एक आगळेवेगळे लग्न भाग १४

Ketan is worry about her mother's health

मागील भागाचा सारांश: निलिमा ताईंच्या ब्लड टेस्टस केल्यावर त्यांना डायबेटिस असल्याचे निदान झाले. मैथिलीने निलिमा ताईंना पथ्य पाणी समजावून सांगितले तसेच केतनने मैथिलीला सांगितले की "आई माझं काही ऐकत नाहीतर तुम्हीच तिला काही समजावून सांगा व तिला तिच्या तब्येतीची काळजी घ्यायला सांगा."

आता बघूया पुढे...

मैथिली घरी आल्यावर आईला सांगते," आई आज निलिमा काकू हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या."

आई हातातील काम टाकून मैथिलीकडे जाऊन म्हणाली," निलिमा ताईंच्या सर्व तपासण्या झाल्या का? रिपोर्ट्स आलेत का? काही काळजी करण्यासारखे आहे का?"

मैथिली म्हणाली," आई एवढी पॅनिक होऊ नकोस. काकूंच्या सर्व तपासण्या केल्यात, काही रिपोर्ट्स आज आले आहेत, काही रिपोर्ट्स उद्या येणार आहेत. काकूंना डायबेटीस डिटेक्ट झाला आहे, त्यांची ब्लड शुगर लेव्हल वाढली आहे."

आई काळजीने म्हणाली," म्हणजे आता ताईंची शुगर लेव्हल कमी नाहीच होऊ शकत का?"

मैथिली म्हणाली," ब्लड शुगर लेव्हल कमी होईल ना पण त्यासाठी गोळ्या औषधे वेळेवर घ्यायला हवी, पथ्यपाणी पाळायला हवे"

आई म्हणाली," अरे देवा, ताईंना हे कधी जमेल. मी ताईंना गेल्या कित्येक वर्षांपासून ओळखत आहे, त्यांना कधी वेळेवर जेवण माहीत नाही की आराम माहीत नाही."

मैथिली म्हणाली," आता माझं लक्षात आलं की केतन सर काकूंवर का चिडले होते? पण आई आता काकूंना जेवणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, जेवणाच्या वेळा पाळाव्या लागतील."

आई म्हणाली," बिचाऱ्या केतनच्या डोक्याला अजून एक ताण वाढला आहे."

मैथिली म्हणाली," आई सर मला म्हणाले की आईला पथ्यपाणी, गोळ्या तुम्हीच समजावून सांगा."

आई म्हणाली," त्यांची मदत कर बाळा, खूप चांगली माणसे आहेत."

मैथिली म्हणाली," हम्मम, आई मला एक सांग केतन सरांचे बाबा एक्सपायर कसे आणि कधी झाले?"

आई म्हणाली," मला त्याबद्दल जास्त माहिती नाही फक्त एवढंच माहीत आहे की ते आर्मीमध्ये होते व एका युद्धाच्या वेळी ते शहिद झाले. निलिमा ताई कधी त्यांच्या बद्दल जास्त बोलल्याच नाही त्यामुळे आमच्यापैकी कोणाला काहीच माहीत नाही."

मैथिली म्हणाली, "आई मी निलिमा काकूंच्या घरी जाऊन त्यांच्याशी ट्रीटमेंट बद्दल बोलले तर चालेल ना"

आई म्हणाली," अग तु चांगल्या कामासाठी जात आहेस, मी का म्हणून तुला अडवेल.तुला हवं तेव्हा निलिमा ताईंकडे जात जा"

दुसऱ्या दिवशी सकाळी मैथिली हॉस्पिटलमध्ये गेल्यावर निलिमा ताईचे सोनाग्राफीचे आलेल्या रिपोर्ट बद्दल डॉ पुजा कडे विचारणा करते. यावर डॉ पुजा मैथिलीला सांगतात," मैथिली मला ज्याची शंका होती अखेर रिपोर्ट्स तेच आलेत. निलिमा काकूंच्या गर्भाशयात छोट्या आकाराचे fibroids आहेत."

मैथिली काळजीने म्हणाली," अरे बापरे, मग आता ऑपरेशन करावे लागेल का?"

डॉ पुजाने मैथिलीच्या प्रश्नाला उत्तर दिले, "मैथिली लगेच ऑपरेशन करण्याची गरज नाहीये, fibroids छोट्या आकाराचे आहेत. गोळ्या औषधांनी कव्हर होऊ शकेल. मात्र आपल्याला सतत followup घ्यावं लागेल."

मैथिली व पुजाचे बोलणे चालूच होते तोच डॉ केतनची एन्ट्री होते.

केतन म्हणाला," डॉ पुजा आईचे सोनोग्राफीचे रिपोर्ट्स आलेत का?"

डॉ पुजा म्हणाली," हो आलेत ना, त्याच रिपोर्ट्स बद्दल आमच्यात चर्चा चालू होती. काकूंच्या गर्भाशयात fibroids तयार झाले आहेत."

केतन म्हणाला," ओके मग पुढे ट्रीटमेंट प्लॅन कसा असणार आहे?"

डॉ पुजा म्हणाली," सध्या काही गोळ्या औषधे चालू करू. शुगर कंट्रोल करण्याची ही औषधे सोबत चालूच असतील. आपल्याला रेग्युलर followup ठेवावा लागेल."

केतन म्हणाला," डॉ पुजा ऑपरेशन करण्याची गरज नाहीये का? असेल तर तस सांगा."

डॉ पुजा म्हणाली," नाही सर सध्या तरी ऑपरेशन करण्याची गरज आहे असं वाटत नाही. माझ्या मावशीची गेल्या एक वर्षांपूर्वी अशीच कंडिशन होती, तिने व्यवस्थित पथ्यपाणी सांभाळले, गोळ्या औषधे वेळेवर घेतली तर ती आता ठीक आहे. माझं तरी हेच मत असेल की काकूंनी सध्या व्यवस्थित गोळ्यांचा कोर्स पूर्ण करावा मग पुढे बघू. आणि जर तुम्हाला दुसऱ्या डॉक्टरचा सल्ला घ्यायचा असेल तर घेऊ शकता."

केतन म्हणाला," नाही मॅडम तुम्ही माझा बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. Actually मी आईच्या तब्येतीच्या बाबतीत खूपच पजेसीव आहे. एक आई सोडली माझं या जगात कोणीच नाही. बाबांच जाण्याच दुःख सहन केले आहे. आईच्या बाबतीत कुठलाही हलगर्जीपणा मला करायचा नाहीये. तुम्ही कोणत्या गोळ्या चालू करायच्या ते लिहून द्या. डॉ मैथिली आज घरी येऊन आईसोबत गोळ्या औषधे व पथ्यपाणी पाळण्याबद्दल चर्चा करायला तुम्हाला जमेल का?"

मैथिली म्हणाली," हो सर आज मी तुमच्या घरी येईल. तुम्ही असताना येऊ की तुम्ही नसताना?"

केतन म्हणाला," मी नसतानाच जा म्हणजे आई तुमच्या सोबत मनमोकळेपणाने बोलू शकेल, तिच्या मनात असलेल्या शंका ती तुम्हाला विचारेल. मी घरी असल्यावर तिला दडपण येऊ शकते."

मैथिली म्हणाली," ठीक आहे, मी संध्याकाळी हॉस्पिटल मधून घरी जाताना तुमच्या घरी जाईन."

संध्याकाळी हॉस्पिटल मधील ड्युटी संपल्यावर मैथिलीला डॉ पुजाने केतनच्या घरी सोडवले. निलिमा ताई मैथिलीची वाटच बघत होत्या. मैथिलीचे त्यांनी हसून स्वागत केले, त्या म्हणाल्या," मैथिली ये ना बाळा. मी केव्हापासून तुझी वाट बघत होते. केतनने फोन करून तु येणार असल्याचे कळवले होते."

मैथिली म्हणाली," काकू तुम्ही खूपच चिंता ग्रस्त दिसत आहात. कसला विचार करत आहात?"

निलिमा ताई म्हणाल्या," केतनच्या आवाजावरून वाटले की तो कसल्या तरी काळजीत आहे. मी टेन्शन घेऊ नये म्हणून तो माझ्याशी मनमोकळेपणाने बोलतच नाही. माझ्या रिपोर्ट्स मध्ये काही प्रॉब्लेम्स आहे का?"

मैथिली म्हणाली," खूप काही मेजर प्रॉब्लेम नाहीये. केतन सरांच्या काळजीचे कारण तुम्हीच आहात आणि त्यांची काळजी तुम्हीच मिटवू शकता."

निलिमा ताई म्हणाल्या," ती कशी?"

मैथिली म्हणाली," काकू मी जे काही तुम्हाला सांगेल ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या आणि उगीच काळजी करत बसू नका. काकू तुमच्या सोनोग्राफीच्या रिपोर्ट्स वरून असे दिसत आहे की तुमच्या गर्भशयात fibroids तयार झाले आहेत, ही नॉर्मल कंडिशन आहे पण आपल्याला आता काळजी घ्यावी लागणार आहे. तुम्हाला जेवण वेळेवर करावे लागणार आहे तसेच गोळ्या औषधे वेळेत घ्यावी लागणार आहेत आणि महत्त्वाची गोष्ट हॉस्पिटलमध्ये येऊन वेळोवेळी शरीराची तपासणी करून घ्यावी लागणार आहे. केतन सरांना वाटतंय की तुम्ही जेवणाच्या वेळा पाळणार नाहीत, औषधे वेळेवर घेणार नाहीत."

निलिमा ताई म्हणाल्या," केतनला अशी शंका येणे रास्तच आहे.तु म्हणतेय म्हटल्यावर जास्त काही सिरिअस नसणारच आहे. मैथिली बेटा गोळ्या औषधांची व जेवणाची वेळ माझ्या लक्षात राहिली पाहिजे ना. कामाच्या तंद्रीत मी भूक तहान विसरून जाते."

मैथिली हसून म्हणाली," काकू यावर माझ्याकडे एक उपाय आहे. मी तुमच्या मोबाईल मध्ये रिमाईंडर सेट करून देते, सुरवातीला थोडं जड जाईल पण हळूहळू सवय होईल आणि मोबाईलच्या वॉलपेपर ला केतन सरांचा चिडलेला फोटो लावा म्हणजे तुम्ही सर्व वेळेत कराल."

निलिमा ताई म्हणाल्या," रिमाइंडर लावण्याची आयडिया छानच आहे पण त्याहीपेक्षा केतनचा चिडलेला फोटो वॉलपेपरला ठेवण्याची आयडिया मस्त आहे."

मैथिली म्हणाली," काकू सरांना खरच तुमची खूप काळजी आहे. ते सकाळी बोलता बोलता बोलून गेले की मी बाबांना गमावल्याचे दुःख सहन केले आहे आता आईला काही होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, तिच्या शिवाय माझं म्हणावं अस कोणीच नाहीये."

निलिमा ताईंच्या डोळ्यात पाणीच आले, त्या म्हणाल्या, " माझा केतन माझ्या बाबतीत प्रचंड हळवा आहे. मैथिली तु मला औषधे कशी घ्यायची ते सांग तसेच पथ्यपाणी काय काय पाळायचे तेही सांग. मला माझ्यासाठी नाही पण माझ्या मुलासाठी जगावे लागेल. मला मधेच काही शंका आली तर मी तुला फोन करू शकते का?"

मैथिली म्हणाली, " काकू तुम्ही मला परकं समजू नका, तुम्ही मला हवं तेव्हा फोन करू शकता."

मैथिलीने निलिमा ताईंना सर्व पथ्यपाणी समजावून सांगितले.

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all