मला भावलेली दुर्गा

Story of brave girl and her success

कॅटेगरी- गोष्ट छोटी डोंगराएवढी
विषय- एक दुर्गा अशीही

मुलींना लहानपणापासून शिकवण मिळते, संस्कार केले जातात. तशी त्यांची जडणघडण होत जाते. मुळात कार्यतत्पर आणि चुनचुनीत असलेल्या मुली सगळी कौशल्ये लगेच आत्मसात करतात. चांगलं वागावं, बोलाव, चांगलं वाचावं, लिहावं आणि निर्भिड असावं. आपल्यावर आलेल्या प्रसंगाला निकराने लढा देत, न घाबरता हिमतीने त्याचा सामना करावा. असे संस्कार आई मुलींवर करत असते. तर असे संस्कार मिळालेल्या एका दुर्गेची ही कहाणी. 
    मी सांगत असलेला ही घटना अठ्ठावीस वर्षांपुर्वीची आहे. मी किर्ती नावाच्या दुर्गेला खूप चांगली ओळखत होते. ती इयत्ता आठवीत शिकत होती. अभ्यासात हुशार, तिच्यावर चांगले संस्कार झाले होते. आमचे आणि किर्तीच्या कुटुंबाचे जिव्हाळ्याचे संबंध होतं. तिचं कुटुंब आमच्या कुटुंबापासून जवळ रहत होतं. रोजच संपर्क असायचा. 
 श्रावण महिना होता. त्या दिवशी गोपाळकाला होता,  किर्ती तिचे बहीण भाऊ आणि मैत्रीणींनी चिपळूणला दहीहंडी पहायला जाण्याचा बेत केला होता. सगळे खेड चिपळूण बसने निघाले होते. बस गावापासून सात आठ किलोमीटरवर गेल्यावर  लोटे एम. आय. डी.सी तील नोसील कंपनीसमोर बसला जोरदार अपघात झाला. धडाम असा मोठा आवाज आला. आजुबाजुचे, कंपनीतील लोक धाऊन आले, त्यात माझे पतीही होते. ते नोसील कंपनीत नोकरीला होते. बसमधील खूप लोक जखमी झाले होते. कोणाचा हात तर कोणचा पाय मोडला होता, डोकी फुटून रक्तबंबाळ झाली होती. लगेच अॅब्यलन्स आली आणि जखमींना हॉस्पिटलमध्ये भरती करायला घेऊन गेली. जखमी मध्ये किर्तीची बहीण होती, भाऊ होते,  मित्र, मैत्रीणी होते. 
 पण पुढचा प्रसंग अंगावर शहारे आणणारा होता. गाडीतील एका बाकावर किर्ती अशाप्रकारे अडकून पडली होती की तिला बाहेर काढणे मोठे मुश्किल काम होते. बसला ट्रकने धडक दिली होती एका  जोरदार टकरीमुळे बाक, रॉड एकमेकांत घुसले होते. आणि एका बाकड्यावर किर्ती भयानपणे अडकून पडली होती. तिचा पाय मोडला होता वेदना प्रचंड होत होत्या पण आपल्यावर काय प्रसंग गुदरला आहे याचे भान तिला होते. गाडीचा फाटलेला पत्रा अगदी तिच्याजवळ येऊन थांबला होता. अशाप्रकारे अडकून पडलेल्या किर्तीला अजीबात हलता येत नव्हते. त्यातून तिला बाहेर  काढण्यासाठी सगळे प्रयत्न करत होते. माझे पती तिला हिंमत देत होते पण मुळात तिचं हिम्मतवान होती. तेवढ्यात मदत पथक कटर घेऊन आले. आजुबाजुचे रॉड, पत्रा कट करु लागले त्या परिस्थितीतही किर्ती त्यांना सुचना देत होती असे कापा, तसे कापा, इकडून कापा सगळे तिच्या धाडसाचे कौतुक करत होते. शेवटी तिची सुटका झाली आणि तिला अॅब्युलन्स मधून दवाखान्यात नेले. सोबत माझे पती ही गेले होते. पायाला गंभीर जखम होऊन तिच्या मांडीचा चुरा झाला होता पण वेदनेवर मात करत ही चिमुकली किर्ती अतिशय धिटाईपणे न घाबरता भयानक प्रसंगाला सामोरी गेली होती. चार महिने कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होती.
 सध्या ही धाडसी किर्ती डॉक्टर झाली आहे. शहरात राहत असूनही खेड्यात जाऊन जनतेची सेवा करावी म्हणून खेड्यातील एका सुशिक्षित मुलाशी तिने लग्न केले.
   आम्ही चिपळूण वरून  पनवेलला राहायला येऊन सोळा वर्ष झाली, कधीतरी चिपळूणला जातो. तिच्या आईबाबांशी फोनवर बोलतो. एकदा किर्तीची चौकशी केली तर त्यांनी तिचा नंबर आम्हाला दिला.
  
तिच्याशी फोनवर बोलले तर तिला खूप आनंद झाला. रुग्णांची सेवा करणारी किर्ती आता गावाची सरपंच आहे. राजकारणात प्रवेश केलाय पण समाजसेवेवर खूप भर आहे. गावात विविध सुधारणा, योजना आणल्या, महिला, मुलांसाठी विविध उपक्रम राबवले, खूप सामाजिक उपक्रम राबवले, गावाचा कायापालट करुन टाकला. तिच्या कार्याची, समाजसेवेची दखल घेऊन तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. एका चॅनेलवर तिची मुलाखतही झाली. त्याचा व्हिडीओ तिने आम्हाला पाठवला. तो बघून खरचं या दुर्गेचा अभिमान वाटला. 
लहानपणी अपघाताच्या वेळी अतिशय धाडसाने सामोरी गेलेली किर्तीने नावाप्रमाणेच किर्ती मिळवली आहे. 
 अशी ही मला भावलेली दुर्गा.
 © सौ. सुप्रिया जाधव