सण दसरा उत्सवाचा ...

Festival Of happiness
उत्सव असतो विजयाचा
दिवस सोनं लुटण्याचा
आनंद घेण्याचा अन् देण्याचा
मनामनाशी नातं जोडण्याचा...


दसरा
हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण ! साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस!

आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत शारदीय नवरात्र उत्सव असतो.या उत्सवाची समाप्ती दसऱ्याच्या दिवशी होते.शुंभ,निशुंभ,रक्त बीज,महिषासुर इ. राक्षसांना मारण्यासाठी दुर्गेने चंडीचा अवतार घेतला व नऊ दिवस या राक्षसांबरोबर युद्ध केले.दशमीला महिषासुराचा वध करून विजयी झाली. म्हणून या दिवशी आनंदोत्सव साजरा होतो.
आश्विन शुद्ध दशमी म्हणजेच दसऱ्याला \"विजयादशमी\" ही म्हणतात.
आश्विन शुद्ध दशमी ,या च दिवशी भगवान रामाचा पूर्वज रघु या अयोध्याधिशाने विश्वजित यज्ञ केला .त्या काळापासून म्हणजे त्रेतायुगापासून विजयादशमी महोत्सव साजरा करतात.
दसरा शब्दाची एक व्युत्पत्ती दशहरा अशीही आहे.दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत.दसऱ्याच्या आधीच्या नऊ दिवसांच्या नवरात्रात दाही दिशा देवीशक्तीच्या असतात. दाही दिशांवर विजय मिळालेला असतो ,वाईट प्रवृत्तीवर चांगल्याचा विजय !
दुर्गा नवरात्र संपल्यानंतर लगेच हा दिवस येतो म्हणून याला \"नवरात्रीच्या समाप्तीचा दिवस\" असेही म्हणतात.
प्रभु श्रीराम यांनी रावणाचा वध करून विजय संपादन केला तो हा दिवस,त्यामुळे या दिवसाला \"विजयादशमी\" असे नाव मिळाले.
पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणाऱ्या कौरवसैन्यावर स्वारी करून विजय मिळविला.तो दिवस म्हणजे विजयादशमी!
विजयादशमी या दिवशी ज्या वृक्षाची पाने लुटली जातात त्या वृक्षाला अश्मंतक असे म्हणतात. अश्मंतक म्हणजे आपट्याचे वृक्ष.
या दिवशी आपट्याची पाने परस्परांना दिले जातात यालाच सोने लुटणे असे म्हणतात.
या पानांचा आकार ह्रदयासारखा असतो म्हणजे आपले नाते मनापासून, ह्रदयापासून असावे असा अर्थ ...
कौत्सास चौदा कोटी सुवर्ण मुर्द्रा देण्यासाठी रघुराजाने कुबेरावर स्वारी केली त्यामुळे भयग्रस्त होऊन कुबेराने याच दिवशी शमीच्या झाडा वर सुवर्णवृष्टी केली.आवश्यक तेवढे सोने रघुराजाने कौत्सास देऊन बाकीचे नागरिकांना वाटले.अशी कथा सांगितली जाते.म्हणून या दिवशी एकमेकांना सोने देणे ही प्रथा सुरू झाली असावी.
भारतात हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा होतो.उत्तर भारतात या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन करतात. कुलू खोऱ्यातील लोक आपल्या रघुनाथ या देवतेचा उत्सव साजरा करतात.
या दिवशी सीमोल्लंघन ,शमीपूजन,अपराजितापूजन आणि शस्त्र पुजा करतात.
ऐतिहासिक काळात या दिवशी सीमोल्लंघन करून मराठा सरदार नव्या मोहिमेवर जात असत.म्हैसूर संस्थानाचा दसरा उत्सव भारतात प्रसिद्ध आहे.चंडीने किंवि चामुंडेने महिषासूराचा वध म्हैसूरजवळ केला,असे मानले जाते.
राजस्थानात या दिवशी राजपूत राजे आपल्या गुरुच्या दर्शनास जात आणि तेथे शमीचे पूजन करीत.ठाकूर स्त्रिया या दिवशी दसरा नृत्य करतात. महाराष्ट्रात कातकरी किंवा आदिवासी स्त्रिया दसरा नृत्य करतात.
हा दिवस शुभ असल्याने राजे,सामंत आणि सरदार हे वीर आपापली उपकरणे आणि शस्त्रांचे पूजन करतात. शेतकरी आणि कारागीर आऊते आणि हत्यारे, अवजारे यांची पूजा करतात.व्यापारी वर्ग हिशोबाच्या वह्या ,ग्रंथ यांचे पूजन करतात.विद्यार्थी लेखणी आणि पुस्तके यांचे पूजन करतात आणि सर्व जण देवी सरस्वती ची पुजा करतात.
या पूजना मागील उद्देश हा की,त्या त्या गोष्टींमध्ये ईश्वराचे रुप पाहणे म्हणजेचं ईश्वराशी एकरूप होण्याचा प्रयत्न!
विजयाची प्रेरणा देणारा आणि छात्रवृत्ती जागृत करणारा हा सण!
पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावर हा सण येतो त्यामुळे शेतकरी आनंदाने हा सण उत्साहाने साजरा करतात. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या स्थंडिलावर नऊ धान्यांची पेरणी करतात आणि दसऱ्याच्या दिवशी त्या धान्याचे वाढलेले अंकुर देवाला वाहतात. कित्येक ठिकाणी शेतातल्या भाताच्या लोंब्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधतात. ही प्रथा या सणाचे कृषीविषयक महत्त्व व्यक्त करते.
सणांना धार्मिक महत्त्व असते. सणांमुळे संस्कृती जपली जाते आणि संस्कार हे पिढ्यानपिढ्या दिले जातात,चालत राहतात.
तसेचं या निमित्ताने अनेक गोष्टी ही नकळत सांगितल्या जातात.
जसे - आरोग्य, पर्यावरण, भूतदया वगैरे.
प्रत्येक सणात झाडांचे महत्त्व सांगितले जाते.
दसरा सणाला शमी,आपट्याची पूजा करून वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला जातो.आपट्याची पानें गुणकारी असल्याने ती परस्परांना देवून सर्वांचे आरोग्य चांगले रहावे ही भावना असावी.आणि सणानिमित्त सर्व जण एकमेकांकडे जातात त्यामुळे नात्यातला आनंद अजून वृद्धींगत व्हावा हा हेतू असावा.

या दिवशी लोक सोने खरीदी करतात,नवीन वस्तू ,गाडी,घर इ. विकत घेतात.
हा दिवस प्रत्येक जण आपल्या परीने आनंदात साजरा करतो.

पवित्र,उत्तम दिवस दसरा
आनंदाने करावा साजरा
वाईट विचार,दुर्गणांना नसावा थारा
हा चं विजयाचा दिवस खरा !!