सारिका च्या शिक्षणाचा प्रवास....

Education
सारिका आई वडिलांची एकुलती एक मुलगी. अभ्यासात खूप हुशार, शाळेतून सर्वात हुशार, प्रश्न विचारल्या बरोबर उत्तर देणारी. अशी सारिका होती. पण तिचे आई वडील गरीब होते, आणि ते शेतात मजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होते.

एकट्या मुलीवर आई वडील खूप प्रेम करत होते. आणि सारिका सुध्दा आपल्या आई वडिलांच्या मेहनतीला जाणून होती. तिला माहिती होते तिचे आई वडील तिच्या साठी किती मेहनत करतात म्हणून. या गोष्टीची जाणीव असल्याने तिचे बरेचशे स्वप्न होते, आणि तिला भविष्यात जिल्हाधिकारी बनायचे होते. आणि आपल्या आई वडील आणि गावचे नाव मोठे करायचे होतं.

तिच्या गावात फक्त १० वी पर्यंतच शाळा होती आणि पुढील शिक्षण घेण्यासाठी त्यांच्या गावापासून ७-८ किलोमीटर अंतरावर एक गाव होते, जेथे १२ वी पर्यंत शिकण्याची व्यवस्था होती. पण सारिका च्या मनात भीती होती की तिला शिकण्यासाठी घरचे बाहेर पाठवतील का? कारण गावातील बरेच पालक आपल्या मुलीला शिक्षणासाठी बाहेर पाठवत नसत आणि त्या वयात त्यांचे लग्न लावून देत असत. म्हणून सारिका ला या गोष्टीची भीती वाटत असे, पण ती कोणाला सांगत नसे.
 
दिवसेंदिवस सारिका च्या मनातील भीती वाढत होती. पण म्हणतात ना संकटात आपल्याला मार्ग दाखविण्यासाठी देव आपली मदत करतेच. त्याचप्रमाणे सारिका चे एक शिक्षक होते ज्यांचे नाव आकाश सर होते. ते विध्यार्थ्यांना नेहमी चांगली शिक्षा देत असतं आणि आयुष्यातील संकटांना तोंड कसे द्यायचे ते शिकवत असत. आणि त्यांना गरिबी विषयी खूप चांगल्या प्रकारे माहिती होती. कारण त्यांनी सुध्दा गरिबी पहिली होती. ते अश्या शिक्षकांपैकी होते ज्यांची गोष्ट सर्व ऐकत असतं.

सारिका दहावीची परीक्षा उतीर्ण झाली होती, तेही चांगल्या मार्कांनी. सारिका शाळेतूनच नाही तर जिल्ह्यातून प्रथम आलेली होती. आणि सगळीकडे तिचे कौतुक होत होत. पण तिच्या मनात तिच्या पुढील शिक्षणाविषयी भीती होती. आणि जेव्हा ती घरी आपल्या आई वडिलांना पुढील शिक्षणा विषयी विचारते तेव्हा तिचे वडील तिला म्हणतात की “हे बघ पोरी आतापर्यंत गावात शाळा होती तर तुला शिकविली आता शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागणार, आणि तिथे जर तुझ्या सोबत काही झाले तर समाजाला तोंड कस दाखवणार”.

तिचे वडील ह्या गोष्टी बोलत असतात तेवढ्यात सारिका च्या शाळेतील शिक्षक सारिका चे अभिनंदन करायला तिच्या घरी येतात, तेव्हा गुरुजींना पाहून सारिका तिच्या आई वडिलांना गुरुजींविषयी सांगते. तेव्हा गुरुजी तिच्या आई  वडिलांना सांगतात, तुमची मुलगी खूप हुशार आहे, ती जिल्ह्यातून प्रथम आलेली आहे आणि तुम्ही आता तिला पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित करायला हवे. आणि बारावी मध्ये ती आपल्या राज्यातून प्रथम आली पाहिजे. असे विचार आकाश गुरुजी मांडतात.
 
गुरुजींना उत्तर देत सारिका चे वडील म्हणतात, आमची परिस्थिती गरीब आहे गुरुजी, आम्ही सारिका चा पुढील शिक्षणाचा खर्च सोसू शकणार नाही. त्यावर गुरुजी म्हणतात त्याची चिंता तुम्ही करू नका, सारिका च्या शिक्षणाचा खर्च मी घेतो, कारण माझे या जगात कोणीही नाही आहे, आणि मी गरिबीला खूप जवळून पाहिले आहे..

मला फक्त एवढंच समजते की आपण कर्म करत रहा देव आपल्याला अवश्य फळ देतो.

गुरुजींच्या या गोष्टींना ऐकून सारिका च्या वडिलांना एक नवीन प्रेरणा मिळते आणि ते सारिका ला पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी शिकण्यासाठी परवानगी देतात सोबतच गुरुजींना सांगतात की आम्ही आतापेक्षा अधिक मेहनत करू आणि पोरीला शिकवू आणि आपली मदत लागली तर आपल्याला अवश्य कळवू,

सारिका पुढील शिक्षण सुरू करते, आणि बारावी मध्ये संपूर्ण राज्यातून प्रथम येते त्यांनंतर राज्याची सरकार सारिका चा पुढील शिक्षणाचा सर्व खर्च उचलते. यानंतर सारिका मागे न पाहता खूप मेहनत करते आणि काही वर्षांच्या कालावधी नंतर एक दिवस सारिका जिल्हाधिकारी बनते.

जेव्हा ती तिच्या गावाला जाते तेव्हा तिच्या शिक्षकांची बदली झालेली असते. आणि ते आता त्या गावात शिकवायला नसतात. पण गुरुजींनी दिलेली शिकवण सारिका ला नेहमी आठवण राहते आणि ती तिच्या गुरुजींना आपल्या यशाचे श्रेय देते. कारण त्या दिवशी जर सारिका च्या आई वडिलांना गुरुजींनी समजावले नसते तर आज सारिका या ठिकाणी पोहचली नसती. असे तिचे म्हणणे असते. आणि ती तिचे आकाश सर तिला एक दिवस भेटावे अशी इच्छा ठेवते.

असच एक दिवस शाळांचा दौरा करत असताना सारिका ला एक आवाज कानावर येतो, तो असतो एका शिक्षका चा जो मुलांना प्रेरणा देणाऱ्या गोष्टी शिकवत असतो, जेव्हा सारिका त्या वर्गात जाऊन पाहते तर तिथे तिचे तेच आकाश सर शिकवत असतात, वयाने वृद्ध झालेले, डोळ्यांवर चष्मा घातलेले, सारिका त्यांना पाहून त्यांच्या जवळ जाते आणि त्यांचे पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेते.

तेव्हा ते म्हणतात आपण कोण मी आपल्याला ओळखले नाही, कारण सरांना ती व्यक्ती अनोळखी वाटली, एवढ्या दिवसानंतर सारिका त्यांना भेटली होती, आता सारिका मोठी झाली होती म्हणून ते तिला ओळखू शकले नाही, पण  तेव्हा सारिका ने स्वतःविषयी बोलताना सांगितले की सर मी आपली विद्यार्थिनी, आपण माझ्या आई वडिलांना मला शिकविण्यासाठी प्रेरित केले होते, सर आज मी शिकून एक जिल्हाधिकारी बनली आहे, आणि हे सर्व तुमच्यामुळे होऊ शकले सर.

तेव्हा गुरुजींनी तिला ओळखून तिची पाठ थोपटली, आणि आनंदी होऊन म्हणाले की तुझ्या सारखी विधार्थ्यांला मला शिकविण्याचे भाग्य मिळाले आणि सारिका ची पाठ थोपटत तिला भरपूर आशीर्वाद दिले.

आपल्या जीवनात अशक्य काहीही नाही फक्त अशक्य वाटणाऱ्या गोष्टीला योग्य रित्या पूर्ण करण्याचा मार्ग शोधणे आवश्यक आहे मग अशक्य सुध्दा शक्य होतं.

नमस्कार. सौ. सोनल गुरुनाथ शिंदे. ( देवरुख - रत्नागिरी )