डस्टबीन

Dustbin

#डस्टबीन

"सुषमा आज सिनेमा बघायला जाऊ गं. येशील ना?,"मोना म्हणाली.

"मी न यायला काय झालं? जरा अदूच्या पाळणाघरात फोन करून उशिरा येणार म्हणून कळवते,झालं. स्वैंपाक आमची वंदूताई करुन गेली असणार. वंदूमुळे मला स्वैंपाकात लक्ष घालावं लागत नाही, जास्त. हल्ली तर डब्याच्या भाजीचीही तयारी करून ठेवायला सांगितलय तिला. चार पैसे जास्त दिले की झालं. पण तुला आज वेळ कसा?  आज परत एखादं स्थळ येणार आहे वाटतं तुझ्या नणंदेला बघायला?"

"अगं हो गं."

"हे कितवं?"

"हे आठवं तरी असेल. पहिल्या दोनेक बैठकींत मीही रस घेतला पण शामलला दोन्ही स्थळांकडून नकार आल्यावर माझाही इंटरेस्ट गेला. परीक्षेसारखं ते धीरगंभीर वातावरण,थोडीशी जाडगेली,कोणत्याही प्रकारचा फेशन सेन्स नसलेली शामल..त्या बैठकीत मेण्याच्या पुतळ्यासारखी चारेक मिनटं बसते, पायाच्या नखाने फरशी पोखरु पहाते. एक गाता गळा सोडला तर बाई सगळ्यात मंद. माझ्या सासऱ्यांची नोकरी सुटली तेव्हा घर चालवण्यासाठी हिने कॉलेज सोडलं आणि नोकरी केली,गाण्याचं शिक्षण घेतलं. हे माझ्या नवऱ्याकडून हजारदा ऐकून कान किटलेत माझे. 
ते जाऊदे. ए सुष,आज बॉस लवकर गेला गं."

"असेल काहीतरी काम. तोही यौवनात आहे नं सध्या. कुठेतरी स्थळ बघावयास गेला असेल."

"बाकी दिसतो चिकणा हं पण पक्का खडूस. नाकावरची माशी हलत नाही त्याच्या. आज मी एवढा छान लखनवी ड्रेस घातला. डिक्टेशन देताना पाहिलंसुद्धा नाही माझ्याकडे. आधीचा बॉस एजेड असला तरी बरा होता. चॉइस होती त्याला,सौंदर्यदृष्टी होती." 

"ए मोना,आता लग्न झालं आपलं. आपल्याला कशाला हवंय परक्या पुरुषाकडून कौतुक!"

"सुष,आपलं माणूस कौतुक करत असलं ना तर असं परपुरुषाकडून कौतुक ऐकण्याची अपेक्षा नसते. आमचं ध्यान नेभळट. सदा आईवडिलांसाठी श्रावणबाळाच्या भूमिकेत असतो आणि हो बहिणीवर तर भारीच जीव. तुझं बरंय गं. हम दो हमारा एक. त्याशिवाय सोबत डस्टबीन नाहीत. हे आमचे डस्टबीन आळीपाळीने आजारी पडतात. किती खर्च होतो काय सांगू तुला! ती शामल कुठे नोकरी करेल तर मग घरातलं कोण बघणार! माझ्या सासूला संधिवातामुळे काहीच झेपत नाही,तिचे सगळे सांधे जखडत असतात."

"अगं चालायचंच. म्हातारी खोडं. तुच समजून घे. तुझ्या दोन्ही लेकरांना सांभाळतात ना."

"सांभाळतात! अगं नातवंडांच्या डोक्यावर चांगलाच हात ठेवलाय त्यांनी. ओजस, आजोबा पोथी वाचत असताना त्यांच्यासोबत बसतो आणि आमची चिऊ,ती तर आजीबाई झालेय अगदी. आजीचे पाय काय दाबून देते,वाती काय वळते."

"मोना, अगं,बोलत काय बसलो. निघुया लवकर."

 दोघीजणी सिनेमाग्रुहाकडे रवाना झाल्या पण नेमकं पिक्चर हाऊसफुल होतं. निराश होत दोघी जवळच्या समुद्रकिनारी गेल्या.  दोनचार प्लेट पाणीपुरी,ओली भेळ खाल्ली. 

तिन्हीसांज झाली तसा सुषमाच्या पाळणाघरवाल्या काकूंचा फोन आला। सुषमाच्या लेकाने सोबतच्या मुलाच्या मांडीत पेनाची नीब घुसवली होती. त्या मुलाची आई पाळणाघरवाल्या काकूंशी भांडत होती.  सुषमा मग घाईतच घरी जायला निघाली. मोनाला आता घरी जाण्यावाचून पर्याय नव्हता. तिने घड्याळात पाहिलं. सात वाजले होते. साडेसातपर्यंत रमतगमत ती घरी पोहोचली. दारावर चपला पाहून तिला कळलं की पाहुणेमंडळी आत आली आहेत. 

सासुबाईने दार उघडलं तसं  तिने खाली मान घालून सँडल काढली व सुमडीत स्नानग्रुहाकडे रवाना झाली. शामल नेहमीसारखीच साधीसी साडी नेसून तयार झाली होती. नेहमीसारखाच केसांचा एक शेपटा घातला होता तिने. मोनाला तिचं ते रुप पाहून किळस आली. तिच्याकडे एक तुच्छतेचा कटाक्ष टाकत ती बेडरुमकडे वळली. घोळदार गाऊन घालून पलंगावर आडवीही झाली. 

घरात प्रत्येकाला तिचं हे वागणं नित्याचंच होतं पण शामलला बघायला आलेल्या मंडळींना तिचं वागणं खटकलंच.  नवऱ्यामुलाच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर ते दिसत होतं. 

शामलच्या वडिलांनी वेळ मारुन घेत त्यांना सांगितलं,"सुनबाई नुकतीच कामावरून आली आहे. फार दमते काम करुन. साहेबाचीही बोलणी खावी लागतात पोरीला. तिच्या गळ्यात बऱ्याच फायली मारतो म्हणे. चिऊनेही आजोबांची री ओढली,"हो काका,मम्माचा बॉस भारी खडूस आहे." 

त्याचवेळी शामल चहा व कांदेपोह्यांच्या डिश घेऊन बाहेर आली. सावळी असली तरी नाकीडोळी नीटस,डोळ्यात चमक,लांबसडक शेपटा..शैलैंद्रला शामल बघताक्षणी आवडली. प्रश्न होता शिक्षणाचा पण तिचं बारावीनंतरच शिक्षण ती लग्न झाल्यावरही करु शकते असं शैलेंद्रच्या आईने म्हंटलं आणि शामलच्या गालावरची खळी खुलली. खूप इच्छा होती तिची पुढे शिकायची. निष्णात वकील व्हायचं होतं तिला.

 शामलचे वडील म्हणाले,"बघ शामल,आमच्या आर्थिक विवंचनेत तुझं शिक्षण सुटलं होतं पण आता नवऱ्याच्या घरी पोटभर शीक." 

सगळं नीट होतंय म्हंटल्यावर मोनाचा नवरा आत गेला व तिला बाहेर येण्यासाठी विनवणी करु लागला. तशी प्रचंड नाराजीत मोनाने एक ड्रेस अंगावर चढवला व बाहेर आली. 

आतापर्यत हॉलमधलं बोलणं मोनाच्या कानावर गेलं होतंच. पुस्तक हातात असलं तरी तिचे कान हॉलकडेच होते. शामलची फजिती तिला मैत्रिणींमधे रंगवून सांगायची होती पण झालं उलटंच. 

मोनाच्या सासऱ्यांनी बॉसबद्दलची तिची नाराजी शामलच्या सासरच्यांकडे मांडली होती. त्यात चिऊ तिच्या बॉसला खडूस म्हणाली होती व समोरच्या खुर्चीवर तिचा बॉस,शैलेंद्र विराजमान होता. शामलला मेल्याहून मेल्यासारखं झालं . बॉसने शामलला पाहूनही न पाहिल्यासारखं केलं. 

शैलेंद्र म्हणाला,"माझी एक अट आहे. हल्लीच्या काही आधुनिक मुली सासूसासऱ्यांना डस्टबीन..केराची टोपली असं उपहासाने म्हणतात व असे हे डस्टबीन त्यांना घरात नको असतात. काहीजणी आधी लग्न करतात व नंतर वेगळं होण्याचा घोशा लावतात. मी माझ्या माईअण्णांचा  एकुलता एक मुलगा आहे त्यामुळे माझे माईअण्णा हे माझ्यासोबत रहाणार नव्हे मी माझ्या माईअण्णांकडे रहाणार. शामलला माझ्यासोबत माझ्या माईअण्णांच्या घरी रहायला आवडेल का?"

बॉसचं हे बोलणं, त्याचा त्याच्या आईवडिलांप्रतिचा आदर पाहून मोनाला स्वतःच्या बोलण्याची किंचीत का होईना लाज वाटली.

 शामल मात्र आनंदाने,"हो मला तुमच्यासोबत माईअण्णांच्या घरात रहायला खूप आवडेल," म्हणाली आणि माईने दोन्ही हात पसरुन शामलला कवेत घेतलं.

शामलच्या आईवडिलांचे डोळेही आनंदाश्रुंनी भरले.

मोना मात्र विचार करत होती,उद्या बॉसला कसं काय सामोरं जायचं याचा.

-------सौ.गीता गजानन गरुड.