दुर्गा झाली काली...

प्रत्येक स्त्रीमध्ये लपलेल्या देवी कालीची गोष्ट



दुर्गा झाली काली.
आज तहसील कार्यालयात सगळे जरा उत्साहात होते.सगळ्यांना उत्सुकता होती की ह्या टेबलवर येणार कोण?

गेले जवळपास आठ वर्ष तिथे काम करणाऱ्या जाचक मॅडम बदलून गेल्या होत्या.नवीन येणाऱ्या सुद्धा एक महिला आहे एवढे समजले होते.

सगळेजण आपापली कामे करत दुसरी नजर विजय नरवणेकडे लावून होते.विजय ह्या ऑफिसमध्ये ज्युनियर क्लार्क.काम मात्र काडीचे करत नसे.

जाचक मॅडम बिचाऱ्या गरीब असल्याने त्या सगळे निमूट सहन करत.खरे म्हणजे सगळ्यांबरोबर विजय सुद्धा जरा मनातून उत्सुक होतच.इतक्यात दरवाजातून एक साधारण तिशितली युवती आत आली.सावळा,गव्हाळ रंग,बोलका आणि आत्मविश्वासपूर्ण चेहरा.तिच्याकडे सगळे पहातच राहिले.


ती सावकाश चालत अधीक्षकांकडे गेली,"नमस्कार,मी दुर्गा जाधव.सिनियर क्लार्क म्हणून रुजू व्हायला आलेय."


अधीक्षकांनी एकदा तिला अपादमस्तक न्याहाळले.नंतर तिच्या हातातील कागद घेऊन सोपस्कार पूर्ण केले.दुर्गा जागेवर जाऊन बसली.मनात विचार सुरूच होते.मुलीची शाळा,रहायला घर सगळेच शोधायचे होते.तिने रजा अर्ज लिहिला आणि अधीक्षकांकडे गेली.


अर्ज वाचून तो म्हणाला,"मॅडम,आज रुजू झालात आणि लगेच रजा?"

ती शांतपणे म्हणाली,"रहायची सोय,मुलीची शाळा हे सगळ नीट लावायच आहे."

त्यावर तो हसत म्हणाला,"तुमचे मिस्टर काय करतात?"

त्यावर काहीही उत्तर न देता तिने,"रजा मिळेल ना?"असा प्रश्न विचारला.


रजा टाकून दुर्गा घरी निघाली आणि इकडे चर्चांना उधाण आले.बाई इथे राहणार,येताना रुजू व्हायला एकटीच आली.नवरा असेल का? असे शंभर प्रश्न आणि तितकीच खमंग चर्चा.

तेवढ्यात एकजण विजयला म्हणाला,"नरवणे,आता जपून.बाई नवीन आहेत."

तसा काडीने कान खाजवत नरवणे म्हणाला,"आपण कोणाच्या बापाला घाबरत नाही.ती बाई काय चीज आहे."

दुर्गाने तिच्या मैत्रिणीचा संदर्भ देऊन घर शोधले.तसेही ती आणि तिची मुलगी वैदेही दोघीच राहणार होत्या.भराभर काम आवरायला हवी.चार दिवसात परत कामावर रुजू व्हायचे होते. घर लावायला घेतले पाहिजे.आधी वैदेहीला मैत्रिणीकडून घेऊन येते.

घरी आल्यावर वैदेही म्हणाली,"मम्मा, घर छान आहे.पण आपण दोघीच राहणार.त्यात तू कामावर जातेस."


दूर्गाने लेकीला जवळ घेतले,"बाळा,मी आहे.आता तुलाही थोडे धीट बनायला हवे."


नंतर दोघी मायलेकी मस्त गप्पा मारत काम उरकत होत्या.रात्री वैदेही निवांत झोपली. आठवीत असलेली आपली लेक.आपण तिला चांगले आयुष्य देऊ शकू?उद्या मला काही झाले तर?पण लेकिकडे नजर जाताच दुर्गा शांत झाली.


चार दिवसांनी दुर्गा सकाळी कार्यालयात पोहोचली.दारात एक वृद्ध आजी बसल्या होत्या.त्यांना पाहून दुर्गा म्हणाली,"आजी,काय काम आहे?काही हवेय का तुम्हाला?"

आजी म्हणाल्या,"पोरी,आग किती चकरा मारू. हिथून कागद मिळायला."

दुर्गा म्हणाली,"बघू फाईल,मी करते तुमचं काम."

आजी म्हणाली,"नग, सायेब रागवल तुला सांगते म्हणून."

दुर्गा हसली,"आजी चला आत."

साडेदहा वाजता नरवणे आला. मस्टर दुर्गाच्या टेबलवर होते.


तो सही करायला जाताच दुर्गा म्हणाली,"नरवणे,आज उशीर झाला."


त्यावर हसत तो म्हणाला,"आज लवकर आलो.इथ आकरा शिवाय येत नाही आपण."


दुर्गा तितक्याच शांतपणे म्हणाली,"उशिरा आल्याचे कारण लेखी द्या.मगच सही करा."


तिचे बोलणे ऐकून आख्खे ऑफिस अवाक झाले.नरवणे मग्रुरीने म्हणाला,"अधीक्षक साहेबांना फोन लावतो."



दुर्गा.शांतपणे बोलली,"पुढील तीन महिने संपूर्ण कार्यभार माझ्याकडे असणार आहे."



हे ऐकताच नरवणे चरफडत जागेवर गेला.एक अर्ज खरडला आणि येऊन सही केली.


तेवढ्यात दुर्गा म्हणाली,"ह्या आजींचा कागद तयार करून आणा."


त्यावर नरवणे म्हणाला,"मला वर साहेबांकडे काम आहे.आल्यावर करतो."


दुर्गा शांत होती,"ठीक आहे,रजिस्टरमध्ये नोंदवून जा."


असे म्हणताच नरवणे जागेवर जाऊन बसला.दुर्गा हसली.पंधरा मिनिटात कागद तयार झाला.


आजी रडायला लागली,"पोरी,लई मोठं काम झालं.तुला कायबी मदत लागली सांग."


दुर्गा हसली,"आजी,माझे काम केले मी.त्याचा पगार मिळतो.जा तुम्ही."




दुपारी जेवणाच्या सुट्टीत सगळ्या महिला एकत्र बसल्या.तेव्हा सुषमा म्हणाली,"दुर्गा मॅडम आजवर नरवणे इतका हवालदिल नव्हता झाला.चांगला धडा शिकवला तुम्ही."


तेवढ्यात सौ माने म्हणाल्या,"जपून ग बाई. वशिले मोठे आहेत त्याचे."


अशी चर्चा चालूच होती.इकडे नरवणे वैतागला होता.त्याने दुर्गाची सगळी माहिती काढली.दुसऱ्या दिवशी नरवणे ऑफिसला लवकर आला.


दुर्गा आल्यावर सही करत असताना तो फोनवर सांगू लागला,"अरे दहा हजारात मुडदे पडतात आजकाल.दे सुपारी बिनधास्त."


असे म्हणून हसत निघून गेला.दुर्गाच्या काळजात चर्रर्र झाले.आपणही त्याच्याकडे दुर्लक्ष करू.पण दुर्गा कामात एकदम परफेक्ट होती.तिचे वरिष्ठांकडून कौतुक होऊ लागले.


एक दिवस तिला येताना पाहून शिंदे नावाचा क्लार्क म्हणाला,"मानेबाई पंचवीस वर्षात तुमचे कोणी कौतुक केले नाही.त्यासाठी स्पेशल काही करावे लागले."


स्पेशल शब्दावर त्याने दिलेला जोर ऐकून दुर्गाला प्रचंड वाईट वाटले.


दुर्गा नेहमी लेखी रेकॉर्ड ठेवत असे.नरवणे आपले राजकीय वजन,वरिष्ठांच्या ओळखी याचा अदृश्य दबाव तिच्याभोवती तयार करत होता.ती आपल्या लेकीचा विचार करून गप्प रहात असे.पण हळूहळू चर्चा तिच्या चारित्र्यावर ,कामाच्या पध्दतीवर घसरू लागली.त्या दिवशी नवरात्र सुरू होणार म्हणून दुर्गा सुट्टीवर होती.तेवढ्यात तिला कार्यालयातून फोन आला.तिच्याविरुद्ध एक तक्रार झाली होती.



दुर्गा सगळे आवरून ताबडतोब कार्यालयात पोहोचली.तक्रारदार आणि वरिष्ठ यांच्या समोरासमोर बोलण्यातून तक्रार खोटी असल्याचे सिद्ध झाले.दुर्गा चौकशी संपवून बाहेर पडत असताना नरवणे दात काढून हसत होता.



चौकातून चालत दुर्गा घरी येत होती.डोक्यात विचारांचे वादळ घोंगावू लागले होते.रात्रभर विचार करून दमून पहाटे ती झोपली.सकाळी लवकर उठून ऑफिसची तयारी केली.लेकीला शाळेत सोडून ऑफिसला जायला निघाली रस्त्यात गर्दी जमली होती.दुर्गा जवळ गेली.


एक गरीब बाई एका धटिंगण माणसाला मारत होती,"मुडद्या,माझ्या पोरीचा हात धरतो काय?तुझ मुंडक कापून हातात ठीविन.परत नादाला लागला तर."


दुर्गा तिथून पुढे निघाली.ती दारात असताना नरवणे म्हणाला,"आरे ती एकटी बाई काय करणार?आपले मोठे वशिले आहेत.तिलाच पळवून लावतो की नाही बघ."


तेवढ्यात दुर्गा आलेली पाहून सगळे गप्प झाले.दुर्गा जागेवर बसली.तिने शांतपणे पेन काढले.कोणाशी काहीच बोलता तिने अर्ज लिहिला आणि तहसीलदार मॅडमचे ऑफिस गाठले.


मॅडम अर्ज वाचून म्हणाल्या,"नरवणे विरुद्ध तक्रार करणे सोपे आहे.पुढे खूप त्रास होईल."


दुर्गा हसली,"माझ्याकडे पुरावे आहेत."


त्यानंतर जुजबी चौकशी सुरू झाली दुर्गाने सादर केलेले पुरावे पाहून सगळेजण अवाक झाले.हळूहळू नरवणे टेन्शनमध्ये आला.तरीही त्याने कनिष्ठ कार्यालयात राजकीय दबाव वापरून सगळ्यांना गप्प बसवले वरून दुर्गाला नोटीस आली.



आता मात्र दुर्गा गप्प बसली नाही.तिने तातडीने जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेतली.तब्बल आठ तास बाहेर बसून राहिलेल्या दुर्गाला पाहून साहेबांनी तिला आत बोलावले,"बोला,काय अडचण आहे मॅडम."


आता पर्यंत ठेवलेला संयमाचा बांध फुटला. दुर्गाने पुराव्यासह सगळी बाजू सांगितली.साहेब तिला एवढच म्हणाले,"निश्चिंत मनाने घरी जा.तुमच्यावर अन्याय होणार नाही."



दुसऱ्या दिवशी ऑफिसात एकच गोंधळ उडाला होता.नरवणे निलंबित झाला.बातमीवर विश्वास बसत नव्हता अनेकांचा.


तेवढ्यात सुषमा म्हणाली,"दुर्गा,मोठी धीराची आहेस.आजवर अनेकांनी त्रास भोगला ग."


दुर्गा हसत म्हणाली,"राक्षसांचा नाश करायला कोणत्यातरी दुर्गेला काली व्हावेच लागते."विचारांचा गोंधळ दूर झाला होता.अंधाराचे मळभ दूर सारून प्रकाश सगळीकडे पसरला होता.

सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.वृत्तपत्रात अनेकदा बातम्या येतात.त्यावरून एकदा चर्चा झाली.त्यावरून वरील कथा सुचली.आजही अनेक दुर्गा निमूटपणे त्रास सहन करतात.प्रत्येक दुर्गेत एक काली असते.गरज आहे तिला योग्य वेळी जागे करायची.