दुर्गा

दुर्गा

#दुर्गा

"माय,ये माय तू पण घे की सफरचंद. बघ कशी लालेलाल हायेत! माय मले लई आवडतात गं." 

बाजूची दिनेशची मम्मी सफरचंद घेताना बघून इमली तिच्या आईच्या पदराला ओढत तिच्याकडे हट्ट करत होती. 

सफरचंदवाल्याला तर चेवच चढलेला. "सेब ले लो सेब.."असं मोठमोठ्याने ओरडत होता. 

इमलीच्या आईने,शकूने इमलीकडे दुर्लक्ष केलं नि ती आपलं स्वैंपाकपाणी आटोपत राहिली. घरातली कामं आवरून तिला चार घरी पोळ्या लाटायला जायचं होतं.

 इमलीचा बापू क्षयरोगाने आजारी होता. त्याच्यासाठी औषध आणायचं होतं. इमली सफरचंदवाला तिच्या नजरेआडून दूर होईपर्यंत त्याच्याकडे आशाळभूतपणे बघत राहिली.

दिनेशच्या मम्मीने एक सफरचंद धुवून पुसलं व त्याच्या पातळ फोडी करुन दिनेशला वाटीत भरुन दिल्या. दिनेश ती फोडींनी भरलेली वाटी घेऊन ओट्यावर बसला व आरामात एकेक फोड खाऊ लागला.  दिनूने इमलीला एक फोड दिली. इमली खूष झाली. तिने ती पातळ फोड अगदी हळूहळू आस्वाद घेत खाल्ली म्हणजे दिनूच्या वाटीभर फोडी संपेपर्यंत इमली तिच्या हातातली फोड चिमणीच्या दातांनी थोडीथोडी खात होती.

इमली घरात येताच शकू तिच्यावर डाफरली,"इमू,कोनी काई दिलं तर नगं म्हून सांगायाचं. लगेच हात पुढं न्हाई करायाचे. कितींदा सांगायाचं तुले!"

"माय,तू काहून न्हाई घेत मले खाऊ? तुह्या पर्सीत पैकं काहून नसतात?"

"इमले,आपुन गरीब मानसं. तुह्या बापू कमवायचा,डोअर किपर व्हता तवा आपले बी दिस चांगले व्हते बग. खाऊनपिऊन सुखी व्हतो आपुन."

"माय,बापू बरा कंदी व्हनार ग?"

"व्हनार गं लौकर बरा व्हनार. मंग माह्या इमुला जत्रला घिऊन जानार. नइन गवन घेनार."

"माय,बापू कामावर जायाला लागला काय आपुन टोपलीभर सफरचंद घिऊ नि चिरमुल्याचे लाडू,नखपालिश, चाललं!

"चाललं गं माजे बाई,"शकू इमलीला कुशीत घेऊन थोपटत म्हणाली. तितक्यात इमलीच्या बापूच्या छातीचा भाता वरखाली व्हायला लागला. शकू त्याच्या छातीवर हात फिरवत राहिली.

सणासुदीला चाळीतली मुलं नवीन कपडे घालायची तेंव्हा इमूलाही वाटायचं नवेकोरे कपडे घालावे,पावडर लावावी नि इकडेतिकडे बागडावं. 

शकू कामाला जायची तिथल्या मालकीणबाई तिला आपल्या मुलीचे जुने कपडे द्यायची. ती मुलगी इमलीपेक्षा हाडापेडाने मोठी असल्याकारणाने शकू त्या कपड्यांना दोरे घालून ते इमलीच्या मापाचे करायची. 

इमली ते कपडे कुरकुरत घालायची मग तिला स्वप्न पडायचं. स्वप्नात ती टिव्हीत दाखवतात त्या मोठ्या दुकानात जायची. तिचे आई नि बापू तिच्यासोबत असायचे. बापू स्वप्नात बरा असायचा. बरा म्हणजे अगदी खडखडीत..दाढीबिढी केलेला..दिनूच्या बाबांसारखा तेलपाणी लावून केसांचा भांग पाडलेला नि शर्टपण इन केलेलं असायचं पँटीत, दिनूच्या बाबांसारखच. 

 तिचा बापू दुकानदाराला सांगायचा, मुलीसाठी कपडे दाखव म्हणून. गुलाबी सोनेरी टिकल्या लावलेली चनिया चोळी,सोनसळी रंगाचा घेरदार फ्रॉक, खणाचा परकरपोलका, गुलाबी फुलाफुलांचा पंजाबी ड्रेस..

इमलीच्या पुढ्यात रंगीबेरंगी कपड्यांचा ढीग पडायचा. इमली त्यातून तिला तो सोनसळी रंगाचा फ्रॉक निवडायची,घालून बघायची मग बापूला आवडली म्हणून बापू फ्रॉकसोबत चनयाचोळीही पँक करायला सांगायचा. त्यानंतर आईसाठी बापू रेशमी साड्या घ्यायचा. आई म्हणायची,"खूप हायती साड्या माह्याकडं." बापू म्हणायचा,"सणाला कारभारनीला येकतरी लुगडं घ्यावं. शुभशकुन असतोया तो." ,मग इमलीची आई गोड हसायची नि बापुलापण स्वतःसाठी कपडे घ्यायला लावायची. 

बापू  त्यांना हॉटेलात घेऊन जायचा. वेटर गार पाण्याची ग्लासं आणून पुढ्यात ठेवायचा. इमली ते पाणी घोट घोट पिते तोवर तिच्या पुढ्यात गरमागरम वडासांबारच्या प्लेटी आलेल्या असायच्या,सोबत केशरी रंगाची नुकतीच पाकातून काढलेली जिलबी. 

इमली काट्याचमच्याने वडासांबार खाण्यात गुंग व्हायची. पोट भरतयसं वाटताच झोपेतच म्हणायची,"बापू,पुरे मला माह्यं पोट भरलं." इमलीचा बापू इमलीचे बोल ऐकून दिनवाणा हसायचा तर शकू तिला अगदी जवळ घ्यायची. तिच्या केसांतून हात फिरवत रहायची.

"""""""""""

शकूच्या कष्टांच चीज झालं. इमली भरपूर शिकली. सरकारी ऑफिसात नोकरीला लागली नि हो,तिला लहानपणी आपल्यातला खाऊ देणाऱ्या दिनूशी तिचं लग्न झालं. शिक्षण माणसाला माणसात आणतो,हे इमलीने खरं करुन दाखवलं. इमली व दिनूला मुलगा झाला. दिव्येश नाव ठेवलं त्याचं. 

दिनूची आईपण इमलीवर खूप माया करु लागली. इमलीचा बापू हे सुख बघायला या जगात नाही राहिला नि तरुणपणी काढलेल्या काबाडकष्टांनी शकूपण लवकर म्हातारी झाली का इमलीचा बापू लवकर गेला म्हणूनही असेल. तो होता तोवर ती घाम गाळायची नंतर तिच्यातला हुरुप ओसरु लागला.

 इमली नि दिनूने नवीन ब्लॉक घेतला. शकूलापण घेऊन जाणार होते रहायला पण शकूला तिच्या जुन्या घरातच रहायचं होतं. जावयाच्या दारात रहाणं तिच्या जुन्या विचारांच्या मनाला पटत नव्हतं. 

इमली दर रविवारी माहेरी जायची. शकूला काय हवं नको ते घेऊन द्यायची. दिनूच्या आईला ते खटकायचं पण ती काही बोलू शकत नव्हती कारण इमली कमवती होती. ती तिच्या कमाईतून तिच्या आईच्या गरजा पुरवायची. 

इमलीकडे कामाला सुगंधा यायची. सुगंधा सकाळची पोळीभाजी करुन जायची,परत संध्याकाळी येऊन आमटीभात करुन जायची. सुगंधा एकदा तिच्या जुळ्या मुलींना सोबत घेऊन आली होती. नेमकं त्यावेळी पिझ्झाबॉय येऊन पिझ्झा देऊन गेला. इमलीच्या सासूने पिझ्झा तिच्या नातवापुढे ठेवला. दिव्येश डिसकव्हरी चँनल बघत पिझ्झा खाऊ लागला. 

इमली तितक्यात ऑफिसला जाण्यासाठी बाहेर आली. सुगंधाच्या मुली,हाताची घडी घालून बसल्या होत्या. त्यांच पिझ्झ्याकडे जाणारं लक्ष त्या हिरिरीने टिव्हीतल्या वाघाकडे वळवत होत्या.

 इमलीला तिचं बालपण,दिनूने दिलेली सफरचंदाची फोड आठवली. इमलीने दिव्येशला जवळ बोलावलं व पिझ्यातले दोन भाग त्या दोन तायांना दे म्हणून सांगितलं. सासू इमलीकडे रागाने बघू लागली पण दिव्येशला आपण एकटेच खातोय हे चुकीचं आहे हे पटलं. त्याने त्या छुटकी नि बबलीला पिझ्झ्याचे दोन भाग दिले तशा त्या नको नको म्हणू लागल्या. तितक्यात सुगंधा काम आवरुन बाहेर आली. ती म्हणाली,"मीच सांगितलय त्यांले नगं म्हनायला."

इमलीने मग त्या दोघींना पिझ्झा खायला लावला व सोबत ऑरेंज ज्युषही दिला. इमलीला छुटकी व बबलीत तिची लहानपणीची छबी दिसत होती. इमलीने सुगंधाला सांगितलं की आजपासून या दोघींचा शिक्षणाचा व कपड्यालत्त्याचा खर्च मी करणार. अट फक्त एकच यांनी मन लावून अभ्यास करायचा."

सुगंधा पोरींना म्हणाली,"आयकलत का काय म्हनतेय मावशी ते."

छुटकी नि बबली गोड हसल्या व दोघींनी इमलीकडे पहात होकारार्थी माना हलवल्या. मोठी दुर्गा या लहानग्या दुर्गांना मदतीचा हात देणार होती,स्वतःच्या पायावर उभं रहाण्यासाठी त्यांच्या पंखांत बळ भरणार होती. 

-----सौ.गीता गजानन गरुड.