Jan 27, 2022
स्पर्धा

दुर्गा ... भाग 2

Read Later
दुर्गा ... भाग 2

दुर्गा ....

©️®️ मेघा अमोल ( राधिका ) 

भाग  2

 

(...पहिल्या भागात आपण बघितले की दुर्गा, जी तीन  वर्षापासून जेलमध्ये शिक्षा भोगते आहे,  ती कुठल्याच वकीलाबरोबत तिच्या केसबद्दल बोलायला तयार नसते. अडवोकेट ईशान , जो एक वर्षापासून  दुर्गासोबत बोलायचा प्रयत्नात असतो , तो शेवटी तिला बोलते करण्यात सफल होतो. आता बघुया पुढे .....)

 

" बोला वकील साहेब , काय जाणून घ्यायचे आहे तुम्हाला ?   " ...दुर्गा

 

" सगळंच , अगदी सुरुवातीपासून , तुम्ही या प्रकरणात कश्या फसल्या , ते सगळंच " ... ईशान

 

" तुम्ही या केसमध्ये इतका इंटरेस्ट का घेत आहात ? मला नाही वाटत यात तुमचा काही फायदा होईल.  मला जी शिक्षा हवी होती ती मला मिळाली  आहे " ....दुर्गा

 

" मॅडम, यात माझा फायदा आहे की नाही,  ते तर वेळच ठरवेल , तुम्ही मला तुमच्या बद्दल सांगा ." .... ईशान

 

" ह्मम " ...दुर्गा

 

दुर्गा बोलायला सुरू करणार तेवढयात ईशानने त्याच्या बॅगमधून रेकॉर्डर काढले,  ऑन करत दुर्गा समोरे ठेवले. त्याला तसे करतांना बघत  , दुर्गा  भुवया उंचावत त्याच्याकडे बघत होती. तिचे तसे बघण्याने ईशान समजयचा ते समाजाला आणि त्याने ते रेकॉर्डर ऑफ करत  बॅगमध्ये वापस ठेऊन दिले.

 

" That's better , Okay ! माझ्या आयुष्याची खरी सुरुवात होते "आर्या" पासून . " ....दुर्गा

 

"  " आर्या ?" तुमची मैत्रीण?? " .... ईशान

 

" नाही,  माझी  "life line, माझं आयुष्य, माझं सगळं काही .   आर्या मुलाचं नाव आहे  " ....दुर्गा

 

" हे कसे नाव?? हे तर मुलीचे नाव वाटते " .... ईशान

 

ईशानचे बोलणे ऐकून दुर्गाला भूतकाळातले काही आठवले, नी आपसूकच तिच्या चेहऱ्यावर हसू आले.

 

" तो पण हेच म्हणायचा , " डूग्गु , हे असे कसे नाव दिले मला तू  , मुलीसारखे , कसे वाटते ते " ...दुर्गा हसतच बोलली.

 

" डूग्गु ??? , हे तर अजूनच भारी आहे " ... ईशान

 

" हो ना, मी त्याला तेच म्हणाले, मी तरी चांगलं नाव दिलेय, हे डूग्गु फुग्गु कसे वाटते आहे? तर तो म्हणायचा " आता दुर्गा इतके छोटे नाव आहे, प्रेमाने काय बरं हाक मारायची??? " , आणि मग त्याने माझे नाव डूग्गु ठेवले , त्याचं नाव आर्यवीर, तो म्हणाला सगळे त्याला वीर म्हणतात, म्हणून मग मी आपले माझे माझ्या आर्यवीरचे नाव ' केले , तसाही तो खूप सुंदर आहे "...  दुर्गा

 

" सुंदर ? " ... ईशानने एक भुवई उंचावत दुर्गाकडे बघितले , दुर्गाला त्याचे चेहऱ्यावरचे भाव कळले.

 

" अरे हो , मुलं सुंदर कशी असणार ना??... ते काय म्हणतात तुमच्या भाषेत " Hot & handsome " , तसाच आहे तो " ...दुर्गा

 

" Great , सारखे आहात तुम्ही दोघं ." ... ईशान

 

" नाही, काहीच सारखं नाही, दोघंही पूर्णपणे वेगळे, तो दिसायला एकदम राजकुमार, मी एकदम रानटी . तो शांत,  मी धडपडी ,बडबडी .  फक्त एक गोष्ट सारखी आहे , आर्या आणि मी खूप महत्वाकांक्षी आहोत , खूप स्वप्न बघायची, आणि ती पूर्ण करायला त्याच्या मागे लागायचं . मी फक्त स्वप्न बघायची , पण स्वप्न पूर्ण करायला त्याने शिकवले ." ,

 

बोलता बोलता दुर्गाच्या डोळ्यांसमोर तो काळ जसाच्या तसा उभा राहिला .

 

"  या सगळ्याला सुरुवात होते चींधिगाव , माझं गाव . " ...दुर्गा

 

"चींधिगाव???" .... ईशान कसेतरी तोंड करत तिच्याकडे बघत होता.

 

ईशानचा तसा प्रश्नार्थक चेहरा बघून तिचे ओठ सुद्धा रुंदावले.

 

" हो , थोड अजब नाव आहे ,चींधिगाव नाव  कसे पडले  माहिती नाही, पण तिथे  कपड्यांचे कारखाने , उद्योग चालतात ." दुर्गा

 

" त्या रात्री मी ....." सांगत असताना दुर्गा भूतकाळात गेली.

 

" सा** , अशी कशी निसटली,  पकडा रे तिला, नाहीतर आपली काय खैर नाय , साहेब फोडून खातील आपल्याला ".... एक माणूस, त्याच्या सोबत चार लोक , गुंडच होते ते , हातात लाठी, सुरा घेऊन जंगला जवळच्या रस्त्याने, एक १७-१८ वर्षाची धडधाकट मुलगी जिने तिचा चेहरा लाल पंचाने पूर्णपणे बांधला होता , फक्त डोळे तेवढे उघडे होते, तिच्या मागे , तिला पकडायला पळत होते .

 

रात्रीचे दहा साडेदहा वाजले असतील, खेडं  गाव ते , चर्र काळोख,  सगळीकडे सामसूम, रातकिडे तेवढे किर्र किर्र होते. काळा सलवार कुर्ता , काळी ओढणी खांद्यावरून घेत पोटाजवळ घट्ट बांधलेली, चेहरा आणि डोकं लाल पंचाने बांधलेले , अनवाणी पाय , एक सतरा अठरा वर्षाची  मुलगी  गावाबाहेरच्या जंगल जवळच्या रस्त्यातून पळत होती ,  पाच हट्टेकट्टे गुंड तिला पकडायला तिच्या मागे पडले होते . ती मुलगी पुढे पुढे , गुंड मागे मागे,  असे पळत होते . पळता पळता रस्त्याने एक वळण आले, मागचा रस्ता दिसेनासा झाला, तसेच कोणीतरी तिच्या तोंडावर हात ठेवत, दुसऱ्या हाताने   तिचा हाथ पकडत तिला बाजूला असलेल्या झुडपामध्ये ओढून घेतले . अचानक रस्त्यावर ती  दिसेनाशी झाली ,तसे ते गुंड शिव्या देत तिला शिकाऱ्यासारखे शोधायला लागले ..

 

ती  त्याच्या विखळ्यातून सुटायचा प्रयत्न करत होती .  तिची खूप हालचाल , धडपड सुरू होती, पण त्याची पकड इतकी घट्ट होती की तिला त्याचापासून सुटता येत नव्हते. तिची हालचाल बघून त्याने तिला आपल्या एका हाताने आपल्या जवळ घेत अजूनच घट्ट पकडले.

 

" श sss , शांत रहा थोड्या वेळसाठी , ते लोकं इकडेच येत आहेत त्यांच्या जवळ बंदुका आहेत  " ....म्हणतच तिला तसेच पकडुन उचलत, एका क्षणात  एका झोपडी जवळ एक झाड होते , त्यामागे घेऊन गेला , तिला झाडाला टेकवत , तिच्या तोंडावर हाथ ठेवूनच , झाडाच्या आडून त्या गुंडांना बघत होता. ती गुंड तिथे येत त्यांनी  जवळची झोपडी चेक केली , आजूबाजूला पण चेक केले .

 

" टाल्या , इथं नाय कोणी , चकमा देऊन पराली ते "

 

" असं नाय होऊ शकत, असल इथच कुठे , शोधा बराबर , नाय तर आज साहेब सोडायचे नाय , सगळं माहीत झालं असेल  त्या पोरीला . आपला जीव प्यारा असाल तर हुडका तिला " ... टाल्या

 

परत ते गुंड तिला शोधायला लागले .

 

तो इकडे तिकडे बघत तिला आणि स्वतहाला त्या झाडाच्या मागे लपवत,  गुंडाकडे अधून मधून बघत होता. बघता बघता त्याची नजर तिच्या डोळ्यांवर गेली, ती शांत एकटक त्याच्याकडे बघत होती .काळाकुट्ट अंधार, त्यात चंद्राचं थोड चांदणं पडले होते, त्या चंद्राच्या प्रकशात त्याच्या चेहऱ्यावरचे तेज ती बघत होती. गोरा रंग, काळे पाणीदार डोळे, वन साईड भांग पडलेले साईड ने बारीक केस, सरळ नाक , क्लीन शेव, ओठांवर गूढ हास्य ,  ती त्याचा चेहरा टिपत होती.  धावल्यामुळे तिला थोडा दम लागला होता.   ती थोडी जोराने श्वास घेत होती.   तिचे ते तपकिरी डोळे, आता तो पण तिच्या डोळ्यात बघायला लागला होता . तिचे  हृदय जोरजोराने धडधडत होते , तिची धडधड  त्याला पण जाणवत होती .  त्याने तिच्या तोंडावरून आपला हाथ काढला , तसे तिला हायसे वाटले , आणि तिने मोकळा श्वास घेतला. अचानक तिचा किंचितसा आवाज झाल्यामुळे गुंड त्यांच्या दिशेने यायला लागले, तसे त्याने परत तिला पकडून घेत ,तो झटकन खाली झुडपामध्ये बसला . ती मान खाली घालून होती , तिच्या कपाळाचा स्पर्श त्याच्या मानेला होत होता. त्याने एकदा तिच्या कडे बघितले आणि परत गुंडवर नजर फिरवली.

 

" पक्या , कोणी नाय  इथे , चला तिकडे , खूप दूर नसेल गेली." ...म्हणतच ते सगळे गुंड रस्त्याकडे जात , पुढल्या दिशेने गेले .

 

"गेले ते " ..त्याने सुटकेचा श्वास सोडला . ती मात्र त्यालाच बघत होती.

 

" कोण होते ते?  त्यांच्या दिसण्या आणि वागण्यावरून तरी ते गुंड वाटत होते ? तू कोण आहे, आणि इथे रात्रीची एकटी काय करत आहे ?? " ...त्याचे प्रश्नांवर प्रश्न सुरू झाले .

 

ती काहीच बोलत नाही बघून तो तिच्या चेहऱ्यावरचा पंचा काढण्यासाठी आपला हाथ पुढे करत होता. त्याचा हाथ जवळ येताना बघून तिने त्याला धक्का देत त्याला दूर ढकलले , नी उठून त्याच्यावर एक नजर टाकत तिथून पळून गेली.

 

" अजीब मुलगी आहे, त्या गुंडपासून तिला वाचवले तरी no thank you , वरतून मलाच धक्का मारून पळाली " ...तो मनातच विचार करत तिथून गावच्या दिशेने निघाला.

 

लपत छपत  पळत दुर्गा  तिच्या घरी पोहचली. घर कसले,  मातीचे असे ते झोपडीवजा घर होते . दोन खोल्या, मातीच्या भिंती, वरती टीनाचा पत्रा , बाहेर पडवी , समोर मातीच छोटे शेणाने सारवलेले अंगण , पडवीत एका कोपऱ्यात बांधलेल्या दोन शेळ्या .

 

ती हाथ पाय धूवून गुपचूप घरात आली आणि एक गोधडी अंथरूण , चादर अंगावर घेत  झोपली. झोप कशाची येते तिला, ती जे बघून आली होती त्याचाच विचार करत होती, ते आठवत तिला अजूनच राग येत होता. ती तिच्या विचारात गुंतली होतीच की तिला ओरडण्याचा, किंकळण्याचा  आवाज आला.  ती ताडकन उठून बसली. ती त्या आवाजाने कासावीस झाली होती .  आता तिचा राग अनावर होत होता . ती ताडकन उठली , तिने तिथेच कोपऱ्यात ठेवलेला विळा उचलला ....

 

" दुर्गी , झोप गपगुमान , त्याईचा नवराबायको मामला हाय थो , आपण मंधी नाय पडायचं " 

 

" आज्ये , हे रोजचंच झाल आता, याचा सोक्षमोक्ष लावतीच की नाय पाय तू "

 

" दुर्गी , तुज सांगितलेले समजत नाय काय??  म्हणलं न व म्या , त्यांच्या मंदी आपण नाय पडायचं, त्यांचा थे पायतील "

 

" आज्ये ते माझी माय हाय, मी सोडायची नाय त्याला आता "

 

" त्याची लग्नाची बायको हाय थे, तो कायबी करू शकतो तीच्यासंग, मारेल नाय तर चटके देईल , थे बायको हाय त्याची , थे भोगल "

 

" आज्ये, एक बाई असून तू अशी बोलते ?? बाईच दुःख बाईला नाय समजत .  तुझ्या पोराचे किती पाप डोळ्यामागे लपवाशिल ?? माझ्या मायच्या हाथून काही चुकलं असतं तर आतपरी तिच्या हाथ तोडून ठेवले असते तू ?  हे कायचे पोराचे प्रेम हाये तुझं  ?? तू बी तेच भोगली , आता सूनेस बी तेच भोगास लावते ?? पहिल्याच दिवशी थो असा वागला, तेव्हाच त्याचा कणपटीत एक जोराची लावली असती ना , तर आज हे वेळ नसती आली . "

 

" तुझा बाप हाये थ्यो "

 

" तो माझा बाप नाही, तो माझ्यासाठी तेव्हाच मेला जेव्हा त्याने काही पैशासाठी माझं त्या बुड्या सोबत लगन लावाया निघाला होता "

 

" बायको हाये थे त्याची ,  नवरा जे म्हंत्ये ,तेच करा लागते , झोप तू गुमान "

 

" आता ते फक्त त्याची बायको नाय हाये, माझी माय बी हाय, अन् आता हे घरामंदी चालणार नाय " 

 

" समाजसेवा कराची खूपच आग तुज , याच्या त्याच्या लफड्यात तोंड खुपसत असतीस "

 

" हो, जे चूक हाय ते चूक हाय, बायको म्हणजी तुमच्या हातचं खेळण होय काय?? मनात यील तस खेळाल ?? अन् समाजसेवा तर करीलच , सुरवात घरापासूनच करती की नाय बग  "

 

दुर्गा ने विळा हातात घेतला आणि ओरडतच खोलीकडे निघाली  .

 

बहुतेक रोजच रात्री दुर्गाचा बाप दारू पियुन यायचा , आणि  दुर्गाच्या आईला पैश्यावरून,  कधी कामावरून,  तर कधी त्याच्या शारीरिक वासनेवरून मारझोड करायचा . पट्ट्याने, कधी चपलेले मारायचा,  तर कधी बिडीचे चटके चटके द्यायचा . तिचा तो इतका शारीरिक छळ करायचा की तिला तो सहन होत नव्हता , आणि कितीही दाबून ठेवलेले आवाज कधीना कधी बाहेर पडायचे .

 

दुर्गा , आता मोठी झाली होती , तिला आता या गोष्टी कळायला लागल्या होत्या . रोज रोज तिच्या आईला होणारा त्रास तिला बघवत नव्हता .आईच्या किंकाळ्या तिला असह्य होत होत्या . आईसोबत बोलून बघितले पण काही फायदा झाला नाही . कधी असा राग आला तर आजी तिला अडवायची . तरीसुद्धा तिने या दोघींना न जुमानता दोन तीनदा तिच्या बापाला मारायची धमकी दिलीच होती , तरी सुद्धा तिचा बाप तसाच वागत होता . 

 

आज मात्र तिचा राग अनावर झाला होता आणि ती बापावर धाऊन गेली ... ओरडतच तिने दारावर लाथ मारली, तसे ते तकलादू दार उघडले.

 

" ये सोड माय ला " ...दुर्गा जोऱ्याने गरजली आणि हातातला विळा आपल्या बापाच्या दिशेने भिरकावला.

 

" दुर्गे sss" ... आई घाबरून ओरडली .

****

 

वर्तमान.......

 

" तर, तुम्ही तुमच्या वडिलांचा जीव घेतला ?? " ... ईशान

 

दुर्गा विक्षिप्तपने हसली..

*******

दूर्गाने काय बघितले असेल?? कोण  होते ते गुंड?? का तिच्या मागे लागले होते??? कोण होता तिला वाचवणारा तो?? कोण आहे आर्याविर?? दुर्गाने तिच्या बापाला मारले म्हणून ती जेल मध्ये होती काय ????  जाणून घेण्यासाठी वाचत रहा ' दुर्गा ' ...

*******

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️