एक आगळेवेगळे लग्न भाग १५

Discussion between maithili and radhika about saurabh

मागील भागाचा सारांश: निलिमा ताईंचे सोनोग्राफीचे रिपोर्ट्स येतात त्यात त्यांच्या गर्भाशयात fibroids डिटेक्ट होतात. मैथिली, केतन व डॉ पुजामध्ये या विषयावर सविस्तर चर्चा होते. मैथिली निलिमा ताईंच्या घरी जाऊन त्यांना त्यांच्या रिपोर्ट्स बद्दल आणि त्यावर करण्यात येणाऱ्या उपचारांबद्दल सविस्तर माहिती देते.

आता बघूया पुढे...

मैथिली व केतनमध्ये निलिमा ताईंवरून नेहमीच चर्चा होऊ लागली त्यामुळे त्यांच्यातील संवाद वाढीस लागला. निलिमा ताई व मैथिली मध्ये नेहमीच फोनवर बोलणे होऊ लागले. मैथिलीचे निलिमा ताईंच्या घरी वारंवार येणेजाणे होऊ लागले,परिणामी केतन व मैथिलीची भेट हॉस्पिटल सोबत घरीही होऊ लागली होती.

बोलता बोलता मैथिलीला हॉस्पिटलमध्ये जॉईन होऊन सहा महिने पूर्ण झाले होते. हॉस्पिटलच्या नियमानुसार दर सहा महिन्यांनी मैथिली सारख्या ज्युनिअर डॉक्टर्सची पोस्टिंग दुसऱ्या डिपार्टमेंटला होत असे. मैथिलीला आता डॉ पुजाला सोडून दुसऱ्या डॉक्टरला असिस्ट करावे लागणार होते. डॉ पुजा सोबत काम करण्याचा शेवटचा दिवस असल्याने मैथिलीला वाईट वाटत होते, ती नाराज होऊन डॉ पुजा समोर बसली होती. डॉ पुजा तिला बोलत करण्यासाठी म्हणाली," मैथिली मॅडम आज अशा तोंड पाडून का बसला आहात? डॉ केतनसोबत भांडण झालं की काय?"

मैथिली म्हणाली," पुजा मॅडम माझा तोंड पाडून बसण्याचा आणि डॉ केतनचा काय संबंध?"

पुजा मैथिलीला चिडवण्यासाठी म्हणाली, "डॉ केतनचा संबंध नाही असं कसं, अग दिवसातून किती वेळेस त्यांच नाव जपत असतेस आणि म्हणते काय संबंध?"

मैथिली म्हणाली," मॅडम प्लिज केतन सरांवरून मला चिडवणे बंद करा. तसाही माझा काही मूड नाहीये."

डॉ पुजा म्हणाली," आज मूड नसायला काय झालंय?"

मैथिली चेहरा पाडून म्हणाली," माझी उद्यापासून पोस्टिंग चेंज होणार आहे, शिफ्ट पण बदलणार आहे. आता आपली भेट होणार नाही. मला तुमच्याशी सर्व काही शेअर करण्याची सवय लागली होती."

डॉ पुजा हसून म्हणाली," मैथिली हॉस्पिटलमध्ये आपली भेट होणार नाही पण आपण बाहेर भेटूच शकतो ना, एवढंच आहे रोज आपली भेट होणे अशक्य आहे पण आठवड्यातील एक दिवस आपण नक्कीच भेटू शकतो. तुझी फक्त पोस्टिंग बदलणार आहे, आपली मैत्री तुटणार नाही."

मैथिली पुढे म्हणाली," आपली मैत्री कधीच तुटणार नाही ह्याची मला खात्री आहे कारण मी तुम्हाला विसरेन हे अशक्य आहे आणि तुम्ही मला विसराल हे मी होऊ देणार नाही"

पुजा म्हणाली," हे हुई ना बात, मैथिली पोस्टिंग बदलल्यामुळे तुला अजून नवीन काही शिकता येईल आणि ते तुझ्यासाठी गरजेचे आहे. कोणाच्या अंडर तुझी पोस्टिंग होत आहे?"

मैथिली म्हणाली," डॉ पंकज जोशी"

पुजा म्हणाली," म्हणजे आता मॅडम मोठमोठ्या सर्जरी शिकणार. डॉ पंकज बेस्ट सर्जन आहेत, त्यांच्याकडून हवं तितकं शिकून घे."

मैथिली म्हणाली, "तुम्हाला माझं एक सिक्रेट सांगते, माझ्या लहानपणापासून पंकज नावाच्या एकाही मुलासोबत आजपर्यंत पटलेले नाही. आजपर्यंत जेवढे पंकज माझ्या आयुष्यात आलेले आहेत त्यांच्याशी माझे काहीना काही खटकलेले आहे"

पुजा हसून म्हणाली," वेडी आहेस तु, काहीतरी गैरसमज करून घेतेस. तुझा हा गैरसमज डॉ पंकज सोबत काम केल्यावर दूर होईल."

मैथिली म्हणाली," होप सो असच व्हावं. तुम्ही घरी जाताना निलिमा काकूंकडे त्यांच्या गोळ्या पोहोच कराल का? आज मला माहीकडे जायचे आहे नाहीतर मीच गेले असते."

पुजा म्हणाली," डॉ केतनकडे गोळ्या दिल्या तरी चालतील ना? आणि माहीकडे काय विशेष?"

मैथिली म्हणाली," केतन सर पुढच्या पंधरा दिवसांसाठी कॅम्पला बाहेरगावी गेले आहेत, जाताना त्यांनी काकूंकडे लक्ष द्यायला सांगून गेले आहे. माही खूप कधीपासून माझी आठवण काढत आहे. राधिका ताई दोन दिवस झाले घरी बोलावतेय पण मला जमतच नाहीये. आज जाऊन येते. राधिका ताईचे नक्कीच काही तरी महत्त्वाचे काम असेल."

पुजा म्हणाली, " माही फोटोवरून खूप गोड मुलगी वाटत आहे. मला एक खरं खरं सांग डॉ केतन आणि तुझ्यात काही चालू नाहीये ना."

मैथिली चिडून म्हणाली, " अरे मॅडम आमच्यात बोलणं जरी होत ते फक्त निलिमा काकूंच्या तब्येतीला घेऊन आणि जास्तीत जास्त हॉस्पिटल बद्दल, पेशंट बद्दल आमच्यात चर्चा होते बाकी आम्ही काहीच बोलत नाही. केतन सर एक व्यक्ती म्हणून नक्कीच चांगले आहेत यात वादच नाही पण आमच्यात त्या पलीकडे काहीच नाहीये आणि समजा जर काही झालं तर पहिले मी तुम्हालाच सांगेन."

मैथिली शिफ्ट संपल्यावर राधिका ताईच्या घरी जायला निघते वाटेत माहीसाठी तिच्या आवडीचा खाऊ घ्यायला विसरत नाही. मैथिलीला दारात बघूनच माही तिच्याकडे धावत येऊन तिला मिठी मारते. मैथिली तिला कडेवर उचलून घेते व तिच्याकडील खाऊ माहीला देते. राधिका दोघींचे निरीक्षण करत असते. ती मैथिलीला म्हणाली," मैथिली प्रत्येक वेळेस माहीला काहीतरी आणलेच पाहिजे का? तु तिला खूप लाडावून ठेवले आहेस."

मैथिली म्हणाली," ताई मला एक सांग आपले असे लाड आपल्या आई बाबांव्यतिरिक्त कोणी केले आहे का? माहीच्या नशिबाने तिचा लाड करणारी, तिचे सर्व हट्ट पुरवणारी हक्काची मावशी आहे तर तिला त्याचा उपभोग घेऊ देत."

राधिका म्हणाली," तु म्हणते ते खरे आहे पण अतिलाड केल्याने ती बिघडायला नको."

मैथिली म्हणाली," ताई डोन्ट वरी मी तिचा अतिलाड करणार नाही. तु मला घरी कशाला बोलावले होते? काही काम होते का?"

राधिका म्हणाली," हो मागच्या आठवड्यात सौरभचा फोन आला होता, त्याचा लॅपटॉप बिघडला आहे त्याला नवीन घ्यायचा आहे, त्यासंबंधी तुझ्याशी बोल असं सांगितलं आहे. मी घरी येऊन बोलले असते तर बाबांनी चिडचिड केली असती म्हणून मी तुला इथे बोलावून घेतले."

मैथिली चिडून म्हणाली," ताई तु सौरभची वकिली करण्याची कधी सोडणार आहेस. हल्ली त्याचे खर्च खूप वाढत चालले आहेत. मागच्या महिन्यात नवीन स्मार्टफोन घेऊन दिला आणि आता नवीन लॅपटॉप. अग ताई आपण कसे दिवस काढलेत आणि हा मात्र उधळपट्टी करण्याचे थांबवत नाही"

राधिका म्हणाली, " तुझे म्हणणे मला सगळं पटतंय पण आता लास्ट सेम जवळ आली आणि लॅपटॉप बंद पडला यात त्याचा काय दोष? पुढच्या वर्षी तो नोकरीला लागेल तेव्हा थोडी तुझ्याकडे पैसे मागेल का? हे बघ तुला जमत नसेल तर मी घेऊन देते."

मैथिली म्हणाली," नाही नको. आता तु म्हणते आहेस म्हणून लॅपटॉप घेऊन देते. आता तु हो म्हंटल्यावर मी नाही कस म्हणू शकेल. त्याला बरोबर माहिती आहे की कोणाला कस पाठवायचं. पण एकच सांगते ताई उद्या पुढे जाऊन त्याने आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटल्या नाही ना तर बघ."

राधिका म्हणाली," मैथिली तु सौरभकडे चुकीच्या चष्म्यातून बघत आहेस. आपल्या सौरभला सर्वांची जाण आहे."

मैथिली म्हणाली," माझा चष्मा चुकीचा असेल तर त्यात मला आनंदच आहे फक्त तुझा भ्रमनिरास व्हायला नको म्हणजे झालं."

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all