दृष्टिकोन माणसे पाहण्याचा ....

Durashtikon

दृष्टिकोन माणसे पाहण्याचा....                                        माणसं कमावण्याची जबरदस्त नशा असते वयाच्या एका टप्प्यापर्यंत.आपल्यापैकी अनेकांना ती असते. माणसं जोडणं ही छानच गोष्ट, अनेकांसाठी ती एक अभिमानाची बाब असते. जरूर असावी. चांगला स्वभाव आणि उत्तम चारित्र्य याच्या जोरावर अनेक माणसं जोडावीत, जपावीत. पण हे करताना ही जपलेली माणसं आपल्यालाही 'जपत' आहेत ना हे बघणं फार महत्त्वाचं असतं. अनेकदा आपल्याला वाटून जातं, अरे बापरे...! ही अमुक इतकी 'भारी' व्यक्ती आपल्यासोबत संपर्क ठेवून आहे. म्हणजे किती छान! त्या संपर्कामागे विशुद्ध भाव आहे ना, की पुढे जाऊन आपला 'स्टेपणी' म्हणून उपयोग केला जाणार आहे हे बघायला हवं. अशा अनेक अनुभवांतून आपण जात असतो, त्यामुळे 'हुरळून' जाणं टाळायला हवं. तुम्हाला माणसं जोडावीशी वाटतात हा तुमचा चांगुलपणा असतो, पण त्याला तुमचा भावनिक कमकुवत पणा समजणारे खूप लोक असतात. त्यामुळे आपल्या चांगुलपणाचं इतकंही प्रदर्शन करू नये की तो संशयास्पद वाटू लागेल. अनेकदा एखादी व्यक्ती आपल्याला अत्यंत जवळची, जिवलग वाटत असते, आपली सुख दुःखं आपण तिला सांगत असतो. पण आपल्या वेदनांचा वापर पुढे ती आपलं मन:स्वास्थ्य उद्ध्वस्त करणारा दारुगोळा म्हणून देखील करू शकते. माणसांना इतकंही पोटाशी धरू नये की ते पुढे आपल्यावर लाडाने दुगाण्या झाडू लागतील. माणसं जोडताना कोणाला कोणत्या पायरीपर्यंत जवळ येऊ द्यावं हे ठरवून घ्यायला हवं. लायकी नसलेल्या एखाद्या व्यक्तीला फार जवळ केल्याचा अतोनात त्रास आयुष्यभर भोगावा लागू शकतो. लोक तुम्हाला खांदा द्यायला नसतात बसलेले, अनेकदा तुम्ही रडण्यासाठी त्यांचा खांदा जवळ करता, हे त्यांना एंटरटेनिंग वाटू शकतं. दुःखावर बांधावीत अशी माणसं फार विरळा असतात. मन मोठं करून समोरच्याला मदत करणं, त्याचं चांगलं व्हावं यासाठी प्रयत्न करणारी भली माणसं जगात आहेत, नक्कीच आहेत. पण भसाभस माणसं जमवण्याच्या नादात दाण्यांपेक्षा बणग्याच जास्त गोळा होतात. त्यातली एखादी आयुष्यभर कुसळा सारखी टोचत राहते, असह्य वेदना देते. 'भारावून जाणं' ही एक फारच भाबडी गोष्ट आहे.कोणाच्या एवढ्या तेवढ्या गोष्टीने भारावून जाणारी माणसं आपल्यात असतात. फार जवळ जाऊन बघितलं की समोरच्या माणसाचे पायही मातीचे आहेेत हे लक्षात येतं आणि अतोनात निराशा वाट्याला येते. माणसांतलं चांगलं ते जरूर वेचावं, त्याचं कौतुक करावं,जमल्यास आचरणात ही आणावं. काही माणसं समोरून फार छान वाटतात, आदर्श वाटतात. आपण त्यांना आपलं मानत राहतो, फॉलो करत राहतो. आणि एका विवक्षित क्षणी कळतं, की काहीही घेणं देणं नसताना ही माणसं आपल्या सोबत किती खोटं, कृतक वागत होती, मागे डावपेच करत होती.मग जीव उबतो, त्या नात्याची शिसारी येऊ लागते. यावर पर्याय काय? 'माणसांच्या फार जवळ न जाणे'. लांबून जे दिसतं त्यात आनंद मानावा. माणसं आपल्या समोर जे वागतात, बोलतात ते आणि तेवढंच खरं मानून पुढे निघावं, फार खोलात जाऊन गोष्टी जाणून घेण्याचा हट्ट करू नये. अपेक्षा भंग वाट्याला येतो. माणसं कमावणं म्हणजे त्यांना आपल्या आयुष्यात हस्तक्षेप करण्याचे अधिकार देणं नव्हे. काही व्यक्ती आपले पणाच्या हक्काने काही गोष्टी सांगत असतात. त्या नम्रपणे ऐकून घेण्याची क्षमता ठेवावी.चार कटू गोष्टी ऐकाव्या लागल्या तरी त्यातून पुढे आपला भलंच होणार आहे हे आपण जाणून असावं. अर्थात आपलं खरोखरच भलं व्हावं म्हणून स्वतःचा वेळ देऊन आपला कान पकडणारं कोण आणि आपलं भलं पाहून पोटदुखी होणारे कोण यातला फरक आपल्याला ओळखता यायला हवा. माणसं जरूर जोडावीत, जपावीत,एकमेकांच्या भावना आपल्याला दुखावू शकेल इतके अधिकार कोणाला देऊ नयेत. जगायला माणसं लागतातच, पण 'आतल्या' वर्तुळात कोणती माणसे घ्यायची आणि 'बाहेरच्या' वर्तुळात कोणती माणसं ठेवायची याचं गणित एकदा जमायला लागलं की सोपं होतं जगणं आणि हेच जमणं आणि जमवणं महत्वाचं असत.