दुरावलेली नाती भाग ६

स्वराली अरुंधतीला तिच्या भूतकाळाबद्दल विचारते
दुरावलेली नाती भाग ६

मागील भागाचा सारांश: अनुराधा देशपांडे ही अरुंधती काळेची म्हणजेच स्वरालीच्या सासूबाईची सख्खी बहीण आहे, हे स्वरालीला अनुराधा कडून समजते. अनुराधा स्वरालीला आपल्या इतर भावंडांची नावे सांगते. अरुंधतीने लव्ह मॅरेज केलं असल्याचे स्वरालीला कळते.

आता बघूया पुढे….
स्वराली मनात काहीतरी ठरवून अनुराधाच्या घरातून बाहेर पडली. खाली जाऊन भाजी घेऊन आली. वरती येता येता स्वरालीची भेट सुरज व तुषारसोबत झाली. स्वरालीचं विचारचक्र चालू असल्याने तिचं त्या दोघांच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. 

"स्वरा अग तुषार काय विचारतोय? त्याच्या प्रश्नाचं उत्तर तर दे." स्वरालीला तिच्या विचारांतून बाहेर काढत सुरज म्हणाला.

"अ….काय म्हणालात तुषार भाऊजी?" स्वरालीने विचारले. 

तुषार हसून म्हणाला,
"काय वहिनी, तुमचं आमच्या बोलण्याकडे लक्ष सुद्धा नाहीये."

"मी ते आईंचा विचार करत होते म्हणून." स्वरालीने सांगितले.

"काकूंची तब्येत बरी नाहीये का?" तुषारने काळजीने विचारले.

"अरे आई बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन करण्यासाठी तयार होत नाहीये. आईला कसं तयार करायचं? याच विचारात स्वराली असेल." सुरजने उत्तर दिले.

बोलता बोलता घर आल्याने तुषार व सुरजचं बोलणं थांबलं. सुरज व स्वराली घरात गेले, तेव्हा अरुंधती हॉलमध्ये सोफ्यावर बसलेली होती.

"स्वरा भाजी घेऊन यायला बराच उशीर लागला. मी केव्हापासून तुझी वाट बघत होते." अरुंधती म्हणाली.

"आई काही हवंय का? अहो मग फोन करायचा. अपार्टमेंट मधील बायका आपण नवीन रहायला आलो, म्हणून चौकशी करत होत्या. त्यांच्यासोबत बोलता बोलता उशीर लागला." स्वरालीने अरुंधतीला खोटं सांगितलं.

सुरज फ्रेश झाला. स्वरालीने त्याच्यासाठी चहा बनवला. अरुंधती भाजी निवडत होती. चहा बनवून झाल्यावर स्वराली व सुरज हॉलमध्ये अरुंधतीच्या जवळ येऊन बसले.

"आई तुला बरं वाटतंय ना? उद्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे. तुला जे काही त्रास होत आहेत, त्याची त्यांना कल्पना दे. स्वरा तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल. बरं आई अनुराधा काकूंसोबत ओळख करुन घे, त्यांच्यासोबत संध्याकाळच्या वेळी खाली फिरायला जात जा. तेवढाच तुला विरंगुळा होईल. घरात बसून तुला कंटाळा येईल." सुरजने सांगितले.

यावर अरुंधतीने मान हलवून होकार दिला. अरुंधती आतातरी काही बोलेल या अपेक्षेने स्वराली म्हणाली,
"सुरज अनुराधा मावशी दुपारी आल्या होत्या, पण आई त्यांच्यासोबत काहीच बोलल्या नाही, त्याही जास्त काही न बोलता निघून गेल्या."

सुरजने आईकडे बघून विचारले,
"पण का? आणि अनुराधा काकूंना मावशी का म्हणत आहेस?"

"त्यांनीच मला मावशी म्हणायला सांगितलं. ह्या दोघी का बोलल्या नाहीत? याचं कारण दोघींनी मला सांगितलं नाही. अनुराधा मावशींना विचारलं, तर त्या म्हणाल्या की, "तुझ्या सासूला विचार म्हणून." आईंना विचारलं तर त्या काहीच सांगत नाहीत." स्वरालीने सांगितले.

सुरजने प्रश्नार्थक नजरेने अरुंधतीकडे बघितलं. सुरज काही प्रश्न विचारायच्या आत ती म्हणाली,
"स्वरा भाजी निवडून झाली आहे. मी जरा रुममध्ये जाऊन पडते. स्वयंपाक झाला की मला बोलव."

अरुंधती निघून गेल्यावर सुरज म्हणाला,
"स्वरा आई अशी का वागत आहे? मला लहानपणापासून खूप प्रश्न पडलेले आहेत, पण त्याची उत्तरे आजतागायत मला मिळालेली नाहीयेत. माझ्या बाबांचं नाव अविनाश काळे हे सोडता ते कसे दिसतात? काय करतात? कुठे असतात? याबद्दल काहीच माहीती नाहीये. नातेवाईकांबद्दल विचारलं तर तेही नाही. कालांतराने मी आईला प्रश्न विचारणचं सोडून दिलं. आता तर तिच्या तब्येतीचा विचार करुन काही बोलता पण येत नाही. आता आई अनुराधा काकूंसोबत का बोलली नसेल? त्यांना किती वाईट वाटलं असेल बरं. ते लोक किती चांगले आहेत. आपण त्यांच्यासोबत असं वागणं कितपत योग्य आहे."

"सुरज शांत हो. जास्त हायपर होण्याची गरज नाहीये. अनुराधा मावशींना वाईट वाटलं नाहीये. मी आईंसोबत शांतपणे बोलते. तुझा राग मला कळतोय. पण आता ही वेळ राग व्यक्त करण्याची नाही." स्वरालीने सुरजला समजावून सांगितले.

स्वरालीने स्वयंपाक बनवला. अरुंधतीला जेवण करण्यासाठी बोलावलं. जेवण करताना सुरज अरुंधती सोबत काहीच बोलला नाही. जेवण झाल्यावर सुरज वॉक करण्यासाठी म्हणून निघून गेला.

"सुरज माझ्यावर खूपच रागावला आहे ना?" अरुंधतीने स्वरालीला विचारले.

स्वराली अरुंधतीच्या गोळ्या तिच्या हातात देत म्हणाली,
"आई आता तुम्ही रागावण्यासारखे वागत आहात, तर तो रागवेलचं ना. आई मला मान्य आहे की, भूतकाळात तुमच्या हातून काही चुका झाल्या असतील, पण मग त्या तुमच्या मुलासमोर मान्य करायला काय प्रॉब्लेम आहे? त्याला त्याच्या वडिलांबद्दल काहीच माहिती नाहीये. तुमच्या नातेवाईकांबद्दल सुद्धा त्याला काहीच कल्पना नाहीये, मग तो चिडेलचं ना. आई अनुराधा मावशी ह्या तुमची बहीण आहे, हे मला कळलंय. पण मी हे सुरजला सांगणार नाहीये. तुम्ही स्वतः त्याला हे सत्य सांगणार आहे. अनुराधा मावशींनी बाकीची माहिती द्यायला सरळ नकार दिला. त्या तुम्हाला त्यांची बहीण मानत आहे. आई आपलीचं माणसं आपल्या चुका त्यांच्या पोटात घालतात. 
तुमचा असा चेहरा बघून मावशींच्या डोळयात पाणी आले. आई तुमचं आयुष्य वाढावं म्हणून आम्ही दोघे प्रयत्न करत आहोत, पण तुम्ही सरळ ट्रीटमेंट साठी नकार देत आहात. आई तुम्ही अचानक गेल्यावर तुमच्या आयुष्यातील सत्य आम्हाला कोण सांगेल? आमच्या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे कोण देईल? 
सॉरी आई मला तुम्हाला हे विचारायचं नव्हतं. पण सुरजच्या चेहऱ्याकडे बघवलं गेलं नाही. आई त्याला त्याचे बाबा कसे दिसतात? हे पण माहीत नाही आणि या गोष्टीचे त्याला खूप वाईट वाटत आहे."

अरुंधती आतातरी काही बोलेल का? बघूया पुढील भागात….
©®Dr Supriya Dighe



🎭 Series Post

View all