दूर

Gosht aai vadilanpasun duravlelya mulachi

रिया आणि राकेश दोघेही चांगल्या पदावर काम करत होते. दोघांना एकमेकांसाठीही वेळ नव्हता.  घरासाठीही आणि स्पेशली वेद, म्हणजेच त्यांच्या एकुलत्या एक मुलासाठीही. राकेशची आई वेदला दिवसभर सांभाळायची. मात्र जसा वेद मोठा होत होता तसे, त्याला आई -बाबा आपल्या जवळ हवेसे वाटू लागले. आपल्या लहानग्या मित्र -मैत्रिणींना घेऊन त्यांचे आई -बाबा फिरायला जात, त्यांच्यासोबत मजा -मस्ती करत. हे पाहून चार वर्षांचा वेद आपल्या आजीकडे हट्ट करे, "आई -बाबा हवेत म्हणून." मग आजी त्याला समजावे, मायेने जवळ घेई. पण वेदचे समाधान होत नसे. हल्ली फारच मस्तीखोर, दंगेखोर झाला होता वेद. आता आजीलाही ऐकत नव्हता.

मग राकेशच्या आईने रिया आणि राकेश दोघांना समजावून पाहिले, पण त्यांच्या कामाचा व्याप, ताण इतका होता की, दोघांनाही वेदसाठी वेळ काढणे शक्य नव्हते.

थोड्या विचारांती सर्वानुमते असे ठरले की, 'वेदला सकाळच्या शाळेनंतर दोन-तीन तास पाळणाघरात ठेवावे, म्हणजे आजीला थोडी विश्रांती मिळेल.' त्यानुसार त्याला ओळखीने जवळच्या एका पाळणाघरात घातले गेले.

पाळणाघरात जाताना पहिल्यांदा वेदने खूप दंगा केला. पण आपल्यासारखीच लहान मुलं आपल्या आई- बाबांना सोडून इथे येतात, हे कळल्यावर वेद त्या मुलांत रमून गेला. तिथल्या मावशी त्या छोट्या छोट्या मुलांची इतकी छान काळजी घेत होत्या, की मुले छान रमून जात इथे.
आता हे पाळणाघर म्हणजे वेदसाठी एक दुसरे घरचं झाले. सुट्टीच्या दिवशीही वेद तिथे जाण्याचा हट्ट करी. वेद तिथे रमल्याने आजीलाही आता थोडा मोकळा वेळ मिळू लागला आणि रिया आणि राकेश वेदच्या बाबतीत आता निवांत झाले.

रोज पाळणाघरातून वेदला घरी घेऊन जायला आजी येई. बाकी मुलांचे आई किंवा बाबा येत. त्यामुळे इथेही तो आपल्या आई -बाबांना मिस करत होता, तर रिया आणि राकेश आपल्या कामाच्या व्यापात जणू विसरूनच गेले होते, की आपल्याला एक मुलगा आहे!

हळूहळू वेदची दंगा ,मस्ती कमी झाली, तो काहीसा अबोल बनला. मनातूनही खूप एकटा पडत चालला होता. अभ्यास मात्र मन लावून करू लागला.
साधारण सहावी -सातवीपर्यंत वेद पाळणाघरात जात होता. तिथेच आपला शाळेचा अभ्यास पूर्ण करून आपल्यापेक्षा लहान मुलांना सांभाळत होता.

आता पाळणाघरातल्या मावशी थकल्या, तसे पाळणाघर बंद झाले. मग मात्र शाळेनंतरचा मोकळा वेळ वेदला खायला उठे. आजीही थकली असल्याने ती वेदला पूर्वीसारखा वेळ देऊ शकत नव्हती. मग मित्र -मैत्रिणी मोजक्याच असलेल्या वेदने आता स्वतःला अभ्यासात गुंतवून घेतले.

वेद जसा दहावीत गेला, तशी अचानक रियाला आपल्या मुलाची आठवण झाली. 'दहावी म्हणजे महत्वाचं वर्ष..!' रियाने आपला व्याप थोडा कमी केला आणि ती वेदला जास्ती जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करू लागली. त्याच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करू लागली. पण वेदला आपल्या आई -वडिलांशी संवाद साधायची सवयच नव्हती, त्यांबरोबर वेळ घालवायची सवय नव्हती, त्यामुळे तो अस्वस्थ झाला. आपल्या 'एकट्या जगात' कोणी डोकावून पाहतो आहे, ही कल्पनाच त्याला सहन होईना. त्यामुळे त्याची चिडचिड तर वाढलीच शिवाय उद्धटपणाचा शिक्काही त्यावर बसला. याच दरम्यान आजी 'गेल्याने ' वेद अगदी एकटा पडला.
राकेशही आता वेदला वेळ देण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला बोलत करण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र वेद आता रिया आणि राकेशपासून लांब राहणे पसंत करू लागला.

वेदची दहावीची परीक्षा झाली. निकाल लागला आणि वेदने दुसऱ्या शहरात एडमिशन घेण्यासाठी हट्ट धरला. त्याला मोकळेपणाने जगायचं होत. बाहेरचं जग अनुभवायचं होतं.
पण रिया आणि राकेशला हे मान्य नव्हतं. वेदने इथेच राहावे, त्यांच्या सोबत, ही त्यांची अपेक्षा होती. "आता वेदने आपल्या सोबत राहावे, आपल्यासाठी वेळ द्यावा, आई -बाबा म्हणून!" या अपेक्षेने, साहजिकच त्यांनी वेदच्या निर्णयाला विरोध केला.

पण वेद आपला निर्णय बदलणार नव्हता. जेव्हा त्याला गरज होती, आई -वडिलांची, तेव्हा त्याला तो हक्काचा वेळ कधीच नाही मिळाला. तो आपल्या आई -वडिलांपासून कधीच दूर गेला होता..खूप दूर.