Jan 26, 2022
सामाजिक

दुर्गा ... भाग 30

Read Later
दुर्गा ... भाग 30

दुर्गा 30

 

मागच्या भागात : दुर्गा , आर्या आणि दुर्गाची आई दुर्गाच्या गावी चींधिगाव येथे पोहचतात. 

 

आता पुढे : 

 

भाग 30

 

          दुर्गा आर्याची गाडी गावी मध्ये चौकात येऊन थांबते. मोठी गाडी बघून छोट्यांसोबत मोठे पण भारी उत्साही झाले होते . अगदी गाडी भोवती घोळका करून उभे होते. छोटे मुले तर गाडीला हात लाऊन बघू दे , नेम प्लेट वर बोटं फिरवू दे , असे काय काय त्यांचे खेळ सुरू होते. आणि मोठे तर दुर्गा कडेच बघत होते . जेव्हापासून तो इन्स्पेक्टर पाटील दुर्गाला सल्यूट करून गेला होता , तेव्हा पासून तर गावकरी सगळेच शॉक झाल्यासारखे तिच्याकडे बघत होते . 

 

" इस्पेक्टर पाटील ला तुमची ओळख का सांगू नाही दिली ?", दुर्गा आर्या ला म्हणाली.

 

" तुझा दिवस आहे , बघ सगळे किती आनंदात आहेत, त्यांच्या दुर्गाला पोलीस झालेले बघून …. ", 

 

" हा , पण …." 

 

" मला तुझ्या नावाने ओळखले तर खूप आवडेल हा ", आर्या 

 

" काय ?", दुर्गा 

 

" तो पहा दुर्गीचा नवरा …. अस्स ", आर्या

 

" होणारा …..", दुर्गा 

 

" काय फरक पडतो होणारा की झालेला….", आर्या हळूच तिच्याकडे बघत एक डोळा मारत म्हणाला . एवढया गर्दीत , सगळे असताना आर्या चे वागणे बघून दुर्गाचे डोळे मोठे झाले, तसे त्याने तिला एक स्मायल देत पलीकडे बघितले. 

 

" बाई बाई….. बाई दुर्गे , तू तर त्या पिक्चर मधल्या हिरोईनी सारखीच दिसती की ग … " 

 

" शहराची हवा च आशी आस्त्ये नाही … कशी चिकणी चिकणी दिसते " 

 

           बायका अगदी तिच्या भोवती गोल गोल फिरत तिला बोलत होत्या. दुर्गाला त्यांचं असं बघणं खूपच मज्जा येत होती . 

 

" कमळे , खरंच दुर्गी पोलीस झाली का ? पण बाईमाणूस कसं काय पोलीस हू शकते ? नाय म्हणजी माणसाच्या जातीला पकडाया कसं जमते ? चोर बिर तर शक्तिशाली अस्त्यात ?" 

 

" काकी , आता स्त्री पुरुषांपेक्षा कुठेच कमी नाही आहे . आता असे कुठलेच काम नाही जे पुरुष करू शकतात आणि स्त्रिया नाही… आणि शूरवीर स्त्रियांचा तर मोठा इतिहास लाभला आहे आपल्या भारताला , झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची शौर्यगाथा माहिती आहे ना … दुर्गा तर आजची स्त्री आहे आणि आजची स्त्री कुठेच मागे नाही फक्त करण्याची जिद्द हवी , आणि तुम्हाला घरच्यांचा सपोर्ट असेल तर खूपच उत्तम ", आर्या 

 

          तिथल्या महिला मंडळाच्या सगळं बोलणं डोक्यावरून जात आहे असे त्यांचे हावभाव वाटत होते . 

 

" हे साहेब कोण म्हणायचे ?", सूमी

 

" हे … , हे आपल्या दुर्गीचे होणारे मालक हायेत !", कमळा 

 

" काय ? दुर्गीचा नवरा ? पण ते तर ….." 

 

" काय ?....ते तर काय?." 

 

" सुमे, आपण नंतर बोलू , दुर्गे घरी चाल की , तूयी आज्जी वाट बघत असल !", दुर्गाच्या आईने मध्येच बोलणं थांबवले , आणि दुर्गाला घेऊन घराकडे निघाली. 

 

" अरे अरे , आमचं बोलून , भेटून नाय झालं आजुन ", शालू 

 

" हो हो , आमाला बोलायचं हाय अजून " 

 

" शालू मावशी , सांजच्याला जेवण झाल्यावर ते मंदिराच्या आवारात भेटू सगळे. मला पण खूप गप्पा करायच्यात , या सगळे , मस्त आरामात बसू ", दुर्गा 

 

" हो हो …. चालल की " , घोळक्यातून आवाज आला . 

 

कमळा , दुर्गा आणि आर्या पायी पायी तिच्या घराकडे जायला निघाले. 

 

" माय , ते सुमी काकी काय म्हणत होती , दुर्गा तर …., तू पुढे बोलू नाही दिले ", दुर्गा 

 

" ते …. ते काय नाय , असाच ", कमळा

 

" सांग लवकर काय झालं ते ?", दुर्गा 

 

" तू अचानक गायब झाली इथून , तर गावात पसरलं की तू कोण्या पोराबरोबर पळून गेली ", कमळा

 

" काय ? पण तू बोलली होती म्हणूनच मी पळून गेले होते ना ", दुर्गा 

 

" हो , पण मी कोणाला काय सांगू नाय शकत होती , अन् थे लोकं तुझा पिच्छा करत होते , त्यात तुझ्या बापानं पण माझा जीव घेतला असता कर म्या तुला पळवलं सांगितले आसते त ", कमळा 

 

" हो पण मग लोक काय काय बोलले असेल तुला , काय दुसरं सांगायचं असते ", दुर्गा 

 

"त्या लोकांनी तुझ्या बापाला लय मारलं , सोवतचा जीव वाचवा साठी त्यानेच सांगून दिलं तू पळून गेली म्हणून ", दुर्गाची आई 

 

" हा बाप नाय कसाई आहे , माय तुला त्रास देतो अजूनही ?", दुर्गा 

 

" सोड ते , आजी लय वाट पायते तुई , आठवण बी लय काढते , पण मी त्याईस तूयाबद्दल काय नाय सांगू शकत होती , जा भेट आधी ", दुर्गाची आई घर जवळ आले तसे म्हणाली . 

 

 

" आज्जी ………….", आवाज देत दुर्गा पळतच घरात गेली … 

 

 

" दुर्गी …… माही दुर्गी ….. दुर्गी आली …. ", स्वतःच बडबडत आजी झोपल्या जागी उठून बसत दाराकडे सरकत होती, बघते तर दारात दुर्गा उभी होती . 

 

 

" माही दुर्गी आली ….. ", त्या सुरकुत्या पडलेल्या गलांवरून अश्रू ओघळले … त्या अश्रू भरल्या डोळ्यांमध्ये सुद्धा आपली नात बघून झालेला आनंद स्पष्ट दिसत होता . 

 

" आज्जे ….", ओरडतच दुर्गा आपल्या आजीच्या कुशीत विसावली. आजीने पण मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. 

 

" काय आज्जे , खात पित नाय वाटते बरोबर , बुढी दिसत हाय तू ?", दुर्गा 

 

" हे तुई माय , आजुन परंत तिच्या हाताला चव नाय आली , सारं ते आळणी जेवण बनवते ", आजी ठसक्यात बोलली . 

 

" हा हा हा , तू अजून पण तशीच हाय ना , माया मायलेच कोस हा ", दुर्गा 

 

" हो , कोणत्या घटकाला सून बनवली म्या हिला … काय सुख नाय देऊ शकली पाय ! निस्ता मारझोड करे तुआ बाप तिला , म्या आधीच अडवले आस्ते तर पोरीची अशी हालत नसती व पोरी , अन् तूज बी असं आपलाच घर सोडून जावं नसते लागले . माहीच चूक होती सारी ", आजी बोलता बोलता भाऊक झाली. 

 

" आज्जी , जे झालं ते झालं , आता आपण ते बदलू शकत नाही . सोड आता ते ", दुर्गा

 

" आत्याबाई , जुन्या गोष्टी सोडा , अन् जे होते ते चांगल्यासाठीच होते बघा , तुमची दुर्गी मोठी इन्स्पेक्टर झाली आता ", आई घरात येत बोलली . 

 

" का म्हणते , दुर्गी पोलीस झाली ?", आजी आपल्या तोंडावर हात ठेवत बोलली. 

 

" हो आजी , एकदम मोठीवाली , तिच्या हाताखाली पोलीस काम करतात ", मागोमाग आर्या पण घरात येत बोलला. 

 

" हो व माय , माही दुर्गी होतीच रांगडी ! मालक या बसा ! ", आजी 

 

" आज्जे , तू ओळखलं यांना ? बाहेर कोण नाय ओळखलं ", दुर्गा 

 

" म्हातारी झाली म्हणून का झालं , नजर मायी आजुन बी चोख हाये . हिकडं ये , एक मज्जा सांगते ", आजीने दुर्गाचा कान जवळ घेतला. आई आर्या पण कौतुकाने त्या दोघींकडे बघत होते . 

 

" मालकास तुझ्यावर लय माया हाय बघ ", आजी हळूच तिच्या कानाजवळ बोलली , तशी ती शॉक होत आजीकडे बघत होती . 

 

" समजली नाय का….? म्हंजी तू त्यांना लय आवडती …. तेव्हा पासून ", बोलता बोलता आजीलाच लाजल्या सारखं झालं , ती तोंडावर पदर धरत हसली. 

 

" तू का लाजती ..? आजा आठवला की काय तुला ? ", दुर्गा पण आजीची मस्करी करू लागली. 

 

" काय बी बोलते !", आजीचे गाल गुलाबी झाले , तिला हसू येत होते. 

 

 

" त्यांना सांगू का , तुला लय आठवण येती , तर घ्यायला या !", दुर्गा 

 

" पंतू चं तोंड पायल्यावर जायेल मी , काय घाई नाय , वाट पायातील ते ", आजी 

आजीचे बोलणे ऐकून दुर्गाने डोक्यावर हात मारला . 

 

" मालक , माह्या दुर्गीला नवरी बनवून नेता काय ? नाय म्हणजी थोडी इपित्तर... नाय म्हणजी जास्तच द्वाड हाय , पण संसार नेटका करल ", आजीने डायरेक्ट विचारून टाकले. 

 

दुर्गा आणि आई एकदम शॉक , आजी रॉक….

 

" मी इपित्तर ?", दुर्गा तोंड डोळे दोन्ही मोठे करत आजी कडे बघत होती , आर्या ला मात्र खूप हसू येत होते . 

 

" हो आजी , खूप बदमाश आहे , काही झालं की चाकू दाखवते आणि हातपाय तोडायची धमकीच देते , कशी करू हिला नवरी आता , तुम्हीच सांगा ?", आर्या बिचारा चेहरा करायची अक्टिंग करत म्हणाला. 

 

" काय ? मी बदमाश काय ?", दुर्गा उठत आर्या जवळ आली ..

 

" हे बघा , कशी करते आहे ? तुम्ही सगळे असून अशी धमकी देते , एकट्यात माझ्या बीचाऱ्याचे काय हाल करेल ?", आर्या 

 

 

" ओ नौटंकी , नाटक पुरे हा आता . आजी हे पण काय कमी बदमाश नाही ", दुर्गा 

 

"मग तर जमलंच की , दोघंही इपित्तर इपित्तर … देवालाच काळजी रायते पा ", आजी 

 

"लग्न जमल्याच्या खुशीत , दुर्गे जा मस्त तुया हातचा चहा टाक ', आजी 

 

" तरी म्हणत होतो , ही दुर्गा गेली कोणावर , आता समजलं ", आर्या दुर्गाच्या कानात म्हणाला, तसे तिला हसू आले , " माझी आजी आहे , काय ऐकून घेणार नाय " हळूच म्हणाली 

 

" मी टाकते !", आई

 

" गप ए कमळे , आधीच रोज तो तसा चाय पाजून माही हे असी हालत केली , दुर्गे तू कर , मस्त गवती पात, आलं , तुळशी टाकून , रोज सकाळच्याला देत होतीस , तसा ", आजी 

 

" पण तुला नव्हता आवडत ना , काढा करती म्हणून ओरडत होती ", दुर्गा 

 

" पण तूच म्हणलं होतं नव्हं , तसाच चहा अंगा साठी चांगला अस्तये म्हणून , पाय तू गेली अन् माही तब्बेतच बिघडली , आता तू आली न, आता पाय टणक होते की नाय !", आजी 

 

" बरं बरं , टाकते मी ", दुर्गा .

 

     सगळे फ्रेश झाले. गप्पा गोष्टींमध्ये जेवण सुद्धा आटोपले. आजीला तर किती बोलू अन् किती नको असे झाले होते . शेजाऱ्या पाजाऱ्याचा , कोणत्या कोणत्या नातेवाईकांच्या शोधून शोधून गोष्टी सांगत होती. दुर्गा पण तेवढयाच उत्साहाने साथ देत होती..

 

" कुट हाय दुर्गा , आता जित्ता सोडणार नाय तिला ", दुर्गाचा बाप जोराने दारावर लात मारत ओरडत घरात आला. 

 

" माझी अब्रू घालून पडाली , आता सोडत नाय तुला ", म्हणत त्याने समोर बसलेल्या दुर्गावर हात उचलला , पण तेवढयात तिने तो अडवत चांगला जोरदार पकडला. 

 

" (शिव्या) ***** , बापाचा हात पकडते ? थांब तुझा माज उतरावतो , उद्याच बोलावतो त्या रेड्यांना , घेऊन जातील अन् तुझी सारी मस्ती उतरवल , तेव्हा समजेल ", दुर्गाचा बाप 

 

   ते ऐकून आर्या रागाने चांगलाच गरम झाला होता. दुर्गा साठी काढलेले अपशब्द त्याला अजिबात सहन झाले नव्हते . त्याचा हात उठला होताच की दुर्गाने त्याला इशारा केला , तसा तो आपल्या जागी शांत बसला. 

 

" बाप नावावर श्राप आहेस तू . उगा माझ्या नादी लागू नको , जितेजी तुला नर्क दाखविल ! ", दुर्गा त्याचा हात झटकत म्हणाली. 

 

" (शिव्या ) ****** , तू घेऊन आलीस हिला परत , तुलाच घरा बाहिर काढतो आधी ", म्हणत त्याने दुर्गाचा आईचा हात पकडला आणि ओढत दाराकडे भिरकावले, तशी तिचे आई दारावर आपटली 

 

" ये ssssss !", दुर्गाने आपला उलटा हात त्याचावर उचलला तसा तो पलीकडे जाऊन जोरदार आदळला. 

 

" तू सुधारायचा नाय नालायक माणसा , जेल ची हवा खाशील म्हणजे डोकं ताळ्यावर येईल ! ", म्हणत तिने आपला मोबाईल काढला , पोलीस स्टेशन ला फोन लावला , आणि आपल्या बापाच्या विरोधात कंप्लेंट नोंदवली. थोड्या वेळात दोन हवालदार आले. 

 

" हे घर आजीचे आणि मायचे आहे , तुझा यावर काय अधिकार नाही , राहायचं असेल तर शांती ने राहायचं , नाही तर गाठ माझ्याशी आहे … आता राहून ये तिकडे , म्हणजे समजेलच " , दुर्गा कडाडली. 

 

" चोप द्या चांगला , एवढा की दूर दूर पर्यंत , गावच्या वेशीच्या बाहेर सुद्धा लक्षात राहिले पाहिजे, बायको वर हात उचलणे अन् आपल्याच पोटच्या पोरीला विकणे याची किती मोठी शिक्षा होते ", दुर्गा 

 

" पण पोरी …..", आई

 

" माय , सुधारणा करायची सुरुवात आपल्या घरापासून केली जाते … आधी घर , मग समाज आणि देश ! काळजी नको करू , चांगल्या गोष्टी शिकून येईल तो , अन् नाय जमलच तर मी आहे मग शिकवायला ", दुर्गा 

 

ते हवालदार दुर्गाच्या बापाला घेऊन गेले. 

 

" चला माझ्या बापाचं तर झालं , आता गावातल्या प्रत्येक पोरीच्या बापाला चांगले धडे द्यायची वेळ आली . 

 

        जेवण वगैरे आटोपून गावातील सगळे मंदिराच्या परिसरात जमले होते . दुर्गा , आर्या , आई आणि आजी सुद्धा तिथे पोहचले. जसे काही मोठा एखादा कार्यक्रमच योजला आहे , असा अख्खा गाव तिथे जमा झाला होता . शेवटी गावात सगळ्यांची लाडकी होती दुर्गा , त्यात पोलीस झाली होती , काही लोकं नाराज सुद्धा होती तिच्यावर..सोबतच बरेच प्रश्न होते , सगळे तिथे जमले होते . दुर्गाला तिथे तिची बेस्ट फ्रेंड मंदा दिसते . 

 

" मंदी , कशी आहेस ? बापरे पण पण सुकली का दिसते आहे ? तुझं लग्न पण झालं ? " ,दुर्गा चौकशी करते . मंदा तिला थोडी नाराज नाराज वाटत होती. 

 

" सगळं तुझ्यापाई … तुझ्यामुळे माझ्या बा नं माझं लग्न लवकर करून दिले. " , मंदा

 

" मी ?, मी काय केले ?", दुर्गा 

 

" तू गेली ना पळून कोणत्या मुलासोबत , तुला पाहिजे तसं जगासाठी . मी तुझी जवळची मैत्रीण, मला पण तुझा वाण लागला असेल , मी तुझ्यासारखीच पळून जाईल , घरची अब्रू काढेल , म्हणून जो पाहिले भेटला , पंचवीस वर्षांनी माझ्या पेक्षा मोठ्या माणसासोबत माझं लग्न करून दिल ! त्या माणसानं माझ्या शरीराचा खेळ केला , चिरडून फाडून टाकलं , दारूच्या व्यसनापायी मेला पण . पांढऱ्या पायाची म्हणून सासरच्यांनी हाकलून लावलं ", मंदा 

 

" तुझ्यामुळे गावात किती मुलींचे आयुष्य खराब झाले… आता कोण जबाबदार यासाठी ?", मंदा 

 

         ते सगळं ऐकून दुर्गाच्या डोळ्यात पाणी जमू लागले, तिला खूप वाईट वाटत होते. बाकी काही लोकं तिला तिच्यावर नाराज दिसत होते. 

( गावाकडे , किंवा आपल्या समाजात , घरात असेच बघायला मिळते , एकाने चूक केली की ती बऱ्याच लोकांना भोगावी लागते , खास करून ते जर मुलीच्या बाबतीत असेल तर …. हीच शोकांतिका आहे ) 

 

 

" म्हाद्या काका , तो …. तो ", एक मुलगा तिथे धावत येत काही सांगू लागला. ते ऐकून सगळेच घाबरले . 

 

*****

क्रमशः 

 

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️