Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

मिळालेले बाबा

Read Later
मिळालेले बाबा


#राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा
#लघुकथा, विषय : आणि ती हसली....

मिळालेले बाबा....

सकाळी उठताच मुद्दाम समोरच्या भिंतीला लावलेला हार घातलेला बाबांचा फोटो पाहून श्रुतीचे डोळे भरून आले . आज बाबा असते तर.... सगळ्यांनी मिळून त्यांचा एकसष्टीचा कार्यक्रम दणक्यात केला असता .

आज श्रुतीच्या बाबांचा वाढदिवस , ते नुकतेच वारले होते आणि ती त्यामुळे खूप हळवी होती हे तिचा नवरा , शशांक जाणून होता . त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला , तिला जवळ ओढलं आणि तिने अश्रूंना वाट मोकळी करून दिली .

" शशांक , का रे देवाने असा दुष्टपणा केला ? दहा वर्षांपूर्वी आई गेली , त्या दुःखातून आता कुठे लग्न झाल्यावर सावरले होते आणि अचानक बाबांचं हार्ट अटॅक ने जाणं.... मी अगदीच पोरकी झाले रे . आज त्यांचा वाढदिवस , एकसष्टी साजरी करायची म्हणून मी किती ठरवलं होतं , अगदी हॉल बुक केला होता , नातेवाईक सांगून ठेवले होते , दादा वहिनीही उत्साहाने हो म्हणाले होते आणि ते बघ , त्यांच्यासाठी आणलेलं गिफ्ट तिकडे कपाटात . दरवर्षी न चुकता , बाबा फादर्स डे ला मला गिफ्ट द्यायचे पण ह्यावेळी बरोबर फादर्स डे ला त्यांचं तेरावं जेवले मी . हे कोणतं गिफ्ट दिलं देवाने मला ? सांग ना , मी काय पाप केलं होतं म्हणून आभाळभर दुःख माझ्या एवढ्याशा झोळीत टाकतोय तो ? का मला अनाथ केलं त्याने ? " श्रुती हमसून हमसून रडत होती .

" असं का म्हणतेस डिअर तू ? मी नाही का ? दादा वहिनी नाहीत का ? " शशांक तिच्या केसातून हात फिरवत म्हणाला .

" आहात रे पण दादाला बाबांची माया कशी येईल ? ती काळजी , ते आपलेपण परकी वहिनी कशी देईल मला ? " श्रुती म्हणाली .

" असं का म्हणतेस गं ? बघ , उद्याच्या राखी पौर्णिमेला त्यांनी आवर्जुन बोलावलं ना आपल्याला ? शेवटी त्यांनाही त्यांचा संसार आहेच , तू नको का समजून घ्यायला ? चल आवर पटकन , निघायचंय ना आज आपल्याला . मी संध्याकाळी ऑफिसमध्ये घ्यायला येतो तुला आणि मग डायरेक्ट जाऊ , नाही म्हंटलं तरी तीन तास लागतात जायला . आजची रात्र तुला माहेरी रहायला मिळेल , बरं वाटेल . बाबा गेल्यापासून तू गेलीच नाहीस माहेरी , आज ते असते तर आपण तिथे असतो, एकसष्टी करायला . ते बघत असतील , त्यांना वाटत असेल तू माहेरी यावं , असं तोडू नकोस माहेर " शशांकने समजावलं .

" तोडत नाही रे पण इच्छा नाही होत . असो , जाऊ आपण आज , ये तू पाच वाजेपर्यंत " श्रुतीने आवरायला घेतलं .

श्रुतीचा पूर्ण दिवस मीटिंगमध्ये बिझी गेला . पाच वाजता शशांक आल्यावर ते दोघे निघाले . माहेरची वाट आज का कोण जाणे तिला खुणावत नव्हती . बाबा असते तर आतापर्यंत दहा फोन आले असते . पाच वाजता निघणार आहे माहित असलं तरी बारापासूनच फोन केला असता , निघालीस का ? किती वेळ , उशीर नको करू , अंधार पडायच्या आत या , हळू या अशा सारख्या सूचना देत राहिले असते . आई गेल्यापासून आपल्या बाबतीत जरा जास्तच हळवे होते ते . दादा तर काय होस्टेलला होता ,मग चार वर्षे नोकरीला बंगलोरला आणि त्याचं लग्न होऊन जेमतेम वर्ष दीड वर्ष झालं की माझं लग्न झालं . बाबांना माझी फारच सवय होती त्यामुळे . वहिनीचा मात्र एकही फोन नाही , फॉर्मलिटी म्हणून बोलावलंय झालं , जाऊन येऊ , शेवटी आई बाबांच्या आठवणी आहेत तिथे . घरावरचा हक्क जरी सोडला असला तरी आठवणींवरचा थोडीच सोडता येईल ?

" हॅलो , श्रुती , निघालीस का ? किती वेळ लागेल ? काही खाऊ नका हं बाहेर , सगळा स्वयंपाक रेडी आहे . घरीच गप्पा मारत जेवू " पलीकडून वहिनी म्हणाली . श्रुतीला बरं वाटलं .

गावात शिरतांना डोळ्यात आलेलं पाणी तिला लपवता येत नव्हतं . घर दिसू लागलं तसं त्या अश्रूंपुढे सारं काही अंधुक झालं आणि हुंदके देत तिने गेट उघडलं . गेटचा आवाज येताच वहिनी भाकर तुकडा घेऊन आली , बाबा घेऊन यायचे तसा . दादाला तिने वाकून नमस्कार केला , तसं त्याने तिच्या डोळ्यातलं पाणी बघून तिला पोटाशी धरलं . माहेरी आल्यावर घरभर फुलपाखरासारखी बागडणारी ती , आज मात्र शांत होती . एकप्रकारचं परकेपण तिला जाणवत होतं . जेवणं , जुजबी गप्पा मारून सगळे झोपले .

दुसऱ्या दिवशी सकाळीच राखी बांधण्याचा कार्यक्रम करून दुपारी जेवण करून निघायचं असं ठरलं होतं . वहिनीने औक्षणाचं तबक केलं . श्रुतीने राखी बांधली खरी दादाला पण चेहऱ्यावर मात्र अजुनही हास्य नव्हतं . दादाने ओवाळणीत छान चकचकीत कागदात wrap केलेलं एक गिफ्ट दिलं आणि म्हणाला , " उघड ना , आताच "

श्रुतीने गिफ्ट उघडलं तर तिचा आणि बाबांचा फोटो होता , फ्रेम केलेला . खूप सुंदर , बोलका होता तो फोटो . तिला रडू आवरेना , ती दादाच्या कुशीत शिरली . दादाने तिला थोपटलं , " श्रुतू , श्रुतूच म्हणायचे बाबा तुला . ते तुझ्या पाठीशी आहेतच हे सांगण्यासाठी हा फोटो दिला मी तुला . आवडलं ना गिफ्ट ? "

" हो दादा , खूप छान आहे . बॅगेत ठेवते " श्रुती म्हणाली .
" थांब , हे पण गिफ्ट घे....आणि उघड " दादाने अजुन एक गिफ्ट दिलं . " दोन दोन कशाला ? " तिने विचारलं . " ह्यावेळी फादर्स डे चं गिफ्ट राहिलं होतं ना म्हणून . उघड ते...."

श्रुतीने गिफ्ट उघडलं तर त्यात तिचा आणि दादाचा फोटो होता फ्रेम केलेला . तिला काहीच कळेना . दादा म्हणाला , " श्रुतू , मी बघतोय बाबा गेल्यापासून तू जरा अंतर ठेवून वागतेस . अगं सगळं अचानक झालं , मलाही मोठा धक्का बसला , तुझ्याप्रमाणेच मी ही पोरका झालो होतो गं पण मला व्यक्त होता येत नव्हतं , काहीच कळत नव्हतं . मला खूप गरज होती तुझी , तू इथे असण्याची पण आता इथे थांबून मी काय करू असं म्हणत तू पाहुण्यांप्रमाणे निघून गेलीस . मी पार कोलमडलो होतो , त्या धक्क्यातून सावरायला मला तुझ्या वहिनीने बरीच मदत केली तरीही मला वाटायचं तुझ्याशी बोलावं पण तू दोन चार वेळा बोलवूनही घरी आलीच नाहीस . अगं इतक्यात विसरलीस आपलं बालपण , सोबत घालवलेले क्षण , ती भांडणं आणि ते प्रेम ? तू मनात धरून आहेस की आता कोण माझं तिकडे ? क्षणात परकं केलंस का गं ह्या भावाला ? मग ह्यावेळी मी शशांकलाच मनातली घालमेल सांगितली आणि रक्षाबंधनला तरी घेऊनच ये म्हणून सांगितलं . कालही मी तीन चार फोन केले पण प्रत्येक वेळी तू मीटिंगमध्ये आहेस सांगत कुणीतरी वेगळंच फोन उचलायचं . हे खरंय , मी तुला बाबांची माया नाही देऊ शकणार पण एक संधी तर दे , निदान तुला पोरकं झाल्यासारखं तरी नाही वाटू देणार . हा फोटो , बाबा नसले तरी मी आहे तुझ्यासाठी ही जाणीव तुला सतत रहावी म्हणून दिला मी तुला आणि हे बघ , माझ्यासाठी पण करून घेतलाय सेम तसाच . मला तुझी , तुला माझी मायेची ऊब हवी आहे . बहीण भाऊ असणारे आपण , आता वेळ पडेल तसे एकमेकांचे आई बाबाही होऊया " दादाचा कंठ दाटून आला होता .

दोघांचाही हात हातात घेत वहिनी म्हणाली , " हो गं श्रुती , आनंद वाटल्याने वाढतो आणि दुःख वाटल्याने कमी होतं . नको अशी समजूत करून घेऊ की तुझं माहेर संपलं . आम्ही सदैव पाठीशी नसलो तरी बरोबर नक्कीच आहोत तुझ्या . हे तुझं घर आहे , इथे कधीही ये , त्याच हक्काने रहा . परकेपणा मनातही आणू नकोस . तसं बघितलं तर तुझा नवरा , शशांक मानलेल्या नात्याने माझा भाऊच ना ? मग दोन्ही भावा बहिणींची भेट होत जाईल . राखीपोर्णिमेला वहिनीला देशील ही ओवाळणी ? "

राखीपोर्णिमेला नव्याने मिळालेले आई -बाबा पाहिले आणि ती हसली , " वहिनी , थॅंक्यु....." म्हणत श्रुती वहिनीच्या मिठीत शिरली .

ऑफिसमध्ये फोन करून दोन दिवसांची सुट्टी वाढवून घेत श्रुतीने \"माहेरपण\" अनुभवलं......

©️®️डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर

जिल्हा : पुणे
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Dr. Shilpa Kshirsagar

Doctor

I am a gynaecologist and love to write and read.

//