दुर्गा ... भाग 3

आर्या दुर्गा

दुर्गा..

( मागच्या भागात आपण वाचले, दुर्गा रात्री कुठूनतरी येत होती. तिला पकडण्यासाठी गुंड तिच्या मागे लागले होते. एक मुलगा तिला त्या गुंड पासून वाचवतो. घरी ती तिच्याच विचारांमध्ये झोपली असते की तिला आईचा आवाज ऐकू येतो. तिच्या आईला होणारा त्रास तिला सहन होत नाही . आणि ती विळा घेत तिच्या बापावर हमला करते. आता पुढे....)

भाग ३

वर्तमान.......

" तर, तुम्ही तुमच्या वडिलांचा जीव घेतला ?? " ... ईशान

दुर्गा विक्षिप्तपने हसली..

" घेतला असता , बरे झाले असते . पण त्या दिवशी मी त्याला मरण

म्हणजे काय असते,  हे नक्कीच सांगितले होते" दुर्गा

" म्हणजे नेमके काय ??" ... ईशान

" सांगते " ..म्हणात दुर्गा त्या रात्रीचे त्याला सांगू लागली

" ये सोड मायला " ...दुर्गा जोऱ्याने गरजली आणि हातातला विळा आपल्या बापाच्या दिशेने भिरकावला.

" दुर्गे sss" ... आई घाबरून डोळ्यांवर हाथ ठेवत ओरडली .

" आय , काय नाय झालं , डोळ उघडून बघ  "...दुर्गा

दुर्गाच्या आईने भित भितच डोळे उघडून बघितले, तर विळा त्याच्या जवळ भिंतीवर खुपसला होता. आईने रोखून धरलेला श्वास सोडला.

दुर्गाचा बाप तर थरथर कापत होता, मरता मरता तो वाचला होता.  दुर्गा असे रूप घेईल त्याला वाटले नव्हते.

" पाय ही शेवटाची चेतावनी समज, माझ्या मायला थोडं बी खरचटलं ना, तिच्या तोंडून थोडसं पण आवाज निघाला ना, तर माझ्यासारखी दुसरी कोण वाईट नाय.  आज सोडती आहे तुला , दुसऱ्यांदा सोडणार नाय . जेलात जायचं काम पडलं तरी जाईल, पण माझ्या मायला तरास द्यायचा नाय  . याद राखायाच. " ....दुर्गा आपल्या बापाला चेतावणी देत खोलीच्या बाहेर निघून आली.

दुर्गाचा तो अवतार बघून तिचा बाप पण थोडा वेळ घाबरला होता. त्याने शांत राहणेच योग्य समजले.

दुर्गा सतरा वर्षाची रांगडी मुलगी , कधी कोणाला घाबरत नव्हती, कुठल्याही परिस्थितीला अगदी बेधडक भिडायची. कारण ही तसेच होते, चींधिगाव , खेडे गाव ते, फार लोकांची काही वस्ती नाही. पण तिथे असलेल्या कापड मिल मुळे त्याला महत्व आले होते. बरीच आजूबाजूच्या गावाची लोकं तिथे कामाला येत होती. दुसरी गोष्ट म्हणजे त्या गावात तिथल्या भागातल्या आमदाराचा वाडा होता, त्यामुळे अधूनमधून गुंडागर्दी तिथे होत असायची. खासकरून निवडणुका आल्या की जास्तीच गुंडागर्दी चालायची. आमदाराची माणसं दादागिरी करायची, गावातल्या लोकांना त्रास द्यायची. गावातली काही  लोकं  आमदाराला जाऊन मिळाली होती.  गावामध्ये शेती आणि कापडाच्या मिलचे काम जास्ती चालायचे, त्यातूनच काय ती रोजीरोटी मिळायची. बऱ्याच गावकऱ्यांची शेती आमदरकडे गहाण होती, लोकं बिचारी तो म्हणेल तसे काम करायचे. दुर्गाने लहानपणापासूनच आमदाराचा,त्याचा माणसाचा होणारा छळवाद बघितला होता. त्यातच घरची, आजूबाजूची माणसांचा घरातल्या बायकांना त्रास देताना बघितले होते. ती त्याच वातावरणात वाढत आली होती. तिला दुसऱ्यांवर होणारा अत्याचार सहन होत नव्हता. त्या अनुषंगाने तिची मनस्थिती तयार होत होती.  गावात गुंडागर्दी होती असे नाही, बरीच चांगली लोकं सुद्धा होती. दुर्गा जेवढी रांगडी तेवढीच खूप प्रेमळ , दुसऱ्यांना जीव लावणारी सुद्धा होती. अडीअडचणीला मदतीला नेहमीच ती धाऊन जायची. बायकी गोष्टी, खेळ तिला कधीच आवडले नव्हते. तिला फक्त मर्दानी खेळात, शिकण्यात हाऊस असायची , आणि त्याप्रमाणे ती शिकत सुद्धा होती.

***

" माय , शाळेत जातंय , काही पाहिजे का?? येतांना घेऊन येते " दुर्गा शाळेची पुस्तक घेत ओरडत बोलत होती.

" माळ्यातून भाजी काढून आण जरासी. " आई

" ठीक आहे. आज्ये, लक्ष ठेव घराकड, आणि तुझ्या पोरास पण समजाऊन ठीव, कालच ध्यानात आहे ना? काल सोडलं त्याला, आता जर दिसला ना माझ्या मायला त्रास देताना, तर सांगून ठेवते, सोडायची नाही मी " ...दुर्गा

" हो बाई, जा शांतीने, लक्ष ठीवती म्या " ....आजी

दुर्गा शाळेत जायला निघाली.

" दुर्गे, शाळेत जातीस होय  ग ?" शेजारची कमला

" हो काकी, काही काम होत  काय??".... दुर्गा

" जाता जाता फॅक्टरीत तुझ्या काकासणी डब्बा देशील होय ग? आज लयी घाई झाली सकाळच्याला, भाकरी झालीच  नाय  पाय . देशील का डब्बा ?" कमला

" हो काकी, दे " ...दुर्गा

कमला काकिने तिला डब्बा बांधून दिला , दुर्गा ते घेऊन फॅक्टरीकडे निघाली.

" काय रे मामा, कसा हायीस?? " दुर्गा तिथल्या गार्डला म्हणाली.

" बरा हाय की, आज हिकड कुठं??? शाळा नाही का?" .... गार्ड

" आरे , हा म्हाद्या काकाचा डब्बा द्यायला आली होती, तो देते मग जाते शाळला" ...दुर्गा

" अच्छा" ... गार्ड

दुर्गा बोलून आतमध्ये गेली आणि म्हाद्या काकाला डब्बा देऊन येत होती.

" काय ग मावशे , काय झालं, उदास दिसत आहे??" ...दुर्गा  फॅक्टरी मधल्या रखमाला बोलली

" काय नाय ग बाय, लाहण्याची तब्बेत बरी नाय आज, रडत   हुता खूप, कामावर यायचं मन नव्हते, पण पगार कटल म्हणून आली, पण कामात काही मन लाग ना , काम पण नाही हुत आहे " ....रखमा

" बरं, तू जा घरच्याला, मी करते तुझवाल काम, मग नाही कटल तुझा पगार " ...दुर्गा

" पण सायेब?? आज दुसरे सायेब आले आहे बघ, चालल का नाय ?" ....रखमा

" थांब, मी विचारून येते , मग तर झालं??" ....दुर्गा

दुर्गा परमिशन घेण्यासाठी म्हणून ऑफिसकडे जायला निघाली, ऑफिसच्या दारात पोहचली होती की तिथला एक कर्मचारी  तिला विचारायला आला.

" दुर्गे, आज इथे काय काम काढलं?" सुज्या

" ते म्हाद्या काकाचा डब्बा द्यायचा होता, म्हणून आली होती. तुमच्या सायाबसोबत बोलायचं होतं?" ...दुर्गा

"  आज नवीन सायेब आले आहेत , ते काय असे कोणासोबत नाय बोलत, खूप कडक आहेत , आताच दोघा तिघावर ओरडले, अन् तुला का काम पडलं त्यांच्याकडे ?? " .....सुज्या

" अरे, ते रखमा मावशी, तिच्या पोराला बर नाही बघ आज, तर त्यांना विचारायचं होत, आजच्या दिवस मी काम करू का त? , " ....दुर्गा

" असं कुठे असते काय?? , तिच्या वाटणीच काम, असं कोनबी थोडी करू शकते?" ...सुज्या

" अरे, पण मग तिच्या बीचारीचा पगार कमी होईल, तुमचं काम पूर्ण झालं म्हणजे झाले ना?? कोण केल??,काय फरक पडतो  " ..दुर्गा

ऑफिसच्या आतमध्ये दुर्गाचा आवाज येत होता, तो तीचे  बोलणं ऐकण्यात बिझी झाला होता....तिच्या आवाजात त्याला आपुलकी,  काळजी जाणवत होती.

" रामू, काय गडबड सुरू आहे बाहेर, कोण बोलत आहे ? काही प्रोब्लेम आहे काय??" .... मालक

" साहेब, ते....ते ती दुर्गा हाये, काय काम काडल म्हणे  तुमच्याजवळ??   तुमास्नी भेटायचे म्हणते ?? " रामू

" okay, पाठव तिला " ...मालक

" दुर्गा , मालक बोलवत आहे " .... रामू बाहेर येऊन बोलला..

दुर्गा आतमध्ये येत त्याच्या समोर येऊन उभी राहिली. तो तिला पाठमोरा बसला होता.

" मालक, थोडं काम होत तुमच्याकडे?" ....दुर्गा

" ह्मम, बोला...." म्हणत त्याने खुर्ची वळवली.

" तू...????.....म्हणजे तुम्ही???" .त्याला बघून दुर्गा थोडी गोंधळली........दुर्गा डोळे मोठे करत त्याच्याकडे बघत होती. तो प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत होता...थोड्या वेळाने दुर्गाच्या लक्षात आले की आपण ओव्हर रिॲक्ट केले, कारण जरी दुर्गाने त्याला ओळखले होते तरी तो तिला कसे ओळखणार होता???  तिचा तर चेहरा पूर्ण बांधलेला होता, हे लक्षात येताच ती थोडी नॉर्मल झाली.

" माफ करा, ते चुकून निघाले तोंडातून " ...दुर्गा

" काय काम होते?" ...तो शांतपणे बोलला

" मालक, ते रखमा मावशी, तिच्या पोराला बर नाही बघा, तिला घरी जाऊ देता काय?? तिच्या जागेवर, तीच काम मी करते. कृपा करून तिचा पगार कपात नका करू" ... दुर्गा विनवणीच्या सुरात बोलली

" तू तर शाळेत जात आहे बहुतेक??" ...तो तिच्या कपड्यांवरून अंदाज बांधत बोलला.

" नाही, म्हणजे हो, म्हणजे मी शाळेतच जात होती, पण एक दिवस नाही गेली तरी चालेल, मी अभ्यास भरून काढील. रखमा काकीचे जरा महत्वाचं आहे . तेवढी एक परवानगी द्या " ...दुर्गा

" कुठल्या वर्गात शिकते? " ...तो

" बारावीत आहे यंदाच्या वर्षी " ...दुर्गा

" ह्मम, बर ठीक आहे , करू शकते काम  " ....तो

" खूप खूप धन्यवाद बघा मालक तुमचे" .... दुर्गाच्या चेहऱ्यावर त्याला आनंद दिसत होता...

" ह्मम, ठीक आहे " ...तो

दुर्गा बाहेर येऊन रखमाला घरी पाठवले नी तिचे कापड तासायचे काम करत बसली.

" अजब मुलगी आहे, काल रात्री गुंडांपासून वाचवले तर ढकलून पळाली, आणि आज दाहदा धन्यवाद म्हणत होती.  तिला वाटले मी तिला ओळखले नाही, पण मी ते डोळे कसे विसरेल....पहिल्यांदा कोणाच्या तरी डोळ्यात हरवलो होतो. दिसायला तर मोठी दिसते एकदम दणकट, पण लहान आहे , फक्त बारावी मध्ये. कोडेच आहे पण, काल गुंडे मागे लागले होते, काय करत असेल ती तिथे सामसूम रस्त्यामध्ये??? आणि ते गुंडे, ते कोण होते???, आज इथे मदत करते आहे , काहीतरी गडबड आहे , बघायला पाहिजे  " .....तो दुर्गा गेली त्या दिशेने बघत मनातच विचार करत होता.

" वाटत पण नाही ते मालक आहेत म्हणून, चांगले वाटतात, काल पण मदत केली, आज पण मदत केली, चांगला स्वभाव वाटतो. आज तर कालपेक्षा पण सुंदर दिसत होते, गोष्टीतल्या पुस्तकात वाचलं तसाच राजकुमारासारखा . पण त्यांनी मला ओळखले तर नसेल ??  नाही नाही ओळखायला नाही पाहिजे , नाहीतर खूप गडबड होईल, सगळंच फिस्कटेल . ".... दुर्गा धागे तासता तसता आपल्याच विचारात हरवली होती.

****

दुर्गा पहाटेच उठली, अजून बाहेर अंधारच होता . तोंड वैगरे धून फ्रेश झाली.बकरी जवळ येत तिला गोंजरू लागली. नंतर बकरीला सोडत बाहेर आणून  अंगणामध्ये बांधली.  बकरीची जागा झाडपुस करून  स्वच्छ केली. बकरीला चारा पाणी ठेवले. घरात येऊन चुलीवर चहा साठी आंदण  ठेवले, बाहेर अंगणात येत गवती चहाच्या पाती तोडल्या, दोन चार तुळशीची पाने घेतली,  परत चुलीजवळ येऊन बसली. पाणी उकळत होते, त्यात तिने थोडी चहा पत्ती टाकली, बाहेरून तोडून आणलेला गवताची पाती, तुळशीची पाने टाकली , आलं ठेचून टाकलं, थोडासा गूळ टाकला, आणि चहा उकळला........गरम गरम वाफाळलेला चहा स्टीलच्या ग्लास मध्ये ओतला....

" आज्ये,  चहा घे " दुर्गा आजी जवळ चहाचा ग्लास ठेवत बोलली

" का चहा बनवतीस ग ?  नुस्ता काढा...." आजी

" तब्बेत चांगली रायते, घे चुपचाप,   हे तुई तब्बेत झाक आहे ना ते ह्याच्यामुळेच ...पी आता ठंडा होईल" ....दुर्गा

" हो राहू दे, काय गोड नाय, काय दूध नाय...." आजी

"तो काय तुमचा दुधा साखरेचा चहा, अंगास लागते तरी काय ? आपले पूर्वज असाच चहा पीत होते, हा तुम्हास आवडते ना,  तो तर इंग्रजांनी सुरू केला...चांगला नसते थ्यो शरीरास.....  " ....दुर्गा

"शाळेत का जाती, मजच शिकवती" ...आजी चहाचा गलास आपल्या पदराने धरत एक एक घुट पित बडबड करत होती.

चहा पिऊन दुर्गाने वेनीफनी ठीक केली, एक मोठी काठी घेतली नि बाहेर पडली. धावत गावाजवळ असलेल्या छोट्या टेकडी वर गेली ... वेगवेगळे व्यायाम करत , स्वबचावाचे हथकांड्यांचा सराव करत  होती.

दुर्गाची रोजची सकाळ अशीच होती . दिवसभर व्यायामासाठी तिला काहीच वेळ मिळायचा नाही, पण व्यायामाची आवड खूप, गावात केले तर आयाबाया वेगवेगळ्या नजरेने बघतील, म्हणून रोज पहाटेच ती जवळच्या टेकडी वर व्यायामासाठी जायची , तिथे खूप कमी रहदारी होती, येवढ्या पहाटेला ला तर कोणीच येत नव्हते,  आणखी एक म्हणजे तिथून पूर्ण गाव दिसत होते , म्हणून तिने ती जागा तिच्या व्यायामासाठी निवडली होती. रोज सारखी आज पण ती तिथे व्यायम आणि काठी चालवण्याची प्रॅक्टिस करत होती.

दुर्गा काठी चालवायची प्रॅक्टिस करत होती की तिला जाणवले कोणीतरी तिच्यावर नजर ठेवत तिचा पाठपुरावा करत आहे . ती काठी चालवतांना , डोळ्यांच्या कोपऱ्यातून बघत किती लोकं आहे,  आजूबाजूचा अंदाज घेत  होती.
 

*******

कोण दुर्गाचा पाठलाग करत आहे आणि का??? 

क्रमशः..

कथा कशी वाटते आहे आपल्या कॉमेंट्स मधून नक्की कळवा. 

🎭 Series Post

View all