दुरावलेली नाती भाग २

स्वरालीच्या सासूबाईंना कॅन्सर झाल्याचे समजले.

दुरावलेली नाती भाग २





मागील भागाचा सारांश: सुरजच्या आईला ब्लड कॅन्सर झाल्याचे निदान डॉक्टर करतात. बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन करण्यासाठी जवळच्या नातेवाईकांची आवश्यकता पडणार होती, पण सुरज व स्वरालीने आजवर कधीच आईच्या तोंडून नातेवाईकांबद्दल काहीच ऐकलेलं नव्हतं. 





आता बघूया पुढे….





"एक चुकीचा निर्णय



आणि सारे आयुष्य बदलून गेले



जवळची प्रिय माणसे



दूर निघून गेले





एका चुकीच्या व्यक्तीच्या



प्रेमापोटी



जवळच्या माणसांच्या प्रेमाला 



मुकावे लागले





अनेकदा वाटते की



माघारी फिरावे



कोणीतरी मला 



मिठीत घ्यावे





माझ्यामुळे आधीच



तुम्हाला झालाय खूप 



मनस्ताप



उगाच पुन्हा नको



आता डोक्याला ताप."





डायरीतील कवितेचा अर्थ स्वरालीला पटकन उमगला नव्हता, म्हणून स्वरालीने त्या कवितेचा फोटो काढून घेतला. डायरीच्या पहिल्या पानावर ही कविता बघून डायरीत आपल्या कामाचं काहीतरी मिळेल, अशी आशा स्वरालीला वाटत होती. पूर्ण डायरी कोरीचं होती. शेवटच्या पानावर काही व्यक्तींची नावे लिहिलेली होती.





अनुराधा देशपांडे



व्यंकटेश धारणे



कल्पना मुळे



अवंतिका देसाई



अरुंधती काळे





"यात एक नाव आईंचं आहे, पण बाकीची ही चार नावे कोणाची असतील? ह्या सगळयांचा व आईंचा काय संबंध असेल?" स्वराली मनातल्या मनात बडबडत होती.





नावाच्या खाली अजून काहीतरी लिहिलेलं होतं.





"चौघी आम्ही बहिणी



एकच भाऊराया."





ही ओळ वाचल्यावर स्वरालीच्या डोक्यात ट्यूब पेटली. अनुराधा, अवंतिका, कल्पना व अरुंधती या चौघी बहिणी व व्यंकटेश हा त्यांचा एक भाऊ असेल, हा अंदाज तिने व्यक्त केला. पण आता या सगळ्यांना शोधणार कुठे? हा प्रश्न स्वरालीला पडला होता. 





स्वराली आपल्या विचारात दंग असतानाच तिला सुरजचा फोन आला,





सुरज: हॅलो स्वरा, कुठे आहेस?





स्वराली: मी घरीच आहे.





सुरज: बरं ऐक, आईला घेऊन मी घरी येत आहे. आईला जो प्रश्न पडला आहे, त्याचं उत्तर द्यायला तयार रहा.





स्वराली: बरं ठीक आहे.





एवढं बोलून स्वरालीने फोन कट केला. सासूबाईंच्या रुममध्ये काहीतरी सापडेल या आशेने स्वराली घरी लवकर निघून गेली होती. स्वरालीच्या अपेक्षेप्रमाणे तिला सासूबाईंच्या डायरीत हवी ती माहिती होती, पण पूर्ण माहिती नव्हती. आजवर तिच्या सासूबाईंनी त्यांच्या डायरीला कोणालाच हात लावू दिला नव्हता आणि म्हणूनच स्वरालीला डायरीत काहीतरी असल्याची शंका आली होती.





"आता आईंच्या भावंडांना कुठे शोधायचं? सोशल मीडियावर शोधलं असतं, पण मला त्यांच्या नावाखेरीज काहीच माहिती नाहीये, म्हणजे ते कुठे राहतात, काय करतात? माझ्याकडे त्यांचे फोटो सुद्धा नाहीयेत. आईंना डायरेक्ट तर काही विचारता येणार नाहीये." डायरी जागच्या जागी ठेवत स्वराली पुटपुटली.





style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">



काही वेळातचं सुरज आईला घेऊन घरी आला. आईला जिने चढून दम लागला होता, म्हणून त्या हॉलमध्ये खोल श्वास घेत सोप्यावर बसल्या. आईच्या या अवस्थेकडे बघून स्वराली व सुरज दोघांच्या डोळयात पाणी आले. स्वरालीने आई व सुरजला पाणी पिण्यास दिले.





"सुरज आईंची तब्येत बरी होईपर्यंत आपण लिफ्ट असलेल्या बिल्डिंगमध्ये रहायला जाऊयात. आईंना जिने चढताना किती धाप लागत आहे." स्वरालीने सुरजकडे बघून सांगितले.





यावर लगेच सुरज म्हणाला,



"हो मी आजच जवळपास फ्लॅटची शोधाशोध सुरु करतो."





"अरे मुलांनो मला थोडा थकवा आला आहे, म्हणून जिना चढताना त्रास झाला असेल. काही दिवसांनी सगळं व्यवस्थित होईल. कशाला फ्लॅट शोधता." आईने सांगितले.





"आई तुम्ही याबाबतीत काहीच बोलू नका. आम्ही तुमचं काहीच ऐकणार नाही." स्वरालीने ठणकावून सांगितले.





"बरं माझे रिपोर्ट्स काय आलेत? सुरजला विचारलं तर तो म्हणाला की, स्वराला विचार. माझा मुलगा माझ्यासारखा काही धीट निघाला नाही. आता तुच मला रिपोर्ट्सबद्दल सांग." आईने विचारले.





स्वराली आईच्या पायाजवळ बसली. ती आईचा हात हातात घेऊन म्हणाली,



"आई आपला सुरज खूप हळवा आहे, त्याला त्याच्या जवळच्या व्यक्तींचं दुःख बघवत नाही आणि ऐकवत पण नाही. आई आपल्या कुटुंबापुढे एक मोठं संकट उभं राहिलं आहे, पण आपल्याला त्या संकटाचा सर्वांनी मिळून हसतमुखाने सामना करायचा आहे."





"स्वरा प्रस्तावना काय सांगत बसली? पटकन मुद्द्याचं बोल ना." आई चिडून म्हणाली.





स्वरा म्हणाली,



"आई चिडू नका. आई तुम्हाला ब्लड कॅन्सर झाला आहे. वेळीच उपचार केलेतर तुम्ही बऱ्या होऊ शकाल. आई प्लिज खचून जाऊ नका."





स्वराच्या हातातून हात सोडवत आई म्हणाली,



"स्वरा मी जरा माझ्या रुममध्ये जाऊन पडते." 





आई जागेवरुन उठत असताना सुरजने आईला हात देऊ केला, पण तिने एकटीने रुमपर्यंत जाणे पसंद केले. सुरजला मात्र आईची प्रतिक्रिया बघून धक्का बसला. 





"आपण आईला सगळं सांगून घाई तर केली नाही ना?" सुरज स्वरालीकडे बघून म्हणाला.





स्वराली म्हणाली,



"नाही. आईंना सावरायला थोडा वेळ लागेल. आईंची ट्रीटमेंट करायची असेल तर मग त्यांना कल्पना द्यावी लागणारच होती ना. आईंना आपल्यासमोर डोळ्यातून पाणी येऊ द्यायचं नसेल. तू त्यांची काळजी करु नकोस. मी थोड्या वेळात त्यांच्यासोबत पुन्हा बोलेल."





जवळपास दोन तास उलटून गेले तरी अजून सासूबाई बाहेर आल्या नाही, म्हणून स्वरालीने त्यांच्या रुमच्या दरवाज्यावर नॉक केले. आतून काहीच रिस्पॉन्स न आल्याने स्वरालीला भीती वाटू लागली होती. सुरज फ्लॅट शोधण्यासाठी म्हणून बाहेर गेलेला होता.





स्वरालीच्या सासूबाई ठीक असतील का? बघूया पुढील भागात….



©®Dr Supriya Dighe








🎭 Series Post

View all