दुरावलेली नाती भाग १०

अरुंधतीने तिचा भूतकाळ सांगितला

दुरावलेली नाती भाग १०

मागील भागाचा सारांश: अरुंधती सुरजला त्याच्या मामा व मावशींची ओळख करुन देते. अरुंधती तिच्या भूतकाळाची कथा सांगत असताना तिला खोकल्याची उबळ आली, त्यामुळे सर्वानुमते अरुंधतीला आराम करायला सांगितले. व्यंकटेशला दुसऱ्या दिवशी पहाटेच जावे लागणार असल्याने त्याने सुरजला "काहीही लागलं तरी मी आहे." असे सांगितले.

आता बघूया पुढे….

अवंतिका अरुंधती सोबत तिच्या रुममध्ये झोपली. खोकल्याचे औषध घेतल्याने अरुंधतीला गुंगी आली होती. अरुंधतीची अवस्था बघून अवंतिकाला तिचा विचार करुन रात्रभर झोप लागली नव्हती. पहाटे सहाच्या दरम्यान अवंतिका हॉलमध्ये जाऊन बसली. पुढील पंधरा मिनिटाने स्वराली झोपेतून उठून आली, तर अवंतिकाला हॉलमध्ये बघून आश्चर्य वाटले.

"मावशी तुम्ही इथे का बसल्या आहात?" स्वरालीने विचारले.

"मला झोप लागत नव्हती, म्हणून आताच येऊन बसले होते. अरुला शांत झोप लागलेली होती, म्हणून मी इकडे येऊन बसले." अवंतिकाने सांगितले.

स्वराली म्हणाली,

"मावशी मी चहा करते." 

अवंतिकाने मान हलवून होकार दिला. अवंतिकाने ब्रश करुन तोंडाला पाणी मारले. स्वराली तोपर्यंत चहा घेऊन आली. 

"तू दररोज या वेळेलाच उठते का?" अवंतिकाने चहा पिता पिता स्वरालीला विचारले.

स्वराली म्हणाली,

"मी ऑनलाईन योगा सेशन जॉईन केलंय, त्यासाठीचं उठत असते. सात वाजता योगा सेशन संपला की, घरातील कामं चालू होतात."

"मग आजचं सेशन माझ्यामुळे गेलं असेल ना?" अवंतिकाने विचारले.

"नाही मावशी. मी कधीतरी सुट्टी घेत असतेचं. तुम्हाला जागा बदलामुळे झोप लागली नाही का?" स्वराली.

अवंतिका म्हणाली,

"नाही ग. अरुचा विचार करुन झोप लागली नाही. आयुष्यात एक निर्णय चुकला की, होत्याचं नव्हतं होऊन जातं. अरुला खूप समजावून सांगितले होते, पण ती प्रेमात आंधळी झाली होती. तसं बघायला गेलं तर तिचं काही चुकलंही नव्हतं. एका बंदिस्त वातावरणात राहिल्यावर त्यातून बाहेर पडण्याची इच्छा सगळ्यांना होतेच ना. आमचे दादा काही गोष्टींच्या बाबतीत अति करायचे, त्याचाच परिणाम म्हणून अरु अविनाशच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. अविनाश अरुला का सोडून गेला असेल?"

स्वराली म्हणाली,

"माहीत नाही. मावशी आईंचा निर्णय खरंच चुकीचा होता का?"

अवंतिका म्हणाली,

"जेव्हा अरु तुम्हाला सगळी कथा सांगेल, तेव्हा ती चुकली की नाही? याचं उत्तर मिळेल."

चहा पिऊन झाल्यावर स्वरालीने घरातील कामे आटोपून घेतली. सर्वांसाठी नाश्ता बनवला. दीप्ती स्वरालीच्या मदतीला आली होती. एव्हाना अरुंधती सह सगळेच जण आपापले आवरुन नाश्ता करण्यासाठी जमले होते. नाश्ता करुन झाल्यावर अरुंधतीने पुढील कथा सांगायला सुरुवात केली.

"दादांनी आम्हा मुलींवर खूप बंधने घातली होती. मी घरात मोठी असल्याने जरा जास्तच बंधने माझ्यावर लादली गेली होती. अवंतिका, अनुराधा, कल्पना या तिघींमधील कोणीही चुकलं तरी बोलणे मलाच बसायचे, कारण मोठी बहीण म्हणून त्यासाठी मला जबाबदार धरण्यात येत होते. मला सतत दादांची कटकट ऐकून कंटाळा यायला लागला होता. मी या सगळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होते.

अशातच अविनाश माझ्या आयुष्यात आला. अविनाश त्याच्या वडिलांसोबत आमच्या घरी आला होता. दादांनी त्याला पुजा विधी शिकवण्यासाठी आमच्या घरी ठेऊन घेतले होते. अविनाश आमच्या सोबत देवळात येऊन पुजा व बाकीची कामे शिकू लागला होता. दादा माझ्यावर ओरडायचे, त्यावेळी अविनाशला ते अजिबात आवडत नव्हते. अविनाशच्या चेहऱ्याकडे बघून हे मला जाणवत होते. माहीत नाही कसं, पण अविनाश व माझ्यात एक वेगळंच नातं निर्माण होऊ लागलं होतं. 

अविनाशला आमच्या घरी येऊन महिना झाला असेल, त्यावेळची ही गोष्ट आहे. एके दिवशी दादांच्या आदेशानुसार मी व अविनाश आम्ही दोघेच मंदिरात गेलो होतो. संध्याकाळच्या वेळी मुसळधार पाऊस सुरु झाल्यामुळे मी व अविनाश मंदिरात अडकून पडलो होतो. 

अविनाशने मला त्याच्या मनात असलेल्या माझ्याबद्दलच्या भावना बोलून दाखवल्या. माझ्या नकळतपणे मी त्याला मिठी मारली. आम्ही दोघे एकमेकांचा हात हातात घेऊन रात्रभर दोघेच मंदिरात बसलो होतो, त्याच्या खांद्यावर डोके टेकवून केव्हा झोप लागली, हे मला सुद्धा कळले नाही. पहाटे पहाटे पाऊस उघडल्यावर त्याने मला उठवले, मग आम्ही दोघे घरी गेलो. त्या दिवसानंतर आम्ही दोघेजण एकांतात भेटण्याचा प्लॅन करायचो. अविनाशच्या रुपाने मला सुटकेचा मार्ग मिळाला होता.

आईचं दादांपुढे काहीच चालत नसल्याने तिने दादांना कधीच समजावून सांगितले नाही. त्यामुळे मला आईचा सुद्धा राग येऊ लागला होता. अविनाश त्याच्या घरी परतणार होता, म्हणून आम्ही दोघांनी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. आई व दादा सोडले असता अविनाश व माझे असलेले प्रेमसंबंध सगळ्यांना ठाऊक होते. अवंतिका, अनुराधा, कल्पना व व्यंकटेशने मला समजून सांगण्याचा निष्फळ प्रयत्न केला होता.

एके दिवशी पहाटे पहाटे मी व अविनाश घरातून पळून गेलो. सकाळच्या बसमध्ये बसून तालुक्याला पोहोचलो. अविनाशचा हात आपल्या हातात असल्यावर आपल्याला कशाचीच कमी पडणार नाही, असे वाटत होते. अविनाशच्या एका मित्राकडे काही दिवस राहिलो, मग देवळात जाऊन आम्ही दोघांनी लग्न केले. जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन काम मिळेल या आशेने आम्ही या शहरात आलो. अविनाश व मला एकाच कंपनीत नोकरी मिळाली होती. कंपनीचे क्वार्टर मिळाल्याने राहण्याची सोय झाली होती. 

दादा सोडून घरातील सर्वांची आठवण यायची, पण परतीचा मार्ग मी स्वतःहून बंद केला होता. सुरुवातीचे एक वर्ष खूप सुखात गेले होते. आपण अगदी योग्य निर्णय घेतला, असे वाटत होते. हातात थोडे पैसे आल्याने अविनाशला मित्रांच्या संगतीने दारुचे व्यसन लागले होते. मी त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो माझं काहीच ऐकत नव्हता. माझ्या सुखाला कोणाची तरी नजर लागली होती. अशातच मी गरोदर राहिले होते. अविनाश दररोज रात्री दारु पिऊन घरी यायचा. दररोज आमच्यात वाद व्हायचे. आमच्या कंपनीच्या मॅडम स्वभावाने खूप चांगल्या होत्या. त्यांना अविनाशची कंडिशन माहिती झाली होती. 

एके दिवशी अविनाश दारुच्या नशेत कंपनीत येऊन माझ्यावर हात उगारत होता. त्यावेळी मला सातवा महिना होता. मॅडमने त्याला थांबवले आणि कंपनीतून हाकलून दिले. मॅडमने माझी राहण्याची व्यवस्था त्यांच्या घरी केली. घरुन कंपनीचे काम करण्याची मुभा त्यांनी मला दिली. माझी डिलिव्हरी त्यांच्याच घरी झाली. त्या काळात मॅडमची मला खूप मदत झाली.

सुरज दोन महिन्यांचा झाल्यावर मॅडमने माझी रहाण्याची व्यवस्था दुसरीकडे केली. मॅडमने त्यांच्या दुसऱ्या कंपनीत मला नोकरी दिली. सुरजला कामावर सोबत घेऊन जाण्याची मुभा दिली. अविनाश त्या दिवसापासून कुठे गेला? हे मला माहित नाही. मी सुरजकडे बघून आयुष्य जगत आले. मी घरातून पळून जाऊन खूप चुकीचा निर्णय घेतला होता आणि काही दिवसांतच त्याची शिक्षा मला मिळाली. मी घेतलेल्या चुकीच्या निर्णयाची शिक्षा माझ्या बहिणींना भोगावी लागली असेल, याची कल्पना मला आहे. शक्य झालं तर मला माफ करा."

अरुंधतीने हात जोडून सर्वांची माफी मागितली.

क्रमशः

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all