"सरू" ही आदिवासी पाड्यावरील अत्यंत गरीब घरातली, अतिशय चुणचुणीत मुलगी, तिचे जिल्हा परिषद शाळेत नाव नोंदविले गेले, ते केवळ खाऊ मिळण्यासाठी....
"उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म" हा श्लोक पहिल्याच दिवशी सरांनी सर्व मुलांकडून म्हणून घेतला. सर्व मुलांनी श्लोक कसाबसा सरांच्या मागे म्हटला खरा पण... सरूला मात्र प्रश्न पडला, सर, "उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म...." या श्लोकाचा अर्थ तरी काय? तेव्हाच सरांनी सांगण्यास सुरुवात केली. आपण जे अन्न खातो, ते फक्त पोट भरावे म्हणून खाऊ नये. त्यापासून आपल्याला किती फायदे होतात, ऊर्जा कशी मिळते? यासाठी आपण अन्न खात असतो. आता तुम्ही शाळेमध्ये जे अन्न खाता ते तुम्हाला ऊर्जा मिळावी म्हणून... आणि त्या ऊर्जेचा तुम्ही सदुपयोग करावा... म्हणजेच खूप अभ्यास करून मोठं व्हावं.... आपल्या आई वडिलांचे नाव मोठं करावं.. आणि आदिवासी पाड्यांची स्थिती सुधारण्यासाठी हातभार लावावा.. हा शासनाचा हेतू आहे.
शासन तुम्हाला संधी देते, आपल्या परिस्थितीवर तुम्ही तुमच्या बुद्धीचातुर्याच्या जोरावर मात करून आपले जीवन सुधारावे. समाजात वावरताना आपण मागे तर राहणार नाही ना.... हा विचार तुम्ही नक्की करावा. म्हणूनच शासनाने विविध योजना सुरू करून, शिष्यवृत्या देऊन आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी हातभार लावला आहे. या संधीचा तुम्ही सर्वांनी फायदा घ्यावा.
सरांनी सांगितलेला शब्दनशब्द सरूच्या बाल मनावर बिंबला गेला. तिने मनाशी पक्कं ठरवलं, काहीही झालं तर मी शिक्षण घेणारच... मी डॉक्टर होऊन, माझ्या आदिवासी पाड्यात आजारांविषयी ज्या अंधश्रद्धा असतात त्या दूर करून निरोगी जीवनाकडे त्यांची वाटचाल करून देणार..! सरू आठवीत शिकत होती.
सरू स्कॉलरशिपचा मन लावून अभ्यास करत होती. सरांचे ही तिला सहकार्य लाभले. शासनाने दिलेल्या "संधीचं सोनं करायचं" तिन ठरवलं, पण स्कॉलरशिप पास होऊ शकली नाही. वडिलांनी तिच्या लग्नाचं मनावर घेतलं होतं, सरांनी घरी जाऊन आईवडिलांची समजूत घातली. सर्व शिक्षणाचा खर्च सर करणार म्हटल्यावर, आई वडील निश्चिंत झाले. दैवयोगाने सरुला दुसरी संधी मिळाली सरांच्या रूपाने....
आता थांबायच नाही.. असे सरूनी ठरवले आणि दहावीला सर्व चांगल्या मार्कांनी पास झाली. पुढे बारावी मध्ये हॉस्टेलची सोय सरांनी करून दिल्यावर, तिने बारावी तरी चांगले मार्क घेतले, आणि डॉक्टर होऊन सरू आज आदिवासी पाड्यावरच्या रुग्णांची सेवा तर करतेच; पण अंधश्रद्धा निर्मूलनही करते आहे.
....."आयुष्याने दुसरी संधी दिली आणि तिने गगन भरारी घेतली....." असे सर्वांच्या तोंडून उद्गार निघाले.
सौ. प्राजक्ता पाटील...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा