एक आगळेवेगळे लग्न भाग २०

Maithili speaks with ketan about Dr Pankaj's behaviour

मागील भागाचा सारांश:निलिमा ताईंना मैथिलीचा फोन न आल्याने त्यांना तिची काळजी वाटू लागली होती, म्हणून त्यांनी केतनला हॉस्पिटलमध्ये गेल्यावर मैथिलीची चौकशी करायला सांगितली. हॉस्पिटलमध्ये जाऊन केतनने मैथिलीबद्दल विचारणा केली असता त्याला समजते की मैथिली आजारी असल्याच्या कारणावरून सुट्टीवर आहे तसेच डॉ पुजाकडून केतनला समजते की मैथिलीची मानसिक स्थिती काही ठीक नाहीये. मैथिलीची मानसिक स्थिती व तब्येत बिघडण्यामागील कारण केतनला शोधून काढायचे होते. निलिमा ताई व केतन मैथिलीला भेटायला तिच्या घरी जातात तेव्हा तिच्या आईकडून केतनला समजते की मैथिली कोणाशी काहीच बोलत नाहीये,त्यावेळी केतन मैथिली सोबत बोलायचे ठरवतो.

आता बघूया पुढे...

केतन मैथिलीच्या रूमचा दरवाजा वाजवून विचारतो,"आत येऊ का?"

केतनचा आवाज ऐकून मैथिली आश्चर्याने दरवाजाकडे बघते,दारात केतनला बघून मैथिली आपल्या जागेवरून उठते,आपल्या आजूबाजूचा पसारा नीट करण्याचा प्रयत्न करते.

मैथिलीला गोंधळलेलं बघून केतन म्हणाला, "तुमची रुम आवरून झाली की सांगा,तोवर मी बाहेर हॉल मध्ये बसतो."

मैथिलीला आपली चुक लक्षात आल्यावर ती म्हणाली,"सर आत या ना, तुम्ही इथे कसे काय?"

मैथिलीने केतनला बसायला खुर्ची दिली व स्वतः बेडवर बसली. 

केतन म्हणाला,"मी काल कॅम्पवरून परतलो तेव्हा आई म्हणाली की दोन दिवसापासून तुमचा फोन आला नाही. आज हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तुम्ही आजारी असल्याचे कळले, फोन करून तुमची चौकशी करावी म्हटलं तर फोन बंद मग काय शेवटी घरी यावं लागलं."

मैथिली म्हणाली," निलिमा काकू पण आल्या आहेत का?"

केतन म्हणाला," हो बाहेर हॉल मध्ये बसली आहे. तुम्हाला काय झालंय?"

मैथिली म्हणाली," हॉस्पिटलमध्ये मी चक्कर येऊन पडले होते,थोडा ताप व अशक्तपणा होता"

केतन म्हणाला," मग फोन बंद करण्याएवढे काय झाले?"

मैथिली म्हणाली," रुटीन लाईफचा कंटाळा आला होता, सर्वांपासून आराम मिळावा म्हणून फोन बंद ठेवला, मला थोडे दिवस कोणाशी काहीच बोलायची इच्छा नाहीये."

केतन हसून म्हणाला," डॉ मैथिली कदाचित तुम्हाला माझ्या बोलण्याचा राग येईल पण जरा स्पष्टच बोलतो.माझ्या चेहऱ्यावर 'मी मूर्ख आहे' असं कुठे लिहिलेलं आहे का? जरा समोरच्याला पटेल अशी तरी कारणे द्या,उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलू नका. तुमच्या काळजीने तिथे तुमच्या आईच्या डोळ्यात पाणी आलंय, काकूंच्या चेहऱ्यावरुन जाणवतंय की त्या किती टेन्शन मध्ये असतील आणि इथे तुम्ही" केतन बोलता बोलता मधेच थांबला.

मैथिली पुढे म्हणाली," सर पण मी आईला सांगितलं होतं की मला शांतता व आरामाची गरज आहे,माझी काळजी करण्याची गरज नाही."

केतन मिश्किल हसून म्हणाला," तुमचं बोलणं त्यांना किंवा मला पटलं असेल का? भारती काकू तुमच्या आई आहेत आणि for your kind information आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या चेहऱ्यावरची एक रेष जरी हलली ना तरी ते आईच्या लक्षात येते. मी तुम्हाला अगदी गेल्या काहीच दिवसापासून ओळ्खतोय तरी तुम्ही खोटं बोलताय हे ठामपणे सांगू शकतो कारण आज तुम्ही माझ्याशी बोलताना एकदाही नजरेला नजर देऊन बोलला नाहीत. नजर चोरून बोलण्याऐवढं काय झालंय? तुमच्याकडून काही चुक झालीय का? प्लिज काहीतरी बोला."

केतन जरा रागातच बोलला, मैथिलीच्या डोळ्यात पाणी आले, तिच्या डोळ्यातील पाणी बघून केतन म्हणाला," सॉरी मी जरा रागातच बोललो, मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. मला मान्य आहे की आपल्या आयुष्यात अश्या अनेक गोष्टी घडतात ज्या आपण आपल्या आई वडिलांशी बोलू शकत नाही. जर अस काही असेल तर माझ्याशी बोलूच शकता ना? आणि जर तुम्हाला माझ्याशी नसेल बोलायचं तर पुजा मॅडम सोबत बोला, मी त्यांना इथे बोलवू का?"

मैथिलीला तिचे अश्रू अनावर झाले होते, ती डोळ्यातील पाणी पुसत होती पण अश्रूच्या धारा चालूच होत्या, मैथिली स्वतःचे अश्रू रोखण्याचा प्रयत्न करत होती पण एवढ्या दिवसापासून दाबून ठेवलेले अश्रू आज बाहेर आले होते.

केतनला पुढे काय बोलावे काहीच कळत नव्हते, थोड्यावेळ तो काहीच बोलला नाही, थोडा विचार करून तो म्हणाला," डॉ मैथिली तुमच्या या अवस्थेला डॉ पंकज तर जबाबदार नाही ना?"

केतन मैथिलीकडे काहितरी उत्तर भेटेल या आशेने बघत होता, डॉ पंकजचे नाव ऐकल्यावर मैथिलीने चेहरा दुसरीकडे फिरवला. केतन पुढे म्हणाला,"तुम्ही काहीतरी बोला, कदाचित मी तुमची काही मदत करू शकेल,अश्या शांत बसू नका,याने काहीच होणार नाही.तुमच्या अश्या वागण्याने तुम्ही स्वतःला व तुमच्या भोवतालच्या लोकांना त्रास करून घेत आहात.please speak up dr maithili"

मैथिली रडवेल्या आवाजात म्हणाली," सर काय काय सांगू? आणि कसं सांगू? जे काही घडलं आहे ते कधी घडेल याची मी कल्पना सुद्धा केली नव्हती, जे काही घडलं आहे ते मला तोंडाने सांगायला सुद्धा लाज वाटत आहे."

केतन शांतपणे म्हणाला," हे बघा डॉ मैथिली आयुष्य हे असंच आहे, इथे आपल्याला हवं तसं घडेलच याची आपण अपेक्षाही करू शकत नाही.आपलं फक्त एकच काम असतं, जे पुढे येईल त्याला सामोरे जायचे.आपल्याला पाहिजे तसं घडलं असतं तर आज माझे बाबा माझ्यासोबत असते,मी एअर फोर्स मध्ये असतो. तुम्ही काही सांगितलंच नाहीतर तुमच्या बरोबर काय घडले आहे हे मला कसे कळेल? एक मिनिटं डॉ पंकजने तुमच्या सोबत काही चुकीच तर नाही केलं ना? तुम्ही त्याच्यासोबत कुठे बाहेर गेल्या होत्या का?" केतन खूप घाबरला होता.

मैथिली म्हणाली," सर एखाद्या मुलीच्या मनाविरुद्ध तिला स्पर्श करणे चुकीचे आहे ना? गुरुदक्षिणेच्या नावाखाली तिच्या कडून शरीर सुखाची मागणी करणे हे चूकच आहे ना? वरून आपल्या फिल्डमध्ये या गोष्टी सर्रास चालतात अस म्हणून आपण जे करतोय ते कसं योग्य आहे हे दाखवून देणे म्हणजे यावर काय बोलायचे?"

केतन म्हणाला," exact काय घडलंय? ते मला कळेल का?"

मैथिलीने रडत रडत डॉ पंकज काय काय बोलला हे केतनला सांगितले. सर्व ऐकल्यावर केतनचे डोळे रागाने लालबुंद झाले होते, तो मनातल्या मनात डॉ पंकजला शिव्या घालत होता. राग शांत व्हावा म्हणून केतनने रूममध्ये दोन तीन फेऱ्या मारल्या.मग काहीतरी विचार करून केतन म्हणाला," एवढं सगळं घडून गेलं, तरी तुम्हाला मला काहीच सांगावं वाटलं नाही, या सगळ्यात तुमची चुक आहे का? नाही ना मग तुम्ही स्वतःला त्रास का करून घेत आहात? तुम्ही डॉ पंकजला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा द्यायला हवी होती.तुमच्या सारख्या मुलीकडून ही अपेक्षा नव्हती."

मैथिली म्हणाली," सर मी काय करायला हवं होतं, पंकज सर धमकी दिल्यासारखे बोलत होते, मला असा अनुभव पहिल्यांदाच आला आहे, मला काय करावे काहीच सुचले नाही. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर पंकज सर पुन्हा काही करतील का? या भीतीने मी सुट्टी घेतली. मी जगाकडे माझ्या नजरेने बघत होते,जग एवढही वाईट असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. आईला काही सांगितलं असतं तर तिला खूप त्रास झाला असता, तिचे टेन्शन अजून वाढले असते."

केतन म्हणाला," असा अनुभव तुम्हाला पहिल्यांदा आला असेल हे मान्य पण आयुष्यात कुठलीही गोष्ट कधीतरी पहिल्यांदा होतेच ना, तुम्हाला त्यावेळी काय करावे हे सुचले नसेल पण त्या भीतीने घरात बसणे हे योग्य आहे का? डॉ पंकज सारखे असे अनेक लोक आहेत जे तुम्हाला घाबरवू पाहत आहे आणि तुम्ही घाबरून ते जिंकले असंच त्यांना दाखवून देत आहात ना? तुमच्या सारखी सुशिक्षित स्त्री जर पुरुषाच्या अत्याचाराला उत्तर देत नसेल तर अशिक्षित स्त्री कडून आपण काय अपेक्षा करायची?"

मैथिली म्हणाली," सर मला तुमचं म्हणणं पटतंय आणि कळतंय सुद्धा, पण मी काय आणि कसं करू हेच कळत नाहीये."

केतन म्हणाला," ठीक आहे, त्यासाठी माझ्याकडे एक प्लॅन आहे."

केतनकडे काय प्लॅन असेल हे बघूया पुढील भागात....

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all