Ek Unad Divas

About whole Day Picnic


एक उनाड दिवस...,. १६/०७/२०१९

काहीतरी लिहावं म्हणून हातात पेन घेतला.पण शब्द कागदावर उतरायला तयारच नाही.जाम टेन्शन आलं...वाटलं आपल्यातली प्रतिभा गोठली की काय...! आज मैत्रीणींमध्ये भाव खायचा होता. काहीतरी सणसणीत लिहून त्यांना ऐकवायचं होतं.पण उपयोग काय त्या सणसणीतला \"स\"पण कागदावर उमटत नव्हता. काय करावं? कुठले टेढमेढे प्रसंग पण आठवत नव्हते.आपलं आयुष्य इतकं \"कूल \" आहे.बापरे...!आपल्याकडे काहीच सांगण्यासारखं नाही?

अख्खी रात्र तळमळून काढली. .मी कवितेची दिवानी झाले होते.पण ती काही माझ्याकडे फिरकली नाही.सकाळ झाली...पण माझ्या गाऊनच्या झोळीत काही म्हणजे काहीच दान पडलं नाही. दोन ओळीसुद्धा नाही पडल्या काय करू?हा घातलेला गाऊन अशुभ आहे का?काय करू....कोणाला विचारू?देवा....देवा...मला वाचव रे..आज किटीपार्टीत मला कविता म्हणायची होती.पत्ते झाल्यावर कवितांच्या ट्रेनमध्ये बसून सुसाट सुटायचं होतं.पण...हा पण फार त्रास देतो.त्या मैत्रीणींना काय सांगू. मेरी तो नाक कट जायेगी....अरे देवा परमेश्वरा.अरे काहीतरी सुचव.

माझ्या किटी पार्टीच्या मैत्रीणी नं जाम अॅटीट्युड वाल्या आहेत
मी स्वभावनी गरीब पडते म्हणून बिचारी सगळी त्यांची बकवास ऐकून घेते. माझं कोणीच ऐकत नाही म्हणजे माझ्या कविता कोणीच ऐकत नाही. कोणाला समजतच नाही मी किती अंतर्मुख होउन लिहीते.म्हणजे कसं? ते मलाच नाही सांगता येणार.

माझ्या मैत्रीणी कशा आहेत सांगते तुम्हाला.ऐका ती करूणा एकेसेएके ज्वेलरी घालून येते सगळ्या तिला जाम भाव देतात. असा राग येतो. म्हणून मी ढुंकूनही बघत नाही त्या ज्वेलरी कडे.त्या अपर्णाचा वेगळाच ताल असतो. साड्यांचं प्रदर्शन मांडते.नशीब एकावेळी एकच साडी घालते.एकावर एक चार साड्या नाही नेसत.

ती प्रांजल नेलपाॅलीशमधेच गुंग असते.आपल्या सुंदर नखांकडे सगळ्यांनी बघावं म्हणून जाम धडपडत असते.या किटी तल्या सगळ्या मैत्रीणी म्हणजे दिव्य आहेत.ती सरीता एकदमच शांत समुजतदार.किटीपार्टीत कशाला ती एवढा समजूतदारपणा सोबत घेऊन येते माहिती नाही.डोक्याचं जाम भजं करते.
किटीपार्टीत यावं धमाल करावी जे घरी करता येत नाही ते करावं.तर हिचं वेगळंच काहीतरी असतं पण जाम हुशार आहे ती. किटीतली एकजणपण हिच्या पायाशी बसून शकत नाही.

यांचे विषय काय असतात माहिती आहे.शाॅपींग,हाॅटेलिंग, जुगल्या. जुगल्यांचा फड तर असा रंगतो काही विचारू नका. वेळेला धाब्यावर बसवून त्या बडबडत राहतात.सासरचे सगळे व्हिजन या फक्त सात्विक आचरण करणा-या. असं त्यांचं म्हणणं आहे. जुगल्या करणा-या बायका सात्विक...हा...हा...हा एक विनोद. मी नाही हं तसली. मी अगदी खरीखुरी सात्विक आहे. कधीतरी नवरोबाच्या,सासूच्या, जावेच्या करते जुगल्या.पण कधीतरीच.

मी मस्त एन्जाॅय करते.पण मैत्रीणींसारख दाखवायला माझ्याकडे काही नाही.नवीन नवीन ज्वेलरी नाही,नवीन कपडे नाही,किटी म्हणजे फन असतं नं. तसच वागावं. नेलपाॅलीश नाही.आणि वाचनपण नाही.माझ्याजवळ फक्त कविता आहेत.ज्या या मैत्रीणीना आवडत नाही.

\"ओंजळीत माझ्या शब्द दे शब्द दे
शब्दात त्या देवा अर्थाचा गर्भ दे...\"

अरे काय चमत्कार सुचलं...वा! देवा तुझी माझ्यावरची कृपा अजून वाढव. आता आणखी सांग काहीतरी वेगळं चमचमीत.
\"हा अर्थ आहे या जीवनाचे सार
तोच असू दे माझ्या जगण्याचा अलंकार
नको कपट कुठले...असू दे साधेपणा
जीवन माझे सदा यातच रंगू दे .\"

अब मेरी बारी... मेरी तो गाडी निकल पडी. देवा असाच प्रसन्न रहा माझ्यावर. एकेक भारी कविता सुचव.आज मला नुसतं ऊंडारायचं आहे. किटीतल्या मैत्रीणींचे पडलेले चेहरे बघायचे आहेत.असं झालं तर काय माहोल होईल.

त्या मैत्रीणीच्या तोंडावर एकेक शब्द एकेक दागीना दाखवावा तसा फेकीन. शोधत बसू दे कविता कशावर केली ते. तशा बिनडोक आहेत विंग्लीशमध्ये बोलायला फार आवडतं त्यांना. जाऊ दे मी स्वतः ऊनाडपणा करणार आज.आज माझा दिवस आहे..एक उनाड दिवस....
-----------------------------------------------------------------------------
## मीनाक्षी वैद्य