दुर्गा ... भाग 10

आर्या दुर्गा ...

दुर्गा....

©️®️ मेघा अमोल ( राधिका ) 

( मागच्या भागात बघितले की दुर्गाच्या बापाने तिला आमदार कडे काही पैशांसाठी विकले होते. तिच्या आईच्या लक्षात येताच तिची आई तिला गावातून पळून जायला सांगते. दुर्गा पळत , एक ट्रक मध्ये लपून मुंबईकडे येते. काही कागदपत्र बघतांना तिला मालकाचा पत्ता दिसतो. आनंदाने ती मुंबईला येते. मुंबई मध्ये पहिल्याच रात्री तिला खूप वाईट अनुभव येतो. मालकाच्या घरी जाते तर तो पण तिला तिथे सापडत नाही. ...... आता पुढे )

भाग 10

त्यानंतर ईशान दोनदा जेल मध्ये आला होता, पण दुर्गा त्याच्यासोबत बोलली नाही.  तिसऱ्या दिवशी मात्र त्याने निर्धार केला , आज बोलायलाच हवे. खूप प्रश्न आहेत जी सुटायला हवीत .

" आठशे बारा ,  ऑडव्होकेट साहेब आले आहेत " , म्हात्रेने आवाज दिला, लॉकअप चे दार उघडले. ईशान आतमध्ये गेला.

" मॅडम मी त्यादिवशी साठी खरंच सॉरी, पण तुम्ही बोलायचे थांबू नका. आता तर सुरुवात झाली होती, आता तर भरपूर गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. तुम्हाला राग येणे साहजिकच आहे , आपल्या माणसाच्या विरोधात कोण कसे काय ऐकून घेणार . माझं चुकलंच जरा. तुम्हाला माहिती नाही मॅडम,  तुमचे बोलणे किती गरजेचे आहे . प्लीज नाही म्हणू नका. " ..... ईशान
 

" आपला असो वा कोणी दुसरा, जेव्हा आपल्याला त्या व्यक्तीबद्दल माहिती नाही, तेव्हा आपण त्यांच्या विरोधात बोलू नये. तुम्ही  वकील आहात ना, तुम्ही तर बोलायलाच नको, पुराव्याशिवाय बोलायला नको. नाहीतर तुमच्या आणि या बाकीच्या लोकांमध्ये काय फरक ??? काहीतरी कोणीतरी सांगते, आणि ही लोकं त्यावर विश्वास ठेवतात. काय फायदा मग तुमच्या शिक्षणाचा??? " ....दुर्गा थोडी चिडत बोलत होती .

" बरोबर बोलत आहात मॅडम तुम्ही, त्या दिवशी बोलतांना जरा माझा ताबाच सुटला. पण तुम्ही सांगितलेली आतापर्यंतचा तुमचा आयुष्याचा प्रवास, खरंच खूप कष्टदायक, जीवघेणा होता, वाईट वाटले थोडे ,.म्हणून म्हणालो . " .... ईशान
 

" आकाशाला गवसणी घालयाची असेल तर कष्ट तर करावेच लागतील, संकटांना सामोरे तर जावेच लागेल. आयुष्याच्या परीक्षा तर द्याव्याच लागतील. " ....दुर्गा
 

" पण जे तुमच्यासोबत घडले, ते खूप जीवघेणे होते. तुम्ही होता म्हणून या सगळ्यामध्ये तारून बाहेर आल्या. सगळ्याच मुलींना जमेल असे नाही ? " ..... ईशान

" आताच्या युगात मुलीला सगळ्यात जास्ती गरज आहे ती स्वरक्षणाची, त्याच्या शिक्षणाची .  सगळे जग वाईट  आहे असे म्हणत नाही मी, पण विकृत, वासानाधिन लोकांची काही कमी नाही आहे इथे. इथे कोणीच तुमच्या मदतीला धाऊन येणार नाही, इथे स्वतःचे रक्षण स्वतःच करायला लागते. त्यामुळे माझा प्लस पॉइंट हा होता की मी स्वतःचे रक्षण करणे शिकली होती. मी काठी चालवणे, हातपाय चालवणे अशा बऱ्याच गोष्टींची मला लहानपणापासून आवड होती आणि गरज ही वाटत होती. त्यामुळेच मी या महानगरात राहू शकली, स्वतःचा बचाव करू शकली. आणि मी खरंच काही चांगले काम केले असतील, किंवा माझे पुण्य म्हणा, मला त्या आजीबाई भेटल्या, ज्यांनी मला पोरीची माया लावली. नाहीतर अजून कठीण झाले असते जगणे  ".....दुर्गा

" आहेत, चांगली लोकं पण आहेत या जगात ." .... ईशान

" चांगल्या लोकांवर तर ही दुनिया टिकून आहे " ....दुर्गा

" तुमचे ते मालक, भेटले तुम्हाला??? आणि पंधरा दिवस चकरा मारून पण ते भेटले नाहीत, तर मग तुम्ही का जात होता??? तुम्हाला कळले नाही की त्यांना तुम्हाला भेटायचे नाही ते?? का तुम्ही त्यांच्यावर अवलंबून होत्या ?? दोन वर्षात त्यांनी एकदा पण तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न नाही केला??? या दोन वर्षात तर त्यांच्या आयुष्यामध्ये दुसरे कोणी सुद्धा आले असेल, आणि तेच बोलले होते ' गोड बोलणारा प्रत्येक व्यक्ती आपला नसतो '   " .... ईशान

" मी त्यांच्यावर अवलंबून नव्हते. आजीच्या मदतीने मला दोन वेळचे जेवण आणि घर दोन्ही मिळाले होते. आणि पुढेही तिच्या मदतीने बरेच काही करायची स्वतः मध्ये धमक ही होतीच. पण एकदा त्यांना भेटायचे होते. दुसरी कोणी आली असेल तरी मी ते मान्य केले असते , पण मला एकदाच त्यांना भेटायचे होते, बघायचे होते.  आणि ते हे सुद्धा म्हणाले होते ' ते एक चांगले व्यक्ती आहेत, मी विश्वास  ठेऊ शकते ' . होऊ शकते भेटायचा प्रयत्न केला असेल ,पण काही प्रोब्लेम आला असेल . त्यांना न भेटता मला त्यांच्याबद्दल काहीही गृहीत धरायचे नव्हते. आजी पण तुमच्यासारखी म्हणायची ".....दुर्गा

" आजी...???" ...... ईशान

" मुंबईवाली आजीबाई, मी तिला आजीच म्हणायचे . " .....दुर्गा , आणि ती पुढल सगळं सांगत भूतकाळात गेली.

" दुर्गी, किती दिवस त्याच्या घराचे असे चक्कर मारणार हायीस ?, तो विसरला पण असेल . तू  विसर त्यास , अन आयुष्यात पुढे जा. किती दिवस वाट बघशील त्याची? "

" हो आजी, मला पण कळते ते, आयुष्य कोणासाठी थांबत नसते, पण आता या गावातच आहे म्हटल्यावर एकदा तरी बघायचे होते त्यांना. " ....दुर्गा

दुर्गा तशी व्यवहारिक विचार करणारी होती . पण तरीही त्याच्याबद्दल एक ओढ तिच्या मनात होती, जो तिला रोज त्याच्या वाटेने घेऊन जात होती. रोज निराशाच पदरी पडत होती, तरीही सकाळ झाली, नवीन दिवस उजाडला की तिच्या मनात एक आशेचे किरण डोकावून जाई, आणि आपोआपच रात्री कामावरून घरी यायचे तिचे पाय त्याच्या घराची वाट पकडत होते. आता तर तिथला गार्ड , माळी तिच्या ओळखीचे झाले होते. पण तिला आतमध्ये घेण्याची त्यांच्याकडे परमिशन नव्हती. ती बाहेरूनच विचारपूस करत परत निघून यायची. अशातच आता दोन महिने होत आले होते, पण अजूनही तिची त्याच्यासोबत भेट झाली नव्हती.

*****

" कोण असेल रे ही मुलगी, रोज साहेबांसाठी येते इथे. साहेब तसे आहेच म्हणा, की लोकं मागे लागतील, मुली तर खूप लागतात. पण या घराच्या पत्त्यावर कधीच कुठली मुलगी आली नाही.   तिकडच्या बंगल्यावर येतात जातात लोकं खूप , हा पत्ता फक्त काही खाजगी लोकांनाच माहिती आहे. पण ही मुलगी थोडी वेगळीच आहे, अशी गावाकडची वाटते. काही पाळत वैगरे ठेऊन तर नसेल ?" .....गार्ड

" हो थोडी वेगळीच मुलगी वाटते . त्यांच्या मित्र परिवारात पण असे लोकं नाहीत.  साहेब या घराचा पत्ता जवळच्या लोकांनाच देतात . या मुलीजवळ हा पत्ता आहे म्हटल्यावर , काहीतरी कनेक्शन दिसते आहे . दिसायला वेगळी असली तरी मुलगी बरी वाटते. म्हणाजे अशी चुकीचे काम करत असेल वाटत नाही.  तशी तिची माहिती काढली थोडी, इथे बाजूला असलेल्या चाळीत राहते एका म्हातारी सोबत, खाण्याची गाडी छोटेखानी दुकान चालवतात. रस्त्याने बघितले मदत करत असते छोटीमोठी.  " ....केशव (माळी)

" ह्मम, तरी लक्ष ठेवलेले बरे." ... गार्ड

दुर्गा रोज तिथे य्याची , विचारपूस करायची , आणि परत जायची. आजही तिला तिथे बघून गार्ड आणि माळी दादा तिच्याबद्दल बोलत होते.

*****

" दुर्गाताई , तुमच्यासाठी चांगली न्यूज आहे. साहेब उद्या नक्की येणार आहेत " .... गार्ड

" खरंच ???" .... दुर्गाचे डोळे आनंदाने मोठे झाले.

" हो, खरतर आम्हाला हे काही सांगण्याची परमिशन नाही. पण केशव दादा म्हणाले म्हणून तुम्हाला सांगितले. पण तुम्ही बाहेर हे कुठेही सांगू नका. कोणाला माहिती पडले तर माझी नोकरी जाईल . " .... गार्ड तिला विनवणी करत बोलला.

" दादा तुम्ही काळजी नका करू, मी कोणाला काहीच सांगणार नाही. तुम्ही माझी खूप मोठी मदत केली बघा. खूप खूप धन्यवाद त्यासाठी. " ....दुर्गा त्याला धन्यवाद करत आनंदाने घरी परतली.

******

" अरे आपण तर आनंदाच्या गडबडीत  त्या गार्ड दादांना मालक किती वाजता येणार आहे,  ते तर विचारायचे विसरलो. आता काय करू???" ....दुर्गा सकाळी उठल्यावर विचार करत होती.

" आजी , आज मी ठेल्यावर नाही आली तर तुला काम आवरेल काय ग ???" .....दुर्गा

आजीला रात्रीपासूनच तिचा आनंद, तिचा उत्साह दिसत होता.. ती आजीला भेटल्यापासून आज पहिल्यांदा एवढी आनंदी दिसत होती..तिने कामामध्ये आजपर्यंत काहीच कामचुकारपणा नव्हता केला की कधी सुट्टी नव्हती घेतली. आजी.    तिला आनंदी बघून आजीला सुद्धा चांगले वाटत होते.

" हो ग पोरी, आवरेल मला आज काम, नको काळजी करू. तसा पण सुट्टीचा दिवस नाय, तर भिड कमीच असते.  तू आज नाही आली तरी चालेल. " ....आजी

आजीचे ऐकून तर तिला खूपच आनंद झाला. तिने स्वतःचे आवरायला घेतले . काय करू नी काय नको,  असे तिला झाले होते . आज तब्बल दोन वर्षाच्या मोठ्या गॅप नंतर ती त्याला भेटणार होती. कसा दिसत असेल तो ??, काय करत असेल??? असे अनेक विचार तिच्या डोक्यात सुरू होते. या दोन वर्षात तिच्यामध्ये सुद्धा बरेच बदल झाले होते. सतरा वर्षांची होती तेव्हा तारुण्यात पदार्पण तर केलेच होते तिने, पण एक पोरकटपणा होता तिच्यामध्ये. समंजस तर ती तेव्हा सुद्धा होती ,  पण आता अनुभवांनी बरीच परिपक्व झाली होती. तिने पटापट स्वतःचे आवरले आणि ती सकाळी सात वाजताच त्याच्या घराजवळ आली.

" ओ दादा, आले काय तुमचे साहेब ?? " ....दुर्गा खूप उत्साहात बोलत होती.

" ताई, येवढ्या सकाळी सकाळी तुम्ही इथे?? , नाही आले साहेब ".....गार्ड

" हो ना दादा, काल तुम्हाला वेळ विचारायची विसरली, चुकामूक नको म्हणून लवकर आले बघा. " .... दुर्गा

" सकाळी दहा अकराच्या दरम्याने येतील आहेत ." .... गार्ड

" बरं, ठीक आहे " ....दुर्गा

बंगल्याचा ऑपोजीट साइडला एक छोटे गार्डन होते , तिथे रस्त्याच्या कडेने  एका बेंचवर दुर्गा जाऊन बसली. येण्याजण्याऱ्या लोकांना बघत होती.  तिचे आजूबाजूचे निरीक्षण सुरू होते.  वेगवेगळ्या लोकांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत त्यांच्या डोक्यात काय सुरु असेल , असेच गंमत म्हणून तिचे आपले डोकं लढवणे सुरू होते. आता हळूहळू रस्त्यावर लोकांची, गाड्यांची गर्दी वाढू लागली होती. बंगल्याच्या साईडने येणाऱ्या गड्यांकडे ती निरखून बघत होती.

सूर्य डोक्यावर येऊ लागला होता , ऊन सुद्धा बऱ्यापैकी वाढले होते. ' मालक येतील की नाही?? ' ... अशी शंका तिच्या मनात येऊ लागली. तिने रस्त्याने चाललेल्या  एका बाईला वेळ विचारली तर दुपारचे दोन वाजत आले होते. आता तिचा चेहऱ्यावरचा उत्साह कमी कमी व्हायला लागला होता. एक उदासिपणा तिच्या चेहऱ्यावर आला होता. तिची एक वेडी आशा, ती तिथेच बसून वाट बघत होती. थोड्याच वेळात एक मोठी ब्लॅक रंगाची  गाडी  बंगल्याच्या दिशेने येतांना दिसली. दुर्गा तिला निरखून बघू लागली. आणि क्षणरधताच तिचे डोळे चमकून उठले. चेहऱ्यावर अविरत आनंद पसरला . ती जागेवरून उठत पुढे आली .

" मालक sss " ..... दुर्गा जागेवरच उभी रहात हात उंचावत  , हात हलवत आवाज देत होती. ती अचानक अशी ओरडते आहे बघून , येणारे जाणारे लोक तिच्याकडे बघत पुढे जात होते.

गाडीमध्ये ड्रायव्हिंग सीटवर , गोरापान तो, डोळ्यांवर गॉगल लावलेला,तो गाडी ड्राईव्ह करत होता. त्याने खिडकीतून बाहेर बघितले , परत ड्रायव्हिंगवर लक्ष घालत , गाडी बंगल्याच्या मेन गेटकडे वळवली. त्याची आलेली गाडी बघून बंगल्याचे ते भलेमोठे गेट उघडत मागे गेले . त्याने गाडी आतमध्ये घेतली, आणि दार परत बंद झाले.

दुर्गाच्या नजरेपुढे दार बंद झाले, ते बघून तिच्या हृदयावर कोणीतरी आघात केल्यासारखे तिला वाटले. आधीच तिने  आवाज देऊनही तिला दुरालक्षित केल्यासारखे वाटले होते , त्यात तिच्या डोळ्यासमोर दार बंद झाले होते, जसे काही तिच्या शरीरातून तिची आत्मा कोणीतरी काढून घेतली , असे तिला वाटत होते. आपोआप तिच्या डोळ्यांतून अश्रू  गळायला लागले होते. समोरचे सगळं आता तिला अंधुक अंधुक दिसायला लागले होते. दोन वर्षापासून ती ज्याची वाट बघत होती, ज्या आशेवर तिने मुंबई शहर गाठले होते , ती आशाच आता संपली होती . सगळी स्वप्न, सगळी आशा  मातीमोल झाल्यासारखे तीला वाटत होते. जड अंतःकरणाने ती तिथून उठली आणि खिन्न मनाने, आपल्या उलट्या हाताने डोळ्यातले पाणी पुसत ,  परतीच्या वाटेला लागली.

वर्तमान ....

" तुमचे ते मालक, त्यांनी तुम्हाला ओळखले नाही की ओळख दाखवली नाही.  चिंधीगावात त्यांना तुमची गरज होती म्हणून त्यांनी तुमच्या सोबत मैत्री केली , गरज संपली तर ओळख सुद्धा दाखवली नाही. तुमच्या बोलण्यावरून तरी वाटते आहे ते मोठ्या घरतले होते, श्रीमंत होते. कदाचित त्यांनी तुम्हाला ओळखले सुद्धा असेल , पण सगळ्यांसमोर   गरिबांना काय ओळखी देणार??? नाही काय ???  तुम्ही किती आशेने तिथे जात होता, अगदी एकही दिवस न चुकता . किती मन आतुर होते तुमचे त्यांना भेटायला ?? खूप वाईट वाटले असेल तुम्हाला तेव्हा ?? " ... ईशान

" ह्मम , वाईट तर खूप वाटले होते , माझ्या डोळ्यांसमोर ते आतमध्ये गेले आणि गेट बंद झाले बघून . " ....दुर्गा


******

काय होईल दुर्गाचे पुढे???? 

आणि हा आर्या कोण आहे ?? 

******

क्रमशः 

🎭 Series Post

View all