

मैथिली गोंधळून म्हणाली," पण सर मी एकटी काय करू शकणार आहे, माझ्यात एवढी ताकद नाहीये, माझा डॉ पंकज समोर निभाव कसा लागेल?"

केतन म्हणाला," ठीक आहे तुम्ही म्हणता तर मी तुमच्यासोबत उभा राहून डॉ पंकज विरोधात लढाई लढेल आणि त्यात आपल्याला यशही मिळेल पण आयुष्यात पुढे जाऊन पुन्हा तुमच्यावर असा काही प्रसंग आला तर त्यावेळी मी नसेल तर तुम्ही काय करणार?"

मैथिली पुढे म्हणाली," सर तुम्ही म्हणता ते खरे आहे पण मी काय करणार? आणि कसं?"

केतन म्हणाला," आपण एक काम करूया, तुम्हाला समजेल आणि उमजेल असं काहीतरी करूया. सर्वप्रथम तुमचा बंद पडलेला फोन चालू करा."

मैथिली तिचा फोन चालू करते, मग केतन तिला सांगतो," माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला दोन जवळच्या मैत्रिणी आहेत, एक म्हणजे गौरी आणि दुसरी डॉ पुजा बरोबर ना?"

मैथिली प्रश्नार्थक चेहऱ्याने केतनकडे बघत म्हणाली," बरोबर पण त्यांचा इथे काय संबंध?"

केतन म्हणाला," प्लिज जास्त प्रश्न विचारू नका,मी सांगतो तेवढं करा.गौरीला व डॉ पुजाला कॉन्फरन्स मध्ये कॉल करा आणि फोन स्पीकरला टाका.केतनने सांगितल्याप्रमाणे मैथिलीने गौरीला व डॉ पुजा ला फोन लावला.

गौरीने फोन उचलल्यावर मैथिलीचे काही न ऐकता बोलायला सुरुवात केली," मैथिली कुठे गायब आहेस? तुझा फोन बंद का होता? तु वेडी आहेस का? मी किती टेन्शन मध्ये होते, तुला मॅसेज ही केलेत पण एकाही मॅसेजला उत्तर आले नाही." गौरीचे बोलणे पूर्ण होईपर्यंत डॉ पुजानेही फोन उचलला होता. मैथिली काही बोलणार इतक्यात केतनने बोलायला सुरुवात केली," गौरी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला नंतर भेटतील. मी डॉ केतन मैथिलीकडून माझ्याबद्दल तुम्हाला थोडी फार माहिती मिळाली असेलच. डॉ पुजा म्हणजे मैथिलीची ह्या हॉस्पिटल मधील मैत्रीण आपल्या सोबत कॉन्फरन्स मध्ये आहे.तुम्ही दोघीही मैथिलीच्या चांगल्या व जवळच्या मैत्रिणी असल्याने मी तुम्हाला कॉल केला आहे, यावेळी इथे माझ्यासोबत मैथिली आहे पण आता सध्या त्या काहीच बोलणार नाहीयेत आणि शक्य झाल्यास तुम्ही दोघीही जास्त प्रश्न विचारू नका, मी जेवढे विचारेल तेवढ्या प्रश्नांची उत्तरे द्या. तुमच्या मैत्रिणीला तुमची गरज आहे सो थोडावेळ तिच्यासाठी द्या."

गौरी म्हणाली,"ठीक आहे मी तुम्हाला ओळखते, जे प्रश्न विचारायचे असतील ते विचारा."

डॉ पुजाचे म्हणाली," डॉ केतन मी पण तयार आहे"

केतन म्हणाला," थँक्स लेडीज, तुम्ही माझ्या प्रश्नांनी गोंधळून जाल याची मला कल्पना आहे. आजवरच्या आयुष्यात तुमच्या दोघींचीही कधी एखाद्या मुलाने छेड काढली आहे का? किंवा तुमच्या मर्जी विरोधात गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे का? आणि तुम्ही त्याला चोख उत्तर दिले आहे का? आणि ते कसे? हे जरा उलगडून सांगाल का?"

गौरी म्हणाली," डॉ पुजा पहिले मी सांगते मग तुम्ही बोला.प्रश्न खरंच गोंधळून टाकणारा आहे. केतन सर अशी कुठलीच मुलगी नसेल की जिच्या आयुष्यात हा क्षण आला नसेल एवढंच आहे की प्रत्येकाची वेळ व वय वेगळे असेल पण हे सगळ्याच मुलींच्या बाबतीत घडतं. शाळेत, कॉलेजमध्ये, कामाच्या ठिकाणी कुठेही घडू शकतं. अगदी कालचीच गोष्ट आहे, मी बसमध्ये प्रवास करत असताना बघितलं की एक माणूस एका बाईला नको त्या ठिकाणी स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता, त्या बाईने बघितलं बघितलं आणि ताडकन त्या माणसाच्या थोबाडीत ठेऊन दिली.मी मुद्दा सोडून बोलत नाहीये, असंच आठवलं म्हणून सांगितलं, मैथिलीला माहीतच आहे की मला लांबलचक प्रस्तावना देण्याची सवय आहे. माझ्या बाबतीत सर्वात जास्त आठवणारा व भयंकर गोष्ट म्हणजे थोडी वैयक्तिक आहे पण मैथिलीसाठी सांगावं लागेल.मी बारावीत होते तेव्हाची ही गोष्ट, माझ्या दादाचा जवळचा मित्र उमेश नाव होतं त्याचं, तो आमच्या पुढच्या कॉलनीत रहायचा, माझ्यात व त्याच्यात दोन वर्षांचे अंतर असेल, तो दादा सोबत आमच्या घरी नेहमी यायचा, त्याची नजर वेगळीच होती, तो माझ्याकडे नेहमीच टक लावून बघायचा, मी त्याकडे नेहमी दुर्लक्ष करायचे, क्लास ला जाण्यासाठी मला त्याच्या घरासमोरून जावे लागायचे. माझ्या क्लासच्या वेळेला बरोबर तो घरासमोर खाली येऊन उभा रहायचा, त्याने स्माईल दिल्यावर मीही दादाचा मित्र म्हणून त्याला स्माईल द्यायची. एकदा दोनदा त्याने मला चॉकलेट दिले.माझ्या मनात काही नसल्यामुळे मी ते घेतलेही.एके दिवशी क्लास ला जाताना माझी मैत्रीण न आल्याने मी एकटीच होते, त्याने ते बघितले असल्याने क्लास वरून परतत असताना वाटेत त्याने मला गाठले व माझ्याशी इकडच्या तिकडच्या गप्पा चालू केल्या आणि मला म्हणाला की 'तु मला खूप आवडतेस, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे' यावर मी त्याच्याकडे रागाने बघितले व म्हणाले की 'मी तुला दादा मानते आणि ही वेळ शिक्षण घेण्याची आहे, असली थेरं करण्याची नाही सो तु हे थांबव नाहीतर मी तुझी तक्रार घरी करेल' एवढं बोलून मी घरी निघून गेले. त्या दिवसापासून तो घरी आला तरी मी त्याच्यासोबत बोलत नसायचे किंवा त्याच्याकडे बघतही नव्हते. काही दिवसांनी माझ्या घरी सत्यनारायण पुजा होती, उमेशला व त्याच्या घरच्यांनाही आमंत्रण दिले होते.घर पाहुण्यांनी भरलेले होते, मी काहीतरी सामान आणण्यासाठी टेरेस वर गेले होते, नेमकी तीच वेळ उमेशने गाठली व तो माझ्यामागे टेरेसवर आला व मला मागून येऊन मिठी मारण्याचा प्रयत्न करू लागला व अंगाला इकडे तिकडे स्पर्श करू लागला, मी कसेबसे स्वतःला त्याच्या तावडीतून सोडावले व खाली जाऊन सर्वांसमोर आई बाबांना उमेशच्या कृत्याबद्दल सांगितले, त्याची आई म्हणे तो असा काही करूच शकत नाही.माझ्या बाबांनी मला त्यावेळी सांगितले की उमेशच्या कानाखाली मार व आपला सगळा राग काढुन टाक. माझ्यात एवढी हिम्मत कुठून आली काय माहीत पण मी सर्वांसमोर त्याच्या कानाखाली मारली तेव्हा कुठे जाऊन माझा जीव शांत झाला."

केतन म्हणाला," गौरी तुम्ही तर फारच धैर्यवान आहात"

डॉ पुजा म्हणाली," वेरी गुड गौरी, माझ्या बाबतीत असं मी मेडिकल कॉलेजमध्ये असताना घडलं.आमचे एक सर होते ते मला म्हणाले होते की 'मला को ऑपरेट कर, मी तुला ओरलला सर्वांत जास्त मार्क्स देईल', मी त्यांना नकार दिला असता ते म्हणाले की मी बघतो तु कशी पास होते ते. मी खूप अभ्यास केला, त्यांनी कमी मार्क्स दिले होते तरी मी लेखी परीक्षेत जास्त मार्क्स मिळाल्याने पास झाले. रिझल्ट आल्यानंतर मी स्टाफरूम मध्ये गेले त्यावेळी तिथे सर्व शिक्षकांची प्रिन्सिपल सरांसोबत मिटिंग चालू होती त्यावेळी मला सरांनी लिहिलेले पत्र सर्वांसमोर मी प्रिन्सिपल सरांना दिले व मनात जेवढे साचलेले होते ते भडाभडा सर्वांसमोर बोलून दाखवले. कॉलेजचा शेवटचा दिवस असल्याने मी ते सर्व करू शकले, पुढे त्यांचे काय झाले? काही कल्पना नाही."

केतन म्हणाला," तुमची मैत्रीण मैथिलीच्या बाबतीतही असंच काहीतरी घडलं आहे आणि त्याचा प्रतिकार कसा करावा हे त्यांना कळत नाहीये किंवा अस म्हणू शकतो की त्यांच्यात एवढी हिम्मत नाहीये."

मैथिली म्हणाली," आतापर्यंत काय आणि कसं करायचं हे कळत नव्हतं पण आता माझ्यात हिम्मतही आलीय व काय करायचे हेही ठरलंय. तुमच्या दोघींशी मी नंतर बोलते"

मैथिलीने फोन बंद केला व ती केतनला म्हणाली," सर उद्या डॉ पंकजच्या कुकर्मांचा पाढा मी सर्वांसमोर वाचणार आहे व त्यांना त्याची शिक्षा देणार आहे."

केतन म्हणाला," ये हुई ना बात, पण सर्वांसमोर म्हणजे कुणासमोर? मला समजलं नाही."

मैथिली म्हणाली," सर उद्या हॉस्पिटलमध्ये कामाचा आढावा घेण्यासाठी मिटिंग आहे ना, त्यावेळी सर्व डॉक्टर जमतील आणि त्याचवेळी मी डॉ पंकजचे खरे रूप मी सर्वांसमोर आणणार आहे.यात मला थोडी तुमची मदत हवी आहे."

केतन म्हणाला,"अरे हो मिटिंग बद्दल माझ्या लक्षातच राहिलं नाही.तुम्हाला जी मदत पाहिजे ती मी करायला तयार आहे"

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all