दुरावलेली नाती भाग ५

अनुराधा अरुंधतीची बहीण असल्याचे स्वरालीला कळते

दुरावलेली नाती भाग ५





मागील भागाचा सारांश: स्वराली, सुरज आईला घेऊन नवीन फ्लॅटमध्ये रहायला जातात. सुरज ऑफिसला गेलेला असताना तुषारची आई सुरजच्या आईला भेटायला येते. स्वराली तुषारच्या आईला तिचं नाव विचारते. तुषारची आई व सुरजची आई समोरासमोर आल्यावर त्या एकमेकींसोबत फारश्या बोलल्या नाहीत.





आता बघूया पुढे…



अनुराधा काकू निघून गेल्यापासून स्वराली विचार करुन करुन थकली होती. शेवटी ती उठून तिच्या सासूबाईंच्या रुममध्ये गेली.





"आई एवढा कसला विचार करत आहात?" स्वरालीने विचारले.





"काही नाही ग. असंच काहीतरी आठवलं." सासूबाईंनी उत्तर दिले.





"आई मी तुम्हाला काही विचारु का?" स्वरालीने विचारले.





यावर तिच्या सासूबाई म्हणाल्या,



"स्वरा मी आता काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये. तुला जो प्रश्न पडला आहे, त्याचे उत्तर मी तुला आत्ता देऊ शकत नाही. मी अनुराधा सोबत का बोलले नाही? हाच प्रश्न तुला पडला असेल ना. आता फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, माझ्या हातून काही चुका झाल्या आहेत आणि त्याचा मला पश्चाताप होत आहे. आता काय आणि कसं झालं होतं? हे मी तुला आतातरी सांगू इच्छित नाहीये. देवाच्या मनात नेमकं काय चालू असतं? हेच मला कळत नाहीये. आता यावेळी अनुराधा व माझी भेट का घडवून आणली असेल त्याने?"





"आई जोपर्यंत तुम्ही स्वतःहून मला काही सांगणार नाही, तोपर्यंत मी तुम्हाला काहीच विचारणार नाही. देवाच्या मनात नेमकं काय आहे? हे मलाही सांगता येणार नाही. एवढंच सांगेल की, आई तुम्हाला तुम्ही चूक केलीय, असं वाटत असेल तर तुम्ही माफी मागू शकतात. माफी मागितल्याने कोणीच लहान होत नाही. माफी मागून आपण केलेली चूक सुधारु शकत नाही, पण आपल्या मनाला समाधान मिळते. बरं आई मी भाजी घेऊन येते. तुम्ही जास्तवेळ विचार करत बसू नका. थोड्यावेळ मनाला विश्रांती द्या." स्वराली एवढं बोलून भाजी आणण्यासाठी घराबाहेर पडली.





स्वराली दरवाजाला लॉक लावत असताना शेजारील देशपांडे काका त्यांच्या घरातून बाहेर पडत होते. त्यांना बघून स्वराली म्हणाली,



"काका कुठे बाहेर निघालात का?"





"हो. मी यावेळी पार्कमध्ये जाऊन बसतो. तुझी काकूही येते, पण आज आमच्या मॅडमचा मूड ठीक नाहीये." एवढं बोलून देशपांडे काका खाली निघून गेले.





स्वरालीच्या डोक्यात काय आले? काय माहीत? ती खाली न जाता तिने देशपांडे काकूंच्या दारावरील बेल वाजवली. देशपांडे काकूंनी दरवाजा उघडला.





"काकू आत येऊ का?" स्वरालीने विचारले.





"हो ये ना." काकू छोटीशी स्माईल देऊन म्हणाल्या.





स्वराली हॉलमध्ये जाऊन सोफ्यावर जाऊन बसली.



"चहा घेतेस का?" काकूंनी विचारले.





"नको. काकू मला तुम्हाला काहीतरी विचारायचे होते?" स्वराली.





"विचार ना." काकूंनी परवानगी दिली.





"काकू तुम्ही आमच्याकडे आईंना भेटायला म्हणून आल्या होता. तुम्ही आईंसोबत काहीच बोलल्या नाही आणि इकडे येताना तुमच्या डोळयात पाणी होतं, असं का?" स्वरालीने विचारले.





यावर देशपांडे काकू म्हणाल्या,



"याचं कारण तुझ्या सासूबाईला विचार ना."





style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">



स्वराली म्हणाली,



"आईंनी सांगितले असते, तर मी तुम्हाला विचारलं असतं का? काकू आई काहीचं सांगणार नाही. सुरज व मला आमच्या कोणत्याच नातेवाईकांबद्दल माहिती नाहीये. आई सांगत सुद्धा नाहीयेत. नातेवाईकांची माहिती मिळाली नाही, तर आईंचं बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन करता येणार नाही. आईंच्या डायरीत काही नावं वाचली होती, त्यात एक तुमचं नाव होतं. आता काकू तुमचं नाव त्या डायरीत का होतं? याचं उत्तर तुम्ही मला प्लिज द्या."





देशपांडे काकू म्हणाल्या,



"एकतर तू मला काकू नको म्हणूस. मावशी म्हण. तुझी सासू माझी सख्खी धाकटी बहीण आहे. मी, अवंतिका, अरुंधती व कल्पना अश्या आम्ही चौघी बहिणी आणि व्यंकटेश आमचा भाऊ. आम्ही बहिणी कायम एकत्र असू, आम्ही एकमेकांना वचन दिलं होतं. पण ते निभावण्यात यश आलं नाही. अरुला या स्थितीत बघून अचानक डोळे भरुन आले ग. बिचारी तर मान वर करुन माझ्याकडे बघत सुद्धा नव्हती. अजून काही क्षण जरी मी तिथं थांबले असते, तर माझ्या डोळ्यात अडवून ठेवलेले अश्रू बाहेर पडले असते. तुझे सासरे कुठे असतात?"





"माहित नाही. माझं लग्न झाल्यापासून मी त्यांना बघितलेलं नाहीये. माझं व सुरजचं लव्ह मॅरेज झालं होतं. सुरजला सुद्धा त्याचे बाबा आठवत नाहीत. आईंनी कधीच कुणाबद्दल काहीच सांगितले नाही." स्वरालीने उत्तर दिले.





"म्हणजे ज्याच्या प्रेमासाठी घरच्यांचा विश्वासघात केला, त्याने पण अरुची साथ दिली नाही वाटतं." अनुराधा मावशी म्हणाल्या.





"म्हणजे आईंनी लव्ह मॅरेज केलं होतं का? आणि म्हणूनच तुमच्या सर्वांपासून त्या दूर आहेत का?" स्वरालीने आश्चर्याने विचारले.





"हो. अरुने प्रेम करुन खूप मोठी चूक केली होती. घरच्यांपासून ते लपवून दुसरी घोडचूक केली होती. अरुला भेटल्यावर ते नकोसे असलेले दिवस डोळ्यासमोर उभे राहिले." अनुराधा मावशींनी सांगितले.





"मावशी नेमकं काय झालं होतं? हे मला कळू शकेल का?" स्वरालीने विचारले.





"यापुढे मी काहीच सांगणार नाही. अरुला ते आवडणार नाही. कितीही राग आला तरी ती माझी बहिण आहे. तिच्या सुनेसोबत मी एका लिमिटच्या पुढे बोलू शकणार नाही." अनुराधा मावशींनी सांगितले.





स्वराली म्हणाली,



"ठीक आहे. नका सांगू. पण एक रिक्वेस्ट करते. आईंचा पुढच्या आठवड्यात वाढदिवस आहे. आईंची तब्येत कधी बिघडेल हे सांगू शकत नाही, शिवाय त्यांना कधी काय होईल? हेही सांगता येणार नाही. तुम्ही तुमच्या दोन्ही बहिणी व एका भावाला बोलावू शकता का? आईंच्या मनात जे गिल्ट आहे, ते तरी कमी होण्यास मदत होईल. मावशी तुम्हाला आईंचा कितीही राग येत असेल, पण त्या मृत्यूच्या दारात उभ्या आहेत. हे लक्षात ठेवा."





क्रमशः





©®Dr Supriya Dighe










🎭 Series Post

View all