दुर्गा ... भाग 19

आर्या दुर्गा

दुर्गा 19

दुर्गाची आणि  गीताची चांगली मैत्री झाली होती . दोन-तीनदा दुर्गा तिच्या घरी सुद्धा जाऊन आली होती . दुर्गाच्या चाळीतल्या काही बायकांना गीताची आई ओळखत होती , त्यांच्याकडून दुर्गा चांगली मुलगी आहे हे त्यांना कळले होते,  त्यामुळे गीतासाठी  सेल्फ डिफेन्स क्लासेस लावायला समजावणे दुर्गाला सोपी गेले होते.  दुर्गाने त्यांना सेल्फ डिफेन्स किती गरजेचे आहे हे समजावून सांगितले होते.  गीताची फॅमिली सेल्फ डिफेन्सक्लास साठी तयार झाली . दुर्गाने गीताला कॉलेज आणि क्लासेस सांभाळून  टाईम मॅनेजमेंट करून देत तिला आर्याच्या ज्योत सेल्फ डिफेन्स अकॅडमी जॉईन करून दिली  होती. 

दुर्गाची आणि गीताची आता चांगलीच जवळीक झाली होती . दुर्गा गीताला अगदी आपल्या लहान बहिणी प्रमाणे मानायची .  ती पण ताई ताई  करत दुर्गा जवळ तिच्या सगळ्या गोष्टी सांगायची.  गीताने पण दुर्गाला मोबाईल , इंटरनेट कसे वापरायचे , कुठली पण माहिती कशी सर्च करायची , अभ्यासातले प्रश्न मोबाईल मधून शोधून त्याचे नोट्स कसे काढायचे,  सगळे शिकवत होती.  व्हिडिओ कॉल,  ई-मेल कसे करायचे,  सेल्फी कशा काढायच्या,  हे सगळं शिकवलं होतं.  आर्याने दुर्गाला फोन दिला होता आणि घाई मध्ये असल्यामुळे फक्त फोन कसा लावायचा आणि रिसिव्ह कसा करायचा एवढंच सांगितले होते . दुर्गाने तिच्या गावात काही लोकांकडे मोबाईल फोन बघितले होते पण त्यामध्ये फक्त फोन करणे एवढेच ऑप्शन होते  आर्यांनी तर तिला चक्क ॲपलचा आयफोन दिला होता , तिच्यासाठी हे नवीन होते . कितीदा तरी तो तिच्या हातातून पण निसटायचा.  चाकू , काठी वागवणारी ती हे नाजूक मोबाईल वगैरे तिला काय नीट सांभाळता यायचे नाही.  हळूहळू तिला प्रॅक्टीस झाली . आर्या आल्यावर त्याचा  सोबत  अभ्यास करण्यासाठी काढून ठेवलेले बरेच प्रश्नांची नोट्स तिने स्वत:च मोबाईल मधून बघून काढले होते. 

"  काही म्हणा पण आर्या साहेबांनी एक काम मस्त  केले,  हा  मोबाईल देऊन"... दुर्गा स्वतःशीच बोलली.  हसत तिने स्वतःचे एक-दोन सेल्फी काढले आणि आर्याला पाठवले. 

" ओहो!!  दुर्गादेवी मोबाईलमध्ये अवतरल्या तर ! " तिचा  फोटो बघून आर्याला आनंद झाला . त्याने तिला किसिंगवाल्या खूप सार्‍या स्मायली पाठवल्या. 

" हे काय फालतूची थोबाड पाठवली... माझा फोटो पाठवला याचा अर्थ तुमचा फोटो पाठवा असा होतो "....दुर्गाने आर्याच्या   मेसेजला उत्तर दिले . 

तिचा तो मेसेज बघून त्याला हसू आले.  त्याने लगेच स्वतःचे काही सेल्फी काढले आणि तिला पाठवले . त्याचे फोटो बघून दुर्गा खूप खुश झाली.  खूप दिवसांनी ती त्याला बघत होती . एकेक फोटो बघता बघता तिने त्याचा शेवटचा फोटो बघितला. 

" वात्रट"..... दुर्गा

त्यात त्याने एक फोटो त्याच्या ओठांचा चंबू करत किस  करतोय अशा पोजचा पाठवला होता . तो बघून " वात्रट"  शब्द तिच्या तोंडून निघाला होता. आणि तिने तसाच मेसेज त्याला केला होता. 


 

" वात्रट " शब्द वाचून  त्याला खूप हसू आले. 

" ओके,  शोना गोईंग फोर वर्क , विल कॅच यू लेटर".... त्याने रिप्लाय केला आणि फोन स्विच ऑफ केला . 

आर्या सोबत बोलून दुर्गाचा मुड एकदम छान झाला होता.  तेवढ्यात तिचा फोन वाजला. 

" हॅलो "....दुर्गा ,

 तिचा नॉर्मल आवाज ऐकून शानला  थोडा धीर आला,  नाहीतर त्या दिवशी तिच्या हॅलो ने पण तो घाबरला होता  ,एवढा  तिचा तो आवाज कडक होता. 

" हॅलो ".....पलीकडून काही आवाज आला नाही म्हणून परत दुर्गा बोलली. 

" अ…... अ…… हॅलो,  ल…..लक्ष्मी आहे का ?"....घाबरत शान बोलला . त्याला काय बोलावं सुचत नव्हते.

" लक्ष्मी नाही दुर्गा".... दुर्गा कडक आवाजात बोलली. 

" सॉरी,  राँग नंबर "... बोलून शानने  फोन कट केला. 

" मोबाईलवर पण राँग  नंबर पण येतात?  किती घाबरला होता तो?.... दुर्गा स्वत:शीच विचार करत अभ्यासाला बसली .

" किती गोड आवाज आहे तिचा !"....शान त्याचा मोबाईल आपल्या हृदयाजवळ लावत स्वप्नवत बोलत होता. 

" गोड , तू पागल तर नाही झाला ना?  तिचा आवाज ऐकला तरी असे वाटते की 2- 4 पडल्या गालावर ".....रवि त्याची पागलपंती बघून बोलत होता. 

" खनक , त्याला खणक  म्हणतात , आवाजातली खनक .  तिच्या आवाजात पण एक वेगळीच खणक आहे".... शान

" आईशप्पथ शान ,  आता तर तुझे कान  सुद्धा खराब झालेत, आधी डोळे आता कान  . तू तर आता खरच पागल झाला आहे . मला आत्ताच पागलखाण्यात एक सीट बुक करायला लागेल , तिचा नकार तो वाचवू शकेल ,  मला डाउट आहे . 

" अबेssss  मित्र आहे की शत्रू आहे तू ?  मदत करायची सोडून पनौती लावून  राहिला"..... शान

" जीव मागशील तर ते पण देईल भाऊ,  पण या तुझ्या दुर्गा पासून दूर ठेव.  अशी बेकार मारते की सगळ्यांसमोर सारी बेइज्जती होते . मदत म्हणे , इथे साधे  फोनवर तर नीट  बोलता येत नाही आणि चालला मोठा मजनू बनायला "..... रवी


 

" आता बोललो की फोनवर "....शान

" हो , दिसले ते , लक्ष्मी आहे काय?  हे काय बोलणं झालं?".... रवी

" सुरुवात तर झाली ना राव,  आपल्याला काही घाई नाही , आपल्या प्रेमाची गाडी हळूहळू गेली तरी चालते , चुकीचा टाकलेला गिअर आपल्याला खूप महागात पडेल "...शान

दोघांच्याही दुर्गा या विषयावर चर्चासत्र सुरू होते आणि पुढे काय करावे याचे प्लानिंग सुरू होते. 

दुर्गाचे कॉलेज चांगले सुरू होते . बाहेर दोन तीनदा  तिने मुलींची छेड  काढणाऱ्या मुलांना लोळवलं होते,  त्यामुळे आधी गावठी वाटणारी मुलगी सगळ्यांना आता डॅशिंग वाटू लागली होती . तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन सुद्धा आता बदलत चालला होता . कॉलेजमधील विद्यार्थी तिला आता चांगलेच ओळखायला लागले होते.  मुली तर त्यांना काही प्रॉब्लेम झाला की तिला सांगत आणि ती त्यावर तोडगा सुद्धा काढून देत.  दुर्गाचा फ्रेंड्स ग्रुप आता चांगलाच मोठा झाला होता.  काही मुलं जुनिअर मुलांना सुद्धा त्रास द्यायची ती मुलं सुद्धा दुर्गाच्या ग्रुपला जॉईन झाली होती.  दुर्गा आता खऱ्या अर्थाने कॉलेज लाईफ एंजॉय करायला लागली होती. 

विद्यार्थ्यांप्रमाणे आता स्टाफ रूम मध्ये सुद्धा दुर्गाच्या चर्चा व्हायला लागल्या होत्या . दुर्गाचे आर्टचे विषय होते,  टेक्निकल विषय सोडले तर बाकी ऐतिहासिक , स्त्रीशक्ती , सामाजिक अशा विषयांवर तिची पकड चांगली झाली होती . शिक्षक वर्गात शिकवत असताना जर विषयाबद्दल देतानाची उदाहरणं किंवा काही चुका झाल्या की दुर्गा प्रतिप्रश्न करून शिक्षकांना हैराण करून सोडत , मग कधी कधी शिक्षक चिडून तिलाच विषय समजवायला पुढे बोलवत आणि ती सुद्धा खूप चांगल्या प्रकारे तो विषय  मुलांना समजावून सांगत असायची,  त्यामुळे आता शिक्षकांना दुर्गाच्या क्लासमध्ये येताना भयंकर अभ्यास करून यावे लागायचे . काही शिक्षक तर त्यांच्या क्लासचे लेक्चर घ्यायला पण तयार होत नसत. 

शानच्या  आता दुर्गाच्या कॉलेजच्या चकरा वाढल्या होत्या. पण तो तिला लपून बघायचा . त्याची तिच्या पुढे यायची हिंमत होत नव्हती . त्याने आता तिच्या घराचा पत्ता शोधून काढला होता.  आता तो तिच्या चाळीतून पण चकरा  मारायला लागला होता . त्याच्या कॉलेजचा रस्ता आता रोज तिच्या घरा पुढून जात होता. 

घर से निकलते ही, कुछ दूर चलते ही 

 रस्ते में है उसका घर

 कल सुबह देखा तो बाल बनाती वो

 खिड़की में आयी नज़र       

मासूम चेहरा, नीची निगाहें

भोली सी लड़की, भोली अदायें

ना अप्सरा है, ना वो परी है

लेकिन यह उसकी जादूगरी है

दीवाना कर के वो, एक रँग भर के वो

शर्मा के देखे जिधर

घर से निकलते ही कुछ दूर चलते ही 

रस्ते में है उसका घर ...

करता हूँ उसके घर के मैं फेरे

हँसने लगे हैं अब दोस्त मेरे

सच कह रहा हूँ, उसकी कसम है

मैं फिर भी खुश हूँ, बस एक ग़म है

जिसे प्यार करता हूँ, मैं जिसपे मरता हूँ

उसको नहीं है खबर

घर से निकलते ही कुछ दूर चलते ही 

रस्ते में है उसका घर ...

आजकाल असेच काहीसे शान सोबत घडत होते . तिच्या घराकडून चक्कर मारली  की ती त्याला काही ना काही करतांना  दिसायची आणि मग तो तिला मंत्रमुग्ध होत बघत उभा असायचा   त्याला आता तो एकदम हिंदी सिनेमा मधला हिरो वाटू लागला होता.  आजकाल त्याचं जगणं सगळे स्वप्नवत झाले होते. स्वप्नात तो तिच्यासाठी फायटिंग करतोय, गुंडांना मरतोय असे काहीबाही त्याला दिसायला लागले होते. पूर्ण फिल्मी भूत त्याच्यात घुसले होते. 

कॉलेजमध्ये एक राकेश नावाचा मुलगा होता . स्वतःला तो रॉकी  म्हणून घेत होता.  गेल्या तीन वर्षापासून नापास होत त्याच वर्गात बसत होता . गुंडागर्दी पण बरीच चालायची त्याची.  उगाच मुलामुलींना त्रास द्यायचा . बडे बाप का मुलगा म्हणून कोणीच त्याच्या वाटे जात नसे.  शिक्षक सुद्धा त्याच्यापासून वैतागले होते. 

कॅन्टीनमध्ये रॉकी आणि त्याच्या ग्रुपच्या उनाडक्या सुरू होते.  जबरदस्ती इतर विद्यार्थ्यांना बेट लावत हरवत होता आणि मग त्यांना काही काही करायला भाग पाडत होता.  आता त्याची मुलांसोबत पंजा लढवणे चा खेळ सुरु होता.  काही मुलं हरत होती आणि काही जिंकायला येत होते तर एक मुलगा काही बाई हावभाव करत रॉकी सोबत पंजा लढवणाऱ्या मुलाचे लक्ष विचलीत करत होता  आणि मग ती मुलं हरत होते.  दुर्गा तिच्या काही मैत्रिणींसोबत तिथे आली होती आणि हा रॉकीचा चाललेला खेळ बघत होती. 


 

" भावा उठ"... म्हणत दूर्गाने  रॉकी समोर बसलेल्या मुलाला तिथून उठवले आणि तिथे पंजा लढवण्यासाठी येऊन बसली. 

येव्हाना शान पण तिथे पोहचला होता , तो आणि रवी एक कोपऱ्यात उभे हे बघत होते.  

"  हा हा हा , आता तू पंजा लढवशील? ते पण माझ्या सोबत ?".... रॉकी कुत्सितपणे हसू लागला. त्या पाठोपाठ त्याचे चमचे सुद्धा हसत होते. 

" हो , आणि हरवणार पण "...... दुर्गा आत्मविश्वासाने बोलली

" बापरे , घाबरलो मी "...... घाबरण्याची अक्टिंग करत रॉकी बोलला आणि परत मोठ्याने हसू लागला. 

" बेटर …. ".... दुर्गा 

" ये चल निघ , उगाच हात वगैरे तुटायचा , अन् मग कॉलेजभर कांगोवा करणार तुम्ही मुली , मुलं छेडताय म्हणून ..".... रॉकी

तिने काहीच न बोलता पंजा लढवण्यासाठी हात टेबलवर ठेवला आणि त्याच्या डोळ्यांना डोळे भिडवत त्याला बघत होती. 

" ये चल हट , मुलींसोबत मी नाही खेळत  असले काही , त्या फक्त बेडवरच शोभतात, पण तू त्याही योग्यतेची नाहीस , कोण घेईल तुला जवळ   …".... रॉकी 

रॉकीचे ते शब्द ऐकून दुर्गाच्या तळपायाची आग मस्तकात गेली . आता याला हरवूनच दम द्यायचा तिने निश्चय केला. 


 

" का घाबरतो मुलीकडून हरायला ?"... दुर्गा 

" रॉकी कोणाच्या बापाला नाही घाबरत ".... रॉकी 

 " मग लढव पंजा ".... दुर्गा 

" मी सांगितलेले कळले नाही वाटते तुला ?"... रॉकी 

" तू हरला समजायचं काय?  ".... दुर्गा 

आता त्या  दोघांमधील शाब्दिक चकमक वाढत चालली होती. आजूबाजूला जमलेल्या सगळ्यांना आता त्या दोघांमध्ये इंटरेस्ट वाटायला लागला होता. सगळे त्या दोघांच्या भोवती जमले. सगळे जमलेले बघून आता रॉकीला तिथून उठलेले चालणार नव्हते शेवटी त्याचा इज्जतीवर येऊन ठेपली होती. 

" रॉकी फक्त खेळत नसतो , बेट लावत असतो … ".... रॉकी

" चल तू म्हणशील ते "..... दुर्गा 

" बघ , नाहीतर मागे हटशिल ?".... रॉकी

" दुर्गा  दिलेला शब्द मोडत नसते "... दुर्गा 

" पछतावशिल ".... रॉक 

"  ते तर नंतर बघू "..... दुर्गा 

" हरली तर माझा बेड गरम….. नाssssय तुझी लायकी नाही ती , इथे प्रत्येक मुलाला वाकून नमस्कार करत माफी मागायची , अन् मुलीच्या जातीला मी कलंक आहे असे म्हणायचं ".... दुर्गा 

" आणि तू हरला तर तू कॉलेज ……"....

" मी हरणारच  नाही…. ".... रॉकी तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच अतिविश्र्वसाने बोलला. 

" ऐकून घे आधी "..... दुर्गा 

" सांगितले ना रॉकी कधी हारत नाही आणि कधी हारला पण नाही ".... त्याने पंजा लढवण्यासाठी हात पुढे केला. 

मुलींबद्दल जे अपमानित शब्द रॉकी काढले होते , ते दुर्गाला अजिबात आवडले नव्हते. मुली बायका बद्दल असे घाणेरडे विचार , अशी विचारसरणी मोडून काढणे आता जास्त गरजेचे झाले होते , बाकी माहिती नाही पण इथे कॉलेज मध्ये जी नवीन पिढी उभी होती त्यांच्यासमोर तरी एक नवीन योग्य  उदाहरण निर्माण करायचे महत्वाचे झाले होते .  दुर्गाने एक मोठा श्वास घेतला आणि काहीतरी निर्धार केला आणि त्याचा पंजा पकडला. 

दोघेही पूर्ण शक्ती एकवटून सामना खेळत होते… बराच वेळ झाला होता , दोघेही बरोबरीने लढत  देत होते. 

दुर्गा आर्या सोबत मर्दानी व्यायाम करायला लागली होती. अगदी डांबलस  , भारी भारी वजन सुद्धा उचलायची . अधूनमधून ती आर्या सोबत पंजे सुद्धा लढवायची, पण आजपर्यंत ती आर्याला हरवू शकली नव्हती ते वेगळं .  त्यामुळे आज हे तिच्यासाठी अशक्य तरी नव्हते. 

दूर उभ्या असणाऱ्या शानला मात्र घाम फुटला होता… त्याला दुर्गाची खूप काळजी वाटू लागली होती. 

दुर्गा आणि रॉकीचा सामना आता चांगलाच रंगला होता. कोणीच हरायचे नाव घेत नव्हते… आजूबाजूला जमलेले सगळेच आता श्वास रोखून त्यांचा सामना बघत होते.. कोण जिंकते आहे याकडे सगळ्यांचे डोळे लागून होते. 

दुर्गाचा जोर जास्त पडत आहे जसे रॉकीला जाणवले तसे त्याने कोणालातरी इशारा केला. तो मुलगा दुर्गाला दिसेल असा येऊन उभा राहिला आणि काहीशी अश्लील  इशारे तिला करत तिचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत होता. दुर्गाचे लक्ष त्याच्याकडे गेले आणि दोघांचेही हात टेबलवर पडले. 

थोडावेळ  भयानक अशी शांतता पसरली होती  , आणि मग टाळ्यांचा गडगडाट झाला…

" दुर्गा ssss , दुर्गा ssss 

" दुर्गा दुर्गा ….. "... दुर्गा नावाचा गजर होऊ लागला. 

दुर्गा रागाने त्याच्याकडे बघत होती. तिचे डोळे आता लाल झाले होते. 

" तू जे काही आता बोलला ना बाई बद्दल , तर तू विसरलास की तुझी आई आणि बहिण सुद्धा एक बाई आहे , आणि तू त्यांचा सुद्धा अपमान केला आहेस , तू तर तुझ्या आईच्या मातृत्वावर कलंक आहेस, असा मुलगा होण्यापेक्षा ती आई निपुत्रिक असलेली बरी …."..... तिने रॉकीची कॉलर पकडली आणि जबर आवाजात बोलली. 

आधीच सगळ्यांसमोर रॉकी हरला होता त्यात दुर्गाचे असे बोलणे , तो शरमेने मान खाली घालून उभा होता. 

" आणि बेट चं ,  एकतर अभ्यास करून, पास होऊन  यावर्षी कॉलेजच्या बाहेर व्हायचं , नाहीतर पुढल्या वर्षी हातात बांगड्या घालून कॉलेजच्या प्रत्येक मुलींच्या चपला पुसायचा ".... दुर्गा 

तो काहीच बोलला नाही ..

" कळलं का ? नाहीतर गाठ माझ्याशी आहे , दुर्गा म्हणत्यात मला, लक्षात ठेवायचं "..... ती रॉकीला जबर आवाजात दरडवत म्हणाली. 

त्याने चुपचाप होकारार्थी मान हलवली.  

आता ती त्या दुसऱ्या मुलाकडे आली जो काही काही चाळे करत होता…. त्याचा जवळ येत तिने त्या मुलाच्या मुस्काटात  एक जोरदार ठेऊन दिली … 

" बायल्या , मुलाचा जन्म व्हावा म्हणून लोकं किती उपासतापास , साकडे घालत किती तरी नवस बोलतात . मुलगा पाहिजे म्हणून मुलींची भ्रूण हत्या करतात , अन् तो मुलगा इकडे असे गुण उधळतो , लज्जास्पद काम करतो. चल तुझ्या घरी येऊन सांगते तुझ्या पालकांना तुझे हे उद्योग , त्यांना पण गर्व वाटू दे तुझ्या कर्तृत्वावर …."... दुर्गा. 

" ताई , ताई , सॉरी , माफ कर …. पण प्लीज घरी नको बोलू "..... तो मुलगा गयावया करू लागला. 

" आपल्या परिवाराची लज्जेने मान खाली जाईल असे वागायचेच का? एवढा खर्च करून, पोटाला चिमटे काढून मायबाप तुम्हाला शिकायला पाठवतात , आणि तुम्ही  पोरं असले धंदे करतात. तुमच्यासारख्या लोकांमुळेच देशाचं भविष्य बिघडते , अंधारात जातेय "..... दुर्गा चांगलेच खडे बोल सुनवत होती. 


 

" आणि भावा तू , आपल्या लक्ष्या वर लक्ष केंद्रित करायला हवे , लक्ष थोडाही विचलित झाले तर आपले ध्येय कधीच गाठू शकणार नाहीस . योगा , प्राणायाम आणि ध्यान कर ".... दुर्गा , जो तिच्या आधी रॉकी सोबत पंजा लढवायला त्याचा पुढे बसला होता त्याला म्हणाली. त्याने पण मान हलवली . 

दुर्गाने बाजूला असलेली आपली बॅग उचलली आणि परत जायला वळली . 

" आणि हो बाई ही भोगवस्तू नाही , जर बाई जन्म देऊ शकते तर आपल्या आत्मसन्मान साठी जीव घेऊ ही शकते… लक्षात ठेवायचं अन् मर्यादेत वागायचं ".... बोलून ती पुढे जायला निघाली…. 

सगळ्या मुली आनंदाने टाळ्या वाजवत होत्या. तिकडे उभा शान आणि रवी सुद्धा टाळ्या वाजवत होते. 

" रवी, चल तिचे धन्यवाद आणि अभिनंदन करून येऊ "..... शान 

" तूच जा , मी नाही येत ".... रवी रुमालाने आपल्या कपाळावरील घाम पुसत बोलला. 

" अबे चुकीचे थोडी काय करायला म्हणतोय , साल्या मित्र असशील तर येशील ….. "... शान 

" आधीच दुर्गात दुर्गा अवतरली आहे ….".... रवी 

" बस हीच का तुझी मैत्री , नाही तुझ्या गर्लफ्रेंड समोर तुझी पोल खोल केली तर नाव नाही लावील "..... शान धमकावत बोलत होता. 


 

शानचे रवीला धमकावणे सुरू होते.. शेवटी रवी त्याच्यासोबत दुर्गा जवळ जायला तयार झाला. दोघेही ती येत होती त्या दिशेने जात होते. दुर्गा पुढे येत होती तर कोणी कोणी तिच्याजवळ येऊन तिचे कौतुक करत होते. दोघेही दुर्गा पर्यंत येऊन पोहचले होते. 

" बोला काय ?"... दुर्गा रवी वर नजर रोखत बोलली

" म... मी…. मी ….. त…. ते …. सॉरी….. ना … ते अभी…..".....रवी त त प प करत होता. 

" काय , बोला पटकन  "..... दुर्गा 

" ते मला नाही याला तुमच्यासोबत बोलायचं आहे "..... रवी बाजूला हात दाखवत पटकन एका दमात बोलला. 

" कोण ?".... दुर्गा 

" हा …".... रवीने बाजूला बघितले तर तिथे कोणीच नव्हते 

" हां….? इथेच तर होता...कुठे गेला ?".... रवी स्वतःभोवती गोल फिरत शानला शोधत घाबरत बोलत होता. 

" कोण ? कुठे होते ?".... दुर्गा 

" कोण …? ".... रवी 

" कोण ?".... दुर्गा 

" तो…..दिसत नाही …..कोणीच नाही ".... त्याला आता टेन्शन आले.. 

" कॉलेज मध्ये पण पिऊन यायला लागलात की काय ?पुढल्या वेळ असे पिऊन दिसले तर प्रिन्सिपॉलकडे कंप्लेंट करेल ".... बोलून दुर्गा निघून गेली. 

रवी शहाण्या बाळा सारखा मान हलवत होता. दुर्गा समोर तो तसाच घाबरून  पाणी पाणी झाला होता. रवीने इकडेतिकडे बघितले तर शान एका पिलर मागे लपला असलेला त्याला दिसला.. 

" बे शान्या , आज मी काय तुला सोडायचा नाय…. ब्रेकअप झाला तर होऊ दे पण आज तू गेला बाबू "...... ओरडत रवी शानला मारायला धावला. 

*****

त्या दिवसापासून कॉलेज मधील मुलं अदबीने वागू लागली. अति बडेजाव कोणी करत नव्हता. रॉकी पण गपगुमान कॉलेज ला येत सगळे लेक्चर्स शांततेने अटेंड करत होता. 

*****

आता बरेच दिवस झाले होते आर्या चा काहीच फोन आला नव्हता की मेसेज आला नव्हता . दुर्गाने बरेचदा त्याला फोन लावायचा प्रयत्न केला होता, आधी आधी स्विच ऑफ यायचा आता तर out of coverage area असा येत होता. तिने त्याचा बंगल्यावर पण विचारपुस केली होती , तिथे पण त्यांना काही माहिती नव्हते. आर्यांच्या काळजीने आता तिचे मन घाबरायला लागले होते. 

******

क्रमशः 


 

🎭 Series Post

View all