एक आगळेवेगळे लग्न भाग १७

Discussion between maithili and Dr pankaj

(मला कल्पना आहे की हा भाग पोस्ट करायला बराच उशीर झाला आहे,पण आयुष्यात बऱ्याचदा अनपेक्षित घटना घडत असतात त्यातून सावरायला वेळ लागतो माझ्याही आयुष्यात काही दिवसांपासून असच काही तरी घडत आहे त्यामुळे मला हा भाग पोस्ट करायला उशीर झाला, पुढील भाग वेळेत पोस्ट होईल याची मी काळजी घेईल) 

मागील भागाचा सारांश: मैथिलीने केतनला दिलेल्या पथनाट्याच्या कल्पनेमुळे केतनला गावातील लोकांची मने मेडिकल ट्रीटमेंट कडे वळवण्यात यश आले होते. मैथिलीचा डॉ पंकज ला असिस्ट करण्याच्या पहिल्याच दिवशी डॉ पंकज कडून तिला ओरडा खावा लागला, म्हणून मैथिलीला खूप वाईट वाटले होते. अशातच केतनचा मैथिलीला फोन येतो, केतनने बऱ्याचदा विचारणा केल्यामुळे मैथिलीने केतनला काय घडले आहे ते सांगितले. केतनने मैथिलीला डॉ पंकजचा स्वभाव कसा आहे? व त्यांच्यासोबत कसे वागायचे हे सांगितले.

आता बघूया पुढे...

केतनसोबत फोनवर बोलणे झाल्यावर मैथिलीने ठरवले की डॉ पंकज पासून दोन हात दूर रहायचे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपले काम करायचे. दुसऱ्या दिवसापासून मैथिली डॉ पंकजकडे दुर्लक्ष करू लागली, ती त्यांच्याशी कमीत कमी बोलू लागली. डॉ पंकज छोट्या छोट्या गोष्टींवरून तिला ओरडायचे पण मैथिलीने या सर्वाचा विचार करणे सोडून दिले होते.

डॉ पंकजच्या लक्षात आले होते की मैथिली त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. डॉ पंकजला मैथिलीने त्यांच्याकडे केलेले दुर्लक्ष सहन होत नव्हते त्याचे कारण असे होते की आजपर्यंत डिपार्टमेंट मधल्या कोणीही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेले नव्हते. डॉ पंकजला ती कमीपणा दिल्याची जाणीव वाटत होती, या गोष्टीचा उलगडा करण्यासाठी व मैथिलीला स्वतःचे महत्त्व पटवून देण्यासाठी डॉ पंकजने मैथिलीला त्यांच्या केबिन मध्ये बोलावले. डॉ पंकजने केबिन मध्ये बोलावले आहे हे कळाल्यावर मैथिलीला थोडे टेन्शन आले होते. "मे आय कम इन सर" मैथिलीने विचारले

"यस कम इन डॉ मैथिली" डॉ पंकज मैथिली कडे न बघतच बोलला.

मैथिली केबिनमध्ये येऊन पाच मिनिटे झाली होती तरी डॉ पंकजने तिला बसायला सांगितले नव्हते, तो मोबाईल मध्ये डोकं घालून बसला होता. मैथिलीला डॉ पंकजच्या अश्या वागण्याचा राग आला होता, न राहवून तिने डॉ पंकजला विचारले," सर तुमचे माझ्याकडे काही काम होते का? मला का बोलावले?"

डॉ पंकज मैथिली कडे रागाने बघून म्हणाला, "डॉ मैथिली मी जरा महत्त्वाचे काम करत आहे, थोड्या वेळ थांबलात तर काही बिघडणार नाही" 

डॉ पंकजचा बोलण्याचा सूर ऐकून मैथिलीला काही तरी गडबड नक्कीच आहे असे वाटले, थोडावेळ असाच निघून गेला. डॉ पंकजने हातातील मोबाईल बाजूला ठेवला व मैथिलीकडे बघून बोलू लागला," डॉ मैथिली मला अस वाटतंय की तुम्हाला माझ्यासोबत काम करायला आवडत नाही. मी दिलेल्या सूचनांकडे तुम्ही सरळसरळ दुर्लक्ष करत आहात. तुम्ही खूप नशीबवान आहात की तुम्हाला मला असिस्ट करण्याची संधी भेटत आहे. मी सर्जन म्हणून कसा आहे हे तुम्हाला माहीत असेलच तरीही तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करत आहात. माझ्याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला खूप महागात पडू शकेल."

मैथिली पुढे म्हणाली," सर तुम्ही सर्जन म्हणून कसे आहात हे मला चांगलंच माहीत आहे. तुमच्याकडून मला जे शिकायचं आहे ते शिकतेच आहे आणि राहिला प्रश्न तुमच्या सुचनांकडे दुर्लक्ष करण्याचा तर मला ज्या गोष्टी पटत नाहीत मी त्या करत नाही."

डॉ पंकज म्हणाला," तुम्हाला पटण्या न पटण्याचा संबंध येतच नाही. तुम्ही जर माझ्या डिपार्टमेंटला काम करत असाल तर माझ्या सूचना ऐकाव्याच लागतील. तुम्ही नवीन आहात म्हणून तुम्हाला एक संधी देत आहे. माझ्याकडे, माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करु नका. तुम्ही मला ओळखलंच नाहीये."

मैथिली म्हणाली," ठीक आहे सर मी लक्षात ठेवेल." एवढे बोलून ती केबिनच्या बाहेर पडली.

केबिनच्या बाहेर निघाल्यावर मैथिली डॉ पंकजच्या बोलण्यावर विचार करते की, "पंकज सर म्हणाले तसे मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यावर ते खरंच काही करतील का? नेमका त्यांच्या अश्या बोलण्याचा उद्देश काय होता?, याबद्दल केतन सरांशीच बोलावे लागेल, सर आत्ता कामात असतील संध्याकाळी फोन करते" 

डॉ पंकजचा विचार डोक्यातून काढून मैथिली आपल्या कामाला लागली. संध्याकाळी हॉस्पिटल मधून घरी जाण्याच्या वेळी मैथिलीने रोजप्रमाणे केतनच्या आईला म्हणजेच निलिमा ताईंना फोन करून गोळ्यांची व पथ्य पाण्याची आठवण करून दिली. मैथिलीचे बोलणे पूर्ण झाल्यावर निलिमा ताई तिला म्हणाल्या, "मैथिली बाळा अग दिवसभर तु हॉस्पिटलचे काम करून किती दिवस दमत असशील तरीही रोज संध्याकाळी फोन करून मला गोळ्यांची आठवण करून देतेस. तु सांगितल्याप्रमाणे मी माझ्या मोबाईल मध्ये गोळ्यांचे रिमाईंडर लावले आहे, मी जरी कामाच्या गडबडीत गोळ्या घेण्याचे विसरले तरी माझा मोबाईल काही विसरत नाही, रिमाईंडर वाजल्या वाजल्या तुझा चेहरा नजरेसमोर येतो मग काय पटकन आपल्या जागेवरून उठते आणि गोळ्या घेते. तु माझी काळजी करू नकोस."

मैथिली पुढे म्हणाली," काकू तुम्ही माझ्या फोनमुळे बोअर झालेल्या दिसत आहात?"

निलिमा ताई म्हणाल्या," नाही ग, तुला उगीच त्रास कशाला अस वाटतंय, तुझा फोन आला की मला तेवढंच बरं वाटतं."

मैथिली म्हणाली," काकू एका पाच मिनिटांच्या फोन मुळे मला काही त्रास होत नाही. केतन सरांनी तुमची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. मला आवडत माझ्या पेशंटची उलट तपासणी करायला. चला काकू आता फोन ठेवते, उद्या फोन करते."

निलिमा ताईंसोबत बोलून झाल्यावर मैथिलीने केतनला फोन करून दिवसभरात घडलेली सर्व हकीकत सांगितली, यावर केतनने मैथिलीला एकच सल्ला दिला," डॉ पंकजच्या बोलण्याचा एवढा विचार करू नका, त्यांना अस भासवा की तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत नाहीये, त्यांचे बोलणे तुम्ही मनावर घेतले आहे असं दाखवा. शेवटच आणि महत्त्वाचं सांगतो डॉ पंकज पासून दोन हात लांब रहा, तो माणूस चांगला नाहीये"

एवढं बोलून केतनने फोन बंद केला. केतनसोबत बोलल्यावर मैथिलीच्या डोक्यात हा विचार आला की," केतन सरांच्या शेवटच्या वाक्याचा अर्थ काय असेल? डॉ पंकज पासून दोन हात लांब रहायचे म्हणजे काय? काहीच कळत नाहीये"

दुसऱ्या दिवसापासून मैथिलीने डॉ पंकजला असे भासवले ती त्यांच्या सर्व सूचनांचे कडेकोट पालन करत आहे, ती डॉ पंकजच्या बोलण्याकडे मनातून दुर्लक्ष करायची पण दाखवताना असे दाखवायची की ती त्यांचे बोलणे मनापासून ऐकत आहे. सर्व काही सुरळीत चालू होते. मैथिली आपल्या कडे दुर्लक्ष करत नाहीये हे बघून डॉ पंकजला असुरी आनंद झाला होता, त्या आनंदाच्या भरात डॉ पंकजने मैथिलीला आपल्या केबिन मध्ये बोलावून घेतले. मैथिली केबिनमध्ये आल्यावर डॉ पंकजने तिला समोरच्या खुर्चीत बसायला सांगितले व त्याने बोलायला सुरुवात केली," डॉ मैथिली तुम्ही काम खरंच खूप छान व प्रामाणिकपणे करत आहात, कमी काळातच तुम्ही खूप काही शिकला आहात, तुमचे कौतुक करावे तितके थोडेच आहे पण आता वेळ आली आहे मला गुरुदक्षिणा देण्याची."

मैथिलीला डॉ पंकजच्या बोलण्याचा अर्थ काही उमगला नसल्याने ती म्हणाली," गुरुदक्षिणा? सर मी तुम्हाला काय देऊ शकते?"

डॉ पंकज म्हणाले," डॉ मैथिली तुमच्याकडे जे आहे आणि ते तुम्ही मला देऊ शकता तेच मागत आहे"

मैथिली गोंधळून म्हणाली," सर मला समजलं नाही, माझ्याकडे अस काय आहे की मी ते तुम्हाला देऊ शकते"

डॉ पंकज काही बोलणार इतक्यात एक नर्स केबिनमध्ये आली व ती म्हणाली, " सर एक इमर्जन्सी केस आली आहे, तुम्हाला ताबडतोब ऑपरेशन थिएटर मध्ये बोलावले आहे."

डॉ पंकज म्हणाले, " ठीक आहे तु जाऊन ऑपरेशनची तयारी कर, मी आलोच."

नर्स केबिन मधून निघून गेल्यावर डॉ पंकज मैथिलीला म्हणाला," डॉ मैथिली आपण उर्वरित बोलणं नंतर करू, मी माझी गुरुदक्षिणा तर तुमच्या कडून घेणारच."

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all