एक आगळेवेगळे लग्न भाग १

Story of different marriage, in this part there is introduction of hero of story

माझ्या आजवरच्या कथांना जसा भरघोस प्रतिसाद दिलात तसाच प्रतिसाद याही कथेला तुम्हा सर्वांकडून मिळेल अशी आशा मी व्यक्त करते.

आपल्या कथेचा नायक आहे केतन. केतनचे वडील आर्मी मध्ये कार्यरत होते. केतनच्या वडिलांची जिथे बदली व्हायची तिथे केतनचे वडील केतनला व त्याच्या आईला सोबत घेऊन जायचे. केतनच्या बाबांच्या सतत होणाऱ्या बदलीमुळे केतन आणि त्याच्या आईने जवळजवळ पूर्ण भारत देश फिरले होते. केतनचे शालेय शिक्षण आर्मी शाळेत झाले. केतन हा त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याने तो आई बाबांचा खूप लाडका होता. केतन आर्मीच्या वातावरणात वाढल्याने लहानपणापासूनच कडक शिस्त पाळण्याची त्याला सवय लागली होती.

सकाळी लवकर उठणे, उठल्यावर व्यायाम, योगासने करणे या सवयी त्याच्या अंगवळणी पडल्या होत्या.केतनला या सवयी लागण्यामागे त्याच्या बाबांचा मोठा हात होता. केतनचे बाबा प्रेमळ होतेच पण थोडे गरम डोक्याचेही होते. केतनला माहीत होते की बाबा जेवढे लाड करतात तेवढे चुकल्यावर शिक्षाही करू शकतात. लहान असल्यापासून केतनचे एअर फोर्स मध्ये जाण्याचे स्वप्न होते. केतन व त्याच्या बाबांमध्ये मैत्रीपूर्वक नाते होते. केतनचे बाबा ज्यावेळी युद्धावर जायचे त्यावेळी केतनला सांगून जायचे की "केतन बाळा मी जर या युद्धातून परत आलो नाही तर आईची काळजी घे, मी गेल्यानंतर आई खूप एकटी पडेल तिला सावर, आईच्या मनाविरुद्ध कोणतीही गोष्ट करू नको, तिचा आधार बनून रहा. माझी मान शरमेने खाली जाईल अस आयुष्यात कधी काहीच करू नकोस. मी तुझ्यासोबत शरीराने नसलो तरी मनाने कायम तुझ्या सोबतच असेल. खूप शिक, मोठा हो. आपण ज्या समाजात राहतो, वाढतो, त्या समाजासाठी आपले काही तरी देणे लागते ही गोष्ट लक्षात ठेवून पुढे जा. तु कितीही मोठा झालास तरी कायम जमिनीवरच रहा.

प्रत्येक वेळी बाबा युद्धावर जाताना हेच बोलून जातात म्हणून केतन बाबांचे बोलणं जास्त मनावर घ्यायचा नाही कारण त्याला माहीत असायचं की काही दिवसांनी युद्ध संपले की बाबा परत येणारच आहे. केतन इयत्ता सातवीत असताना केतनचे बाबा युद्धावर चालले होते, जाताना ते केतनजवळ आले व त्यांनी दरवेळेस जसे बोलतात तसे बोलायला सुरुवात केली तसे केतनने त्यांना मधेच अडवले व तो बोलू लागला, " बाबा मला माहित आहे की तुम्ही काय सांगणार आहात, दरवेळेस तुम्ही हे सर्व सांगून जातात ते माझ्या लक्षात आहे. बाबा तुम्ही जर परत आला नाहीत तर मी खूप शिकून मोठा होईल, आईला सांभाळेल, तिला कधीही अंतर देणार नाही. बाबा मी तुम्हाला वचन देतो की मी तुमचे नाव खराब होईल असे काहीही कृत्य करणार नाही. आपल्या लोकांना समाजाला कायम धरून राहील. समाजासाठी काहीतरी करत राहील."

केतनच्या बाबांचे डोळे भरून आले, त्यांनी केतनला मिठी मारली. केतन बाबांच्या पाया पडून त्याने आशिर्वाद घेतले. केतनची आई बाजूलाच उभी होती तिच्याकडे बघून केतनचे बाबा म्हणाले, " निलिमा आपला केतन आज खऱ्या अर्थाने मोठा झाला आहे असे म्हणावे लागेल. मी जर युद्धातून परत आलो नाहीतर माझ्या केतनला आई व बाबा दोघांचे प्रेम देण्याची जबाबदारी तुझी राहील"

एवढे बोलून बाबा निघून गेले. केतनने आईच्या डोळ्यातील पाणी बघितले, तो आईजवळ गेला, आईच्या डोळ्यातील पाणी पुसले व बोलू लागला " आई तु रडू नकोस, युद्ध संपल्यावर बाबा काही दिवसांतच परत येतील, तु काळजी करू नकोस"

छोट्याशा केतनने आईला समजावले पण त्याच मन त्याला काहीतरी वेगळंच सांगत होते. केतन देवाजवळ गेला त्याने देवासमोरील दिवा लावला आणि हात जोडून उभा राहिला व मनातल्या मनात म्हणाला, " हे देवा मी आजपर्यंत बघत आलो आहे की बाबा नेहमीच युद्धावर जातात आणि युद्ध संपल्यावर सुखरूप घरी परततात पण यावेळी बाबा गेल्यापासून मनाला हुरहूर लागली आहे हे मी आईलाही सांगू शकत नाही, तिला जर मी काही सांगितले तर आई टेन्शन घेऊन बसेल, देवा यावेळीही माझ्या बाबांना सुखरूप घरी परत आण"

युद्ध चालू होऊन बरेच दिवस झाले पण यावेळी युद्ध संपायचे काही नाव घेईना, बरेच सैनिक शहीद होत होते. एक दिवस केतन घराच्या बाहेर सायकल खेळत होता, एक सुभेदार केतनच्या घराच्या दिशेने जीप घेऊन आले व त्यांनी केतनला विचारले, " केतन आई कुठे आहे? आईला बोलावतो का?"

केतनने उत्तर दिले, "काका आई घरात आहे, मी बोलावतो पण काय झाले?"

सुभेदार बोलले "तु आधी आईला बोलावं"

केतनने आईला आवाज दिला, आई बाहेर आली.

आईने सुभेदाराला पाहिले तिने काळजीने विचारले, " सुभेदार साहेब काय झाले? काही काम आहे का?"

सुभेदार बोलू लागले "निलिमा ताई एक वाईट बातमी आहे, शत्रूसोबत झालेल्या गोळीबारात निकम साहेबांना गोळी लागली आहे, त्यांना आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मी तुम्हाला तिकडे नेण्यासाठी आलो आहे. आपल्याला हॉस्पिटलमध्ये त्वरीत जावे लागेल"

केतनच्या आईच्या डोळ्यात पाणी आले ती भरलेल्या आवाजात बोलू लागली, " सुभेदार साहेब केतनचे बाबा ठीक आहेत ना? त्यांना काही झाले नाही ना?"

सुभेदार केतनच्या आईला धीर देत बोलले, " ताई साहेबांना फक्त गोळी लागली आहे एवढेच मला समजले आहे, त्यांची सत्य परिस्थिती आपल्याला हॉस्पिटलमध्ये गेल्याशिवाय कळणार नाही."

केतनची आई व केतन सुभेदार सोबत जीप मध्ये बसले आणि जीप हॉस्पिटलच्या दिशेने निघाली. वाटेत केतनची आई देवाला नवस करत होती. केतन बाबांना गोळी लागल्याची बातमी ऐकून सुन्न झाला होता, त्याला काय बोलावे काय करावे हेच कळत नव्हते. हॉस्पिटल जवळ जीप येऊन थांबल्यावर केतन व त्याची आई पळतच हॉस्पिटलमध्ये घुसले, तिथे गेल्यावर त्यांना समजले की केतनच्या बाबांचे ऑपरेशन सुरू आहे. केतनच्या बाबांना पायाला एक गोळी लागली होती तर एक गोळी डोक्यातून आरपार गेली होती. केतनची आई सारखी देवाचा धावा करत होती.सुभेदार केतनला व केतनच्या आईला धीर द्यायचे काम करत होते. थोड्याच वेळात डॉक्टर ऑपरेशन संपवून बाहेर आले. डॉक्टरांनी केतनच्या आईला केबिनमध्ये बोलावून घेतले. केतनची आई नाही म्हणत असताना केतन आईसोबत डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेला.

केतनच्या आईने पूर्ण धीर एकवटून डॉक्टरांना विचारले, " डॉक्टर साहेब हे कसे आहेत? हे शुद्दीवर कधी येतील?"

डॉक्टर म्हणाले, " मॅडम तुम्ही खुर्चीत बसा आणि मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका ( केतन व त्याची आई खुर्चीत बसतात मग डॉक्टर पुढे बोलायला सुरुवात करतात) मॅडम सरांना दोन गोळ्या लागल्या होत्या, एक पायात तर एक डोक्यातून आरपार गेली होती, रक्तस्राव खूप झाला होता, आम्ही दोन्ही गोळ्या ऑपरेशन करून काढल्या आहेत. येत्या चोवीस तासात सर शुद्दीवर यायला हवेत, आमचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत"

केतनच्या डॉक्टरांना पुढील प्रश्न विचारला, " डॉक्टर जर हे चोवीस तासात शुद्दीवर नाही आले तर...."

डॉक्टरांनी उत्तर दिले, " तर मग साहेब कोमात जाऊ शकतात आणि कोमातून कधी बाहेर येतील हे त्या वरच्यालाच माहीत"

केतन व आई डॉक्टरांच्या केबिन मधून बाहेर पडतात ते हॉस्पिटलमध्ये गणपतीची मूर्ती ठेवलेली असते तिकडे जातात. केतन व त्याची आई दोघेही देवाकडे प्रार्थना करतात, हे देवा तु विघ्नहर्ता आहेस, तु सर्वांच्या दुःखाचे हरण करतोस, आमच्या वाट्याला हे दुःख देऊ नकोस, त्याचे हरण कर.

चोवीस तासात केतनचे बाबा शुद्धीत येतात की नाही हे बघूया पुढील भागात.

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all